रिकेट्‌सिया : सूक्ष्मजंतूंच्या एका मोठ्या व मिश्र गटाला रिकेट्‌सिया म्हणतात. प्रस्तुत नोंदीत वर्णन केलेल्या या सूक्ष्मजंतूंचा समावेश सूक्ष्मजंतूविज्ञानीय वर्गीकरणातील ⇨रिकेट्‌सिएलीझ गणातील रिकेट्‌सिएसी या कुलात करण्यात येतो. काही कीटकांच्या आंत्रमार्गात (आतड्यात) बहुतकरून आढणाऱ्या व मानवी रोगास कारणीभूत असणाऱ्या या अंतःकोशिय (कोशिकेच्या−पेशीच्या−आतील) परजीवी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणाऱ्या) सूक्ष्मजंतूंच्या गटाला एकेकाळी सूक्ष्मजंतू व व्हायरस यांच्या दरम्यानचा गट मानीत. आता ते सूक्ष्मजंतू असल्याचे सिद्ध झाले आहे. सूक्ष्मजंतूंप्रमाणेच त्यांना म्युरिनयुक्त (पेप्टिडोग्लायकान या बहुवारिकांनी म्हणजे साध्या व लहान रेणूंच्या संयोगाने बनलेल्या प्रचंड रेणूंच्या संयुगांनी युक्त) भित्ती असते. त्यांमध्ये रिबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए) व डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) ही दोन्ही ⇨न्यूक्लिइक अम्ले असतात आणि द्विभाजनाने त्यांच्या संख्येत वाढ होते. याशिवाय त्यांची स्वतंत्र चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींची) क्रियाशीलताही असते.  

मानवातील रिकेट्‌सियाजन्य रोग

रिकेट्‌सिया गट 

रोग 

रोगोत्पादक रिकेट्‌सिया 

संधिपाद रोगवाहक 

पोषक प्राणी 

समूहनमिळणारे प्रोटियस 

भौगोलिक प्रदेश 

(१) प्रलापक सन्निपात अथवा टायफस ज्वर गट

(अ)साथीचा प्रलापक सन्निपात ज्वर 

रिकेट्‌सिया प्रोवाझोकी 

ऊ 

नाही 

ओएक्स – १९

जागतिक क्वचितच अमेरिका.

(आ) ब्रिल-झिन-सर

रिकेट्‌सिया प्रोवाझोकी

− 

− 

ओएक्स− १९

अमेरिकेतील ईशान्य किनाऱ्यावरील शहरे इझ्राएल. (पूर्वी साथीचा प्रलापक सन्निपात ज्वर होऊन गेलेल्या रुग्णात उद्‌भवणारी सौम्य विकृती).

(इ)मूषक प्रलापक सन्निपात ज्वर

रिकेट्‌सिया भूसेरी किंवा रि. टायफी

उंदरावरील पिसू व ऊ                 

उंदीर 

ओएक्स −१९

जागतिक अमेरिकेतील दक्षिण राज्ये

(२) उत्स्फोटक ज्वर 

(अ)रॉकी मौंटन उत्स्फोटक ज्वर 

रिकेट्‌सिया रिकेट्‌साया

गोचीड

कृंतक वर्ग व सस्तन प्राणी

अनिश्चित ओ-एक्स-२ किंवा ओ-एक्स-१९

उत्तर व दक्षिण अमेरिका संबंधित रोग जगभर.

(आ) रिकेट्‌सियल स्फोट (देवीसारखे फोड येणारी विकृती)

रिकेट्‌सिया अकारी

माइट

घरगुती उंदीर

कोणतेही नाहीत

अमेरिकेचा पूर्व भाग 

(३)त्सुत्सुगा-मुशी गट  

उष्णकटिबंधीय प्रलापक सन्निपात ज्वर अथवा स्क्रब टायफस

रिकेट्‌सिया ओरिएंटॅलीस अथवा रि. त्सुत्सुगामुशी

माइट

कृंतक वर्ग

ओएक्स- के

पूर्व व वायव्य आशिया, उत्तर ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, तैवान.

(४)क्यू ज्वर

क्यू ज्वर

कॉक्सिला बर्नेटी

क्वचित गोचीड

गुरे-ढेरे, शेळ्या-मेंढ्या

कोणतेही नाहीत

जागतिक अमेरिकेतील पश्चिम भाग.

 फक्त सूक्ष्मजंतूप्रमाणे ते ग्लुकोजचे अपघटन (रेणूचे तुकडे करण्याची क्रिया) करी शकत नाहीत. त्यांच्या बहुतेक जाती सूक्ष्मजंतुकीय गाळणीतून गाळल्या जात नाहीत व त्यांच्या गुणनाकरिता जिवंत कोशिकांची आवश्यकता असते. जैविक दृष्ट्या रिकेट्‌सियांमध्ये काही सूक्ष्मजंतूंचे व काही व्हायरसांचे गुणधर्म आहेत.      

एच्. टी. रिकेट्‌स (१८७१−१९१०) या अमेरिकन शास्त्रज्ञांच्या नावावरून या सूक्ष्मजंतूंना नाव मिळाले आहे. या सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या साथीच्या ⇨प्रलायक सन्निपात ज्वरावर (टायफस ज्वरावर) व रॉकी मौंटान उस्फोटक ज्वरावर (अमेरिकेतील रॉकी पर्वत प्रदेशात प्रथमतः आढळलेल्या व ठिपक्यासारखे फोड हे लक्षण असलेल्या तापावर) रिकेट्‌स यांनी यांच्या संप्राप्तीसंबंधी प्रथम संशोधन केले होते. 

या सूक्ष्मजंतूंना व्हायरसाप्रमाणेच वाढीकरिता जिवंत कोशिकांची गरज असते. संसर्गित ऊतक-कोशिकांत (समान रचना आणि कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहातील कोशिकांत) विशिष्ट रंजन पद्धती वापरून सूक्ष्मजंतू स्पष्ट दिसतात. सूक्ष्मदर्शकाखाली ते विविध रूपांनी दिसतात. सर्वसाधारणपणे आकारमानात त्यांचा व्यास ०·२ ते ०·५ मायक्रॉन (१ मायक्रॉन = १० मी.) व लांबी ०·८ ते २·० मायक्रॉन असते आणि सर्व प्रकार अचल असतात. 

रिकेट्‌सिया प्रामुख्याने संधिपाद (सांधेयिक्त पाय असलेल्या आर्थोपॉड) प्राण्यांमधील परजीवी असतात. ते ⇨गोचीड आणि ⇨माइट यांमध्ये जास्त आणि ⇨पिसू व ⇨ यांमध्ये कमी प्रमाणात आढळतात. हे रोगवाहक प्राणी ज्या प्राण्यावर राहतात त्या प्राण्यांमध्येही रिकेट्‌सिया जन्म रोग होतात. रिकेट्‌सियांचे प्रमुख नैसर्गिक संचयस्थान संधिपाद प्राणी असतात. 

  


आ. १. रिकेट्‌सिया मूसेरी किंवा रि. टायफी : इलेक्ट्रॅन सूक्ष्मदर्शकातून दिसणारे सूक्ष्मजंतू.प्रायोगिक अंतःक्रमणाद्वारे अनेक प्राण्यांमध्ये रिकेट्‌सियाजन्य रोग उत्पन्न करता येतात. गिनीपिग व उंदीर हे प्राणी रिकेट्‌सियांच्या विलगीकरणाकरिता वापरतात. रिकेट्‌सियाजन्य रोगांच्या निदानाकरिता अविशिष्ट व विशिष्ट रक्तरस परीक्षा वापरतात. यांपैकी जर्मन वैद्य एटमुंट व्हाइल व झेक सूक्ष्मजंतुवैज्ञानिक आर्थर फेसिक्स यांच्या नावाने ओळखण्यात येणारी व्हाइल-फेलिक्स प्रतिक्रिया (रुग्णाचा रक्तरस व ओएक्स−१९ प्रोटियस व्हल्गॅरिस नावाच्या सूक्ष्मजंतूंचे मिश्रण केल्यास रिकेट्‌सिया सूक्ष्मजंतूंचे समूहन होते) अधिक उपयोगात आहे. रोगाच्या सुरुवातीस केलेली कोणतीही परीक्षा ऋण (रोग नसल्याचे दर्शविणारी) मिळते. 

रिकेट्‌सियाजन्य रोग : रिकेट्‌सियाचे वितरण भौगोलिक असल्यामुळे रुग्ण कोणत्या प्रदेशातील रहिवासी आहे हे वैद्यास माहीत असणे हितावह असते. कोष्टकात रिकेट्‌सियाजन्य रोगांची माहिती दिली आहे.  

  

आ. २. रिकेट्‌सिया त्सुत्सुगामुशी : हा सूक्ष्मजंतू माइट या कीटकाद्वारे मनुष्य व इतर काही प्राणी (उंदीर, घूस इ.) च्या शरीरातून प्रवास करून आपले जीवनचक्र पूर्ण करतो : (१) अष्टपाद प्रौढ माइट, (२) अंडी (मातेकडून संक्रामण), (३) षट्पाद डिंभ, (४) अष्टपाद अर्भक, (५) जमिनीतील मुक्तावस्था, (६) अष्टपाद प्रौढ, (७) अंडी (मातेकडून संक्रामण), (८) अष्टपाद अर्भक, (९) जमिनीतील मुक्तावस्था, (१०) पहिली पिढी, (११) दुसरी पिढी. मनुष्य, उंदीर व माइट यांमध्ये हा सूक्ष्मजंतू परजीवी असतो.

काही रिकेट्‌सियाजन्य रोगांची थोडक्यात माहिती खाली दिली आहे. 

(१) साथीला प्रलापक सन्निपात ज्वर : या रोगाला ऊ-वाहित प्रलापक सन्निपात ज्वर या नावानेही ओळखतात. पेडिक्यूलस ह्युमॅमस नावाच्या मानवी शरीरावरीरल उवांच्या विष्ठेतून रिकेट्‌सिया शरीरात प्रविष्ट होतात. या तीव्र गंभीर ज्वरयुक्त विकृतीत खूप वाढलेले शरीर-तापमान, असह्य डोकेदुखी व बिंदू पिटिकामय उत्स्फोट ही प्रमुख लक्षणे असतात. दहा वर्षे वयाखालील मुलात मृत्यु-प्रमाण अत्यल्प असले. तरी पन्नाशी वरीस व्यक्तीमध्ये ते ६०% आढळते. [⟶ प्रलापक सन्निपात ज्वर]. 

(२) प्रदेशनिष्ठ प्रलापक सन्निपात ज्वर : या विकृतीला मलयातील नागरी प्रलापक ज्वर असेही म्हणतात. उंदरावरील पिसवांच्या चाव्यातून सूक्ष्मजंतू मानवी रक्तात प्रवेश करतात. सर्व लक्षणे वर वर्णिलेल्या साथीच्या प्रकारासारखी परंतु सौभ्य असतात. 

(३) रॉकी मौंटन उत्स्फोटक ज्वर : अमेरिकेतील रॉकी पर्वत भागात प्रथम आढळल्यावरून हे नाव दिले गेले आहे. या रोगाला गोचीड ज्वर व उत्स्फोट ज्वर अशी दुसरी नावे आहेत. ७०% रुग्णात गोचीडच्या चाव्याचा इतिहास मिळतो. ज्वर ३९५ ते ४०से. आणि कधी कधी १५ ते २० दिवस टिकून राहणारा असतो. चौथ्या दिवशी उत्स्फोट दिसू लागतो. पूर्वी २० टक्क्यापेक्षा जास्त असलेले मृत्युप्रमाण प्रतिजैव (अँटिबॉयाटिक) औषधांमुळे कमी झाले आहे. 

(४) क्यू ज्वर : पूर्वी रिकेट्‌सिया बनेंटी व आता कॉक्सिला बर्नेटी हे नाव असलेल्या सूक्ष्मजंतूमुळे होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या आणि ज्वर, डोकेदुखी व न्यूमोनिया ही लक्षणे आढळणाऱ्या विकृतीला क्यू ज्वर म्हणतात. १९३५ मध्ये ऑस्ट्रेलियातील कत्तलखान्यात काम करणाऱ्या कामगारांत ही विकृती प्रथम आढळली. तिला ‘कीन्सलॅंड ज्वर’ जसे दुसरे नावही आहे. इतर रिकेट्‌सियाज्वर रोगांप्रमाणे यामध्ये उत्स्फोट नसतो. घरगुती पाळलेले प्राणी, शेळ्या, मेंढया, गुरे वगैरेंमध्ये लक्षणविहरीत असतो. या प्राण्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या. व्यक्तींमध्ये अंतःश्वसनामार्फत सूक्ष्मजंतू शरीरात प्रवेश करतात. कधी कधी संसर्गित प्राण्यांच्या निरशा दुधातूनही रोग होतो. क्वचित यकृतशोध (यकृताची दाहयुक्त सूज) व हृद्-अंतःस्तरशोथ (हृदय आणि त्यांच्या झडपा यांच्या अस्तराचा शोथ) हे उपद्रव आढळत असले, तरी एकूण मृत्यु-प्रमाण अत्यल्प असते.

 

उपचार : रिकेट्‌सियाजन्य रोगांवरील उपचाराची तत्त्वे येथे दिली आहेत. उपचारामध्ये (१) विशिष्ट रासायनिक चिकित्सा आणि (२) इतर पुष्टिदायक उपचार जेवढे लवकर सुरू होतील तेवढा रुग्णास लवकर आराम मिळतो म्हणून शक्यतो उत्स्फोट दिसू लागतात उपचार सुरू करणे हितावह असते. कधी कधी रक्तरस परीक्षेचा परिणाम समजण्यापूर्वीच रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेतून मृत्युमुखी पडण्याचीही शक्यता असल्यामुळे अंदाजी निदान झाले असतानाच उपचार सुरू करणे महत्त्वाचे असते.  

प्रतिजैव औषधांमध्ये क्लोरँफिनिकॉल आणि टेट्रासायक्लिने उपयुक्त आहेत. ती रिकेट्‌सियानाशक नसून रिकेट्‌सियारोधी (रिकेट्‌सियांची वाढ थोपवणारी) आहेत. इतर उपचारामध्ये मुख-स्वच्छता, योग्य आहार, रुग्णास वारंवार अंथरुणातकुशी बदलून झोपवणे (शय्याव्रण होऊ नये म्हणून) इत्यादींचा समावेश होतो. 

रोग नियंत्रण : रिकेट्‌सियाजन्य रोगांवर दोन प्रकारांनी नियंत्रण करता येते. (१) रोगवाहकावरील नियंत्रण : उवा, माइट, गोचिडी व पिसवा या रोगवाहकांवर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मोठया प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यास त्यांचा नाश करणारी किंवा त्यांना मानवी शरीरापासून दूर ठेवू शकणारी (निवारक) अनेक प्रभावी रासायनिक औषधे कारणीभूत आहेत. वैद्यकीय इतिहासात डीडीटीचा अंगावरील कपड्यांवर उपयोग करून उवांचे नियंत्रण करणे प्रथम शक्य झाले. नेफ्ल्स व इतर काही ठिकाणी युद्धबंद्यांच्या छावण्यांमधील प्रलापक सन्निपात ज्वराच्या साथीला पूर्णपणे आळा घालण्यात आला. कृंतक (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या) प्राण्यांचा मोठा प्रमाणावर नाश केल्यामुळे रोग वाहकांना पोषक प्राणी मिळणे कठीण बनले. गोचीड नियंत्रणाकरिता जमिनीवर डायएल्ड्रिन किंवा क्लोडान यांसारख्या औषधांचे फवारे यशस्वी ठरले आहेत. 

  

 

ज्या भागात रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्या भागात संपूर्ण शरीर, विशेषेकरून मुलांचे शरीर, केसाळ भागासहित काळजीपूर्वक तपासून गोचीड, उवा इ. रोगवाहक काढून टाकणे हितावह असते. रोगवाहक शरीरापासून अलग करताना न चिरडता काढणे जरुर असते. 

(२) रोगप्रतिकारक्षमतेची निर्मिती : दुसऱ्या महायुद्धात अक्रिय बनविलेल्या संपूर्ण रिकेट्‌सिया प्रोवाझेकीपासून तयार केलेली लस टोचून प्रलापक सन्निपात ज्वरास प्रतिबंध करण्यात व त्याचे गांभीर्य कमी करण्यात यश आले होते. रॉकी मौंटन उत्स्फोटक ज्वर व क्यू ज्वर यांवर नवीन लस शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. उष्ण कटिबंधीय प्रलापक सन्निपात ज्वर (स्क्रव टायफस) या रोगावर लस उपलब्ध नाही. 

संदर्भ : 1. Berkow , R. and others, Ed. The Merck Manual, Rahway, N. J. 1982.

           2. Sally, A. J. Fundamental Principal of Bacterlology, New Delhi, 1984.

          3. Stewart, F. S. Beswick, T. S. L. Bacterlology, Virology and Immunity for Students of Medicine, London, 1977.

          4. Weatherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Oxford, 1984.

         

भालेराव, य. त्र्यं.