रिबैरु, बेर्नार्दि : (? १४८२−ऑक्टोबर १५५२). पोर्तुगीज कवी आणि रोमान्सकार. जन्म तॉर्राउं, आलँतॅज्यु येथे. लिस्बन विद्यापीठातून त्याने कायद्याची पदवी घेतली. पोर्तुगालचा राजा जॉन तिसरा ह्याचा सचिव म्हणून त्याने काम केले होते.
रिबैरूच्या काव्यकृतींत त्याने रचिलेल्या पाच उत्कृष्ट गोपगीतांचा समावेश होतो. त्याच्या गोपगीतांनी पोर्तुगीज गोपकवितेला तिचे एक निश्चित असे स्वरूप प्राप्त करून दिले. प्रबोधनकालातील श्रेष्ठ पोर्तुगीज महाकवी ⇨लुईज द कामाँइश (१५२४−८०) ह्यालाही रिबैरूच्या गोपकवितांनी प्रभावित केले होते. रिबैरूला पोर्तुगीज गोपकवितेचा जनक मानले जाते.
रिबैरूने मेनीना इ मोसा ओज साउदादिश (१५५४, इं. शी. यंग मेड अँड यर्निंग्ज) नावाचा एक गद्य रोमान्सही लिहिला. विफल प्रेमाची ही एक करण कथा आहे. प्रबोधनकालातील पोर्तुगीज साहित्यातील एक उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून ह्या रोमान्सचा उल्लेख करण्यात येतो.
रिबैरूला जीवन म्हणजे दुःखयातनांचा गुंता आहे, असे वाटे. त्याच्या भावविवशतेचा प्रभाव त्याच्या साहित्यावरही पडलेला आढळतो. लिस्बन येथे एका मनोरुग्णालयात त्याचा अंत झाला.
रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)