राष्ट्रीयत्व : राजकीय दृष्टीने पाहता एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व म्हणजे त्या व्यक्तीचा सांस्कृतिक, धार्मिक अगर वांशिक वारसा होय. परंतु एक वैधानिक संज्ञा या नात्याने राष्ट्रीयत्व म्हणजे त्या त्या राष्ट्राचे नागरिकत्व.
जवळजवळ सर्व लोकांना जन्माने राष्ट्रीयत्व प्राप्त होते. ज्या राज्यात ते जन्मतात, त्या राज्याचे नागरिकत्व त्यांना आपोआप प्राप्त होते त्याचप्रमाणे माता-पित्यांचे नागरिकत्व मुलाला जन्मताच प्राप्त होते पण राष्ट्रीयत्व मिळवण्याचे इतरही मार्ग संभवतात. उदा. एखाद्या स्त्रीने परकीय पुरुषाशी विवाह केल्यास तिला पतीचे नागरिकत्व प्राप्त होते. परदेशात वास्तव्याच्या अगर इतर अटी पूर्ण करून त्या देशाचे नागरिकत्व मिळवता येते. याशिवाय एखाद्या राज्याच्या काही प्रदेश दुसऱ्या राज्यात समाविष्ट करण्यात आला, तर त्या प्रदेशातील सर्व लोकांना दुसऱ्या राज्याचे नागरिकत्व प्राप्त होते. राष्ट्रीयतत्त्व रद्द होण्याच्या विविध पद्धती अस्तित्त्वात आहेत. राज्यपरत्वे त्यात भिन्नता आहे. उदा., विशिष्ट मुद्दतीपेक्षा अधिक काळ परदेशी वास्तव्य केल्यास किंवा शासनाची संमती न घेता परकीय सरकारची नोकरी स्वीकारल्यास, राष्ट्रीयत्त्व रद्द करण्याची तरतूद काही राज्यांत आहे. काही राज्ये त्यांच्या नागरिकांनी परदेशीय नागरिकत्त्व हेतूतः स्वीकारल्यास त्यांचे मूळचे नागरिकत्व रद्द करतात.
एखाद्या व्यक्तीस जन्मस्थळाच्या आधारे एक आणि मातापित्यांकडून आलेले दुसरे, अशी दोन नागरिकत्त्वे प्राप्त होतात. अशा वेळी सज्ञान झाल्यानंतर ती व्यक्ती दोहोंपैकी एकाचा त्याग करू शकते किंवा काही राज्यांच्या कायद्यानुसार काही निकषांवर त्या व्यक्तीचे नागरिकत्त्व निश्चित केले जाते.
ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीस दुहेरी नागरिकत्व प्राप्त होते. त्याप्रमाणे कुठल्याही राज्याचे नागरिकत्व नसल्याचीही स्थिती उद्भवू शकते. राज्याराज्यांच्या विशिष्ट कायद्यांमुळे किंवा दीर्घकाळ स्थलांतर केल्याने असे घडू शकते. या स्थितीस राज्यविहीनता (स्टेटलेसनेस) असे म्हणतात. राज्यविहीन व्यक्तीस कुठल्याच राज्याचे अगर आंतरराष्ट्रीय कायद्याचे संरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळे आपसांत सहकार्य करून राज्यविहीनता नष्ट करण्याकडे राज्यांचा वाढता कल आहे.
पहा : नागरिकत्व.
तवले, सु. न.
“