राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला : (नॅशनल डिफेन्स अकॅडेमी). सैनिकी प्रशिक्षण देणारी भारतातील एक महत्त्वाची संस्था. पुणे शहराजवळ खडकवासला येथे ही संस्था असून तिन्ही सैनिकी दलांचे प्राथमिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची सोय या संस्थेत आहे. भूसेना, नौसेना व वायुसेना या दलांतील अधिकाऱ्यांचे शिक्षण सुरुवातीस एकत्र केले जावे, या उद्देशाने १९४५ साली तत्कालीन हिंदुस्थान सरकारने नॅशनल वॉर अकॅडेमी वर्किंग कमिटी नेमली. या कमिटीचे अध्यक्ष फील्ड मार्शल सर क्लॉट ऑकिनलेक व उपाध्यक्ष अमरनाथ झा हे होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धात तीनही सेनाविभागाचे परस्परांशी सहकार्य हे अत्यावश्यक आहे, ही गोष्ट लक्षात आली होती. म्हणूनच स्वतंत्र भारतातही अशा प्रकारच्या संयुक्त सैनिकी शिक्षणसंस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ह्या संस्थेचे नाव प्रथम नॅशनल वॉर अकॅडेमी ठेवावे आणि साधारणपणे २,५०० छात्रांसाठी ४ वर्षे मुदतीचा शिक्षणक्रम ठेवावा असे ठरले.

या संरक्षण प्रबोधिनी सूदान सरकारने दुसऱ्या महायुद्धात भारतीय सेनेने सूदानमध्ये केलेली महत्त्वाची कामगिरी लक्षात घेऊन एक लाख पाउंड देऊ केले व महाराष्ट्रराज्याने सु. २,८३३ हेक्टर जमीन दिली. तसेच भारताच्या इतर घटक राज्यांनीही प्रत्येकी ५ लाख रु. दिले. खडकवासल्यापासून समुद्र फार लांब नाही व पुण्यात हवाई दलाचा तळ आहे, म्हणून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी खडकवासल्याची निवड करण्यात आली. परंतु बांधकाम होण्यात लागणारा कालावधी लक्षात घेता ४ जानेवारी १९४९ रोजी डेहराडून येथे एक इंटर सर्व्हिसेस विंग स्थापन करण्यात आले. ६ ऑक्टोबर १९४९ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासल्याच्या वास्तूची पायाभरणी झाली. डिसेंबर १९५४ मध्ये वास्तूचे काम जवळजवळ पूर्ण झाले व १६ जानेवारी १९५५ रोजी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे उद्‌घाटन केले.या संस्थेतून ५ जून १९५५ रोजी पहिली तुकडी शिक्षणक्रम पूर्ण करून बाहेर पडली. त्यावेळी शिक्षणक्रम तीन वर्षांचा होता व त्यांपैकी शेवटच्या वर्षांचा अभ्यासक्रम भूसेना, नौसेना व वायुसेना यांनी आपआपल्या शिक्षणसंस्थांमध्ये पूर्ण करून घ्यावा, असे ठरविण्यात आले.

डब्ल्यू. एक्स. मस्कारेन्हस यांनी ह्या वास्तूचे स्थापत्याचे काम केले, आहे. मुख्य इमारतीस ‘सूदान ब्लॉक’ ही संज्ञा दिली असून ६० वर्ग, प्रशस्त ग्रंथालय, संग्रहालय, सभागृह हे सूदान ब्लॉकचे मुख्य भाग आहेत. प्रबोदिनीचे प्रमुख कार्यालयही येथेच आहे.

प्रबोधिनीत १,८०० छात्र शिक्षण घेतात. सेनेची गरज वाढल्यामुळे घोरपडी येथे आणखी ३०० छात्रांची शिक्षिणाची व्यवस्था करण्यात आली. तथापि १९८७ मध्ये हा विभाग खडकवासल्याला हलविण्यात आला. या प्रबोधिनीत कमांडंट, लेफ्टनंट जनरल अथवा तत्सम हुद्याचे अधिकारी असतात व पाळीपाळीने तीनही सेनाविभागांतून ते निवडले जातात. कमांडंट व डेप्युटी कमांडंट हे वेगवेगळ्या विभागांचे असतात. शालेय शिक्षण प्राचार्याच्या देखरेखीखाली चालते. प्राचार्य व शिक्षक यांची निवड व नेमणूक राज्य लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येते.

१६ ते १८ १/२ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपरीक्षा मे व डिसेंबरमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दर दोन वर्षांनी घेण्यात येतात व त्यांतून निवडलेले विद्यार्थी निवड मंडळापुढे चाचणीला जातात. वैद्यकीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुणक्रमांनुसार यादी तयार करण्यात येते व त्यांतील पहिल्या ३३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. छात्रांचा शिक्षणाचा आणि भोजन−निवासाचा खर्च सरकारमार्फत करण्यात येतो.

शालेय शिक्षणक्रमाव्यतिरिक शिस्त, नेतृत्व व लष्करी शिक्षण यांचा अभ्यासक्रमात समावेश असतो. तीन वर्षांनंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे बी. ए. अथवा बी. एस्‌सी. पदवी देण्यात येते.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या बोधचिन्हात भूसेनेच्या दोन क्रूस आकारातील तलवारी, नौसेनेचा लंगर व वायुसेनेचा गरुड आहे व ‘सेवा परमो धर्म:’हे बोधवाक्य आहे.

पित्रे. का. ग.