रुथेनियम : धातुरूप मूलद्रव्य रासायनिक चिन्ह Ru अणुक्रमांक (अणुकेद्रांतील प्रोटॉनांची संख्या) ४४ अणुभार १०१.०७ आवर्त सारणीतील [इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील⟶ आवर्त सारणी] आठव्या गटातील एक मूलद्रव्य ज्ञात समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच प्रकारांचे) द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या) ९५ ते १०६ यापैकी ९५, ९७, १०३, १०५ व १०६ हे पाच समस्थानिक किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे) आहेत. विद्युत् विन्यास (अणुकेंद्राभोवती विविध कक्षांतील इलेक्ट्रॉनांची संख्या) २, ८, १८, १५, १ संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) २, ३, ४, ६, ८ वि. गु. १२·३ वितळबिंदू २,२५०° से. उकळ बिंदू ३,९००° से. कठिनता ६·५ मोस [⟶ कठिणता] रंग रूपेरी करडा, चमक प्लॅटिनमासारखी.
इतिहास : एस्टोनियन शास्त्रज्ञ कार्ल क्लॉस यांनी १८४४ मध्ये रशियातील प्लॅटिनम खनिजातून एक नवीन मूलद्रव्य शोधून काढले. यापूर्वी १८२७ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ जी. डब्ल्यू. ओझान यांनी एक ऑक्साइड वेगळे केले पण ते त्यांनी मूलद्रव्य म्हणूनच जाहीर केले. त्यांनी रशियातील उरल पर्वतात सापडणाऱ्या प्लॅटिनम खनिजापासून ऑक्साइड वेगळे केले म्हणून या मूलद्रव्याला रुथेनिअम (लॅटिन भाषेत रशियाला ‘रुथेमिया’ असे म्हणतात) हे नाव दिले पण रुथेनियमाच्या शोधाचे श्रेय क्लॉस यांच्याकडेच जाते.
आढळ : प्लॅटिनम गटातील (ऑस्मियम, इरिडियम, पॅलॅडियम, प्लटिनम, रुथेनियम व ऱ्होडियम या मूलद्रव्यांच्या गटातील) हे एक मूलद्रव्य असून ही सर्व मूलद्रव्ये निसर्गात एकत्र सापडतात. खनिजांत रुथेनियम अत्यल्प आढळते, म्हणून त्यापासून रुथेनियम मिळविणे फार खर्चाचे व कठीण असते. लॉराइट (Ru2S2) हे धातुक (कच्च्या रूपातील धातू) महत्त्वाचे असून ते कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फिनलंड, द आफ्रिका, द. अमेरिका, रशिया, ब्राझील, फिलिपीन्स इ. ठिकाणी सापडते. भारतातही ते अल्प प्रमाणात सापडते.
प्राप्ती : प्लॅटिनम धातुकापासून प्लॅटिनम, पॅलॅडियम व ऱ्होडियम अलग केल्यानंतर उरलेल्या शेष भागावर सोडियम पेरॉक्साइडाची विक्रिया करतात व त्यामुळे बनलेल्या विद्रावात संयुगरूपात रुथोनियम व ऑस्मियम राहातात. विद्राव गरम करून त्यातून क्लोरीन वायू पाठवून दोन्ही मूलद्रव्ये वायुरूप बनवितात व हे वायू हायड्रोक्लोरिक अम्लातून पाठवून टेट्राक्लोराइड मिश्रण तयार करतात. याचे ऊर्ध्वपातन करून (तापवून वाफ करून मग ती थंड करून) ऑस्मियम अलग करतात. उरलेल्या शेषविद्रावाचे टेट्रॉक्साइड बनवून त्याचे हायड्रोजनात ⇨क्षपण करून सेस्क्विऑक्साइड मिळवितात. ते तापविल्यास रुथेनियम धातू मिळते.
गुणधर्म : थंड स्थितीत हवेचा रुथेनियमावर परिणाम होत नाही. हवेत वा ऑक्सिजनामध्ये ७००°–१,२००° से.ला चूर्णरूपात तापविल्यास RuO2 हे काळे ऑक्साइड मिळते. प्रबल अम्लाचा तिच्यावर पिरिणाम होत नाही. अम्लराज व सल्फूरिक अम्ल यांत ती विरघळत नाही, पोटॅशियम सायनाइड व मर्क्युरिक क्लोराइड यांच्या विद्रावाचा १००° से.ला तिच्यावर जलद विक्रिया होते.
उच्च उकळबिंदूमुळे ही धातू ओतकामास निरुपयोगी आहे. ती प्लॅटिनमापेक्षा ठिसूळ असल्याने तापवून शुभ्र झाल्यास तिच्यापासून तार काढणे वा पत्रा करणे कठीण असते म्हणून ती फक्त मिश्रधातूच्या रूपात वापरली जाते.
संयुगे : सर्वसाधारणतः रुथेनियम संयुगे ही ३ व ४ संयुजेची असून ती जटिल (गुंतागुंतीची) व द्रवरूप, तर ६ व ७ संयुजेची क्षारकीय (अल्कलाईन) आणि टेट्रॉक्साइड हे महत्त्वाचे संयुग ८ संयुजेचे असते.
रुथेनियमाची RuF5, RuCl3, K2RuCl0, RuI3 ही ही हॅलाइडे तसेच Ru(SO4)2, Ru(SO4)2 ही गंधकी संयुगे तयार होतात. (C5H5)2 Ru हे कार्बनी संयुग प्रतिष्ठापित (एका अणूच्या वा रेणूच्या जागी दुसरा अणू वा अणुगट बसविण्याच्या) विक्रियेत उपयुक्त आहे.
रुथेनियमाची RuO2 (निळे), Ru2O3 (काळे), RuO4 (सोनेरी) ही ऑक्साइडे, Ru(OH)3 व Ru(OH)4 ही हायड्रॉक्साइडे आणि Ru (CO)5, Ru2(CO)3 यांसारखी कार्बोनिल संयुगे माहित आहेत. पोटॅशियम रुथिनेट (KRuO2. H2O) हे पाण्यात विरघळते. याचे टेट्रॉक्साइड(RuO4) हे संयुग महत्त्वाचे असून ते पिवळे वा करडे, पाण्यात विरघळणारे व विषारी आहे. ते २५° से. ला वितळते व ७° से. पासून संप्लवित होते (घनरूपातून एकदम वायुरूपात जाते). १००° से. वरील तापमानात आणि कार्बनी व ऑक्सिडीकारकांशी [⟶ ऑक्सिडीभवन] संपर्क आल्यास त्याचा स्फोट होतो. ते एक प्रबल ऑक्सिडीकारक आहे.
मिश्रधातू : प्लॅटिनम, पॅलॅडियम इ. धातू कठीण करण्यासाठी रुथे नियमाचा उपयोग होतो. रुथेनियम-प्लॅटिनम या मिश्रधातूचा विद्युत् संपर्कासाठी, तर रुथेनियम-पॅलॅडियम मिश्रधातू दागिने तयार करण्यास वापरतात.
अभिज्ञान : प्लॅटिनम गटातील सर्व धातू रासायनिक दृष्ट्या सारखेच असल्याने त्यांचे अभिज्ञान करणे (ओळखणे) गुंतागुंतीचे असते. [⟶ वैश्लेषिक रसायनशास्त्र].
उपयोग : रुथेनियम हे एक उपयुक्त उत्प्रेरक (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती बदलण्यास मदत करणारा पदार्थ) असून बऱ्याच कार्बनी व अकार्बनी विक्रियांत रुथेनियमाचा असा उपयोग केला जातो. मिश्रधातूंच्या रूपात तिचा उपयोग विद्युत् दाब नियंत्रक, विद्युत् संपर्क इत्यादींमध्ये करतात. अगदी अलीकडे सूर्यकिरणांच्या साहाय्याने पाण्याचे विघटन करू हायड्रोजन निर्मितीत रुथेनियमाचा उपयोग करण्यात आला आहे.
पहा : प्लॅटिनम.
संदर्भ : 1. Kolthoft, I. M. Eluing. P. J. Ed., Treatise on Analytical Chemistry. Vol. 8, New York, 1963.
2. Mellor, J. W. A Comprehensive Treatise on Inorganic and Theoretical Chemistry, Vol. XV, London, 1964.
3. Partington. J. R. General and Inorganic Chemistry, London, 1966.
मिठारी, भू. चि.