रेडवुड : प्रकटबीज वनस्पतीच्या (ज्यांची बीजे उघडी असतात अशी वनस्पतींच्या ) गटातील शंकुमंत [⟶ कॉनिफेरेलीझ] वनस्पतींच्या गणात रेडवुड या नावाच्या काही वृक्षांचा समावेश होतो. वर्गीकरणाच्या संदर्भात त्यांचा अंतर्भाव टॅक्सोडिएसी कुलात आणि सेक्कोया ह्या एकाच प्रजातीत केला जात असे परंतु हल्ली सेक्कोयाडेन्ड्रॉग आणि सेक्कोया अशा दोन प्रजाती मानल्या जातात या प्रत्येक प्रजातीत एकेक जाती असून सेक्कोया सेंपर्व्हिरेन्स व सेक्कोयाडेन्ड्रॉन जायगॅन्शियम या नावांनी त्या जाती ओळखल्या जातात. से. जायगॅन्सिय़मचे इंग्रजी नाव ‘बिग ट्री’ असून रेडवूड या नावाचा वापर फक्त से. सेंपर्व्हिरेन्स या वृक्षाकरिता केलेला आहे.
रेडवूड : हे वृक्ष सदापर्णी, काहीसे त्रिकोणी आकाराचे व मोठे असून उ. अमेरिकेच्या पॅरिफिक किणाऱ्याजवळ आढळतात. भारतात व इतरत्र ते आणून शोभेकरिता लावले आहेत तमिळनाडूत कोडईकानल टेकड्यांत त्यांची लागवड केली असून त्यांना शंकू [विशिष्ट प्रकारचे फुलोरे ⟶ पुष्पबंध] येत आहेत. अमेरिकेत त्यांची उंची सु. ९५ मी. पर्यंत किंवा थोडी अधिक वाढते व त्यांचा व्यास तळाशी सु. ६ मी. किंवा अधिक आहे.तेथे हे वृक्ष खडकाळ उतारावर आणि दमट दऱ्यांतील गाळाच्या जमिनीत सु. ५००–१,००० मी. उंचीवर वाढून त्यांची वने बनतात. पूर्ण वाढ झालेल्या वृक्षावर जमिनीपासून सु. ३२ मी. उंचीपर्यंत फांद्या नसतात त्या जून झाल्यामुळे गळून गेलेल्या असतात. माथा अरूंद असून फांद्या सरळ व काहीशा लोंबत्या असतात. खोडाची साल जून झालेल्या वृक्षावर सु. ३० सेंमी .जाड, लालसर तपकिरी ,धागेदार, भेगाळ असून कीटक, कवक (बरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती) व अग्नी यांमुळे तिचा नाश होत नाही. हा वृक्ष तोडल्यावर उरलेल्या खुंटापासून सु. ३०–६० वर्षांत नवीन आलेली फूट जुन्या वृक्षाप्रमाणे व्यापारी दृष्ट्या उपयुक्त असते मात्र अग्नीपासून तिचे संरक्षण करावे लागते. पाने वरच्या बाजूस गर्द हिरवी व खाली पांढरट असून त्यांचा आकार रेषाकृती (अरूंद व लांबट) व लांबी सु. २·५ सेंमी असते पाने सतत राहणारी व एकाआड एक असतात. पुं- व स्त्री-शंकू (प्रजोत्पादक इंद्रिये) २·५–५ सेंमी लांब, लंबगोल व एकाच झाडावर असून स्त्री -शंकू फांद्यांच्या टोकांस येतात व पहिल्या शरद ऋतूत पक्क होतात. पराग पंखयुक्त नसतात. बीजोत्पादन प्रचंड असले, तरी २५ टक्क्यांपेक्षा अधिक बिया न रूजल्याने वनात रोपटी फार कमी आढळतात नवीन उत्पत्ती शाकीय पद्धतीने अधिक असते. तथापि नवीन लागवडीस बियांचा वापर करतात. बिया दीर्घवृत्ताकृती, चपट्या, अरूंद व सु. ६ सेंमी लांब असून दलिका असतात. याचे रसकाष्ठ पातळ व पांढरे असून ते त्वरित खराब होते परंतु मध्यकाष्ठ मजबूत, टिकाऊ, नरम, ठिसूळ व लालसर तपकिरी असते त्यावरूनच इंग्रजी नाव पडले असून ‘रक्तदारू’ हे संस्कृत नाव सुचविले आहे. हे लाकूड वाळवी, इतर कीटक आणि कवक यांमुळे खराब होत नाही. लाकूड कातीव वस्तू, बांधकाम, सजावटी समान, कुंपणाचे खांब,पाणी व दारू साठविण्याच्या टाक्या, कागदाचा लगदा इ. विविध प्रकारे वापरात आहे. स्वच्छ केलेले वस्त्रनिर्मितीचे सु. ९·९ मिमी. लांब धागे, लोकर, कापूस इत्यादींत मिसळून वापरतात. सालीत २·८% टॅनीन असते.
बिग ट्री: (इं. जायंट सेक्कोया, मॅमथ ट्री सेक्कोया जायगॅन्शिया सेक्कोयाडेन्ड्रॉन जायगॅन्शियम). अमेरिकेच्या वायव्य भागातील किनारपट्टीजवळच्या जंगलात (सिएरा नेव्हाडाच्या प. उतरणीवर सु .९००–२,६०० मी. उंचीवर) हे प्रचंड व्यापाचे वृक्ष आढळतात. यांची पाने खवल्यासारखी [⟶ जूनिपर] असतात. मध्यकाष्ठ फिकट जांभळे-तपकिरी आणि रेडवुडपेक्षा हलके व अधिक ठिसूळ असते. साल सु. ३०–६० सेंमी जाड व सुविरल (स्पंजी) असते लाकडात व सालीत टॅनीन भरपूर असते. रेडवूडचे काही वृक्ष ११४ मी. उंच असल्याचे नमूद असून बिग ट्रीचे काही ९३–९६ मी. आणि एक तर १४२ मी. उंच असल्याचे नमूद आहे. जाडीच्या (व्यासाच्या व घेराच्या) बाबतीत मात्र बीग ट्री सरस आहेत त्यांतील काहींचा बुंध्याजवळचा व्यास १२ मी.आहे, तर काही रेडवुड वृक्ष बुंध्याजवळ १० मी. व्यासाचे आहेत. कापलेल्या वृक्षांच्या खोडातील वार्षिक वलये [⟶ शारीर, वनस्पतींचे] मोजून त्यांचा आयुःकाल अजमावण्याची पद्धत आहे. त्यानुसार रेडवुड व बिग ट्री या वृक्षांचे वयोमान निश्चित करण्याचे प्रयत्न झाले आहेत तथापि त्यातही मतभेद दिसतात तर सर्वसाधारणपणे २,००० ते ५,००० वर्षे वयाचे वृक्ष असल्याचा अंदाज करण्यात आला आहे. कॅलिफोर्नियातील सेक्कोया नॅशनल पार्कमधील ‘जनरल शेरमन ट्री’ हा व्याप्तीने सर्वांत मोठा सक्कोया वृक्ष असल्याचा दावा केला गेला आहे. याची उंची सु. ८४·३२ मी. असली, तरी त्याचा घेर बुंध्याजवळ सु. ३१ मी. व व्यास सु. १० मी. असून त्याचे वय ३,५०० वर्षे असावे.
उत्तर गोलार्धात जुरासिक कल्पातील (सु. १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकांत सेक्कोयाचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळतात.
पहा : आयुःकाल, प्राण्यांचा व वनस्पतींचा वनस्पति, प्रकटबीज उपविभाग.
संदर्भ : 1. C. S. I. R The Wealth of India, Raw Materals, Vol IX and Vol. X, New Delhi, 1972 and 1979.
2. Datta S. C. An Introduction to Gymonsperms, Bombay, 1966.
3. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.
4. McCann, C. 100 Beautiful Trees of India, Bombay, 1937.
5. Rendle A. B. The Classification Flowering Plants Vol ,I, Cambridge 1968.
6. Zim H. S. Martin, A. C. Trees, New York, 1956.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
“