रेडफील्ड, रॉबर्ट: (४ डिसेंबर १८९७–१६ ऑक्टोबर १९५८). अमेरिकन मानवशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ. जन्म शिकागो (इलिनॉय) येथे.पहिल्या महायुध्दाकाळात त्यांनी स्वेच्छेने रूग्णवाहिका चालकाचेही काम काही काळ केले. नंतर शिकागो विद्यापीठातून १९२० मध्ये ए.बी. आणि १९२१ मध्ये कायद्याची पदवी घेतल्यावर त्यांनी काही काळ वकिली केली. ⇨रॉबर्ट एझरा पार्क (१८६४–१९४४) हे त्यावेळी शिकागो विद्यापीठातील प्रख्यात समाजशास्त्रज्ञ होते. त्यांची कन्या, मार्गारेट ल्यूसी हिच्याशी रेडफिल्ड यांचा १९२० मध्ये विवाह झाले. रॉबर्ट पार्क यांच्या मार्गदर्शनामुळे रेडफील्ड यांच्या संशोधनास व अध्ययनास योग्य ती दिशा आणि उत्तेजन मिळाले. १९२३ मध्ये ते मेक्सिकोच्या प्रवासास गेले व तेव्हापासून आदिम संस्कृतीच्या अभ्यासाकडे ते कायमचे आकृष्ट झाले. शिकागो विद्यापीठात १९२८ मध्ये पीएच्. डी. घेऊन ते तेथेच मानवशास्त्र विभागात उपप्राध्यापक १९३० मध्ये सहयोगी प्राध्यापक आणि १९३४ मध्ये प्राध्यापक झाले. १९३४ ते १९४६ ह्या काळात ते विद्यापीठाच्या सामाजिक विज्ञाने या विद्याशाखेचे प्रमुख होते. १९४८ मध्ये ते मानवशास्त्र विभागाचे प्रमुख झाले आणि १९५३ मध्ये ‘रॉबर्ट मेनार्ड हचिन्स प्रोफेसर’ हे अध्यासन भूषविण्याचा बहुमानही त्यांना प्राप्त झाला. फ्रँटस बोॲस (१८५८–१९४२), रॅल्फ लिंटन (१८९३–१९५३), रॉबर्ट लोई (१८८३–१९५७), मार्गारेट मीड (१९०१–७८) इ. समकालीन प्रख्यात समाजशास्त्रज्ञांच्या ते सहवासात आले होते. शिकागो येथे ते निधन पावले.

वॉशिंग्टनस्थित कार्नेगी प्रतिष्ठानपुरस्कृत मध्य अमेरिकेतील ग्वातेमाला आणि यूकातान येथील आदिवासींच्या जीवनाबाबतच्या संशोधनकार्यात ते सु. १६ वर्षे सहभागी होते.

नागरी आणि ग्रामीण समाजांत, आचार-विचार, भाषा, पोषाख, वाहतुकीची साधने, दैनंदिनी इ. संस्कृतीच्या सर्व तपशिलांत विरूद्ध टोकांचे चित्र जरी दिसत असले, तरी त्यांच्यातील संपर्काच्या अगर दळणवळणाच्या मार्गाबरोबर एक प्रकारचे सांस्कृतिक सातत्य दिसून येते. म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाताना वाटेत आपणास एका संस्कृतीची वैशिष्ट्ये सावकाशीने कमीकमी होत जाताना व दुसऱ्या टोकाची वैशिष्ट्ये अधिकाधिक प्रचारात आलेली दिसून येतात. या वास्तवाला रेडफील्डने ग्रामीण-नागरी सातत्य (रूरल-अर्बन कंटिन्यूअम) असे संबोधिले. त्याचप्रमाणे समाजातील सांस्कृतिक भिन्नतेच्या काही सत्यस्थितीवर प्रकाश पाडताना त्यांनी महान परंपरा वा शिष्ट-परंपरा (ग्रेट ट्रॅडिशन) आणि लोकरूढी (लिटल ट्रॅडिशन) ह्या संकल्पना मांडल्या. महान संप्रदाय हा समाजाच्या वरच्या दर्जाशी संबंधित असून त्याच्या आचार-विचारांना सार्वत्रिकता, अभिजातता लाभलेली असते तर लोकपरंपरा ह्या अधिकतर ग्रामीण स्तरावरील व निम्नस्तरावरील लोकांशी संबंधित आणि प्रादेशिक दृष्ट्या संकुचित स्वरूपाच्या असतात.

ग्रामीण आणि नागरी समाजाच्या ह्या तुलनात्मक विश्लेषणाने रेडफील्ड ह्यांनी मानवशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांत महत्त्वाचे योगदान केले आहे. त्यांचे महत्वाचे ग्रंथ असे :टेपोझ्टलन अ मेक्सिकन व्हिलेज : अ स्टडी ऑफ फोक लाइफ (१९३०) चानकोम अ : माय व्हिलेज (१९३४, अल्फॉन्सो बीयासमवेत) द फोक कल्चर ऑफ यूकातान (१९४१) अ व्हिलेज दॅट चोज प्रोग्रेस : चान कोम रिव्हिजिटेड (१९५०) द प्रिमिटिव्ह वर्ल्ड अँड इटस टान्सफॉर्मेशन्स (१९५३) द लिटल कम्यूनिटी : व्ह्यूपॉइन्टस फॉर द स्टडी ऑफ अ ह्यूमन होल (१९५५) पीझन्ट सोसायटी अँड कल्चर : ॲन अँथ्रपॉलॉजिकल ॲप्रोच टू सिव्हिलिझेशन (१९५६). रेडफील्ड यांच्या पत्नी मार्गारेट पार्क यांनी त्यांचे पेपर्स हे शोधनिबंध दोन खंडांत संपादित केले (१९६२-६३).

भोईटे, उ. बा.