रासबेरी : (गौरीफल, काला आंचू हिं. काला हिंसालू, काला अंचू इं. म्हैसूर रासबेरी महाबळेश्वर रासबेरी लॅ. रूबस निव्हियस,रू. लॅसिओकार्पस कुल−रोक्षेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] व ⇨ब्लॅंकबेरी च्या रूबस प्रजाती यातील फळांबद्दल परिचित असलेले एक सरळ उभे वाढणारे कोटेरी झुडूप. याचा प्रसार समशीतोष्ण हिमालयात पंजाब ते आसामपर्यंत, दख्खनच्या पठारावर व सह्याद्रीत सु. १,२०० मी. पेक्षा अधिक उंचीवर आहे. महाबळेश्वरातील दाट जंगलात हे रानटी अवस्थेत आढळते आणि तसेच तेथे याची लागवडही करतात. अमेरिकेतील द.फ्लॉरिडात ‘म्हैसूर रासबेरी’ या नावाने मोठ्या प्रमाणावर याची लागवड केली असून तेथून त्याचा प्रवेश प्वेर्त रीकेत झाला आहे.
रासबेरीचे झुडूप सरळ वाढणारे व याचे खोड सु. ३ मी. उंच व ७ सेंमी. घेराचे असते काही वाकलेल्या लांब, जांभळट व भुरकट फांद्यांना टोकांस मुळे फुटतात. पाने संयुक्त, एकाआड एक, १०−२०सेंमी. लांब विषमदली असून दले ५−९, गर्द हिरवी आणि दातेरी असतात. फांद्यांच्या टोकांस किंवा पानांच्या वगलेत लालसर लहान फुलांचे झुबके [गुलुच्छ ⟶ पुरूषबंध] पावसाळ्यात येतात. त्यांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨रोझेलीझ गणातील रोक्षेसी अथवा गुलाब कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. फळ [घोसफळ ⟶ फळ] गोलसर, ०·६ ते १·८ सेंमी. व्यासाचे, पूर्ण पिकल्यावर (एप्रिल ते मेमध्ये) गर्द जांभळे दिसते ते अनेक लहान अश्मगर्मी (आठळीयुक्त) फळांचे बनलेले असते.
लागवड, मशागत इ.: रूबस प्रजातीतील भारतात आढळलेल्या व खाद्य फळांकरिता आणि इतर कारणांकरिता महत्त्वाच्या मानलेल्या सु. १६ जातींची माहिती उपलब्ध आहे. त्यांपैकी काही स्थानिक जातींपासून खाद्य फळे मिळतात परंतु व्यापारी दृष्ट्या त्यांना महत्त्व नाही. त्यांचा प्रसार हिमालयीन प्रदेश, आसाम, कुमाऊँ, पंजाब, सिक्कीम, नेपाळ, काश्मीर, निलगिरी, बिहार, उ. बंगाल,सह्याद्री, दख्खन इ. प्रदेशांत आहे. ब्लॅकबेरी व रासबेरी यांच्या लागवडीत बरेच साम्य असल्याने त्यांचा येथे एकत्र विचार केला आहे. महाबळेश्वर व कर्नाटक येथे रासबेरीची (रू. निव्हियस ची) लागवड असून त्या फळांवर मुंबई व बंगलोर येथे विशेष प्रकारे प्रक्रिया केल्या जातात. बंगलोरात सु. ८ हेक्टरातील लागवडीमुळे सु. ७५,००० किमॅ. फळे मिळतात व त्यांचा उपयोग तेथे मुरंब्याकरिता केला जातो. निलगिरीतही याच जाताची पण मर्यादित लागवड केली आहे. भारतातील सु. १,५००-२,१०० मी उंच प्रदेशातील हवामान ब्लॅकबेरी व रासबेरीला मानवते. मध्यम प्रकारच्या पिकाऊ जमिनीत चांगले कुजवलेले भरपूर खत दिल्यास ही पिके चांगली येतात. लागवडीकरिता जमीन चांगली नांगरून व कुळवून त्यात तुरीसारखे पीक गाडून टाकतात शिवाय हेक्टरी २०–२५ टन शेणखत घातल्यास फार फायद्याचे असते. पहिल्या लावणीच्या वेळी एकदा खत देतात आणि नंतर दर दोन वर्षांनी देतात. दाबकलमांचे तुकडे अथवा मुनवे विशेषेकरून लावणीस वापरतात. मुनवे उन्हाळ्यात वाढून पुढे लागवडीकरिता वापरतात. लांबट व वाकलेल्या फांद्यांची टोके प्रथम जमिनीत भोके पाडून खुपसून ठेवतात आणि नंतर २-३ महिन्यांनी मुळे फुटलेले भाग थोडी फांदी राखून अलग करतात आणि नंतर इच्छित स्थळी पावसाळ्यात लावतात. पाटाचे पाणी उपलब्ध असल्यास वर्षभरात केव्हाही लागवड करता येते. हेक्टरी सु. १,००० झाडे लावतात. वाढ सुरू असताना लांबट वाकलेल्या फांद्या छाटल्यास फळे धरणाऱ्या या बाजूच्या इतर फांद्यांची वाढ चांगली होते. सरळ उभ्या वाढणाऱ्या या रासबेरी आणि ब्लॅकबेरी जातींची छाटणी व खुडणी करून विरळ करतात परंतु सरपटत वाढणाऱ्या या जातींना खुंट्या व तारेच्या जाळ्यांचा आधार दिल्यास उत्पादन वाढते. काही जातींत वाढ चालू असताना अनेक मुनवे फुटतात तेही मधून मधून कापून टाकल्यास मुख्य झाडाची वाढ जोमाने होते. लावणीनंतर साधारपणे दोन वर्षांनी ब्लॅकबेरींना फळे येऊ लागतात, तर रासबेरींना एक वर्षांनंतर येतात. बंगलोरात सु. पाच महिन्यांनी फुले येतात व पुढे वर्षभर फुले व फळे येणे चालू असते. फेब्रुवारी ते मार्चमध्ये सर्वांत मोठा बहर असतो, तो हेक्टरी सु, ६,००० किग्रॅ. फळांचा असतो परंतु जून ते ऑगस्ट या कालात सर्वांत कमी म्हणजे हेक्टरी सु. १,५०० किग्रॅ. उत्पादन होते त्याच क्षेत्रात सु. ५–६ वर्षे उत्पादन फायद्याचे राहते. निलगिरीतील हवामानात ब्लॅकबेरीचा फळबहार मेमध्ये येतो व तो एक महिना टिकतो तेथे रासबेरीचा बहार पुढे एक महिन्याने असतो.
फळे : पक्व फळे काळजीपूर्वक काढावी लागतात. तळातील पुष्पस्थलीपासून (अक्षापासून) ती सहज निघतात तेव्हाच ती सोडून जमा करतात व लागलीच ती विकली जातात जमा करताना खरचटली गेल्यास त्यांवर बुरशी येण्याचा संभव असतो. पक्व फळांना उत्तम चव व वास असतो पण तो फार दिवस टिकत नाही. फळे झाडावरच सुकल्यास खाण्यास उपयोगी पडत नाहीत. ताजी फळे फार टिकत नसून व ती साठवून ठेवणेही व्यापारी दृष्ट्या फारसे सोयीचे नसते. त्यामुळे रासबेरीचे मुरंबे, जेली, सरबते करणे किंवा ती डबाबंद करणे आवश्यक असते. आइसक्रीमला स्वाद आणण्यास व मिठाईकरिता ती वापरतात. रासबेरीचा रस व साखर एकत्र करून किंवा फक्त फळे गोठविता येतात. रस चवदार असून इतर फळांच्या रसाबरोबर त्याचे मिश्रण करता येते. रोग्यांना फक्त रस किंवा काही क्षारीय औषधाबरोबर तो दिल्यास तोंडास चव येते व औषधांची वाईट चव किंवा वास सुसह्य होतो. मुरंबे व सरबत उद्योगांतून टाकाऊ पदार्थ म्हणून भरपूर बिया मिळतात. सुकलेल्या बियात १०–१५% वसाम्ल मिळते ते जवस तेलापासून त्वरित सुकते. युरोपीय रासबेरीची सुकी पाने चहाप्रमाणे उपयुक्त असतात. रूबसच्या या व आणखी काही जातींच्या पानांचा काढा स्तंभक (आकुंचन करणारा) असल्याने शौचाच्या तक्रारीवर देतात. पाने रक्तशुद्धिकारक असून पानांचा रस अरेखित स्नायूंना उत्तेजित करतो.
पाहा : ब्लॅकबेरी
संदर्भ :
- C.S. I. R., The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.
- Lawrence, G. H. M., The Taxonomy of Varcular Plants, New York, 1965.
- Rendle, A. B., The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.
लेखक : जमदाडे, ज. वि.; परांडेकर, शं. आ.