राष्ट्रीय अनुशासन योजना : (नॅशनल डिसिप्लिन स्कीम). भारतातील राष्ट्रीय अनुशासन योजनेची सुरुवात १९५४ मध्ये कर्नल जगन्नाथराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली झाली. प्रारंभी भारतीय राष्ट्रसेनेतील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने दिल्ली शहरातील निर्वासितांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे पंजाब, प. बंगाल, गुजरात इ. राज्यांतही अंशतः ही योजना कार्यान्वित करण्यात आली. पुढे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने १९५७ मध्ये या योजनेचा विस्तार करण्याचे काम स्वीकारले व त्यासाठी जगन्नाथराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र संचालनालय स्थापन करण्यात आले. युवकांचा शारीरिक व मानसिक विकास घडवून त्यांच्यातील राष्ट्रप्रेम, स्वावलंबन, स्वार्थत्याग इ. गुणांचे संवर्धन करणे त्याचप्रमाणे त्यांच्यात सामाजिक जीवनमूल्यांची जाणीव निर्माण करून त्यांना राष्ट्रसेवेस पात्र बनविणे, अशी उद्दिष्टे या योजनेमागे आहेत. या योजनेत पुढील कार्यक्रम समाविष्ट होतो : (१) शारीरिक शिक्षण : शरीरसंवर्धन व्यायाम, कवायत-कसरतीचे व्यायाम आणि इतर क्रीडाप्रकार इत्यादी. (२) बौद्धिक शिक्षण : अनुशासन, राष्ट्रप्रेम आणि उत्तम नागरिकत्व यांना पोषक असे शिक्षण देणे तसेच राष्ट्रगीत, झेंडावंदन यांबद्दल योग्य ती माहिती देणे. (३) आयोजन : मोठी प्रात्यक्षिके, शिबिरे यांच्यामार्फत नेतृत्वाचे प्रशिक्षण देऊन युवकांची आयोजनक्षमता विकसित करणे. (४) व्यवस्थापन : क्रीडासामने आणि संमेलने, कवायती, संचलन इ. कार्यक्रमांचे व्यवस्थापन युवकांकडूनच करून घेऊन त्यांचे व्यवस्थापन कौशल्य विकसित करणे. (५) प्रात्यक्षिक कार्यक्रम : यात कवायत व संचलन, लेजीम, मल्लखांब, लोकनृत्ये व समूहगीते, व्यायामी खेळ इत्यादींचे प्रशिक्षण अंतर्भूत होते.

हा कार्यक्रम राबविण्यासाठी लागणारे नेतृत्व तयार व्हावे म्हणून प्रथम दोन किंवा तीन महिन्यांची प्रशिक्षण शिबिरे सुरू करण्यात आली. तदनंतर सारिस्का (राजस्थान) व बरुआ (मध्य प्रदेश) या ठिकाणी राष्ट्रीय अनुशासन संचालनालयातर्फे स्वतंत्र प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या व त्यांमध्ये एक वर्षांच्या मुदतीचे शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या युवकांसाठी प्रमाणपत्र वर्ग व पदवीधरांसाठी एक वर्षाचा पदविका वर्ग सुरू करण्यात आला. या प्रशिक्षण वर्गांतून उत्तीर्ण झालेल्यांना भारत सरकारतर्फे देशातील माध्यमिक शाळांमधून नेमण्यात आले आणि त्यांच्यामार्फत या योजनेचा कार्यक्रम त्या त्या माध्यमिक शाळांत सुरू करण्यात आला.

भारतात या योजनेखाली सु. सात-आठ हजार प्रशिक्षित शिक्षक तयार झाले आहेत. १९५५ ते १९६० या काळात माध्यमिक शाळांत बालवीर व वीरबाला, छात्रसेना, राष्ट्रीय अनुशासन योजना, शारीरिक शिक्षण इ. अनेक योजना सुरू झाल्यामुळे या सर्व योजनांमध्ये समन्वय साधून एक संघटित योजना तयार करण्याचे काम पं. हृदयनाथ कुंझरू यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीवर सोपविण्यात आले. या समितीच्या शिफारशींप्रमाणे १९६५ मध्ये राष्ट्रीय अनुशासन योजनेचे रूपांतर ‘राष्ट्रीय स्वास्थ्यदल योजने’त झाले. माध्यमिक शाळांकरिता ‘राष्ट्रीय स्वास्थ्यदला’ने जो कार्यक्रम तयार केला, त्यातील मुख्य विषय पुढीलप्रमाणे आहेत : (१) शरीरसंवर्धन व्यायाम, (२) लेजीम, (३) कवायती, (४) मैदानी स्पर्धा, (५) खेळ, (६) कसरतीचे व्यायाम, (७) लोकनृत्य (मुलींकरिता), (८) द्वंद्वात्मक प्रकार, (९) गिर्यारोहण, (१०) कसोट्या, (११) नागरिकत्व, राष्ट्रीय ध्येय आणि उद्दिष्टे, राष्ट्रीय एकात्मता, झेंडावंदन व राष्ट्रगीत इत्यादींचे प्रशिक्षण.

माध्यमिक शाळांमधून योजनेचे कार्य सुलभ रीतीने व्हावे म्हणून राष्ट्रीय स्वास्थ्यदल संचालनालयाद्वारे मार्गदर्शक सचित्र पुस्तके इंग्रजी व हिंदी भाषांतून प्रसिद्ध करण्यात आली. या योजनेमुळे शाळेमधील विद्यार्थि-विद्यार्थिनींची निरनिराळ्या शारीरिक शिक्षणप्रकारांतील व क्रीडाप्रकारांतील सांघिक प्रात्यक्षिके अतिशय शिस्तपूर्ण होतात. या योजनेमुळेच राष्ट्रीय पातळीवर शारीरिक शिक्षणाचा सुसंघटित अभ्यासक्रम तयार झाला. त्यामध्ये पाश्चिमात्य व्यायाम व खेळ यांबरोबरच भारतीय व्यायाम आणि खेळ यांचा समावेश होऊन तो भारतातील निरनिराळ्या राज्यांत सुरू करण्यात आला.

पुढे कोठारी शिक्षण आयोगाच्या सूचनेनुसार १० + २ हा आकृतिबंध सुरू झाल्यानंतर व या योजनेचा खर्च केंद्र शासनाला मोठ्या प्रमाणावर करावा लागल्यामुळे ही योजना निरनिराळ्या राज्यांकडे हस्तांतरित करण्यात आली. तसेच राष्ट्रीय स्वास्थ्य दलाचा अभ्यासक्रम शारीरिक शिक्षण व क्रीडा अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आला परंतु राष्ट्रीय स्वास्थ्य दलाचे जे शिक्षण राज्यात होते, त्यांच्या वेतनाची जबाबदारी मात्र केंद्र सरकारने स्वतःवर घेतली.

वाखारकर, दि. गो.