राजगीर : (राजगृह). बिहारमधील प्राचीन अवशेषांचे एक प्रसिध्द स्थळ व प्राचीन मगध साम्राज्याची राजधानी. ते नालंदा जिल्ह्यात पाटण्यापासून आग्नेयीस सु. ९५ किमी. वर व बिहारशरिफच्या नैर्ॠत्येस २२ किमी.वर व नालंदाच्या दक्षिणेस १० किमी.वर वसले आहे. वैभार, विपुल, रत्न, छट, शल्ल, उदय व सुवर्ण या सात पर्वतरांगांनी राजगीर वेढलेले आहे. लोकसंख्या १८,००९ (१९८१). प्राचीन वाङ्मयात याचा उल्लेख चणकपूर, ऋषभपूर, कुशाग्रपूर, क्षितिप्रतिष्ठत, गिरिव्रजपूर, बृहद्रथपूर आदी भिन्न नावांनी केलेला आढळतो. महाभारत काळात येथे जरासंधाची राजधानी होती आणि बौध्द काळात ही नगरी मगधाची राजधनी होती. गौतम बुध्द आणि महावीरांनी या स्थळाला अनेक वेळा भेट दिली. फाहियान आणि ह्यूएनत्संग या चिनी प्रवाशांनी या नगरीचे विस्तृत वर्णन केलेले आहे.

त्यातील बहुतेक स्थळे राजगीर नगरीच्या परिसरात दृष्टोत्पत्तीस येतात. शिशुनाग वंशातील बिंबिसार याने येथे राजधानी स्थापली. त्याचा मुलगा आजातशत्रू याने रागीरमध्ये प्रासाद, स्तूप इ. वास्तू बांधल्या. बुध्दघोषाने या नगरीला चौसष्ट लहान दरवाजे व छत्तीस मोठी द्वारे होती आणि नगराभोवती ४० ते ५० किमी. लांबीची तटबंदी होती, असे नमूद केले आहे. मगधाची राजधानी पाटलिपुत्र येथे हलविल्यानंतर राजगीरचे राजकीय महत्त्व हळूहळू लोप पावले. जैन, बौध्द व हिंदू यांचे हे पवित्र तीर्थस्थान असून विसाव्या शतकात येथे ब्रम्हदेश, जपान, तिबेट, श्रीलंका वगैरे बौध्दधर्मीय धनिकांनी अनेक वास्तू व स्तूप बांधले आहेत.

राजगीर : तटबंदीचे अवशेष.राजगीरला अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी १९०५–०६ मध्ये प्रथम उत्खनन केले. त्यानंतर शास्त्रशुध्द उत्खनन अमलानंद घोष यांनी १९५० मध्ये केले. या उत्खननात अनेक अवशेष उपलब्ध झाले. त्यांपैकी मणिनाग सर्पदेवतेची मूर्ती, मणियार मठ हे वैशिष्ट्यपूर्ण असून इ. स. पू. ५०० ते इ. स. १०० दरम्यानच्या वस्तीचे चार कालखंड आढळून आले. यांशिवाय दगडगोट्यांची तटबंदी, किल्ला, जैन मंदिरे, सोमनाथ-सिध्दनाथ शिवमंदिरे इ. अवशेष महत्त्वपूर्ण असून येथे गरम व गार पाण्याची अनेक कुंडे आहेत. त्यांपैकी ब्रम्हकुंड, व्यासकुंड, सप्तधारा, गंगायमुनाकुंड ही प्रसिध्द आहेत. सांप्रत येथे धर्मशाळा व अतिथिगृहे असून भारतीय व परदेशी पर्यटकांचे ते केंद्र झाले आहे. गृध्दकूट या बुध्दाच्या निवासस्थानाजवळ कुंडांशेजारी ब्रम्ही व जपानी बौध्द साधूंनी दोन भव्य स्तूप बांधले आहेत. त्यांपैकी जपान-भारत मैत्रीचे प्रतीक असलेला रत्नगिरी टेकडीवरील शांतिस्तूप सु. पन्नास मीटर उंचीचा आहे. अलीकडे रत्नगिरी टेकडीवर यात्रेकरूंना नेण्या-आणण्यासाठी विजेवर चालणारा रज्जुमार्ग तयार केला आहे.

वेणुवनात बुध्दाचा एक भव्य पुतळा आहे. तेथील गूळ आणि निरा प्रसिध्द आहेत.

संदर्भ : 1. Ghosh, A.A. Guide to Rajgir, Delhi, 1951.

2. Kumar N.Ed. Bihar District Gazetteers : Patna, Patna, 1970.

3. Law, B. C. Rajagriha in Ancient Literature. Memoris of the Archaeological Survey of India, No.58. Delhi, 1938.

4. Sen D.N. Rajgir and Its Neighbourhood, Patna, 1924.

देव, शां. भा