पाटणा विद्यापीठ: बिहार राज्यातील एक विद्यापीठ. १९१७ मध्ये ते पाटणा येथे स्थापन झाले. या विद्यापीठाची तीनदा पुनर्घटना होऊन (१९५२, १९६० व १९६२) त्यास शेवटी अध्यापनात्मक व निवासी असे स्वरूप प्राप्त झाले. तथापि १ एप्रिल १९७२ पासून त्याचे नियंत्रण आणि व्यवस्थापन राज्यशासनाकडे सोपविण्यात आले आहे. या विद्यापीठाच्या कक्षेत पाटणा महापालिकेच्या हद्दीतील महाविद्यालये येतात. अशा महाविद्यालयांची संख्या दहा असून त्यांशिवाय विद्यापीठात २७ विषयविभाग, दोन संलग्न महाविद्यालये व एकूण विद्यार्थिसंख्या १३,७४० आहे (१९७६-७७). सिनेट ही सर्वोच्च समिती व सिंडिकेट ही अधिकृत कार्यकारिणी होय. शैक्षणिक गोष्टींची जबाबदारी विद्वत्‌परिषद, विद्याशाखा आणि अभ्यासमंडळे यांच्यावर असते. पदवी, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम या विद्यापीठात आहेत.

विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष जून ते मेपर्यंत तीन सत्रांचे असते. मानव्यविद्या, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण, अभियांत्रिकी, विधी आणि वैद्यक ह्या सात प्रमुख विद्याशाखा आहेत. बी. ए. पदवीपर्यंत शिक्षणाचे माध्यम हिंदी असून पदव्युत्तर पातळीवर इंग्रजी माध्यम आहे. 

येथे विद्यापीठीय विद्यार्थ्यांचे माहिती केंद्र आहे. परदेशी विद्यापीठांतील आणि अन्य उच्च विद्यासंस्थांतील निरनिराळ्या अभ्यासक्रमांची माहिती या केंद्रातर्फे विद्यार्थांना पुरविण्यात येते. हुशार विद्यार्थांना शिष्यवृत्त्याही देण्यात येतात. विद्यापीठाचे वार्षिक उत्पन्न व खर्च अनुक्रमे २·५८ व २·७३ कोटी रु. आहे (१९७३-७४). 

विद्यापीठाने १९६०-६१ मध्ये त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रम चालू केला. मानव्यविद्या, विज्ञान, वाणिज्य, शिक्षण आणि वैद्यक विभागांत संशोधनाच्या सोयी-सवलती उपलब्ध आहेत. विद्यापीठातील अध्यापकांना परदेशांत जाऊन उच्च अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाच्या खास निधीतून व्याजमुक्त कर्जही देण्यात येते. विद्यापीठीय ग्रंथालय सुसज्ज असून त्यात २,२०,०९५ ग्रंथ आणि ४,८७० प्राचीन हस्तलिखिते आहेत (१९७६-७७). 

घाणेकर, मु. मा. मिसार, म.व्यं.