रॉटरडॅम : नेदर्लंडसमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व व्यापारी उलाढालींच्या बाबतीत जगातील सर्वांत मोठे बंदर. लोकसंख्या शहर ५,५८८३२ (१९८३ अंदाज) महानगरीय १०,२४,७०२. साउथ हॉलंड या प्रांतातील न्यू मास (न्यू म्यूज) ह्या ऱ्हाईनच्या उपनदीच्या दोन्ही तीरांवर वसलेले हे शहर उत्तर समुद्रापासून ३०किमी., तर द हेगच्या आग्नेयीस सु. २१ किमी. अंतरावर आहे. शहराचे अंतर्गत बंदर बाहेरच्या बंदराशी ‘न्यू वॉटर वे’ या जलमार्गाने जोडलेले आहे.
रॉटे नदीच्या मुखाकडील भागाचे १२८३ मध्ये पुनःप्रस्थापित भूमीत रूपांतर करण्यात आले व तेव्हापासून ‘रॉटरडॅम’ हा शब्द प्रथम वापरात आला. प्रथम मासेमारी गाव म्हणून रॉटरडॅमचा विकास होत गेला. गावाला १३२८ मध्ये शहराचा दर्जा मिळाला, तर १३४० मध्ये कालवा खोदण्याची परवानगी मिळाली. सतराव्या शतकांती हे ॲमस्टरडॅमनंतरचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यापारी शहर बनले. १७९५−१८१५ पर्यंत रॉटरडॅम फ्रेंचांच्या ताब्यात होते. परिणामी येथील व्यापर रोडावला होता. मोठी महासागरगामी जहाजे आथ येण्यासाठी १८६६−७२ यामदरम्यान ‘न्यू वॉटर वे’ हा म्यूज नदीवर वाहतुकीसाठी एक पूल बांधण्यात आला. १९०६−३० च्या दरम्यान व्हाल बंदर बांधण्यात आले. सांप्रत ते जगातील सर्वांत मोठे गाळ उपसलेले बंदर समजण्यात येते. दुसऱ्या महायुद्धकाळात शहाराचा मध्यवर्ती भाग तसेच बंदरातील एकतृतीयांश साहित्य जर्मनांच्या बाँबवर्षावात बेचिराख झाले. या आपत्तीतून नगरभवन (१९१८), प्रमुख डाककार्यालय (१९२३), शेअरबाजार कार्यालय एवढ्याच इमारती बचावल्या. पंधराव्या शतकातील सेंट लॉरेन्स चर्चही १९४० मध्ये नष्ट झाले, तथापि त्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले.
‘न्यू वॉटर वे’ या कालव्याच्या मुखाशी यूरोपोर्ट (यूरोपचे प्रवेशद्वार) हे रॉटरडॅमचे मोठे बंदर असून त्यात प्रवेश करण्याचा जलभाग सु. २२−२३ मी. खोलवर गाळरहित करण्यात आला आहे त्यामुळे प्रचंड तेलवाहू जहाजे या बंदरात थांबविण्याची सुविधा आहे. बंदरातून नेदरर्लंडसच्या आयात-निर्यात व्यापाराची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असून आयात व निर्यात या व्यापाराची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असून आयात व निर्यात यांत अनुक्रमे धातुके, धान्ये, तेले, लाकूड व फळफळावर आणि रुर दगडी कोळसा, मार्गरीन, भाज्या, दुग्धपदार्थ यांचा अंतर्भाव होतो. रॉटरडॅमची अर्थव्यवस्था मुख्यतः जहाजवाहतुकीवर निर्भर असली, तरी खनिज तेल रसायनोद्योगही मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. तेल नळाद्वारे अशुद्ध खनिज तेल ॲम्स्टरडॅम, अँटवर्प आणि प. जर्मनाकडे, तेलशुद्धीकरण कारखान्यातील पदार्थ प. जर्मनीकडे, नॅप्था लिंबर्ग प्रांताकडे व एथिलीन वायू तेर्नझकडे (झीलंडमधील एक जिल्हा) पाठविण्यात येतो. यांशिवाय येथे जहाजबांधणी व दुरूस्ती, रसायने, यंत्रे व यंत्रसामग्री, धातुपदार्थ, खाद्यान्ने, वस्त्रे यांचे निर्मितिउद्योगही आहेत.
ऐतिहासिक व समकालीन रूपणकलांविषयी रॉटरडॅमची मोठी ख्याती आहे. येथील ‘बॉयमान्स-व्हान बेयुनिंगेन म्युनिसिपल म्यूझियम’ या संग्रहाल्यात हिएरोनीसम बॉस, थोररला पीटर ब्रगेल, यान व्हाज आर्थिक, व्हिन्सेंत व्हान व्हान गॉख या श्रेष्ठ चित्रकारांच्या तसेच इतर डच व फ्लेमिश चित्रकारांच्या कलाकृती आहेत. इतर लक्षणीय संग्रहालयामध्ये ‘म्यूझीयम फॉर जिऑग्रफी अँड एप्नॉग्रफी’ (यामध्ये बिगर यूरोपीय देशांतील ललित व उपयोजित कलाकृती संगृहीत आहेत, ‘प्रिन्स हेन्री मॅरिटाइम म्यूझीयम’ (यात विविध जहाजांच्या नमुनाकृती तसेच देखावे संगृहित असून त्याअन्वये नौवहनाचा इतिहास चित्रित करण्यात आलेला आहे), ‘हिस्टॉरिकल म्यूझीयम’ (सतराव्या शतकातील उत्रकृष्ट वास्तुप्रकारांचे नमुने) इत्यादींचा समावेश होतो. पिलग्रिम फादर्सनी आपल्या ऐतिहासिक सागरी मोहिमेला प्रारंभ करण्यापूर्वी ज्या चर्चमधून निरोप घेतला, ते चर्च अद्यापही येथे उभे आहे. जुन्या वास्तूंपैकी नगरभवन, शेअरबाजार कार्यालय. डाक कार्यालय या, तर पुनर्रचित वास्तूंमध्ये ‘लिजबान दुकान विक्री केंद्रे’, ‘दे दोलेन’ (एक अप्रतिम संगीत सभागृह), तसेच १.२० लक्ष चौ. मी. क्षेत्राचे घाऊक व्यापारकार्यालय इत्यादींचा समावेश होतो. शहरात आधुनिक कार्यवादी (फंक्शनल) वास्तुकलेचे अनेक नमुने पहावयास मिळतात. ‘न्यू रॉटरडॅम्स टोनील’ ही देशातील प्रख्यात नाटककंपनी, तर ‘फिलहार्मोनिक’ हा वाद्यवृंद ह्या दोन्ही संस्था येथल्याच. डच विद्वान व कॅथलिक धर्मसुधारक इरॅस्मस (१४६६−१५३६), चित्रकार पीटर दी होख (१६२९−७७) यांचे रॉटरडॅम हे जम्नग्राम होय. १९१३ मध्ये स्थापण्यात आलेली अर्थशास्त्रविषयक संस्था आता मानव्यविद्या संस्था म्हणून विस्तारित झाली आहे.
गद्रे. वि. रा.