रेडिंग – २ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील प्रमुख शहर व वर्क्स परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ७६,६८६ (१९८०). हे राज्याच्या आग्नेय भागात, फिलाडेल्फियाच्या वायव्येस ९३ किमी. अंतरावर स्कूलफिल नदीतीरावर वसलेले आहे. पेनसिल्व्हेनिया डच (पेनसिल्व्हेनिया राज्यात स्थायिक झालेले द. जर्मनीतील लोक) यांची वसती असलेल्या कृषी क्षेत्राच्या मध्यभागातील या शहराची स्थापना १७३३ मध्ये करण्यात आली. १७४८ मध्ये निकोलस स्कल याने याची रचना केली व पुढे चारच वर्षांत नव्याने स्थापन झालेल्या वर्क्स परगण्याचे हे मुख्य ठिकाण बनले. १८४७ मध्ये याला शहराचा दर्जा प्राप्त झाला.

रेडिंग हे एक महत्त्वाचे व्यापारी, औद्योगिक व लोहमार्ग वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे. वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू, लोह आणि पोलाद, यंत्रांचे सांगाडे, विणमाल इ. तयार करणे हे येथील महत्त्वाचे उद्योग आहेत. राज्यातील औद्योगिक शहरांत हे पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. सुरुवातीला लोह पोलाद उत्पादन केंद्र म्हणून, तर क्रांतियुद्धाच्या काळात तोफांच्या निर्मितीचे व पुरवठ्याचे प्रमुख केंद्र म्हणून हे प्रसिद्ध होते. यादवी युद्धात हे देशाचे सेनासामग्री केंद्र होते. युद्धाची पार्श्वभूमी, औद्योगिक विकास, कालव्यांची आणि लोहमार्गांची बांधणी यांमुळेच शहराच्या विकासास गती आली. समाजवादी शासनव्यवस्था स्वीकारणारे (१९२९) ही महाविद्यालये असून, सार्वजनिक वस्तुसंग्रहालय, कलावीथी, खगोलालय, पेनसिल्व्हेनिया राज्य विद्यापीठाचा वर्क्स विभाग (१९५८) व एक इतिहासविषयक संस्था आहे. येथील डॅन्येल बूनचे जन्मस्थान, शहराजवळील मौंट पेनवरील जपानी पद्धतीचा पॅगोडा व निरीक्षण मनोरा ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.

चौधरी, वसंत