युनिव्हर्सल पिक्चर्स : अमेरिकेत १९१२ साली कार्ल लेम्ली यांनी स्थापन केलेली प्रसिद्ध चित्रपटनिर्मिती संस्था. चित्रपटव्यवसायात ज्या आठ बहुराष्ट्रीय संस्था अग्रभागी आहेत, त्यांत युनिव्हर्सल पिक्चर्स ही सर्वांत जुनी म्हणता येईल. कार्ल लेम्ली यांनी १९०६ सालापासून चित्रपट प्रदर्शन व वितरण व्यवसाय सुरू केला. त्या सुमारास अमेरिकेत चित्रपटाच्या एकाधिकारासंबंधीचा खटला चालू असल्याने वितरकांना आणि प्रदर्शकांना चित्रपट मिळेनासे झाले होते म्हणून कार्ल लेम्ली यांनी १९०९ साली स्वतःचीच इंडिपेंडन्ट मोशन पिक्चर्स ही कंपनी काढून चित्रपटनिर्मिती सुरू केली. त्यातूनच पुढे १९१२ साली युनिव्हर्सल पिक्चर्स ही कंपनी उभी राहिली. या कंपनीतर्फे १९१५ साली कॅलिफोर्नियात सॅन फॅर्नन्दो व्हॅली येथे युनिव्हर्सल सिटी या नावाचे जगातील सर्वांत मोठे चित्रपटनिर्मितिगृह उभारण्यात आले त्याचा परिसर २३० एकरांचा (सु. ९३ हेक्टर) होता. त्यात स्टुडिओ व बाह्य चित्रणाची कायमची व्यवस्था करण्यात आली होती. साधारणपणे १९१९ पासून पुढे या कंपनीचे चित्रपट जगभर दाखविले जाऊ लागले. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी अचूक हेरणारी अर्व्हिंग थालबर्गसारखी कर्तबगार माणसे कंपनीत असल्याने बहुतेक सर्व चित्रपट लोकप्रिय झाले. भारतातही या कंपनीचे चित्रपट १९१७ सालापासून सातत्याने दाखविण्यात येत आहेत. लॉन चेनीसारख्या बहुरूपी नटाचे हंचबॅक ऑफ नोत्र दाम (१९२३) किंवा फॅटम ऑफ द ऑपेरा (१९२५) सारखे चित्रपट जगभर गाजले, तथापि १९३० सालातील युद्धविरोधी चित्रपट ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट विशेष गाजला. त्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारही लाभला. दरम्यान कार्ल लेम्ली यांच्या विचित्र कारभारामुळे कंपनी तोट्यात जाऊ लागली त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापन कार्ल लेम्ली यांच्या हातातून १९३६ साली काढून घेण्यात आले. नवीन व्यवस्थापकांनी थोड्याच अवधीत कंपनी पुन्हा एकदा नावारूपाला आणली. दुसऱ्या महायुद्धानंतर इंटरनॅशनल पिक्चर्सबरोबर एकीकरण झाल्याने १९४६ सालापासून कंपनी युनिव्हर्सल इंटरनॅशनल या नवीन नावाने ओळखण्यात येऊ लागली. पुढील आठ दहा वर्षांत कंपनीने अनेक उत्तम चित्रपट निर्माण केले. १९८५ मध्ये दिवंगत झालेला देखणा नट रॉक हडसन किंवा अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन हे ह्याच काळात कंपनीत नट म्हणून चमकले. त्याच सुमारास अमेरिकेत दूरचित्रवाणीचे नवीन माध्यम झपाट्याने विकसित झाले त्यामुळे कंपनीने दूरचित्रवाणीसाठी चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली. १९५९ मध्ये पुन्हा एकदा कंपनीच्या व्यवस्थापनात बदल झाला आणि म्यूझिक कॉर्पोरेशन ऑफ अमेरिका या कंपनीने युनिव्हर्सलचा ताबा मिळविला. कंपनी चित्रपटसृष्टी व दूरचित्रवाणी या क्षेत्रांत निर्मिती करते. या कंपनीचे चित्रपटनिर्मितीगृह हे पर्यटकांचे एक आकर्षण ठरले आहे.
धारप, भा. वि.