रूढिवाद : (कॉन्झर्व्हेटिझम). विशिष्ट काळी विशिष्ट समाजगटात कमीअधिक प्रमाणात स्थिरावलेली जी प्रस्थापित जीवनपद्धती असेल, तीच योग्य आणि तीच टिकवून धरली पाहिजे, असा आग्रह धरणार्यान तत्कालीनांच्या एका पंथाची विचारसरणी. तीत त्या समाजातील काही विचारवंत, काही प्रत्यक्ष संघटना करणारे आणि राजकीय सत्ता हाती असणारे किंवा मिळवू पाहणारे आणि ह्याच बरोबर ह्यांना पाठिंबा देणारे, सर्वसामान्य लोकांतील काही गट हे सगळे समाविष्ट असतात. त्याच्या ह्या दृष्टिकोनाला आणि विचारप्रणालीस रूढिवाद असे म्हटले जाते.
रूढिवादी दृष्टिकोनाचा उगम फ्रेंच राज्यक्रांतीस एडमंड बर्कने जो विरोध केला, त्यात दिसून येतो. एडमंड बर्क, झोझेफ द मेस्त्रे व अन्य काही तत्त्ववेत्त्यांनी यूरोपीय रूढिवादाची काही सूत्रे फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात मांडली. त्यांनी राजेशाही व उमरावशाही यांवर भर देऊन औद्योगिक क्रांतीमुळे उत्पन्न होणाऱ्या बूर्झ्वा समाजावर जमीनदारांचा प्रभाव राहावा, तसेच त्यांना मर्यादित मताधिकार असावेत आणि राज्यसंस्था व चर्च यांचे संबंध पूर्ववत चालू राहावेत इत्यादींचा पुरस्कार केला. त्यांचा आधुनिक सुधारणांना विरोध होता. थोडक्यात राजेशाही, धर्मसंस्था, खाजगी मालमत्ता, उमरावशाही यांसारख्या परंपरेने चालत आलेल्या संस्थांचे समर्थन रूढिवादाने केले आहे. रूढिवाद ही संज्ञा मात्र १८५० मध्ये शातोब्रीआं या तत्त्ववेत्त्याने उजव्या विचारसरणीच्या राजकीय विचारंवतांना उद्देशून वापरली.
रूढिवादाला आर्थिक, सामाजिक, धार्मिक व राजकीय अशा विविध बाजू आहेत. बहुतेक वेळा ह्यांपैकी दोन किंवा अधिक अंगे एकमेकांत मिसळलेली असतात. शेतीव्यवसाय, व्यापार वगैरेंची मालकी वा मक्तेदारी आणि त्यांचे व्यवस्थापन आहे तसेच रहावे, कुटुंबसंस्था, विवाहपद्धती, धर्मश्रद्धा, पूजापद्धती, सणसमारंभ जसे चालले असतील, तसेच कायम रहावेत, असे रूढिवाद्यांचे म्हणणे असते. राजकीय सत्तेच्या स्वरूपात बदल करणेही त्यांना खपत नाही. रूढिवादाला विरोध करणारे गट वा पथ उदारमतवादी, प्रगतिवादी, क्रांतीवादी इ. अनेक संज्ञांनी ओळखले जातात. प्रस्थापित समाजरचनेत व राज्यपद्धतीत त्यांच्या मते कुठेही, काहीही अन्याय्य असतील, तर ते दूर झाले पाहिजेत. तसेच अनावश्यक आणि कालबाह्य झालेल्या संस्था मोडून टाकल्या पाहिजेत, असे हे मानीत असतात. रुढिवादी काय किंवा प्रगतिवादी काय, दोघांच्याही विचारात आणि कार्यक्रमात काही व्यक्तींचे आणि गटांचे हितसंबंध गुंतलेले असतातच. त्याचप्रमाणे रुढिवाद म्हटला म्हणजे तो दुष्ट हेतूंनीच प्रेरित झालेला असतो आणि क्रांतिवाद नेहमीच जनकल्याणासाठी अवतरत असतो, असेही मानण्याचे कारण नाही. जे प्रस्थापित आहे, स्थिरावलेले आहे ते मोडल्याने समाजात गोंधळ माजेल आणि अशांतता निर्माण होईल, म्हणून ते कायम टिकवून धरणेच समाजहिताचे आहे, अशी प्रामाणिक धारणाही रुढिवादामागे असू शकते. ती तर्कसंगत नसते, वास्तवाची दखल घेणारी नसते, बुद्धिनिष्ठ नसते हे मान्य केले, तरी ती सद्हेतुमूलक असू शकते, हेही लक्षात घ्यावयास हवे.
बदल हवा असे वाटणारे आणि नको असे वाटणारे जे दोन गट समाजात पडलेले दिसतात, ते ज्ञात इतिहासावरून मनुष्यजातीइतकेच जुने आहेत असे दिसून येईल तथापि औद्योगिक क्रांतीनंतर प्रथम यूरोपमध्ये आणि नंतर हळूहळू जगभरचे सामाजिक जीवन इतके आमूलाग्र बदलून गेले, की क्रांतीपूर्वीचा रुढिवाद आणि प्रगतिवाद ह्यांच्यातील संघर्षाचा क्रांत्युत्तर काळात काही संदर्भच राहिलेला नाही. अठराव्या शतकापासूनचा रुढिवाद हा राजकीय दृष्ट्या प्रथम पूर्णतथा लोकशाहीविरोधी आणि नंतर मर्यादित लोकशाही मानणारा, धार्मिक आणि सामाजिक बाबतींत प्रारंभी सर्वस्वी धर्मसंस्थेला कवटाळून बसणारा, तर नंतर थोड्या थोड्या बदलांना तयार झालेला आणि आर्थिक क्षेत्रात सुरुवातीला समाजवाद आणि शेतकरी कामगारांचे कल्याण ह्यांना कडाडून विरोध करणारा, तर नंतर हळूहळू काही थोड्या सुधारणा करायला हरकत नाही, अशी भूमिका घेणारा, अशा अवस्थांतून जात असलेला दिसतो. आजचे रुढिवादी व रुढिवादी राजकीय पक्ष काही बदल नकोतच, असा आग्रह धरीत नाहीत. लोकशक्तीच्या, विशेषतः संघटित जनशक्तीच्या रेट्यामुळे निदान आर्थिक व राजकीय आघाड्यांवर तरी रुढिवादाला नमावेच लागेल. बाकी सामाजिक, धार्मिक वगैरे क्षेत्रांत रुढिवाद किती आणि कसा टिकेल, हे त्या विशिष्ट समाजातील सर्वसामान्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि बौद्धिक विकासावर अवलंबून राहील.
काही असले तरी रुढिवादी बदलतात, त्यांना अल्पप्रमाणात आणि हळूहळू का होईना पण प्रागतिक कार्यक्रम स्वीकारावे लागतात. ह्यातच रुढिवादाचा पराभव गर्भित आहे.
संदर्भ : 1. Kirk, Russel, The Conservative Mind, New York, 1960.
2. Lipset, S. M. Political Man, London, 1960.
3. Maistre, y3wuoeph M. Works, New York, 1965.
4. Rossiter, Clinton L. Conservatism in America, New York, 1955.
5. Viereck, Peter, Conservatism : From John Adams to Churchill, Princeton, 1956.
6. Watkins, Frederick M. The Political Tradition of the West, Cambridge (Mass), 1948.
आठवले, सदाशिव