रिचर्ड्स, सर ओवेन विलान्स : (२६ एप्रिल १८७९−१५ फेब्रवारी १९५९). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. तप्त धातूंपासून होणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या उत्सर्जनासंबंधी [⟶ तापायनिक उत्सर्जन] केलेल्या संशोधनाबद्दल रिचर्ड्सन यांना १९२८ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहूमान मिळाला.
रिचर्ड्सन यांचा जन्म यॉर्कशरमधील ड्यूजबरी येथे झाला. केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजात शिक्षण घेऊन १९०० साली ते पदवीधर झाले. १९०२ मध्ये ट्रिनिटी कॉलेजचे अधिछात्र म्हणून त्यांची निवड झाली व १९०४ मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठाची डी.एस्सी. पदवी संपादन केली. १९००−०६ या काळात त्यांनी कॅव्हेंडिश लॅबोरेटरीमध्ये तापायनिक उत्सर्जनासंबंधी संशोधन केले. त्यानंतर ते अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक होते (१९०६–१३). १९१४ मध्ये इंग्लंडला परतले व लंडन येथील किंग्ज कॉलेजमध्ये भौतिकीचे व्हीटस्टन प्राध्यापक झाले. तेथेच १९४४ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी काम केले. रॉयल सोसायटीचे थारो संशोधन प्राध्यापक (१९२४−४४) व किंग्ज कॉलेजात भौतिकीच्या संशोधनाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले.
प्रिन्स्टन येथे असताना त्यांनी तापायनिक उत्सर्जन, प्रकाशविद्युत् परिणाम [विद्युत् चुंबकीय प्रारक पदार्थावर पडले असता त्याच्या विद्युत् गुणर्धात घडून येणारे बदल ⟶ प्रकाशविद्युत्] व घूर्णचुंबकीय परिणाम [⟶ चुंबकत्व] या विषयावर संशोधन केले. १९११ मध्ये त्यांनी इलेक्ट्रॉन हे सभोवतालच्या हवेपासून नव्हे, तर तप्त धातूपासून उत्सर्जित होतात, असे सिद्ध केले. १९०१ मध्ये केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीच्या बैठकीपुढे रिचर्ड्सन यांनी इलेक्ट्रॉनांच्या उत्सर्जनाचा दर व पदार्थाचे निरपेक्ष तापमान [⟶ केल्व्हिन निरपेक्ष तापक्रम] यांना जोडणारे एक अनुभवसिद्ध गणितीय सूत्र एका संशोधनात्मक निबंधाद्वारे मांडले. पुढे १९११ मध्ये त्यांनी या सूत्रात सुधारणा करून ते नव्याने मांडले. हे सूत्र रिचर्ड्सन नियम या (आणि एस. दूरमान यांनी नंतर त्यात आणखी सुधारणा केल्याने रिचर्ड्सन-दूशमान नियम याही) नावाने ओळखले जाते [⟶ तापायनिक उत्सर्जन] नंतर इलेक्ट्रॉन नलिकासंबंधीचे [⟶ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति] संशोधन व तंत्रविद्या यांत या सूत्रांनी फार महत्त्वाची मदत झाली. १९१४ नंतर रिचर्ड्सन यांनी तापयनिकी (तापयनिकी उत्सर्जनांचा अभ्यास व उपयोग यासंबंधीचे शास्त्र), प्रकाशविद्युत् परिणाम, चुंबकत्व, रासायिनक विक्रियेमुळे होणारे इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन इलेक्ट्रॉन सिद्धांत रेणवीय हायड्रोजनाचा वर्णपट इ. विषयांत संशोधन केले.
रॉयल सोसायटीने १९१३ मध्ये रिचर्ड्सन यांची सदस्य म्हणून निवड केली आणि त्यांना ह्यूझ (१९२०) व रॉयल (१९३०) या पदकांचा दिला. सेंट अँड्रझ, लीड्स व लंडन विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. १९३९ मध्ये त्यांना नाईट हा किताब देण्यात आला. ते ब्रिटिश ॲसोसिएशनच्या ए विभागाचे अध्यक्ष (१९२१), लंडनच्या फिजिकल सोसायटीचे अध्यक्ष (१९२६−२८), अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे सदस्य (१९११) व इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्य होते. त्यांचे सु. १३० संशोधनपर निबंध आणि द इलेक्ट्रॉन थिअरी ऑफ मॅटर (१९१४), द एमिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम हॉट बॉडीज (१९१६) आणि मॉलिक्यूलर हायड्रोजन अँड इटस् स्पेक्ट्रम (१९३४) हे ग्रंथ प्रसिद्ध झाले. ते हँपशरमधील ऑल्टन येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.