रूमानिया : सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ रूमानिया. यूरोपातील नवनिर्मित स्वतंत्र देशांपैकी एक देश. यूरोपच्या आग्नेय भागातील या देशाचा विस्तार ४३०३७’ उ.ते ४८०१५’ उ. अक्षांश व २००१५’ पू. ते २९०४१’ पू. रेखांश यांदरम्यान आहे. सर्वसामान्यपणे गोलाकार असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २,३७,५०० चौ.किमी. असून लोकसंख्या २,२७,२४,८३६ (१९८६) होती. देशाची पूर्व –पश्चिम लांबी ७८९ किमी. व उत्तर- दक्षिण रुंदी ४७५ किमी. आहे. उत्तरेस व ईशान्येस रशिया, पूर्वेस काळा समुद्रा, दक्षिणेस बल्गेरिया, नैऋत्येस यूगोस्लाव्हिया, पश्चिमेस हंगेरी यांनी हा देश सीमित झालेला असून याला एकूण ३,१९० किमी. लांबीची (पैकी १९० किमी. सागरी) सरहद्द लाभली आहे. बूकारेस्ट (लोकसंख्या १९,६१,१८९–१९८४) ही देशाची राजधानी आहे.
भूवर्णन : भूरचनेच्या दृष्टीने पर्वतरांगा, टेकड्या व पठारे, मैदाने असे देशाचे प्रमुख तीन भाग पाडता येतात. या भूविशेषांनी देशाचा सर्वसाधारणपणे समसमान भाग व्यापलेला आहे. सुमारे ३३% भागात पर्वतरांगा असून येथील रांगा मध्यम उंचीच्या व कमी उताराच्या दिसून येतात. ⇨कार्पेथियन ही देशातील प्रमुख पर्वतरांग असून तिचे ईस्टर्न कार्पेथियन, ट्रान्सिल्व्हेनियन आल्प्स व वेस्टर्न कार्पेथियन (आपूशने पर्वत) असे तीन भाग करण्यात येतात. या सर्व रांगा कमानीच्या आकारात पसरलेल्या असून खनिज संपत्ती, कुरणे, पर्यटनस्थळे, वीजनिर्मिती इत्यादींमुळे देशाच्या आर्थिक विकासात महत्वाच्या ठरल्या आहेत. ईस्टर्न कार्पेथियन ही ‘कार्पाती ओरिएंटली’ या स्थानिक नावाने ओळखली जाणारी मालिका देशाच्या पूर्व भागात उत्तर-दक्षिण पसरलेल्या व एकमेकीस समांतर रांगांची बनलेली आहे. ती उत्तरेस रशियाच्या सरहद्दीपासून दक्षिणेस प्रारवॉव्हा नदीखोऱ्यापर्यंत (देशाचा मध्यभाग) पसरलेली असून तिची सरासरी उंची १,००० मी. आणि रूंदी ९७ किमी. आहे. उत्तरेकडील प्येट्रॉस (२,३०५ मी.) हे या मालिकेतील उंच शिखर आहे. मालिकेतील मध्यभागी असलेली रांग कठीण व स्फटिकी खडकांची बनलेली असून या भागातून वाहणाऱ्या नद्यांनी अनेक खोल आणि अरूंद घळ्यांची निर्मिती केलेली आढळते. पश्चिमेकडील रांग ज्वालामुखीजन्य खडकांची बनलेली असून तीत अनेक शंकू व ग्रीवा आढळतात. सेंट ॲना हे देशातील एकमेव ज्वालामुखी सरोवर याच भागात आहे. हा प्रदेश खनिजसमृद्ध असून या भागात अनेक उष्णोदकाची कुंडे आणि आरोग्यधामे आहेत.
ट्रान्सिव्ल्व्हेनियन आल्प्सचा (सदर्न कार्पेथियन) विस्तार पूर्वेस प्राखॉव्हा नदीखोऱ्यापासून पश्चिमेस टीमीश व सेर्ना नद्यांच्या खोऱ्यापर्यंत सु. ३७० किमी. आहे. ही रांग पूर्णपणे ज्वालामुखीजन्य स्फटिकी खडकांची बनलेली असून मॉल्डॉव्हानुल (२,५४४ मी.) हे देशातील सर्वात उंच, तर नेगोई (२,५३५ मी.), ओमू (२,५०५मी.) इ. अन्य उंच शिखरेही याच रांगेत आहेत. या रांगेतील अनेक भूमंच कुरणांसाठी प्रसिध्दी आहेत तर उंच डोंगराळ भागात हिमनद्यांपासून बनलेली निसर्गसुंदर सरोवरे, दक्षिण उतारावर बीस्त्रीत्सा, सेर्ना इ. नद्यांनी चुनखडकांमध्ये निर्माण केलेल्या अनेक गुहा हे या रांगेचे वैशिष्ट्य व आकर्षण समजले जाते.
वेस्टर्न कार्पेथियन रांग सु. ८८ किमी. लांब व ६४ किमी. रूंद असून ती देशाच्या पश्चिम भागात उत्तरेस करश नदी व दक्षिणेस मुरेश नदी यांदरम्यान उत्तर–दक्षिण दिशेने पसरलेली आहे. या रांगेतील बीखॉर (१,८५० मी.) हे सर्वोच्च शिखर असून हाही प्रदेश खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. याचा मंटी मेटॅलिसी हा भाग ‘गोल्ड स्वेअर’ म्हणून ओळखला जातो.
ट्रान्सिल्व्हेनिया हा देशातील सर्वात मोठा पठारी भाग असून सस पासून सु. ३६६ मी. उंचीचा आहे. ईस्टर्न कार्पेथियन रांगेचे पश्चिम खोरे व ट्रान्सिव्हेनियन आल्प्सचे उत्तर खोरे यांचा या पठारी प्रदेशात समावेश होतो. हा प्रदेश मिथेन वायू व खनिज मीठ यांच्या उत्पादनांसाठी महत्वाचा आहे. देशाच्या पूर्व भागात मॉल्डेव्हियन पठारी प्रदेश असून त्याचा विस्तार कार्पेथियन पर्वतरांगेच्या पूर्वेस प्रुट नदीपर्यंत आहे. सुमारे ४८६ मी. ते ६१० मी. उंचीच्या या प्रदेशात ट्रान्सिल्व्हेनियन पठारी प्रदेशापेक्षा वस्तीचे मान कमी आहे. दोब्रूज टेबललँड हा प्राचीन खडकांची मोठ्या प्रमाणात झीज होऊन बनलेला प्रदेश देशाच्या आग्नेय भागात असून त्याची सस पासून उंची सु. २५० मी. ते ४६० मी. आहे. या भागात काही टेकड्याही आढळतात.
येथील बहुतेक मैदाने देशाच्या दक्षिण व पश्चिम भागातं आहेत. एकोणिसाव्या शतकापासून होणाऱ्यादेशाच्या आर्थिक विकासात या मैदानांचा मोठा वाटा आहे. देशाचा दक्षिण भाग डॅन्यूब मैदानाने व्यापलेला असून त्याचा पूर्व भाग (ऑल्ट नदीच्या पूर्वेकडील) ‘रूमानियन प्लेन’ व पश्चिमेकडील भाग ‘ऑल्टेनियन प्लेटो’ या नावाने ओळखला जातो. हा संपूर्ण प्रदेश लोएस व काळ्या चेर्नोसेम मृदेने व्यापलेला असून शेतीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो. याच भागात दक्षिण सरहद्दीवर डॅन्यूब नदीची पूरमैदानेही मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली दिसून येतात. देशाच्या आग्नेय कोपऱ्याचा उत्तर भाग डॅन्यूब नदीचे त्रिभूज प्रदेश व दलदलीयुक्त असून त्याने सु . ४,५३० चौ.किमी. क्षेत्र व्यापले आहे. पूर्वीचा हा समुद्रव्याप्त भाग, प्रागैतिहासिक काळात निर्माण झालेल्या वाळूच्या बांधामुळे समुद्रापासून वेगळा झाला व नदीच्या गाळाने भरून आला आहे. देशातील एकूण मासेमारीच्या सु. ५०% मासेमारी येथील नद्यांतून होते. आग्नेय भागातील काळ्यासमुद्राची किनारपट्टी उत्तम प्रकारच्या पुळणी व सरोवरे यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागात गंधकयुक्त गरम पाण्याचे झरे असून काही खनिजेही सापडतात.
नद्या : देशातील बहुतेक नद्या ⇨डॅन्यूबच्या उपनद्या आहेत. त्या देशाच्या मध्य भागातील डोंगररांगांत उगम पावून पश्चिमेस, दक्षिणेस व पूर्वेस वाहत जाऊन डॅन्यूबला मिळतात. त्यामुळे डॅन्यूब नदीतून काळ्या समुद्राला मिळणाऱ्या पाण्यापैकी जवळजवळ ४०% पाणी येथील नद्यांद्वारे पुरविले जाते. डॅन्यूब ही देशाच्या दक्षिण सरहद्दीवरून पश्चिम-पूर्व दिशेने वाहणारी प्रमुख नदी असून ती कीलीया, स्फंतू ग्यॉर्गे आणि सुलीना या प्रमुख तीन मुखांनी काळ्या समुद्राला मिळते. मुखाकडील भागात या नदीने मोठे त्रिभूज प्रदेश निर्माण केले आहेत. ही नदी देशाच्या नैर्ऋत्य सरहद्दीवरील सु. ३.२ किमी. लांबीच्या ‘आयर्न गेट’ या प्रसिद्ध निदरीतून वाहते. डॅन्यूब नौसुलभ असून सागरगामी मोठी जहाजे या नदीतून ब्राईला शहरापर्यंत येतात. अंतर्भागातही अनेक ठिकाणी या नदीतून वाहतूक केली जाते. डॅन्यूब शिवाय प्रुट ही देशाच्या पूर्व सरहद्दीवरून उत्तर-दक्षिण दिशेने वाहणारी नदी जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्वाची आहे. ऱ्येनी शहराजवळ ती डॅन्यूब नदीला मिळते. हिचा मुखाकडील सु. ११० किमी.चा प्रवाह नौसुलभ आहे. याशिवाय देशातील मुरेश, ऑल्ट, सीरेट, यालॉमीत्सा, सॉमेश इ. अन्य महत्वाच्या नद्या आहेत. बहुतेक सर्व नद्यांपासून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करणे शक्य आहे.
भूप्रदेश : भूरचनेनुसार जरी देशाचे प्रमुख तीन विभाग पडत असले, तरी इतिहासकाळापासून आर्थिक व सामाजिक विकासाच्या दृष्टीने देशाचे ट्रान्सिल्व्हेनिया, बूकव्हीना, मॉल्डेव्हिया, बालेकिया, बनात व दोब्रूज अशा एकूण सहा भूप्रदेशांमध्ये विभाजन केले जाते.
(१) ट्रान्सिल्व्हेनिया हा देशातील सर्वात मोठा भूप्रदेश असून त्यात देशाच्या मध्य व वायव्य भागांचा (पर्वत, ट्रान्सिल्व्हेनियन पठार,वायव्य मैदानी प्रदेश) समावेश होतो. पठारी व मैदानी भागांतील मृदा सुपीक असल्याने हा प्रदेश शेतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो. तसे डोंगराळ व पठारी भागांतील जंगलांतून मोठ्या प्रमाणात जंगल उत्पादने व खनिजे घेतली जातात. या प्रदेशातील निसर्गसौंदर्य, बर्फावरील खेळांसाठी योग्य असे डोंगरउतार यांमुळे या भागात अनेक पर्यटन स्थळांचाही विकास झाला आहे.
(२) बूकव्हीना हा प्रदेश ट्रान्सिल्व्हेनिया प्रदेशाच्या ईशान्येस असून कार्पेथियन पर्वतातील अत्यंत दाट जंगलाचा यात समावेश होतो. ट्रान्सिल्व्हेनियाप्रमाणेच सृष्टीसौंदर्य असले, तरी डोंगराळ भाग व घनदाट अरण्यांमुळे या भागात मोठी शहरे नाहीत.
(३) मॉल्डेव्हिया हा प्रदेश देशाच्या ईशान्य भागात असून याचा विस्तार पश्चिमेस ट्रान्सिल्व्हेनिया प्रदेशापासून पूर्वेस प्रुट नदीपर्यंत आहे. याचा उत्तर भाग उंच डोंगराळ प्रदेशाने व्यापलेला असून दक्षिण भाग सपाट मैदानी आहे. या प्रदेशातील काळी मृदा धान्य, साखर, बीट, गहू, भाजीपाला, फळे यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागात देशातील खनिज तेल व नैसर्गीक वायूचे महत्वाचे साठे आहेत. याशी, गलात्सी इ. व्यापारी व औद्योगिक दृष्ट्या विकसित झालेली शहरे या भागात आहेत.
(४) वालेकिया हा देशाच्या दक्षिण भागातील प्रदेश ट्रान्सिल्व्हेनियान आल्प्सपासून दक्षिणेस डॅन्यूब नदीपर्यंत (बल्गेरियाची सरहद्द) पसरलेला आहे. मॉल्डेव्हियाप्रमाणेच या भागात शेती उत्पादनांबरोबर मीठ, कोळसा, लिग्नाइट इ. खनिज उत्पादनेही घेतली जातात. बूकारेस्ट हे देशाच्या राजधानीचे शहर याच प्रदेशाच्या मैदानी भागात वसलेले असून येथे अनेक उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे. क्रायॉव्हा (मृत्पात्री, कापड, कातडी वस्तूंसाठी प्रसिद्ध) प्लॉयेश्ती (तेलशुध्दीकरण) ही औद्योगिक दृष्ट्या प्रसिद्ध शहरे या भागात आहेत. म्हणूनच या प्रदेशात लोकवस्ती जास्त आढळते.
(५) बनात हा देशाच्या नैऋत्य भागातील हंगेरी व यूगोस्लाव्हिया यांच्या सरहद्दींना लागून असलेला प्रदेश सपाट, चिवडयुक्त परंतु सुपीक मैदानाचा असून गहू उत्पादक म्हणून व वराहपालनासाठी प्रसिद्ध आहे. देशातील लोहखनिज उत्पादक प्रदेश म्हणूनही याची ख्याती असून असून टीमिश्वारा-रेशीत्सा आराद हा या प्रदेशातील पोलाद उत्पादक विभाग म्हणून प्रसिद्ध आहे.
(६) दोब्रूज हा देशाच्या आग्नेय कोपऱ्यातील सपाट मैदानी प्रदेश असून तो पश्चिमेस व उत्तरेस डॅन्यूब नदीपासून पूर्वेस काळ्या समुद्रापर्यंत विस्तारलेला आहे. या प्रदेशाचा ईशान्ये भाग डॅन्यूब नदीच्या त्रिभूज प्रदेशाने व्यापलेला असून या दलदलयुक्त प्रदेशात विविध प्रकारचे वन्य प्राणी पहावयास मिळतात त्यामुळे हा भाग शिकाऱ्यांचे नंदनवन म्हणून ओळखला जातो. दोब्रूजचा दक्षिण भाग शेतीयोग्य जमिनीने व्यापलेला असून काळ्या समुद्राच्या किनारपट्टीवर प्रसिद्ध पुळणी व मामाया, एफॉरीआ, मांग्गाल्या यांसारखी आरोग्यधामे आहेत. कॉन्स्टांट्सा हे रूमानियाने प्रमुख बंदर याच भागात आहे. हा भाग ‘रूमानियन रिव्हिएरा’ म्हणून ओळखला जातो.
हवामान : रूमानियाचे हवामान मध्यम प्रतीचे दमट (विशेषतः आग्नेय भागांत) व खंडीत प्रकारचे असले, तरी ऋतुपरत्वे व स्थानपरत्वे त्यात थोडाफार फरक आढळतो. देशाचे वार्षिक सरासरी तापमान दक्षिण भागात ११० से. तर उत्तर भागात ७० से. असते. येथील उन्हाळा कोरडा व कडक, तर हिवाळा दीर्घकाळ व तीव्र स्वरूपाचा असतो. जानेवारीतील सरासरी तापमान –४० से. ते ०० से. तर उन्हाळ्यात डॅन्यूब नदीखोऱ्यात जास्तीतजास्त तापमान २४० से. असते. बारगान प्रदेशात ते ४४० से. पर्यंत आढळते. देशाच्या आग्नेय भागात समुद्रसान्निध्यामुळे व वायव्य भागात सस .पासूनच्या जास्त उंचीमुळे तापमान त्यामानाने कमी आढळते. बूकारेस्ट या राजधानीचे जानेवारीतील सरासरी तापमान -३० से. तर जुलैमध्ये २३० से. असते. देशात वायव्येकडून सौम्य, आर्द्र, वारे वाहतात, परंतु ईशान्येकडून येणारे वारे थंड, कोरडे व तीव्र स्वरूपाचे असतात. पश्चिम भागात विशेषतः उन्हाळ्यात वाहणारे ‘ऑस्ट्र’ वारे उष्ण असतात. देशातील पर्जन्यमान पश्चिमेकडून पूर्वेकडे व उंच डोंगराळ प्रदेशांपेक्षा मैदानी भागांत कमीकमी होत गेलेले आढळते. येथे सरासरी ७१ सेंमी. पाऊस पडतो. हे प्रमाण पर्वतीय भागांत वार्षिक सरासरी १०० सेंमी. ते १२५ सेंमी., तर त्रिभूज प्रदेशात ३८ सेंमी. असते. पूर व दुष्काळ या देशातील सर्वसामान्य आपत्ती असून क्वचित प्रसंगी भूकंप होतात. १९७७ साली देशात मोठा भूंकप (रिश्टर प्रमाण ७.२) झाला होता व त्याचे केंद्र बूकारेस्ट येथे होते.
वनस्पती व प्राणी : देशाच्या सु. २५% भाग जंगलव्याप्त असून बहुतेक पर्वतीय भागांत जंगले आहेत. जास्त उंचीच्या प्रदेशात अल्पाइन व उपअल्पाइन प्रकारची कुरणे दिसून येतात, तर १,४०० मी. ते १,८०० मी. उंचीच्या भागात सूचिपर्णी वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. ८०० मी. उंचीच्या प्रदेशांत ओक वृक्ष दिसून येतात. मॉल्डेव्हिया व वालेकिया प्रदेशांत स्टेप प्रकारच्या गवताळ वनस्पती असून जास्त आर्द्रता असणाऱ्या प्रदेशांत खोलवर मुळे असणाऱ्या वनस्पती आहेत. कोरड्या भागात खुरट्या वनस्पती ,तर कार्पेथियन पर्वतरांगांतील उच्च प्रदेशांत सदापर्णी व कमी उंचीच्या भागात पानझडी वृक्षप्रकार दिसून येतात. येथील जंगलांत काळवीट, मार्टेन, तपकिरी अस्वल, बिडाल, रानडुक्कर, कोल्हा इ. वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात दिसतात. डॅन्यूब नदीच्या त्रिभूज प्रदेशात हंस, पाणकोळी, बगळे, पाणकावळे, हंसक, बदके, क्काक, वगैरे सु. ३०० प्रकारचे पक्षी आढळतात तर उंच डोंगराळ भागांत गरूड, ससाणे दिसून येतात. सरोवरांत प्रामुख्याने कार्प, ब्रिम, पाइक, तर नद्यांतून बार्बेल, ट्राउट इ. जलचर आढळतात.
चौंडे, मा. ल.
इतिहास : रूमानियाचा प्राचीन सुसंगत इतिहास ज्ञात नाही तथापि प्राचीन काळापासून या देशातील लोकांवर विविध संस्कृतीचा प्रभाव पडलेला आहे. रूमानियाच्या इतिहासाचे सामान्यतः पुढील कालखंड पडतात : (१) रोमन काळ, (२) रानटी टोळ्यांची आक्रमणे, (३) ऑटोमन साम्राज्याचे आधिपत्य आणि (४) रशियाचे वर्चस्व. रूमानिया या नावाने सांप्रत ज्ञात असलेल्या प्रदेशात ‘डेशन’ नावाचे लोक राहत व त्यांच्या प्रदेशाला ‘डेश’ म्हणत. रोमन सम्राट ट्रेजनने हा प्रदेश इ.स. १०६ मध्ये जिंकला. पुढे तेथे रोमनांच्या वसाहती झाल्या आणि तेथील समाजांशी संकर होऊन डेको-रोमन ही संज्ञा रूढ झाली. डेको-रोमनांनी रोमन चालीरीती, लॅटिन भाषा, इ. अंगीकारल्या. डेशन व जीटी हे मूळ थ्रेशिअन शाखेचे होते. रोमनांचे येथे तिसऱ्या शतकापर्यंत वास्तव्य होते. त्यावरून या प्रदेशाला रूमानिया (रोमानिया) हे नाव पडले असावे. चौथ्या शतकापासून गॉथ, स्लाव्ह, हूण, आवार, बल्गर, मग्यार, पेचेनेग, आदी रानटी टोळ्यांनी रूमानियावर आक्रमणे केली. त्यामुळे रोमन राज्यकर्ते त्रस्त झाले व त्यांनी हा प्रदेश सोडला. सुरूवातीस येथील मूळ लोकांना डोंगरात आश्रयार्थ स्थलांतर करावे लागले. ही आक्रमणे बाराव्या शतकापर्यंत चालू होती. या रानटी टोळ्यांपैकी बल्गरांचे सु. २०० वर्षे येथे वास्तव्य व वर्चस्व होते. त्यांनी नागरी जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा राजा झार बोरिस (कार. ८५२–८८९) याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली (८६५). त्यामुळे त्या धर्माचा तेथे प्रवेश झाला. त्यानंतर मग्यार व पुढे पेचेनेग या टोळ्यानी हा प्रदेश पादाक्रातं केला. अकराव्या शतकातही हंगेरीने उत्तर रूमानियातील ट्रान्सिल्व्हेनिया हा भूभाग घेतला. काही इतिहासकार डॅन्यूबला उत्तरेकडील डेको-रोमन लोकसंख्या या आक्रमणात जवळजवळ नष्ट झाली, असे मत व्यक्त करतात आणि विद्यमान रूमानियन हे दक्षिणेकडील स्लाव्ह जमातीतून आलेले असून ते तेराव्या शतकात उत्तरेकडे सरकले असे मानतात या शतकाच्या प्रारंभी मंगोलांनी हा प्रदेश ताब्यात घेतलापरंतु ते फार काळ तेथे राहिले नाहीत. यानंतरच्या रूमानियाचा इतिहास म्हणजे मॉल्डेव्हिया, वालेकिया व ट्रान्सिल्व्हेनियाया स्वतंत्र विभांगातीलस्थित्यंतरे व घडामोडी यांची सुंसगत हकिकत होय. मंगोलांच्या स्वारीनंतर मध्ययुगात मॉल्डेव्हिया व वालेकिया हे दोन स्वतंत्र परगणे अस्तित्वात आले आणि एकीकरणाच्या प्रक्रियेस सुरूवात झाली.
पंधराव्या शतकाच्या अखेरीस ह्या दोन्ही परगण्यांचे राज्यपाल (हॉस्पोडॉर्स) प्रत्यक्षात कारभार पाहात आणि तुर्की सम्राटाला वार्षिक खंडणी देऊन ते आपापल्या विभागांचे शासन स्वतंत्रपणे करीत. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात वालेकियाचा राजा मायकेल द ब्रेव्ह (कार. १५९३–१६०१) याने मॉल्डेव्हिया व ट्रान्सिल्व्हेनिया यांच्याशी युती करून तुर्कांचे सार्वभौमत्व झुगारून दिले आणि मॉल्डेव्हिया, वालेकिया व ट्रान्सिल्व्हेनिया परगण्यांचे स्वतंत्र राज्य स्थापले पण ते फार काळ टिकले नाही. मायकेलचा खून झाला आणि परिणामतः पुन्हा या परगण्यांना तुर्काचे मांडलिकत्व पतकरावे लागले. तुर्कस्तान येथील श्रीमंत जमीनदारांच्या (बोयार) मदतीने राज्यकारभार पाहात. किंबहुना तेच या परगण्यांतील खरे सत्ताधारी होते. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना जबरदस्त कर द्यावे लागत आणि त्यांना मजूर म्हणून राबावे लागे. या बोयारांनी सर्व सत्ता आपल्या हाती यावी म्हणून तुर्काविरूद्ध प्रयत्न केले. मॉल्डेव्हिया या वालेकिया यांनी ऑस्ट्रिया व रशिया यांच्याशी वाटाघाटी केल्या आणि १७१० मध्ये रशियाच्या पीटर द ग्रेटशी तहही केला. तेव्हा तुर्की सुलतानाने येथील संस्थानिकांचे अधिकार काढून घेऊन (१७१९) व दोन्ही शासनांचे मक्ते श्रीमंत ग्रीकांना (फनारिऑट) देण्यास सुरूवात केली. ते सुलतानाला रकमा देत व त्याची भरपाई जनतेवर जबर कर लादून दामदुप्पट वसूल करीत. त्यामुळे जनता त्रस्त झाली. साहजिकच तुर्कापेक्षाही येथील जनतेला ग्रीकांबद्दलजास्त घृणा वाटू लागली. या काळात ऑस्ट्रिया व रशिया यांची तुर्कांबरोबर अनेक युध्दे झाली. तेव्हा रूमानियामध्ये राष्ट्रीय चळवळ सुरू झाली. कूचू क कायनार्जी तहाने रशियाचे वर्चस्व मॉल्डेव्हिया व वालेकिया यांवर निर्माण झाले (१७७४) पुढील वर्षीच बूकव्हिना जिल्हा ऑस्ट्रियाला व १८१२ मध्ये बेसारेबिया रशियाला मिळाला. १८२२ मध्ये तुर्कांनी शासनाच्या वार्षिक लिलावाची प्रथा बंद करून स्थानिक राजघराण्यांची सत्ता पुन्हा स्थापन केली. रूमानियाच्या इतिहासातील यानंतरचा १८२१–७८ हा महत्वाचा टप्पा मानला जातो. कारण या काळात परगण्यांच्या एकीकरणासाठी महत्त्वाची पावले पडू लागली व आधुनिक रूमानियाच्या निर्मितीच्या दृष्टीने काही घटना उत्क्रांत झाल्या.
रशिया-तुर्कस्तान युध्दात (१८२८-२९) मॉल्डेव्हिया व वालेकिया यांमध्ये रशियन सैन्याने तळ ठोकला. तरीही एड्रिॲनोपलच्या तहानुसार तुर्कांचे नाममात्र आधिपत्य मान्य करण्यात आले. आणि प्रत्यक्षात हे दोन्ही प्रांत रशियाच्या रक्षणाखाली आले. साहजिकच रशियाच्या दबावाखाली दोन्ही प्रांतांत कायदेशीर अनुशासन सुरू झाले. या काळात रशियान जनरल पव्हिल क्यिस्यियॉव्ह हा सर्वसत्ताधारी होता. त्यावेळी रूमानिया राज्याचा पाया घालण्यात आला. संविधानात्मक सभा (दिवान) संघटित करण्यात आल्या, नवीन शिक्षणपद्धती सुरू झाली आणि रस्त्यांच्या बांधकामास चालना मिळाली. या सुधारणांबरोबरच रूमानियातील औद्योगिकरणास तसेच परराष्ट्र व्यापारास क्यिस्यियॉव्हने प्रोत्साहन दिले तथापि या कार्यात सरंजामदारांचाच मोठा वाटा होता आणि रशियाचा प्रत्यक्षात फारसा हस्तक्षेप नव्हता. १८४८ मध्ये दोन्ही राज्यांतील लोकांनी तुर्कस्तान व रशिया यांविरूद्ध विशेषतः बोयारांविरूद्ध बंड केले पण ते मोडण्यात आले. पुढे १८५४ मध्ये रशियाने रूमानियातून काढता पाय घेतला. क्रिमियन युध्दानंतर १८५६ च्या पॅरिस परिषदेने वालेकिया व मॉल्डेव्हिया यांनी तुर्की आधिपत्याखाली नाममात्र रहावे व प्रमुख यूरोपीय राष्ट्रांनी त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची हमी द्यावी, असा निर्णय दिला. दक्षिण बेसारेबिया विभाग मॉल्डेव्हियाला देण्यात आला. दोन्ही राज्यांनी आलेक्झांडू जॉन कूझा (कार. १८५९–६६) याची राजपदी निवड केली व १८६१–६२ मध्ये रूमानियाच्या एकीकरणास अन्य राष्ट्रांची मान्यता मिळाली. आलेक्सांडू कूझा याने ग्रीक मठांच्या जमिनी जप्त केल्या व १८६४ च्या जमीनविषयक कायद्याने सरंजामदारांच्या जमिनी जप्त करून कुळांना दिल्या. कूझाने शैक्षणिक क्षेत्रात व न्यायव्यवस्थेत अनेक सुधारणा केल्या परंतु खाजगी जीवनातील भ्रष्टाचार व उद्धटपणा यांमुळे त्याच्या विरूद्ध कट होऊन १८६६ मध्ये त्याला राज्यत्याग करावा लागला. त्यांच्यानंतर होहेंझॉलर्न-झिकमारिंजन वंशातील पहिला प्रिन्स कारॉल (कार. १८६६–१९१४) याची रूमानियाच्या राजपदी निवड झाली. उदार संविधान स्वीकारण्यात आले. यावेळी प्रथमतःच राजकीय पक्षांचा उदय झाला आणि घटनेनुसार लोकांना आपल्या शासनातील प्रतिनिधी निवडण्याचा हक्क मिळाला परंतु गुंतागुंतीच्या राजकीय वातावरणामुळे हा प्रयोग यशस्वी झाला नाही. पुन्हा सत्ता श्रीमंत बोयारांच्या हातातील बाहुले बनली. अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, दंगेधोपे आणि परकीय सत्तांचा अधुनमधून होणारा हस्तक्षेप यांमुळे जमीनविषयक सुधारणा कार्यवाहीत आल्या नाहीत आणि बोयारांविरूद्धही शासनाने खंबीर धोरण अवलंबिले नाही. परिणामतः ज्यू आणि बोयार यांविरूद्ध शेतकऱ्यांचे बंड उद्भवले (१९०७) रूमानियाने तुर्कस्तानाविरूधद रशियास मदत केली (१८७७). बर्लिन परिषदेतील निर्णयानुसार रूमानिया स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले (१८७८) त्याला मॉल्डेव्हियातील एक प्रदेश– दक्षिण बेसारेबिया–रशियाला द्यावा लागला मात्र त्याएवजी उत्तर दोब्रूज प्रांत मिळाला.
पहिल्या बाल्कन युध्दात रूमानिया तटस्थ राहिला पण दुसऱ्यात (१९१३) त्याने बल्गेरियाविरूद्ध बृहद्रूमानियाच्या निर्मितीसाठी शस्त्र उचलले आणि बूकारेस्टाच्या तहानुसार बल्गेरियाकडून त्याने दक्षिण दोब्रूज प्रांत मिळविला. बाल्कन युध्दांनंतर रूमानियाच्या परराष्ट्रीय संबंधात फ्रेंचांबद्दल आधिक सहानुभूतीचे धोरण दिसू लागले. त्यामुळे पहिल्या महायुध्दात रूमानियाने तटस्थता पाळावी, असा दबाव निर्माण झाला. कारॉलच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या पहिला फर्डिनांड (कार. १९१४–२७) गादीवर आला. वनात, बूकव्हिना, ट्रान्सिल्व्हेनिया हे मुख्यतः रूमानियन वस्तीचे ऑस्ट्रिया–हंगेरीतील प्रदेश मिळविण्याच्या उद्देशाने १९१६ मध्ये रूमानिया दोस्तराष्ट्रांस मिळाला. ऑस्टो-जर्मन सैन्याने त्याची दमछाक केली आणि त्याला बूकारेस्टच्या अपमानकारक शांतता तहास मान्यता द्यावी लागली (१९१८). परंतु रशिया आणि हॅप्सबर्ग साम्राज्य यांविरूद्ध विशेषतः जर्मनीची पीछेहाट सुरू होताच, रूमानियाने पुन्हा युद्ध पुकारले. ११ नोव्हेंबर १९१८ च्या युद्धविराम तहाने बूकारेस्ट रद्द करून रूमानियाने रशियाकडून बेसारेबिया, ऑस्ट्रियाकडून बूकव्हिना आणि हंगेरीकडून बनात व ट्रान्सिल्व्हेनिया हे प्रदेश मिळविले. पुढे सेंट जर्मेन व ट्रिॲनॉनच्या तहांनी या प्रदेशांवरील रूमानियाच्या हक्कांवर शिक्कामोर्तब होऊन ते बाल्कन द्विपकल्पातील सर्वात मोठे राष्ट्र झाले. या प्रदेशांमुळे रूमानियन संस्कृतीत परकीय चालीरीती, धार्मिक कल्पना आणि समाजिक रूढी प्रविष्ट झाला. युध्दीत्तर काळात रूमानियापुढे संमिश्र समाजामुळे आर्थिक समस्या उभ्या राहिल्या. शिवाय ज्यू व हंगेरियन यांचे काही प्रश्न होते. सरकारने कृषिविषयक कायदे करून बोयारांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांचे तुकडे सवलतीच्या दराने शेतकऱ्यांना विकले तथापि मग्यारांचा विरोध आणि अल्पसंख्याकांचा प्रश्न यांमुळे असंतोष वाढत गेला. १९२३ च्या संविधानाने हे भूविभाजन पक्के झाले. १९२७ मध्ये फर्डिनांड मृत्यू पावला व राजपुत्र कारॉल याने गादीवरील हक्क पूर्वीच सोडला असल्याने त्याचा मुलगा मायकेल राज्यावर आला.
रूमानिया, बल्गेरिया व हंगेरी या देशांनी अंतर्गत कारभार स्वच्छ करण्याच्या उद्देशाने शुद्धिकरणाची मोहीम सुरू केली अंतर्गत प्रश्न सोडविण्यासाठी रूमानिया हा लिटल आंतांत (१९२१) तसेच बाल्कन राष्ट्रांत (१९३४) सामील झाला. लिटल आंतांतचा उद्देश शांतता तहाचे पालन व हॅप्सबर्गच्या पुनर्बांधणीस विरोध, असा होता. बाल्कन राष्ट्रांत मात्र चेकोस्लोव्हिकिया नव्हता आणि त्याने जर्मनी, हंगेरी, इटली, बल्गेरिया यांच्या युध्दोत्तर झालेल्या फेरबदलांत बदल करावा, या मागणीला विरोध दर्शविला .दोन्ही संघटनांचा पवित्रा बचावात्मक होता आणि हिटलरच्या उदयानंतर त्या संपुष्टात आल्या. यावेळी रूमानियात पक्षोपपक्षांनी सत्ता हस्तगत करण्यासाठी अवैद्य मार्गाचा व प्रसंगी हिंसाचाराचाही अवलंब केला. यूरोपातील अन्य देशांप्रमाणे प्रखर परंतु संकुचित राष्ट्रवादी फॅसिस्टांची ‘आयर्न गार्ड’ ही संघटना ज्यूविरोधात उभी राहिली आणि धमक्यांचे राजकारण खेळू लागली. कार्नेल्यू कॉड्रिआन्यूच्या नेतृत्वाखाली तो १९२४ मध्ये अस्तीत्वात आली. ज्यूविऱोध व दहशतवाद यांकरिता ती प्रसिद्ध होती. दोन पंतप्रधानांच्या खुनानंतर कारॉलने त्यावर बंदी घातली. तेव्हा तिचे रूपांतर ‘फादरलँड पार्टी’ या राजकीय पक्षात झाले. १९२९ च्या जागतिक मंदीचा तीव्र तडाखा रूमानियालाही बसला. त्यामुळे अशा स्थितीत मायकेलचा पिता कारॉल स्वदेशी परतला व आपल्या मुलास बाजूस सारून त्याने विधिमंडळाच्या मान्यतेने दुसरा कारॉल (कार.१९३०–४०) हे नाव धारण करून गादी बळकाविली. चार-पाच वर्षांत त्याने आपले बस्तान बसविले आणि रशिया व जर्मनी यांच्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी संघटनांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने १९३८ मध्ये त्याने संविधानात दुरूस्ती करवून घेऊन विधिमंडळाचे अधिकार मर्यादित केले आणि स्वतःकडे सर्वाधिकार घेतले. त्याने सर्व राजकीय पक्ष बरखास्त केले आणि ‘फ्रन्ट ऑफ नॅशनल रिनेसन्स’ या राजकीय पक्षास मान्यता दिली. तरीही आयर्न गार्ड संघटना नेस्तनाबूत होऊ शकली नाही. कार्नेल्यू कॉड्रिआन्सू व त्याचे तेरा सहकारी तुरूंगातून पळून जात असताना मारले गेले (१९३८) दुसऱ्या महायुध्दात तटस्थ राहण्याचा कारॉलने प्रयत्न केला, तरीही पहिल्या महायुध्दाच्या अखेरीस मिळविलेला सर्व मुलुख त्याला गमवावा लागला. तेव्हा देशात असंतोष माजला. आयर्न गार्डच्या अनुयायांनी गेलेला प्रदेश परत द्यावा. म्हणून कारॉलविरुद्ध बंड केले. परिणामतः कारॉलला सत्तात्याग करणे भाग पडले. तो हद्दपारीत गेला आणि पुन्हा मायकेल गादीवर आला (१९४४) तथापि खरी सत्ता पंतप्रधान जनरल यॉन आंटॉनेस्कूच्या हाती जाऊन तो हुकूमशाह बनला. रूमानियाने गेलेले बेसारेबिया, बूकव्हीना इ.प्रदेश मिळविण्यासाठी जर्मनीची मदत घेतली व १९४१ मध्ये रशियाविरूद्ध युद्ध पुकारले .त्याने गेलेला प्रदेश परत मिळविला पण स्टालिनग्राडजवळ (व्होल्गोग्राड) त्याच्या सैन्याची मोठी हानी झाली (१९४३).१९४४ मध्ये मायकेलने आंटॉनेस्कूला बडतर्फ केले आणि पुढे १९४६ मध्ये त्याला फाशी देण्यात आले. यानंतर त्याने सर्व सत्ता स्वतःकडे घेऊन रशियाबरोबर शरणागती पतकरली आणि दोस्त राष्ट्रांशी तात्पुरता तह करून त्याने जर्मनी इटली यांविरूद्ध युद्ध पुकारले तरीसुध्दी पॅरिसच्यातहाने त्याला बेसारेबिया,उत्तर बूकव्हीना व दक्षिण दोब्रूज प्रांत गमवावे लागले (१९४७). यातूनच पुढे मॉल्डेव्हिया एस्.एस्.आर्. हे रशियाचे सर्वात लहान प्रजासत्ताक जन्मास आले.
आंटॅानेस्कूच्या बडतर्फीपासूनच रूमानियात कम्प्युनिस्टांचा प्रभाग वाढू लागला आणि आर्थिक व राजकीय दृष्ट्या तो रशियाच्या कच्छपी गेला. साहजिकच नोव्हेंबर १९४६ मध्ये झालेल्या निवडणुकीत कम्युनिस्टप्रभावित नॅशनल डेमॉक्रॅटिक फ्रंटला बहुमत मिळाले. कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर १९४५ साली संयुक्त शासन सत्तेवरआले आणि पीटर ग्रोझा हा बिगर कम्युनिस्ट नेता पंतप्रधान झाला. १९४७ च्या डिसेंबरमध्ये मायकेलला राज्यत्याग करणे भाग पडले. रूमानिया हे लोकसत्ताक गणराज्य म्हणून जाहीर करण्यात आले. १९४५ ची घटना रद्दबातल ठरवून दुसरी रशियाच्या धर्तीवर घटना तयार करण्यात आली (१९५२). रूमानियात कम्युनिस्टांचे नेतृत्व वरचेवर वाढत होते. नवे संविधान स्वीकृत होऊन कॉन्स्टंटीन पॅरहॉन हा नवस्थापित रूमानियन प्रजासत्ताकाचा अध्यक्ष निवडला गेला. ग्यॉर्गी ग्यॉर्ग्-दे हा देशाचा मुख्य पुढारी बनला. यानंतर संविधानात रशियानुकूल काही बदल करण्यात आले. सामुदायिक शेती, उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण इ. कार्यक्षम तत्पूर्वीच हाती घेण्यात आले होते. रशियाला मान्य होईल असे परराष्ट्रीय धोरण स्वीकारण्यात आले. रशियानुकूल संरक्षणविषयक वॉर्सा करारात रूमानिया सामील झाला. १९५५ मध्ये रूमानिया कॉमेकॉनचा सभासद झाला आणि त्याच साली त्याला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्वही मिळाले. रूमानिया रशियाचा अंकित झाल्यामुळे आर्थिक विकासाच्या १९४९ च्या योजनेनुसार इतरांना कच्चा माल व अन्नधान्य परुविण्याचेच काम रूमानियाला करावे लागणार, अशी चिन्ह दिसू लागली. तेव्हा आर्थिक व परराष्ट्रीय धोरणांत स्वातंत्र्य असावे, अशी भावना तेथील नेत्यांत जागृत होऊन १९६३ पासून रूमानियाने काहीसे स्वतंत्र परराष्ट्रीय धोरण अवलंबिले आणि मध्यपूर्वेच्या बाबतीत वॉर्सा करारातील इतर देशांप्रमाणे अरबानुकूल धोरण स्वीकारले नाही. अरब-इस्त्राएल युद्ध संपताच रूमानियाने इस्झाएलशी मैत्रीचे संबंध जोडले (१९६७), चीनबरोबरही मित्रत्वाचे संबंध ठेवण्यात त्याने यश मिळविले. इतकेच नव्हे, तर रशिया व अन्य कम्युनिस्ट देशांच्या इच्छांविरूद्ध त्याने प. जर्मनीशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले व अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशांशीही मैत्रिचे संबंध जोडले. १९६५ साली ग्यॉर्गी ग्यॉर्ग्यू-दे हा रूमानियन वर्कर्स पार्टीचा (कम्युनिस्ट) नेता वारला. त्याच्यानंतर नीकॉलायी चौशेस्कू मुख्य झाला. त्याने रूमानियन कम्युनिस्ट पार्टी असे पक्षाचे नामांतर केले. त्याच साली (१९६५) रूमानियाचे अधिकृत नाव समाजवादी प्रजासत्ताक असे करण्यात आले आणि त्यानुरूप नवीन संविधान स्वीकारण्यात आले. १९६८ साली रशियाच्या चेकोस्लोव्हिकियावरील आक्रमणाचा चौशेस्कू यांनी विरोध केला व त्यानंतर चीन व रशिया यांच्याशी योग्य सुसंवाद साधीत स्वतंत्र परराष्ट्रधोरणाची कास धरली. पण अंतर्गत अर्थकारणात मूलभूत बदल केले नाहीत.
राष्ट्रीय सभेची निवडणूक ७ मार्च १९६५ रोजी झाली. कम्युनिस्ट पक्षाची काँग्रेस (महासभा) बूकारेस्ट येथे भरून तिथे नव्या संविधानाला मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय विधिमंडळात तिला अनुमती मिळाल्यावर ७ डिसेंबर १९६७ रोजी विधिमंडळाने चौशेस्कूची अध्यक्ष म्हणून निवड केली. तोच कम्युनिस्ट पक्षात महासचिव राहिला. राष्ट्रीय सभेने त्याची १९७४-७५ मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून फेरनिवड केली. त्याने देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पक्ष आणि शासन यांचे पुनःसंघटन केले. १९७९ मध्ये इली व्हेर्डेंट पंतप्रधान झाला आणि कम्युनिस्ट पक्षातील प्रमुख नेत्यांतखांदेपालट झाला. चीनबरोबरचे संबंध टिकवण्यासाठी रूमानियाचे वॉर्सा कराराशी मतभेद झाले. सामाजिक कल्याण व संरक्षण यांविषयीचे कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी १९८० मध्ये चौशेस्कूने अर्थसंकल्पात काही महत्वाचे बदल केले. मे १९८२ मध्ये कॉन्स्टंटीन दस्कलेस्कू या पक्षसचिवाची इली व्हेर्डेटच्या जागी पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. पक्षाच्या तेराव्या काँग्रेस अधिवेशनात चौशेस्कू याची पक्षाचा महासचिव म्हणून पाच वर्षासाठी फेरनिवड झाली (नोव्हेंबर १९८३). त्यानंतर राष्ट्रीय सभेने चौशेस्कूची रूमानियाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली. १९८६ मध्ये चौशेस्कूने लष्करातील काही पदे कमी करून शस्त्रास्त्रांवरील खर्च तसेच संरक्षणावरील अर्थसंकल्पात कपात केली. रूमानियाने गेल्या ५० वर्षांत अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती केली असली, तरी मजूर, शेतकरी व मध्यम वर्ग यांच्या वाढत्या गरजा, नोकरशाही व्यवस्था पुरवू शकलेली नाही. त्यामुळे अनेक क्षेत्रांत संघर्ष निर्माण झाले पण चौशेस्कू याच्या नेतृत्वाखाली एकात्म, स्वतंत्र आणि प्रगतिशील राष्ट्र अशी या देशाची प्रतिमा तयार झाली आहे व यूरोपातील राजकारणात हा देश जास्त महत्वाची भूमिका बजावणार आहे. कामगारांचा असंतोष व चळवळ अधिक फैलावू नये, म्हणून शासन योग्य ती खबरदारी घेत आहे (१९८७).
ओक, द. ह. देशपांडे, सु. र..
राजकीय स्थिती : रूमानिया हे स्वतंत्र, सार्वभौम आणि एकात्म सामाजिक प्रजासत्ताक (सोशॅलिस्ट रिपब्लिक ऑफ रूमानिया) आहे. एकोणिसाव्या शतकापर्यंत रूमानिया हे राष्ट्र म्हणून उदयास आले नव्हते. पुढे पॅरिस काँग्रेसने मॉल्डेव्हिया आणि वालेकिया यांना तुर्कस्तानच्या नाममात्र सार्वभौमत्वाखाली स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली आणि यूरोपीय देशांनी या तत्त्वाचा पाठपुरावा करावा असे ठरले. त्याचवेळी दक्षिण बेसारेबिया मॉल्डेव्हियाला देण्यात आला. आलेक्सांड्रू जॉन कूझा याची या दोन्ही संस्थानांचा संयुक्त राजा म्हणून निवड करण्यात आली (१८५९).या अधिकृत सामीलीकरणामुळे (१८६१-६२) आधुनिक रूमानिया हे राष्ट्र उदयास आले परंतु कूझच्या जुलमी राजवटीमुळे अवचित सत्तांतर होऊन होहेंझॉलर्नसिकमारिंजन घराण्यातील पहिला कारॉल याची राजा म्हणून निवड झाली (१८६६). त्यावेळी राज्यव्यवस्थेसाठी एक मसुदा तयार करण्यात आला. तेच रूमानियाचे पहिले उदार संविधान होय. पुढे बर्लिन काँग्रेसने रूमानियाला पूर्ण स्वातंत्र्य दिले (१८७८) आणि रूमानिया हे स्वतंत्र राज्य (राजसत्ता) अस्तित्वात आले (१८८१). हेच संविधान काही किरकोळ फेरबदल करून १९२३ पर्यंत कार्यवाहित होते. पुढे त्यात काही बदल झाले आणि राजेशाही संपुष्टात आल्यानंतर (१९४५) आमूलाग्र बदल करण्यात आले. १९५२ मध्ये रशियाच्या धर्तीवर तेथील संविधान बनविण्यात येऊन त्यात कम्युनिस्ट पक्षांच्या ध्येय-धोरणानुसार काही अपरिहार्य बदल झाले (१९६५).
होहेंझॉलर्न-सिकमारिंजन धराण्यात १८६६ च्या संविधानानुसार राजसत्ता चालू राहिली व गादीला कोणी औरस राजपुत्र नसेल,तेव्हा लोकांच्या प्रतिनिधींना म्हणजे राष्ट्रीय सभेला राजघराण्यातून राजा निवडण्याचा हक्क प्राप्त झाला. ही राष्ट्रीय सभा-संसद-प्रारंभी द्विसदनी असून तिचे सिनेट व प्रतिनिधिमंडळ (कनिष्ठ गृह) असे दोन विभाग होते. सिनेटवर निवडून आलेल्या सभासदांची कालमर्यादा आठ वर्षे असून प्रतिनिधिमंडळ चार वर्षांसाठी असे. सिनेटर या पदासाठी ४० वर्षे वयाची मर्यादा असून कनिष्ठ गृहासाठी निवडून येणारा उमेदवार किमान २५ वर्षे पूर्ण झालेला असावा, अशी अट होती. राजा, दोन मुख्य धर्मोपदेशक,सहा कनिष्ठ धर्मोपदेशक व विद्यापीठांचे दोन कुलमंत्री हे राष्ट्रीय सभेचे पदसिद्ध सभासद असत. वयात आलेल्या प्रत्येक करदात्यास मतदानाचा हक्क असे. संसदेने संमत केलेला कायदा तात्पुरता निलंबित करण्याचा अधिकार राजास असे. तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार मुख्यमंत्री व त्यांच्या हाताखालील मंत्रिमंडळास असत. १९२३ मध्ये या घटनेत बदल करण्यात येऊन नवीन संविधान कार्यवाहीत आले. त्याअन्वेय जंगल व भूम्यंतर्गत भाग शासनाच्या अखत्यारीत आले. दुसऱ्या महायुध्दानंतर बिगर साम्यवादी पीटर ग्रोझा याच्या नेतृत्वाखाली साम्यवाद्यांचे बहुमत असलेले संयुक्त शासन सत्तारूढ झाले (१९४५). १९४७ मध्ये मायकेल यास राजत्याग करणे भाग पडले आणि रूमानिया हे पीपल्स रिपब्लिक (लोकांचे गणराज्य) जाहीर करण्यात आले. त्यावेळी जुने संविधान रद्द करण्यात येऊन रशियाच्या नमुन्यावर नवीन संविधान बनविण्यात आले (१९५२). या संविधानानुसार राष्ट्रीय सभा (संसद) एक सदनी करण्यात आली व ती कायदे करणारी सर्व सत्ताधारी संस्था मानण्यात येऊ लागली. १९६५ मध्ये रूमानियाने कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व असणारे नवीन संविधान स्वीकारले आणि गणराज्याचे नामांतर ‘रूमानियन समाजवादी प्रजासत्ताक’ असे करण्यात आले. सर्व शासकीय व प्रशासकीय योजना रशियातील शासनपद्धतीनुसार ठरविण्यात आल्या. राष्ट्रीय सभेतील प्रतिनिधींची निवड समान तत्वांवर गुप्तमतदानाद्वारे प्रत्यक्षरीत्या सार्वत्रिक निवडणुकांतून होते. प्रत्येक १८ वर्षे वयावरील स्त्री-पुरूषांना मतदानाचा हक्क असून देशाने समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली आहे. सर्व जातीधर्माच्या स्त्री-पुरूषांना संविधानाने समान नागरी हक्क दिले असून कामगार संघटना तसेच सार्वजनिक, सहकारी इ. संघटनांचे सभासद होण्यास मान्यता दिली आहे.
संविधान स्वीकारणे, सुधारणे तसेच राष्ट्राध्यक्ष निवडणे, त्याला परत बोलविणे आणि प्रशासकीय बाबींवर देखरेख ठेवणे, न्यायदानात सुसूत्रता आणणे इ. कामे राष्ट्रीय सभा करते. तिची निवडणुक पाच वर्षाकरिता होते तीतून निरनिराळ्या खात्यांचे प्रमुख निवडले जातात तसेच अध्यक्ष व चार उपाध्यक्ष यांची निवड होते. वर्षातून तिची दोन अधिवेशने भरतात. मंत्रिमंडळ हे राष्ट्रीय सभेखालील प्रशासकीय उच्च -स्तरीय मंडळ असून अधिवेशनांदरम्यानच्या काळात ते राष्ट्रीय सभेच्या निर्णयांची अंमलबजावणी करते. त्याची निवड राष्ट्रीय सभेने नियुक्त केलेल्या प्रतिनिधीतून केलेली असते. याचा अध्यक्षच देशाचा राष्ट्राध्यक्ष असतो. मंत्रिमंडळात राष्ट्राध्यक्ष, पाच उपाध्यक्ष व पंधरा सभासद असतात. राष्ट्राध्यक्ष हा सर्व सैन्यांचा व संरक्षण खात्याचा प्रमुख असून तो विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करतो.
रूमानियाचे प्रशासनाच्या सोयीसाठी ३९ जिल्ह्यांत (ज्यू डेटे) विभाजन केले असून बूकारेस्ट शहर हा विशेष जिल्हा ठेवला आहे. याशिवाय जिल्ह्यांतर्गत ४५ लहान शहरे व ग्रामीण स्तरावर २,००० कम्यून स्थानिक स्वराज्याचे भाग आहेत. लोकमंडळांना रूमानियाच्या राजकीय वर्तुळात फार महत्व असून या स्थानिक मंडळांद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन चालते. त्यांची मुदत पाच वर्षाची असते.
देशात मध्ययुगापासून अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात होते व काही पक्षांना राजाचा प्रत्यक्ष आश्रयही होता परंतु दुसऱ्या महायुध्दानंतर राजकीय क्षेत्रात रशियाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आणि तेथील सोशॅलिस्ट पक्षाचे (१८९३ पासून ) रूपांतर कम्युनिस्ट पक्षात झाले (१९४८). याच पक्षाकडे जवळजवळ सर्व सत्ता असून रूमानियन वर्कर्स पार्टी असे पूर्वीचे पक्षाचे नाव पक्षाच्या नवव्या काँग्रेसमध्ये १९६५ साली ‘रूमानियन कम्युनिस्ट पार्टी’ असे करण्यात आले. काँग्रेस हे पक्षाचे सर्वोच्च अंग असून त्यातील प्रतिनिधींची दर पाच वर्षांनी बैठक बोलाविण्यात येते. तिचे एकूण २६५ स्थायी सभासद असून १८१ बदली सभासद होते (१९८४) महासचिव, केंद्रीय लेखा परीक्षा आयोग आणि मध्यवर्ती समिती या पक्षाच्या तीन प्रमुख शाखा असून मध्यवर्ती समिती कार्यकारिणी व सचिवालय यांची निवड करते. कार्यकारिणीत १९८७ मध्ये २१ पूर्ण सभासद व २५ बदली सभासद होते. या पक्षाशिवाय ‘सोशॅलिस्ट डेमॉक्रसी अँड युनिटी फ्रन्ट’ (१९६८) आणि ‘युनियन ऑफ कम्युनिस्ट यूथ’ हे अन्य दोन पक्ष आहेत. पहिला पक्ष हा कामगार व अल्पसंख्याकांचा प्रातिनिधीक असून दुसऱ्या पक्षात १४ ते ३० वर्षादरम्यानचा युवकाचा समावेश होतो. तो कम्युनिस्ट पक्षाचीच युवा शाखा मानला जातो.
देशपांडे, सु. र.
न्याय व संरक्षण : देशात सर्वोच्च न्यायालय, परगणा, स्थानिक व सैनिकी न्यायालये यांमार्फत न्यायदानाचे काम चालते. रूमानियन संसद (ग्रँड नॅशनल असेंब्ली) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची चार वर्षासाठी निवड करते. देशातील सर्व कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे काम सर्वोच्च न्यायालय करते. सामान्यपणे परगणा व स्थानिक न्यायालयांत न्यायाधीश न्यायसाहाय्यकांच्या मदतीने न्यायदानाचे काम पाहतात. त्यांचीही चार वर्षाकरिता नेमणूक केलेली असते. यांशिवाय न्यायदानाच्या कामात समेट आयोग आणि न्यायनिर्णय परिषदा मदत करतात. संसदेने चार वर्षासाठी नियुक्त केलेल्या शासकीय अभियोत्त्याचे कार्यालय शासनाला कायदेविषयक बाबींत सल्ला देते. शासकीय अभियोक्त्याचे कार्यक्षेत्र संविधानानुसार स्वायत्त असून सामान्यपणे सामाजिक न्याय्य प्रस्थापणेच्या कामी देखरेख करणे हे त्याचे काम असते. या कामात इतर दुय्यम अधिकारी त्याच्या मदतीसाठी नेमलेले असतात. संसदेच्या अधिवेशनकाळात राज्य परिषदेचे त्याच्यावर नियंत्रण असते. परगण्यांतील व बूकारेस्ट येथील अभियोक्त्यांची निवड त्या त्या लोकपरिषदांतून केली जाते. राज्यसुरक्षा परिषद कायदा व सुव्यवस्था पाहते.
देशात खाजगी वकील व्यवसाय अस्तित्वात नाही. कायदा व न्याय खात्याच्या अखत्याराखाली एका सामूहिक कार्यालयामार्फत वकील व्यवसाय करावा लागतो. १ जानेवारी १९६९ पासून नवीन दंड संहिता अंमलात आली आहे. खून, राष्ट्रद्रोह, इं. गंभीर गुन्ह्यांस मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. जानेवारी १९८८ मधील गुन्हेगारी माफीच्या ठरावानुसार गुन्हेगारांच्या काही शिक्षा रद्द करण्यात आल्या, तर काहींच्या शिक्षांत कपात करण्यात आली. रूमानियन संसदेने १९७४ मध्ये प्रतिबंधात्मक वित्तीय नियंत्रण न्यायालय स्थापन केले असून त्याच्या अखत्यारीत आर्थिक बाबीसंबंधीचे व्यवहार येतात.
संकपाळ, ज. वा.
रूमानियात सैनिकी सेवा सक्तीची असून या सेवेस योग्य अशा २० ते ५० वर्षे वयोगटातील, सर्व पुरूषांना सैन्यात भरती व्हावे लागते. पायदळ व हवाईदल यांसाठी ही सक्तीची सेवा १६ महिन्यांची आणि नाविकदलासाठी २४ महिन्यांची असते. १९८७ मध्ये देशात पुढीलप्रमाणे सैन्यबळ होते: एकूण १,७९,५०० सैनिकांपैकी १,०७,५०० सक्तिसैनिक होते. १९८८ साली पायदळात १,४०,००० नौदलात ७,५०० व हवाईदलात ३२,००० अधिकारी व सैनिक होते. यांशिवाय सैनिकीसम दलातील ३५,००० सैनिकांपैकी १५,००० सीमासैनिक होते.याच वर्षी देशात सु. ९,००,००० लोकसेना होती. रूमानिया वॉर्सा करार संघटनेचा सभासद असूनही त्याने १९६२ पासून या संघटनेच्या कृतिशील कार्यक्रमात भाग घेतलेला नाही.
आर्थिक स्थिती : दुसऱ्या महायुध्दापूर्वी रूमानिया अप्रगत देश होता. येथील बहुतेक जनता प्रामुख्याने शेतीवर अवलंबून होती. या काळात एकूण कामकऱ्यांपैकी सु. ८०% कामगार शेतीमध्ये गुतलेले होते. परंतु अप्रगत शेतीपद्धतीमुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेती उत्पन्नाचा फक्त ३८% वाटा होता. त्याच्या जोडीला जंगल उत्पादने व लघुउद्योग यांचे थोडेफार साहाय्य होते. यात फक्त ८% कामगार गुंतलेले होते. १९३० साली देशातील बहुतेक शेती जमीनदारांच्या ताब्यात होती व सु. ७ लक्ष शेतकरी भूमिहीन होते. या काळात रूमानियात ९५% यंत्रसामग्रीची आयात केली जात होती, तर फक्त कच्चा माल, खनिज तेल, कापड व कातडी वस्तू यांची निर्यात होत होती. दुसऱ्या महायुध्दाच्या अखेरीस देशाची अर्थव्यवस्था व औद्योगिक क्षमता खूपच ढासळली. १९३८ च्या मानाने १९४७ मध्ये उत्पादनक्षमता निम्मी झाली. महायुध्दांनंतर नुकसानभरपाई म्हणून रशियाने रूमानियाशी करार करून जागतिक किंमतीच्या निम्म्याने खनिज तेल घेण्यास सुरूवात केली आणि अनेक सोव्हिएट-रूमानियन कंपन्यांची स्थापना केली. त्यामुळे रूमानियाच्या औद्योगिक व आर्थिक व्यवहारांत रशियाचे बरेच वर्चस्व प्रस्थापित झाले होते. ही परिस्थिती १९५४ पर्यंत कायम राहिली. दुसऱ्या महायुध्दानंतर १९४८-४९ मध्ये रूमानियाच्या कम्युनिस्ट सरकारने रशियाच्या पद्धतीचे आर्थिक धोरण स्वीकारले व बऱ्याचशा औद्योगिक व कृषी क्षेत्रांचे राष्ट्रीयीकरण केले. मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणाचे धोरण अवलंबिल्यामुळे बहुतेक कामगारवर्ग शेतीऐवजी कारखानदारी व लुघुउद्योगांमध्ये गुंतलेला दिसून येतो. त्यामुळे १९८० सालच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेती उत्पादनाचा फक्त १४.८% वाटा होता. तर उद्योगधंद्यांपासून मिळणारे उत्पन्न ५८.६% होते.
देशात १९४९ पासून सामुदायिक शेतीपद्धतीच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली व १९६२ पर्यंत बऱ्याचशा खाजगी शेतजमिनींचे या पद्धतीत रूपांतर करण्यास आले. त्यामुळे ९१% जमीन सामुदायिक व सरकारी मालकीची आणि फक्त ९% जमीन खाजगी क्षेत्र म्हणून राहिली. १९८० साली देशातील एकूण क्षेत्रापैकी सु. ६३% क्षेत्र शेतजमिनीचे होते व सु. ३०% कामगार शेतीत गुंतलेले होते. एकूण १,५०,२०,००० हे. शेतीयोग्य जमिनीपैकी प्रत्यक्ष धान्य लागवडीखाली ९९,८५,००० हे., कुराणांखाली ४३,९८,००० हे., तर फळबागांखाली ६,३७,००० हे. क्षेत्र होते (१९८५).त्याच वर्षी देशात एकूण ४,३६३ सामुदायिक शेती होती. रशियाप्रमाणेच येथेही शेती आणि तिच्याशी संलग्न असलेले उद्योगधंदे यांचे तीन भाग केलेले दिसून येतात. सहकारी तत्वावर चालणाऱ्या शेतीमध्ये जमीनमालक एकमेकांच्या सहकार्याने सार्वजनिक सहकारी शेते करतात. याशिवाय स्वतःच्या मालकीची शेतेही कसतात. सरकारी शेती मात्र पगारी कामगारांकडून केली जाते. आणि या सर्वांना लागणारी यंत्रसामग्री, खते तसेच अन्य सुविधा अग्रहक्काने पुरविण्यात येतात. महायुध्दोत्तर काळात खते, जलसिंचन व अन्य सुविधा यांमुळे शेती उत्पादन व शेतमालाची प्रत यांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. तरीही एकंदरीत शेतजमिनी उद्योगधंद्यांसाठी देण्याच्या व कुराणांसाठी राखून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे शेती उत्पादनात फारसा वेग दिसून येत नाही. स्थानिक गरजेसाठी प्रामुख्याने गहू व राय, साखरबीट, बटाटे इ. पिके घेतली जातात. १९८६ मध्ये शेती उत्पादन पुढीलप्रमाणे झाले. (आकडे हजार मे. टनात):गहू व अळशी ७,९४७ सातू २,२०० मका २०,००० बटाटे ८५१३सूर्यफूलाच्या बिया १,००४ साखर बीट ७,०००. देशात भाजीपाला व फळे यांचेही उत्पादन होत असून द्राक्षउत्पादनामध्ये हा जगातील एक अग्रेसर देश आहे. यांशिवाय सोयाबीन, तंबाखू, कापूस, फ्लॅक्स, अंबाडी ही पिकेही घेतली जातात.
शेती उत्पादनाच्या मानाने देशात पशुपालन व्यवसायाची प्रगती झपाट्याने होत असल्याचे दिसून येते. यासाठी रूमानियन सरकारने कुरणांचा विकास तसेच पशुवैद्यक शास्त्रात मोठ्या प्रमाणात प्रगती घडवून आणण्यासाठी योजना आखल्या असून जातिवंत पशुंची पैदास केंद्रे उभारली आहेत. १९८७ साली देशात पुढीलप्रमाणे पशुधन होते: गुरे, ७२,२५,००० डुकरे, १,४७,११,००० घोडे ६,८६,००० शेळ्यामेंढ्या १,८७,६२,००० आणि कोंबड्या १३,०९,४१,०००. औद्योगिकीकरण व शेतीमध्ये आधुनिक यंत्रावजारांचा वाढता वापर सुरू झाल्याने १९८६ मध्ये देशातील घोड्यांची संख्या एकदम घटली. त्यामुळे सरकारने शेतीमध्ये यंत्रांचा वापर थोडा कमी करून घोड्यांच्या पैदाशीला अधिक प्रोत्साहन दिले आहे. पशुपालनाबरोबर पशुजन्य पदार्थ उदा., मांस, दूध, लोकर, कातडी, अंडी इ. पदार्थानाही देशात भरपूर मागणी असल्याने सरकारने या व्यवसायाकडेही लक्ष केंद्रितकेले आहे. देशातील पशुजन्य पदार्थांचे १९८६ मधील उत्पादन मे. टनांत पुढीलप्रमाणे होते: मांस २६,५६,००० दूध, ५,६४,२९,००० लोणी ४३,२५६ चीज ८४,४१६ लोकर, ४३,४८२ मध १४,२१९ व अंडी ८८,८४० लक्ष नग. देशात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात (मुख्यत्वे डॅन्यूब नदी,तिचा त्रिभुज प्रदेश व काळा समुद्र यांमध्ये) चालतो. यांशिवाय देशातील इतर नद्या, सरोवरे यांमध्येही थोड्याफार प्रमाणात मासे सापडतात. १९८५ मध्ये २,३७,६०० मे. टन मासे पकडण्यात आले. माशांमध्ये मुख्यत्वे स्टर्जन, बार्बेल, मॅकेरेल व कार्प यांचे प्रमाण जास्त आहे.
उद्योगधंदे : रूमानियन सरकारने १९५१–८० या काळातील विकासयोजनांच्या एकूण गुंतवणुकीपैकी ५०% गुंतवणूक उद्योगधंद्यांच्या विकासासाठी केली आहे. त्यामुळे या काळातील औद्योगिक उत्पादनांमध्ये दरवर्षी सरासरी १२% वाढ झाल्याचे दिसून येते. रसायने, यंत्रसामग्री व धातूंवरील प्रक्रिया या उद्योगांची झपाट्याने वाढ होत आहे.त्याखालोखाल बांधकाम साहित्य, तेलविहिरी खोदण्याची उपकरणे तसेच विजेची उपकरणे तयार करण्याच्या उद्योगांचा विकास होत आहे. रसायन उद्योगात प्रामुख्याने रासायनिक खते, गंधकाग्ल, सोडा ॲश, कॉस्टिक सोडा यांचा समावेश आहे. देशातील लोखंड व पोलाद उत्पादन महत्वाचे असून यंत्रसामग्री उद्योगत ट्रॅक्टर, अवजड वाहने, मोटारी, जहाजे इत्यादींच्या निर्मितीचा समावेश होतो. याशिवाय कापड, लाकूडकाम, चामडी कमावणे, चामड्याच्या वस्तू बनविणे इ. उद्योगही थोड्याफार प्रमाणात चालतात. परंतु मोठ्या उद्योगांशी स्पर्धा, उत्पादनातील अडचणी, मालाची हलकी प्रत, व्यवस्थापनातील हलगर्जीपणा इ. अनेक कारणांमुळे लघुउद्योगांची फारशी प्रगती झालेली नाही. तांत्रिक कौशल्यामध्ये हळुहळू प्रगती होत असून औद्योगिक उत्पादनावर त्याचा चांगला परिणाम होत आहे. १९८५ मध्ये देशात पुढीलप्रमाणे उत्पादन झाले (आकडे टनांत) :कच्चे लोखंड ९,९१२ पोलाद १३,७९५ पोलादी नळ्या १,५१३ लाटीव पोलाद ९,९०० रासायनिक खते ३,०९७ धुण्याचा सोडा ३३६ कॉस्टिक सोडा ८१४ कागद ७४१ सिमेंट १२,२३८ साखर ५८२ खाद्यतेल ३२८. याच वर्षी देशात ५,७१,००० रेडिओ संच व ५,२२,००० दूरचित्रवाणीसंच १,३४,१६९ मोटारी यांची निर्मिती झाली.
देशातील खनिज उत्पादनांमध्ये प्रामुख्याने खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचा मोठा वाटा असून त्यांशिवाय मीठ, तपकिरी कोळसा, लिग्नाइट, लोहखनिज, तांब्याचे खनिज, बॉक्साइट, क्रोमियम, मँगॅनीज व युरोनियम यांचेही साठे आहेत. खनिज तेल उत्पादन मुख्यत्वे प्राखॉव्हा, बाकऊ, गॉर्झ, आर्जेंश इ. प्रांतातून होते. १९८७ मध्ये खनिज तेलाचे उत्पादन १०५ लक्ष टन झाले तर १९८५ मध्ये देशाची तेलशुध्दीकरणाची क्षमता ३०० लक्ष टनांची होती. अशुद्ध तेलाची आयात केली जाते. मिठाच्या खाणी मुख्यत्वे कार्पेथियन व ट्रान्सिल्व्हेनिया प्रदेशांत आढळतात. मिठाचे १९८५ मध्ये ५० लक्ष टन उत्पादन झाले. इतर खनिजांचे उत्पादन पुढीलप्रमाणे (आकडे हजार टनात): लोहखनिज, २,२८७ दगडी कोळसा ४६,५८१ मिथेन वायू २,७७,१९० लक्ष घ.मी. रूमानियातून प्रामुख्याने खनिज तेल उत्पादने सिमेंट धान्य, तेलविहिरी तसेच रसायन कारखाने यांना लागणारी उपकरणे इत्यादींची निर्यात, तर लोह खनिज, कोक, विद्युत् उपकरणे, मोटारी व शेती अवजारे यांची आयात केली जाते. रशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ईजिप्त, प. जर्मनी, इटली, इराण, पू.जर्मनी या देशांशी रूमानियाचे व्यापारी संबंध आहेत.
औद्योगिकीकरणाच्या उत्तेजनामुळे देशातील वीजनिर्मितीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. १९८५ मध्ये देशात सु. ७,१८,१९० लक्ष किवॉ ता. (पैकी जलविद्युत् १,१८,९६० किवॉ.ता.) वीजनिर्मिती झाली. यूगोस्लाव्हियाच्या सहकार्याने डॅन्यूब नदीवर ‘आयर्न गेट’ येथे मोठा वीजप्रकल्प उभारण्यात आला असून त्याची वार्षिक वीजनिर्मिती क्षमता २,२२,५०० लक्ष किवॉ. ता. आहे. देशात औष्णिक व अणुऊर्जा केंद्रे असून अणुऊर्जा केंद्रे लष्कराच्या ताब्यात आहेत. लेऊ हे रूमानियाचे चलन असून एका लेऊचे १०० बानी असे भाग होतात. १ लेऊ व ५,१०,२५,५०,व १०० ले यांच्या नोटा तर ५,१०,१५,२५, बानी तसेच १ लेऊ आणि ३,५ ले यांची नाणी प्रचारात आहेत. मार्च १९८८ मध्ये स्टर्लिंग पौंड = ६·२५ ले आणि १ अमेरिकी डॉलर = ४·२५ ले असा विनिमय दर होता. देशात दशमान पद्धतीचा वापर केला जातो. द नॅशनल बँक ऑफ रूमानिया (स्था. १८८०, राष्ट्रीयीकरण १९४६) ही देशातील प्रमुख बँक असून ती वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. या बँकेला होणाऱ्या४ फायद्याचा निम्मा हिस्सा देशाच्या अर्थसंकल्पात जमा केला जातो. याशिवाय देशात गुंतवणूक, विदेश व्यापार ,कृषी व खाद्यपदार्थ उद्योग यांविषयी विशेष बँका आहेत. मॅन्युफॅक्चरर्स हॅनोव्हर ट्रस्ट कंपनी या अमेरिकन बँकेने बूकारेस्ट येथे १९७४ मध्ये आपली शाखा उघडली असून कम्युनिस्ट देशांत स्थापन करण्यात आलेली ही पहिलीच पाश्चात्य बँक आहे.
वाहतूक व संदेशवहन : देशात तिन्ही प्रकारच्या वाहतूक सुविधा उपलब्ध असून वाहतूक यंत्रणा सरकारकडून राबविली जाते. १९८५ साली देशात एकूण ७२,७९९ किमी. लांबीचे रस्ते होते व त्यांपैकी ३५,९७० किमी. लांबीचे रस्ते आधुनिक पद्धतीने बांधलेले होते.१९८७ साली देशातील एकूण ११,२२१ किमी. लांबीच्या लोहमार्गापैकी ३,३२८ किमी. मार्गाचे विद्युतीकरण झाले होते. भुयारी लोहमार्गाचा पहिला टप्पा १९७९ मध्ये बूकारेस्ट येथे सुरू करण्यात येऊन सु. २७ किमी. लांबीचा पूर्व-पश्चिम मार्ग १९८३ मध्ये पूर्ण करण्यात आला. जानेवारी १९८६ मध्ये उत्तर-दक्षिण भुयारी लोहमार्गाचा १०.५ किमी लांबीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. १९९० पर्यंत ६० किमी. भुयारी मार्ग पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.
देशांत अंतर्गत जलाशयातून होणारी व सागरी असे जलवाहतुकीचे दोन भाग पडतात. डॅन्युब नदीतून जलवाहतूक करण्यास सर्व देशांना परवानगी असू डॅन्यूब-काळा समुद्र कालवा १९८४ मध्ये अधिकृत पणे वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. याची वाहतूकक्षमता वार्षिक सु. ८०० लक्ष मे. टन आहे. १९८७ मध्ये ८५ मी. लांबीच्या डॅन्यूब-बूकारेस्ट कालव्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून बूकारेस्ट कालव्याचे बांधकाम सुरू करण्यात आले असून बूकारेस्ट हे चांगल्या प्रतीचे आधुनिक बंदर म्हणून विकसित करण्याची योजना आहे. रूमानियन यूगोस्लाव्ह आयर्न गेट या वीजनिर्मिती व जलवाहतुकीसाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील आयर्न गेट २ चा डिसेंबर १९८४ पासून जलवाहतुकीस उपयोग करण्यात येऊ लागला आहे. याशिवाय प्रुट नदीतूनही थोड्या प्रमाणात वाहतूक चालते. या अंतर्गत जलवाहतुकीशिवाय काळ्या समुद्रातून इतर देशांशी मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. देशात चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असून रूमानियन एअर ट्रान्स्पोर्ट ही देशाची हवाई वाहतूक कंपनी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक करते.
डिसेंबर १९८५ मध्ये देशात एकूण ३२,०८,००० रेडिओ आणि ३८,७९,००० दूरचित्रवाणी परवानाधारक होते. रेडिओवरून विविध भाषांतून (रूमानियन, अरबी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, रशियन इ.) कार्यक्रम सादर केले जातात. १९८३ पासून दूरचित्रवाणीवरून काही रंगीत कार्यक्रमही सादर करण्यात येऊ लागले. १९८५ मध्ये देशात एकूण ४,९७९ डाक कार्यालये होती, तर १९·६ लक्ष दूरध्वनी परवानाधारक होते. त्याच वर्षी देशात ५,५५८ चित्रपटगृहे व १५४ नाट्यगृहे होती
पर्यटन : रूमानियन सरकार पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देत असून, कार्पेथियन पर्वतारांगा, डॅन्यूब नदीचा त्रिभुज प्रदेश, काळ्या समुद्राची किनारपट्टी इ. भागांतील आरोग्यधामे व प्रेक्षणीय स्थळांचा विकास मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. डॅन्युब त्रिभूज प्रदेश विकास कार्यक्रमाला १९८३ पासून प्रोत्साहन देण्यात आले असून या त्रिभूज प्रदेशाचा जवळजवळ निम्मा भाग अभयारण्य म्हणून संरक्षित ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय पर्यटन कार्यालयातर्फे पर्यटन उद्योगाची विकासकामे केली जातात. १९८५ मध्ये सु. ६० लक्ष परदेशी पर्यटकांनी रूमानियाला भेट दिली. १९८६ मध्ये रशियातील चेर्नोबिल येथील अणुऊर्जा निर्मिती केंद्रात प्रचंड स्फोट होऊन निर्माण झालेल्या किरणोत्सर्गाच्या धोक्यामुळे, रूमानियातील आप्रवाशांची संख्या ४५ लक्षांपर्यंत घटली होती. या देशात येणाऱ्या प्रवाशांत जवळजवळ ८५% प्रवासी पूर्व यूरोपीय देशांतील व रशियातील असतात.
लोक व समाजजीवन : रोमन साम्राज्याच्या ताब्यातील ऐतिहासिक डेश प्रदेश हे आधुनिक रूमानियन संस्कृतीचे केंद्रस्थान समजले जाते. त्यामुळे सु. ८९·१% रूमानियन स्वतःला डेशन व रोमन वसाहतकऱ्यांचे वंशज मानतात. त्यांच्याशिवाय देशात हंगेरियन ७.७% व जर्मन १.५% आहेत. हंगेरियन व जर्मन मुख्यतः ट्रान्सिल्व्हेनियन व वनात प्रदेशांत आढळतात. रशियन, युक्रेनियन, सर्ब, क्रोएट, ज्यू,तुर्की, तातार, बल्गेरियन ग्रीक, स्लोव्हाक व जिप्सी यांचे देशातील प्रमाण अगदी थोडे (१·७%) असून त्यांच्या वसाहती देशाच्या सरहद्दीजवळील प्रदेशात असल्याचे दिसून येते. १९८८ साली येथे हंगेरियन २० लक्ष, जर्मन २·५ लक्ष ज्यू ३०,००० व जिप्सी १० लक्ष होते. येथील कायद्यानुसार हंगेरियनांना परदेशी स्थलांतरास परवानगी नाकारण्यात आलेली आहे. देशाच्या संविधानाने इतर भाषिकांना दैनंदिन व्यवहारात, शिक्षण क्षेत्रात त्यांच्या मातृभाषेचा वापर करण्याचा अधिकार दिला आहे. रूमानियात स्त्री-पुरूषांसाठी उत्तम प्रतीचे भरतकाम केलेला पारंपारिक पद्धतीचा सदरा व अंगरखा असा पोशाख लोकप्रिय आहे. स्त्रियांनी सणासमारंभाच्या वेळी डोक्याला रूमाल बांधणे अथवा मोत्यांनी मढविलेले शिरोभूषण वापरण्याची प्रथा आहे.
येथील साम्यवादी शासनाने कोणत्याही धर्माचा पुरस्कार केलेला नसला, तरी लोकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे धार्मिक कृत्ये करण्याची मुभा आहे. देशात एकूण १४ धार्मिक पंथांची चर्च आहेत. सु. ९०% लोक रूमानियन ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी असून उर्वरित रोमन कॅथलिक, कॅल्व्हिनवादी (६,००,००० अनुयायी) ज्यू व ल्युथरन (१,५०,०००) या पंथाचे आहेत. शासनाकडून चर्चची व्यवस्था शक्य तितक्या नियमितपणे पाहिली जाते व त्याचा खर्च भागविला जातो. ११८६ साली देशात ११,८०० चर्च, दोन धर्मविद्याविषयक महाविद्यालये व सहा धर्मशिक्षण विद्यालये होती. ज्यू लोकांनी इस्झायल मध्ये स्थलांतर केल्याने त्यांची येथील संख्या खूपच कमी झाली आहे. १९८८ मध्ये देशात ३०,००० ज्यू व १२० सिनॅगॉग होती (१९८७). १९४८ पूर्वी सु. १० टक्क्यांपेक्षा जास्त लोक ईस्टर्न कॅथलिक चर्चचे अनुयायी होते परंतु त्यानंतर सरकारने या धर्मपीठाच्या कार्यावर बंदी आणून त्याची मालमत्ता रूमानियन ऑर्थाडॉक्स चर्चमध्ये समाविष्ट केली. जर्मन हे ईव्हँजेलिकल चर्चचे, तर हंगेरियन युनिटेरियन चर्चचे अनुयायी आहेत. १९८३ मध्ये देशात सु. ४०,००० मुस्लिम होते.
देशातील आरोग्यव्यवस्था समाज कल्याण व आरोग्य खात्याकडून पाहिली जाते. आरोग्यविषयक योजना, वैद्यक संस्थांवर नियंत्रण इ.कार्ये वा खात्यामार्फत केली जातात. १९८५ साली देशातील रूग्णालयांत २,१२,९५३ खाटांची सोय होती व ४७,३९० डॉक्टर होते. १९५९ पासून येथील खाजगी वैद्यक व्यवसाय जवळजवळ बंद करण्यात आला आहे. १९८३ पासून काही रूग्णालयांनी औषधोपचारासाठी थोड्याफार प्रमाणात शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. कामगार ,निवृत्त कर्मचारीवर्ग व त्यांवर अवलंबून असलेले लोक यांच्या औषधोपचाराची काळजी सामाजिक विमा योजनेद्वारे घेतली जाते. वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे देशातील सरासरी आयुर्मान वाढले असून ते १९७६-७८ या काळात स्त्रियांचे ७२ वर्षे व पुरूषांचे ६७ वर्षे असे होते. १९८६ मध्ये देशातील लोकसंख्यावाढीचे प्रमाण हजारी ४·९ होते, तर लोकसंख्येची घनता दर चौ.किमी. ला ९५·७ होती. समाजकल्याण खात्यातर्फे लोकसंख्यावाढीला प्रोत्साहन देण्यात येत असून मुलींच्या लग्नाचे वय १८ वर्षावरून १५ वर्षे करण्यात आले आहे.
शिक्षण : देशात १९४८ मध्ये प्रौढ शिक्षितांचे प्रमाण फक्त २% होते. रूमानियन सरकारने शिक्षण मोफत व ६ ते १६ वर्षापर्यंत सक्तीचे केले असून त्यांतील आठ वर्षे प्राथमिक व दोन वर्षे माध्यमिक शाळेची असतात. त्यापुढील शिक्षण मात्र शासनाने चालविलेल्या ‘लीसे’ या विद्यापीठपूर्व माध्यमिक शाळांतून किंवा व्यावसायिक अथवा प्रगत अशा तांत्रिक शाळांतून दिले जाते. १९८५-८६ मध्ये देशातील १२,८११ बालोद्यानांमध्ये ३३,५२२ शिक्षक व ८,६४,३३२ मुले होती. १४,०७६ प्राथमिक व माध्यामिक शाळांत १,४७,१४७ शिक्षक व ३०,३०,६६६ विद्यार्थी ९८१ लीसेंमध्ये ४७ ६९३ शिक्षक व १२,२६,९२७ विद्यार्थी ७५३ व्यावसायिक शाळांमध्ये २,५१७ शिक्षक व २,८७,८१८ विद्यार्थी होते. २९६ प्रगत तांत्रिक शिक्षण शाळांमध्ये १२३ शिक्षक व २२,८०३ विद्यार्थी होते. १९८३-८४ मध्ये देशातील संख्येने कमी असलेल्या इतर धार्मियांसाठी ३,१३० शाळा होत्या व त्यांत ३,४०,७७३ विद्यार्थी व १५,९२२ शिक्षक होते. याशी (विद्यापीठ स्था. १८६०) बूकारेस्ट (१८६४) क्लूझ (१९१९) टीमिश्वारा (१९६२), क्रायॉव्हा (१९६५), ब्राशॉव्ह (१९७१) येथे विद्यापीठे असून १९८५-८६ मध्ये देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये १,५९,७९८ विद्यार्थी व १२,६९१ शिक्षक होते. ‘नॅशनल कौन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च ’ या संस्थेतर्फे संशोधनात्मक कार्य केले जाते.
चौंडे, मा. ल.
भाषा-साहित्य : रूमानियन ही देशाची अधिकृत भाषा असून जर्मन व हंगेरियन (विशेषतः ट्रान्सिल्व्हेनिया प्रदेशात) या भाषाही अल्प प्रमाणात वापरात आहेत. रूमानियन ही रोमान्स भाषासमूहात समाविष्ट होणारी एक भाषा आहे. ह्या भाषेतील विपुल लोकसाहित्यात महाकाव्ये, भावकविता, बोधवादी साहित्य, नाट्यात्म संवाद ह्यांचा समावेश होतो. सोळाव्या-सतराव्या शतकांत धार्मिक व ऐतिहासिक साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. रूमानियन भाषेचे पहिले व्याकरण अठराव्या शतकात तयार झाले. एकोणिसावे शतक म्हणजे रूमानियाचा प्रबोधनकाल. व्हासीले आलेक्सांड्री, मीहाईल एमीनेस्कू ह्यांसारखे श्रेष्ठ साहित्यिक ह्या शतकात होऊन गेले. यॉन ल्यूका कारागीएल, यॉन स्लाव्हिसी, दुलिऊ झामफिरेस्क्यू, कॉस्बक हे ह्या शतकातील अन्य उल्लेखनीय साहित्यिक होत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कथाकांदबरीकार मीहाईल सादोव्हीन याने रूमानियन गद्यावर आपला प्रभाव पाडला. ह्या शतकातील लिव्हिऊ रेब्रिआनू, यॉन आगारबिसिआनू,सेझार पेत्रेस्क्यू गाला गालसिऑन त्यूदोर आर्गेझी ,झहारिआ स्टान्सू हे साहित्यिकही उल्लेखनीय होत [⟶ रूमानियन साहित्य] .
देशात १९८५ मध्ये ३६ दैनिके ,२४ साप्ताहिक वृत्तपत्रे, ४२२ नियतकालिके प्रसिद्ध होत होती. यांपैकी ३८ नियतकालिके इतर भाषांतील होती.
कुलकर्णी, अ. र.
कला व क्रीडा : रूमानियन कलेला प्राचीन इतिहास असून देशात नवाश्मयुगातील काही कलात्मक अवशेष सापडतात. दोब्रूजयेथे काळ्या समुद्रकिनारी भागात ग्रीक व रोमनकालीन स्मारके पहावयास मिळतात. रोमनकाळानंतर येथील कलेत बायझंटिन तसेच पौर्वात्य व पश्चिमात्य कलांचे मिश्रण झाल्याचे दिसून येते. रूमानियन कलेची छाप ट्रान्सिल्व्हेनिया, वालेकिया, मॉल्डेव्हिया इ. भागातील वास्तू व लोककला यांमधून दिसते. सामान्यपणे रूमानियन चर्चवास्तू बायझंटिन स्थापत्यशैलीतील आहेत. ट्रान्सिल्व्हेनिया प्रदेशातील मग्यारांच्या व जर्मनांच्या वास्तू गॉथिक शैलीत बांधलेल्या दिसतात. बायझंटिन पद्धतीप्रमाणे आतून सुशोभित व सुंदर मूर्तिकाम केलेल्या वास्तूंत धातुकामाचेही आकर्षक नमुने आढळतात. चर्चवास्तूंच्या बाह्य सजावटीवर जर्मन कलेची छाप दिसून येते. नवीन वास्तुकलेत पश्चिम यूरोपीय आधुनिक शैलीचा प्रभाव असून १९१०–३९ यांदरम्यानच्या वास्तुशैलीवर विशेषतः अमेरिकन पद्धतीचा ठसा दिसतो.
रूमानियातील अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झालेल्या चित्रकलाकृतींत पारंपरिक बायझंटिन छटा दृग्गोचर होते मात्र त्यानंतर चित्रशैलीत फ्रेंच दृकप्रत्ययवादाचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे विसाव्या शतकातील रूमानियन चित्रकारांत फ्रेंच चित्रकारांचे अनुकरण व पौर्वात्य चित्रकलेतील रंगसंगतीचे अनुकरण केलेल्या, कृषिकलेचे मिश्रण दिसून येते. आधुनिक रूमानियन चित्रकृतींच्या निर्मितीत निकोले ग्रिगोरेस्क्यू व यॉन अँड्रिस्क्यू (१८५०–८२) यांचा मोठा वाटा आहे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात स्टीफन लुशिअन (१८६८–१९१६) याने काही चित्रकृती निर्माण केल्या. त्यांत त्याने रूमानियन पारंपारिक कला व यूरोपीय नवीन कला यांचा समन्वय साधला. त्याचा आदर्श घेऊन त्यानंतरच्या चित्रकारांनी दृकप्रत्ययवादाचा व अभिव्यक्तिवादाचा प्रभाव असलेल्या कलाकृती निर्माण केल्या. विसाव्या शतकातील रूमानियन शिल्पकारांत दीमित्री पॅसिऊरे (१८७३–१९३२) व कॉन्स्टंटिन ब्रांकूश (१८७६–१९५७) हे प्रसिद्ध आहेत. १९४५ नंतरच्या कलाकृतींवर मात्र रूमानियातील सांस्कृतिक बदलांचा परिणाम झालेला दिसून येतो. आधुनिक रूमानियन मृत्पात्री व काचेचे कलाकाम जगप्रसिद्ध आहे. १९४८ मध्ये बूकारेस्ट येथील एका शाही राजवाड्याचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करण्यात आले असून त्यात दहाव्या ते अठराव्या शतकांतील रूमानियन ललित कलांचा, तसेच पौर्वात्य व यूरोपीय कलांचा संग्रह आहे.
सॉकर, स्कीइंग, हायकिंग, पोहणे, होड्यांच्या शर्यती, कुस्ती, हँडबॉल, शारीरिक कसरती इ. खेळ रूमानियात लोकप्रिय आहेत. १९८८ च्या सेऊल येथील ऑलिंपिक सामन्यांत रूमानियाला ७ सुवर्ण, ११ रोप्य व ६ कांस्य पदके मिळाली.
महत्त्वाची स्थळे : देशातील इतिहासप्रसिद्ध शहरे, आरोग्यधामे, रूमानियन रिव्हिएरा म्हणून प्रसिद्ध असलेला प्रदेश ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. रूमानियात सु. १२० आरोग्यधामे व औषधी पाण्याचे झरे आहेत. बूकारेस्ट ही देशाची राजधानी असून देशातील एक मोठे शहर तसेच सांस्कृतिक, औद्योगिक केंद्र म्हणून ते प्रसिद्ध आहे. बूलेव्हार दुतर्फा तांबडे, पिवळे व पांढरे गुलाब असलेले रस्ते, बागा, तलाव, ऐतिहासिक इमारती, सोळाव्या-सतराव्याशतकांतील चर्च अठराव्या शतकातील राजवाडा (सांप्रत शाही कलावस्तुसंग्रहालय) तसेच विलासी हॉटेले, रंगमंदिरे इत्यादींसाठी बूकारेस्ट प्रसिद्ध आहे. ब्राशॉव्ह (लोक. ३,५१,४९३–१९८६) हे लोकसंख्येने दुसऱ्याक्रमांकाचे शहर ट्रान्सिल्व्हेनिया प्रदेशात वसलेले असून रसायने, ट्रॅक्टर, विद्युत् उपकरणे इत्यादींच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. ट्यूटॉनिक सरदारांनी तेराव्या शतकात वसविलेले हे शहर पूर्वीपासूनच एक व्यापार केंद्र म्हणून विख्यात आहे. १९५०–६० या काळात हे ‘स्टालिन’ या नावाने ओळखले जात होते. तेथे तेराव्या व चौदाव्या शतकातील चर्च , नगरभवन (१४२०), सतराव्या शतकातील किल्ला इ. ऐतिहासिक वास्तू पहावयास मिळतात. शहरात एक तंत्रनिकेतन संस्था आहे. ⇨कॉन्स्टांट्सा (३,२७,६७६) हे काळ्या समुद्रावरील प्रमुख बंदर असून देशातील सर्वांत जुने शहर आहे. येथून प्रामुख्याने खनिज तेल, धान्य, लाकूड, यांची निर्यात होते. शहरात फर्निचर ,साबण, कापड, कातडी वस्तू इत्यादींचे निर्मितिउद्योग आहेत. ख्रिस्ती, यहुदी, मुसलमान पंथीयांची मोठी प्रार्थना मंदिरे, बायझंटिन व रोमनकालीन अवशेष, पुळणी विश्रामगृहे यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. ⇨टीमिश्वारा (३,२५,२७२) हे प्राचीन शहर व्यापारी केंद्र तसेच ऐतिहासिक वास्तू, बागा इत्यादीसाठी प्रसिद्ध आहे. याशी (३,१३,०६०) हे देशाच्या पूर्व सरहद्दीजवळील सुपीक शेती प्रदेशातील शहर पूर्वी मॉल्डेव्हियन राजांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे रूमानियन संस्कृतीचे केंद्र म्हणून ते आजही प्रसिद्ध आहे. शहरात मॉल्डेव्हियन कलेसाठी प्रसिद्ध असलेले सतराव्या शतकातील गोलिआ चर्च, कूझा, वीद्यापीठ मानवजातिवर्णनात्मक ऐतिहासिक व कलाविषयक वस्तूंचे संग्रहालय इ. वास्तू महत्वाच्या आहेत. येथे कापड, औषधे, यंत्रसामग्री, अन्नपदार्थ यांचे निर्मितिउद्योग चालतात. पहिल्या महायुद्धकाळात रूमानियाची राजधानी काही काळ येथे हलविण्यात आली होती. क्लूझ अथवा क्लूझ-नापोक (३,०९,८४३) हे शहर ट्रान्सिल्व्हेनियाच्या डोंगराळ भागात असून येथे रसायने, कापड, मृत्पात्री, धातूकाम इ. व्यावसाय चालतात. हे हिवाळी आरोग्यधाम म्हणून प्रसिद्ध असून येथे उच्च शिक्षणाच्या अनेक संस्था तसेच एक प्रमुख औषधोपचार केंद्र आहे. येथे चौदाव्या आणि पंधराव्या शतकांतील काही चर्च पहावयास मिळतात.
⇨प्लॉयेश्ती (२,३४,८८६) हे देशातील प्रमुख खनिज तेल उत्पादक केंद्र असून येथे १८५६ मध्ये खनिज तेल उत्पादनास सुरूवात झाली. शहरात कापड, रबर, काच, युद्धसामग्री इ. इतरही उद्योग चालतात. शहराच्या उत्तरेला जवळच प्राखॉव्हा खोरे असून ते सरोवरे, आरोग्यधामे, निसर्गसुंदर दृश्ये यांसाठी प्रसिद्ध आहे. या प्रमुख शहरांशिवाय मामाया, एफॉरिआ, मांग्गांल्या, व नव्याने निर्माण झालेली कॉन्स्टिनेस्ती, नेपच्यून, ज्यूपिटर, व्हीनस ही काळ्या समुद्रावरील पर्यटनस्थळे पुळणींसाठी आणि आरोग्यधामे म्हणून प्रसिद्ध आहे. (चित्रपत्र १२).
चौंडे, मा. ल.
संदर्भ : 1. Gilberg, T. Modernisation in Romania Since World War II, New York, 1975.
2. Graham, L. S. Romanja, A Developing Socialist State. Boulder, 1982.
3. King R. R. History of the Romanian Communist Party, Stanford 1980.
4. Turnock D. The Romanian Economy in the Twenieth Century, London, 1986.
“