व्ही.राव, विजयेंद्र कस्तुरिरंगा वरदराज : (८ जुलै १९०८–). प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ व भारत सरकारचे माजी मंत्री. वडिलांचे नाव के. कस्तुरिरंगाचार व आईचे भारती. त्यांचा जन्म तमिळनाडू राज्याच्या कांचीपुरम् या शहरी झाला. मुंबई विद्यापीठातून राव यांनी बी.ए. (ऑनर्स) व एम्.ए. या दोन्ही पदव्या प्रथम श्रेणीत संपादन केल्या. केंब्रिज विद्यापीठातून बी.ए. (ऑनर्स) ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. सी.एन्. वकील या सुविख्यात भारतीय अर्थशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी राव एम्.ए.ला असताना त्यांनी टॅक्सेशन ऑफ इन्कम इन इंडिया हा प्रबंध लिहून पूर्ण केला. जोन रॉबिन्सन या अर्थशास्त्राच्या प्रसिद्ध विदुषी व प्राध्यापिका यांचा विद्यार्थी तसेच विल्सन महाविद्यालय, मुंबई आणि केंब्रिजस्थित गॉनव्हिल व केअस या महाविद्यालयांचा विद्यार्थी असलेल्या राव यांना केंब्रिज विद्यापीठाने पीएच्.डी ही पदवी प्रदान केली. १९३१ मध्ये राव यांचा पहिला विवाह झाला. प्रमिला या त्यांच्या प्रथम पत्नीचे १९५५ मध्ये निधन झाले. १९६२ मध्ये त्यांनी दुसरा विवाह केला. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत.

अहमदाबादच्या एल्.डी. आर्ट्‌स् महाविद्यालयाचे व्ही. के. आर्. व्ही. राव प्राचार्य तसेच अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते (१९३७ –४२) दिल्ली विद्यापीठात अर्थशास्त्र विभागप्रमुख व अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले (१९४२ –५७) काही काळ राव यांनी विविध शासकीय पदे भूषविली. यांमध्ये केंद्र सरकारचे सांख्यिकी संचालक (१९४४-४५) नियोजन सल्लागार (१९४५-४६) भारतीय वकिलात, वॉशिंग्टन (अमेरिकेची संयुक्त संस्थाने) येथे अन्न व आर्थिक सल्लागार (१९४६-४७) इ. पदांचा समावेश होतो. १९४९–५७ या काळात राव दिल्ली विद्यापीठाच्या ‘दिल्ली अर्थशास्त्र संस्थे’चे (दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) संस्थापक-संचालक होते. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू (१९५७ –६०) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९६६ पासून ते गुणश्री प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. दिल्लीच्या ‘आर्थिक विकास संस्थे’चे (इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ) ते संस्थापक-संचालक होते (१९६० –६३). भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले (१९६३ –६६) याशिवाय संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या आर्थिक विकास उपसमितीचे अध्यक्ष (१९४७ –५०) लोकसभा सदस्य (१९६७ –७७), दळणवळण आणि जहाजवाहतूक खात्याचे केंद्रीय मंत्री (१९६६ –६९) शिक्षण व युवकसेना खात्याचे मंत्री (१९६९ –७१) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ते बंगलोरच्या ‘सामाजिक व आर्थिक बदल संस्थे’चे संस्थापक-संचालक (१९७२ – ७७), भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेचे राष्ट्रीय अधिछात्र (१९७७) होते. यांशिवाय गॉनव्हिल व केअस महाविद्यालये, केंब्रिज यांचे ते सन्माननीय अधिछात्र होते (१९७१) तर ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही पदवी देऊन गौरविले (१९६९). १९७४ मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मविभूषण हा सन्मान दिला. १९८४ पासून राव यांची राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राव यांचे अनेक ग्रंथ मान्यता पावले आहेत. त्यांतील काही उल्लेखनीय ग्रंथ पुढीलप्रमाणे : टॅक्सेशन ऑफ इन्कम इन इंडिया (१९३१) ॲन एसे ऑन इंडियाज नॅशनल इन्कम १९२५-२९ (१९३९)द नॅशनल इन्कम ऑफ ब्रिटिश इंडिया १९३१-३२ (१९४०) इंडिया अँड इंटरनॅशनल करन्सी प्लॅन्स (१९४६) पोस्ट वॉर रुपी (१९४८) फॉरिन एड अँड इंडियाज इकॉनॉमिक डिव्हलपमेंट (१९६२) एसेज ऑन इकॉनॉमिक डिव्हलपमेंट (१९६३) ग्रेटर दिल्ली-ए स्टडी इन अर्बनायझेशन १९४७ – ५७ (१९६५) एज्युकेशन अँड रिसोर्स डिव्हलपमेंट (१९६६) व्हॅल्यूज अँड इकॉनॉमिक डिव्हलपमेंट-द इंडियन चॅलेंज (१९७१) द नेहरू लीगसी (१९७१) इंडियाज नॅशनल इन्कम १९५० टू १९७५-७६, (१९७८) स्वामी विवेकानंद-प्रॉफेट ऑफ वेदांतिक सोशलिझम (१९७८) मेनी लँग्विजेस अँड वन नेशन-द प्रॉब्लेम ऑफ इंटिग्रेशन (१९७९) फूड, न्यूट्रिशन अँड पॉव्हर्टी (१९८२).

राव यांनी संपादिलेल्या ग्रंथांपैकी खालील ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहेत : ॲग्रिकल्चरल लेबर इन इंडिया (१९६१) एम्लॉयमेंट अँड अनएम्लॉयमेंट (१९६५) इंडियन सोशालिझम : रिट्रोस्पेक्ट अँड प्रॉस्पेक्ट (१९८२) इंडियाज नॅशनल इन्कम १९५० ८० (१९८३) इंडियन क्रायसिस- सम रिफ्लेक्शन्स (१९८५).

राव यांनी संयुक्त राष्ट्रांचा ‘विशेष आर्थिक विकास निधी’ (सनफेड-स्पेशल युनायटेड नेशन्स फंड फॉर इकॉनॉमिक डिव्हलपमेंट) स्थापन करण्याची सूचना केली होती. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न यांची शास्त्रीय पद्धतीने संगणना करणारे राव हे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ होत. राष्ट्रीय उत्पन्नाची परिगणना करण्यासाठी त्यांनी ‘वस्तुसूची पद्धती’ व ‘उत्पन्न प्रवाह पद्धती’ अशा दोन्ही पद्धतींचा वापर केला. करपद्धतीमध्ये सुधारणा करण्याकरिता ‘स्थूल उत्पन्न’ व ‘निव्वळ उत्पन्न’ यांमध्ये स्पष्टपणे भेद करणे आवश्यक आहे प्राप्तिकराचा दर क्रमशः वाढवीत नेला पाहिजे कृषिउत्पन्नाचा करपात्र उत्पन्नात समावेश करणे आवश्यक आहे इ. मौलिक सूचना त्यांनी केल्या. पूर्ण रोजगारासंबंधात केन्स यांचे विश्लेषण राव यांना असमाधानकारक वाटले आहे. राव यांच्या मते विकसनशील राष्ट्रांमध्ये केन्सप्रणीत बेकारीऐवजी सुप्त बेकारी प्रकर्षाने आढळून येते.

गद्रे, वि. रा.