‘राशीद’– नूनमीम : (१ ऑगस्ट १९१० – १० ऑक्टोबर १९७६). सुप्रसिद्ध आधुनिक उर्दू कवी. संपूर्ण नाव नझर मुहंमद राशीद. पाकिस्तानमधील गुजराणवाला जिल्ह्यातील अकलगढ येथे जन्म. १९२६ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ल्यालपूर व लाहोर येथे त्यांचे उच्च शिक्षण झाले. १९३० मध्ये ते इंग्रजी, अर्थशास्त्र, पर्शियन हे विषय घेऊन बी. ए. झाले. त्यांना पित्याकडून वाङ्मयीन अभिरुचीचा वारसा मिळाला होता. कुमारवयातच सादी, हाफीज, गालिब आणि इक्बाल यांच्या काव्याचा त्यांना परिचय झाला आणि ते काव्यरचनाही करू लागले. अहमदशाह बुखारी आणि डॉ. तासीर यांच्या सहवासाचाही राशीदवर बराच परिणाम झाला. ऑल्डस हक्सली, एझरा पाउंड, मालार्मे, एलियट आणि आधुनिक इराणी कवी यांचे काव्य राशीद यांना आवडत असे. यांपैकी काहींच्या कवितांचे त्यांनी उर्दूत भाषांतरही केले. महाविद्यालयात असतानाच त्यांनी काही लेख व सुनीते लिहिली होती. मावरा या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात काही सुनीतेही प्रकाशित झाली. ‘जुर्अत-ए पर्वाझ’ ही त्यांची प्रसिद्ध कविता १९३२ मध्ये लिहिली गेली. १९३९ मध्ये आकाशवाणीवर ‘कार्यक्रम प्रबंधक’ म्हणून राशीद यांची नियुक्ती झाली. चार वर्षे ते दिल्लीत होते. १९४३ मध्ये त्यांना अस्थायी स्वरूपाचे लष्करी कमिशन मिळाले. १९४७ मध्ये ते पुन्हा लखनौ आकाशवाणी केंद्रावर साहाय्यक संचालक म्हणून रुजू झाले. भारताची फाळणी झाल्यावर त्याच पदावर त्यांनी पेशावर आकाशवाणी केंद्रात काम केले. १९५२ मध्ये ते यूनोमध्ये गेले. अखेरच्या दिवसांत ते लंडनजवळच्या एका खेड्यात राहिले. लंडन येथे ते मृत्यू पावले.
मिराजीबरोबरच राशीद हेही उर्दूतील नवकवितेचे प्रवर्तक मानले जातात. मिराजीप्रमाणेच त्यांनीही मुक्तच्छंदाचा पुरस्कार केला. ते बंडखोर कवी होते. प्रेमाची प्रचलित कल्पना आणि ईश्वर यांविरुद्ध त्यांनी बंडखोर विचार मांडले. त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातील ‘गुनाह और मुहब्बत’, ‘इन्सान और फित्रत’, ‘मुकाफात’ या कवितांमध्ये त्यांच्या मनातील संघर्षाचे चित्र उमटले आहे. त्यांची प्रेमकल्पना शारीरिक आहे. ते सरळ म्हणतात, ‘रूहे मिल सकती नही है तो ये लब ही मिल जाये’– (‘इत्तेफाकात’ –आत्म्याचे मीलन तर होऊ शकत नाही, निदान परस्परांचे ओठ तरी मिळू द्या).
परकीय सत्तेविरुद्धही त्यांनी बंड पुकारले होते. त्यांच्या दुसऱ्या संग्रहात ते स्पष्टपणे दिसते. इरान में अजनबी या कवितासंग्रहात संपूर्ण आशिया खंडासंबंधी ते बोलतात. ‘सबा विरान’ या कवितेत प्रतीकात्म शैलीत समकालीन मानवाच्या नैराश्याचे चित्र त्यांनी रेखाटले आहे. जीवन हे अनेकांगी व गुंतागुंतीचे आहे. किंबहुना प्रेमभावनेतदेखील थोडेसे जळणे, थोडीशी गंमत आणि थोडाफार सूड असतो (‘जिन्दगी मेरी सेहनीम’). त्यांच्या नंतरच्या संग्रहांत- (ला मुसावी इन्सान आणि गुमान का मुंकिन यांत) – ‘याराने सरे पुल’, ‘इस्त्राफित की मौत’ या कवितांत त्यांचे गुंतागुंतीचे पण समृद्ध अनुभव त्यांच्या परिपक्व शैलीत प्रगट झाले आहेत. ‘मुझे विदा कर’, ‘याराने सरे पुल’ यांत राशीद महत्त्वाकांक्षी माणसाच्या संकटाचे आणि त्याच्या भीतीचे वर्णन करतात. नेणिवेतील गोष्टींचे जाणीवपूर्ण भाषेत वर्णन म्हणजे कविता, असे ते म्हणतात. आधुनिक उर्दू कवितेवर त्यांनी दर्जेदार समीक्षालेखनही केले आहे. त्यांनी काही पर्शियन कवितांची भाषांतरेही केली. त्यांच्या उल्लेखनीय कृती अशा : मावरा (१९४१), इरान में अजनबी (१९५५, १९६९), ला इन्सान (१९६९), गुमान का इमकान (१९७६) इत्यादी.
सैय्यद, नईमुद्दीन