रेझिस (राझी): (८६५–२६ डिसेंबर ९२५ॽ) पर्शियन किमयागार ,वैद्य, धार्मिक टीकाकार व तत्त्वज्ञ. यांचे संपूर्ण नाव अबु-बकर मुहम्मद इब्न झकारिया अर (अल) राझी असे आहे. विशेषतः त्यांच्या वैद्यकीय विचारांचा प्रभाव पाश्चात्य जगात शेकडो वर्षे टिकून राहिला होता.

रेझिस यांचा जन्म तेहरानजवळच्या रायी, पर्शिया (आता इराण) येथे झाला. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी अस्सल माहिती थोडीच उपलब्ध आहे. सुरूवातीला त्यांनी किमया व भौतिकी या विषयांचा अभ्यास केला. वयाच्या तिसाव्या वर्षानंतर त्यांनी वैद्यकाचा अभ्यास करायला सुरूवात केली व त्यांचे वैद्यकीय शिक्षण मुख्यतः बगदादला झाले. त्यांनी रायी येथील नगरपालिकेच्या रूग्णालयात व काही काळ बगदाद येथील रूग्णालयात प्रमुख म्हणून काम केले. इस्लामी जगतातील सर्वात थोर वैद्य म्हणून त्यांची गणना होते. ⇨हिपार्कस व ⇨गेलेन यांच्याप्रमाणे ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रोग्यापर्यंत नेऊन वैद्यकाचे धडे देत असत. त्यांना संगीताची उत्तम जाण होती. ते स्वतः गात असत व ल्यूट हे विणेसारखे वाद्य वाजवीत असत. त्यांनी आयुष्यभर संगीताचा आस्वाद तर घेतलाच, शिवाय संगीताचा विश्वकोश संकलित करण्यास मदत केली.

वैद्यक हा केवळ व्यवसाय नसून एक तत्वज्ञान (जीवनप्रणाली) आहे,असे त्यांचे मत होते. श्रीमंत व गरीब रोग्यांकडे प्रत्यक्ष जाऊन ते उपचार करीत असत. रोगी व वैद्य यांच्यातील परस्परसंबंधांना ते अत्यंत महत्व देत असत. तुमचा वैद्य तुम्हीच निवडा व मग त्याच्यावर विश्वास ठेवा, असे ते रोग्यांना सांगत असत. वैद्यकीय उपचारांत आहाराला अतिशय महत्त्व असते, असे त्यांचे म्हणणे होते. शस्त्रक्रियेच्या वेळी टाके घालण्यासाठी प्राण्यांची आतडी वापरणे अस्थिभंगाच्या वेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करणे या तसेच प्रकाशाला डोळ्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो. इ. गोष्टी त्यांना माहीत होत्या.

वैद्यक, शल्यतंत्र, गणित, ज्योतिषशास्त्र, बुद्धिबळ, संगीत, धर्म व तत्वज्ञान या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले होते. त्यांनी २३० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली होती व त्यांपैकी ११७ वैद्यकाविषयीची होती. यात त्यांनी स्वतःची मते व वैद्यकीय व्यवसायातील अनुभव विशद केले आहेत. त्यांचे तत्वज्ञानविषयक व धर्मविरोधी बहुतेक लेखन काळाच्या ओघात नष्ट झाले. जे राहिले (उदा., द ट्रिक्स ऑफ द प्रॉफेट्) त्याच्याकडे शेकडो वर्षे दुर्लक्ष झाले होते. मात्र विसाव्या शतकात त्याचे महत्व लोकांच्या लक्षात आले. किताब अल तिबब अल-रूहानी (स्पिरिच्युअल फिजिक ऑफ रेझिस किंवा द बुक ऑफ स्पिरिच्युअल फिजिक) आणि सिरत अल-फिलसफ (द फिलॉसफर्स चे ऑफ लाइफ) ही त्यांची नीतिशास्त्रावरची पुस्तके असून त्यांपैकी पहिले विशेष लोकप्रिय झाले होते.

अल-हाषी (लॅटिन आवृत्ती काँटिनन्स, १४८६ काँप्रिहेन्सिव्ह बुक ऑफ मेडिसीन ) हा २५ खंडांचा व्यापक असा वैद्यकीय विश्वकोश आहे. यात ग्रीक, सिरियन, प्राचीन अरबी व काही भारतीय वैद्यकीय माहितीही संकलित केली आहे. यामध्ये त्यांच्या आयुष्यभराच्या निदानविषयक नोंदीही दिलेल्या आहेत. १५०० सालाच्या आधीचा हा सर्वांत मोठा व जाड असा छापील ग्रंथ होता.

किताब अल मन्सुरी (लॅटिन लायवर अल-मन्सोरिस) या पुस्तकाचे नाव रायीचा सत्ताधीश मन्सूर इब्न इशाक यांच्यावरून पडले असून यात रेझिस यांनी आधीच्या काळात लिहिलेल्या विविध लेखांचे संकलन केलेले आहे. १४७६ साली प्रथम छापलेला हा ग्रंथ संपूर्ण सोळाव्या शतकात यूरोपामधील जवळजवळ सर्व विद्यापीठांतून पाठ्यपुस्तक म्हणून वापरला जात होता.

ए ट्रिटाइझ ऑन द स्मॉल पॉक्स अँड मीझल्स या त्यांच्या पुस्तकाच्या आधीही देवीच्या रोगाचे वर्णन करण्यात आलेले होते परंतु यातील वर्णन नाविन्यपूर्ण व जवळजवळ आधुनिक वर्णनासारखे आहे. त्यामुळे या छोट्या पुस्तकाची (व्याप्तिलेखाची) गणना अभिजात वैद्यकीय लेखनात केली जाते. लॅटिन, बायझंटिन, ग्रीक व विविध आधुनिक भाषांत याचा अनुवाद झालेला आहे.

रेझिस यांनी आत्मचरित्र लिहिले असून त्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील घटनांना महत्व दिलेले नाही तर त्यात त्यांनी आपल्या जीवनाविषयीच्या तत्वज्ञानाचे दमदारपणे समर्थन केलेले आहे. यांशिवाय त्यांनी सिकेट ऑफ सिकेट् (जर्मन अनुवाद, १९३७) हे किमयेवरचे पुस्तक, तसेच पूर्णपणे लहान मुलांच्या रोगांवरचा एक विवेचक ग्रंथही लिहिला होता. त्यांच्या निदानीय निरीक्षणांचे संपादन एम् मायरहोफ यांनी केले होते.

आपण प्लेटोवादी आहोत असा रेझिस यांचा दावा होता आणि ते सॉक्रेटिस यांचे इस्लामी प्रणेते (वारस) मानले जातात. रेझिस यांचे तत्वज्ञानविषयक काही विचार असे होते: काळ ही प्रवाही वस्तू असून त्याचे निरपेक्ष व मर्यादित असे प्रकार असतात. पैकी निरपेक्ष काळ हा विश्वनिर्मितीपूर्वीही होता आणि विश्वाच्या अंतानंतरही असणार आहे. ते परमाणुवादी होते, म्हणजे विश्वाच्या निर्मितीपूर्वीचे निरपेक्ष द्रव्य हे अविभाज्य म्हणजे तुकडे न होऊ शकणाऱ्या अणूंचे बनले होते, असे मानणारे होते. या द्रव्याचे निर्वातामधील कणांशी भिन्नभिन्न प्रमाणामध्ये मिश्रण होऊन पृथ्वी (जमीन) पाणी, हवा, मूळ अग्नी व स्वर्गीय मूलतत्व ही पंचमहाभूते निर्माण झाली, अशी त्यांची धारणा होती. उदा., हवा या मूलतत्वात निर्वाताच्या कणांचे प्रमाण जास्त असते. ते स्वतंत्र विचारसरणीचे तत्वज्ञ होते व त्यांनी प्रचलित धर्मावर टीका केली होती. शिवाय प्रथम किमयेसारख्या विषयात त्यांनी रस घेतला होता. यांमुळे त्यांच्यावर वैचारिक हल्ले झाले आणि परिणामी त्यांच्या वैद्यकशास्त्रातील पात्रतेविषयीही शंका घेण्यात आल्या होत्या.

आयुष्याच्या अखेरीस त्यांना हलाखीत जीवन कंठावे लागले. मोतीबिंदूमुळे शेवटी शेवटी त्यांना अंधत्व आले होते. ते रायी येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.