रूमानियन भाषा: रूमानियन भाषा ही ⇨रोमान्स भाषासमूहात समाविष्ट होणारी पूर्वेकडील एक भाषा. २,२१,५०,००० लोक ही भाषा बोलतात. त्यांपैकी १,६०,००,००० रूमानिया देशात आहेत. रूमानियन भाषेचे चार स्पष्ट असे स्थानिक भेद आहेत.

(१) डाको-रूमानियन ही खुद्द रूमानिया आणि रूमानियाला जोडून असलेल्या यूगोस्लाव्हीया, बल्गेरिया आणि सोव्हीएट संघातील मॉल्डेव्हीया राज्य येथील संलग्न प्रदेशात बोलली जाते.

(२) मॅसिडो-रूमानियन अथवा आरूमानियन ही ग्रीसमधले मॅसिडोनिया व थेसाली हे प्रदेश आणि यूगोस्लाव्हीया व बल्गेरियामधील काही भाग या ठिकाणी बोलली जाते.

(३) मेग्लेनो-रूमानियन ग्रीसमध्ये सालोनिकीजवळ बोलली जाते.

(४) इस्त्रियो-रूमानियन ही यूगोस्लाव्हीयाच्या वायव्य भागातील इस्त्रिया प्रदेशात मल्योरी पर्वताजवळ बोलली जाते.

एक डाको-रूमानियन सोडली, तर इतर भाषाभेद झपाट्याने अस्तंगत होत आहेत. किंबहुना भाषाभेद ३ व ४ हे जवळजवळ नामशेष झालेलेच आहेत.

ऐतिहासिक दृष्टीने पाहिले, तर रूमानियन भाषा ही पूर्वेकडील रोमन साम्राज्यात बोलल्या जाणाऱ्या लॅटिन भाषेची वंशज. रोमनांचे बाल्कन द्वीपकल्पावरील आक्रमण ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात सुरू झाले आणि डेश (म्हणजे साधारणतः आजचा रूमानिया) जिकंल्यानंतर इ.स. दुसऱ्या शतकात ते पूर्ण झाले. भौगोलिक साहचर्यामुळे स्लाव्हिक भाषांचा रूमानियन भाषेच्या शब्दसंपत्तीवर फार मोठा प्रभाव पडला. अठराव्या शतकात ग्रीक आणि तुर्की भाषांनीदेखील रूमानियन भाषेवर आपला ठसा उमटविला. एकोणिसाव्या शतकात आधुनिक विज्ञान, कला वगैरेंशी संबंधित शब्दांची फ्रेंच, इटालियन आणि इंग्रजीमधून रूमानियन भाषेत भर पडली.

रूमानियन भाषेतील स्वनव्यवस्था आणि व्याकरण खूपसे रोमान्स भाषांच्या धाटणीचे आहे, तर शब्दसमूह मुख्यतः स्लाव्हिक भाषासमूहाकडून प्रभावित आहे. स्वनिमविन्यासापुरते म्हणावयाचे, तर रूमानियन भाषेतील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लॅटिन भाषेतील ऱ्हस्व उ आणि दीर्घ ओ यांतील भेद ‘u’ आणि ‘o’ असा रूमानियन भाषेत कायम राखला गेला आहे क्, ग् या व्यंजनांचे जोडाक्षरांमध्ये ओष्ठ्यीकरण झाले आहे. उदा., लॅटिन ŏoto (आठ) &gtopt त्याचप्रमाणे ‘ग्न’ चे ‘म्न’ मध्ये परिवर्तन झालेले आहे आणि दोन स्वरांमधील ‘ल’ चे परिवर्तन ‘र’ मध्ये झालेले आहे. या भाषेच्या व्याकरणातील काही वैशिष्ट्ये सांगायची, तर नामांना सरळ आणि सामान्य रूपे असतात, त्याचप्रमाणे नामे निश्चित करणारी उपपदे नामाला शेवटी जोडली जातात. उदा., ओमु-ल : द मॅन (उलट पक्षी फ्रेंचमध्ये ल्-ओम्).

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत रूमानियन भाषा शेजारच्या स्लाव्हिक भाषेप्रमाणेच सिरिलिक लिपीमध्ये लिहिली जात असे पण १८५९ मध्ये रोमन लिपीचा स्वीकार करण्यात आला . मात्र मॉल्डेव्हियात अजूनही सिरिलिक लिपी वापरली जाते.

सर्वात जुने रूमानियन ग्रंथ पंधराव्या शतकातील आहेत आणि ते मुख्यत धार्मिक स्वरूपाचे आहेत. १६८८ मध्ये बायबलचा अनुवाद करण्यात आला. एकोणिसाव्या शतकापासूनच राष्ट्रीय भावनेच्या वाढीमुळे उत्कृष्ट वाङ्‌मय निर्माण व्हायला सुरूवात झाली. आधुनिक रूमानियन भाषेत समृद्ध वाङ्‌मय निर्माण झालेले आहे पण भाषांतरांच्या अभावामुळे देशाबाहेर ते दुर्दैवाने अपरिचितच आहे.

संदर्भ : 1. Densusianu, O. L. Histoire de la langue roumalne, 3 Vols., Paris, 1901-1938.

2. Elcock W. D. Romance Languages, Boston, 1960.

3. Guillermou, A. Manuel de la langue roumaine, Paris, 1953.

4. Sandfeld K. Lingulstique balkanique : problems at resultants, Paris, 1930.

केळकर, अशोक रा. कळमकर, य. शं.