राष्ट्रगीत : देशाच्या शासनसंस्थेची अधिकृत मान्यता लाभलेले व राष्ट्रीय उत्सवप्रसंगी म्हटले जाणारे गीत. राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रगीत हेदेखील राष्ट्रीय एकात्मतेचे व अभिमानाचे प्रतीक आहे. अर्वाचीन काळातच राष्ट्रगीतांचा उदय झाल्यामुळे त्यांना प्राचीन परंपरा नाही. प्रचलित राष्ट्रगीतांपैकी नेदर्लंड्‌चे ‘विल्यम ऑफ नॅसा…’ हे सर्वांत जुने (१६२६) राष्ट्रगीत असून त्यानंतर ग्रेट ब्रिटनचे ‘गॉड सेव्ह द क्विन/ किंग….’ (१७४५) व डेन्मार्कचे ‘किंग ख्रिस्तीआन…’ (१७६२ ते १७७७ दरम्यान) यांचा क्रम लागतो. या तिन्ही देशांत राजेशाही असल्याने त्यांच्या राष्ट्रगीतांतून राजा हाच देशाच्या एकतेचे व अभिमानाचे प्रतीक मानण्यात आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील काही संस्थांनांची राष्ट्रगीते राजस्तुतिपर असल्याचे दिसते. फ्रेंच राज्यक्रांतीपासून (१७८९) राजाऐवजी देशाचे गुणगान करणारी राष्ट्रगीते प्रचलित होऊ लागली. उदा., फ्रान्सचे ‘ला मार्से…’ (१७९२) व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे ‘द स्टार स्पँगल्ड बॅनर…’ (१८१४). या गीतांना अधिकृत शासनमान्यता अनुक्रमे १७९५ व १९३१ यांवर्षी मिळाली. यानंतरच्या राष्ट्रभक्तिपर गीतांना निरनिराळ्या निमित्तांनी राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाल्याचे पुढे दिसून येते. हैती देशाच्या स्वातंत्र्य शतकमहोत्सवानिमित्त (१९०३) रचलेले गीत राष्ट्रगीत म्हणून मान्यता पावले. या गीताने त्या प्रसंगाची स्मृती कायमची जतन करून ठेवली आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे गीत तो पक्ष सत्तेवर आला असता राष्ट्रगीत बनते. उदा., इंडोनेशियाचे (नॅशनॅलिस्ट पार्टी) राष्ट्रगीत (१९४९). काही वेळा राष्ट्रगीताच्या निवडीसाठी स्पर्धा आयोजित केल्या जात. पेरू आणि गुयाना या देशांची राष्ट्रगीते अशाच एका स्पर्धेतून निवडण्यात आली. राजेशाही रूढ असलेल्या देशांत राजा एखाद्या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देतो.

भारताचे राष्ट्रगीत

जन गण मन अधिनायक जय हे

भारत भाग्य विधाता ।

पंजाब, सिन्धु, गुजरात, मराठा,

द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधि तरंग,

तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे,

गाहे तव जय गाथा,

जन गण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य विधाता ।

जय हे । जय हे । जय हे ।

जय जय जय जय हे ।।

उदा., पहिल्या जॉर्ज राजाने ग्रीसचे राष्ट्रगीत निवडले (१८६४). एखाद्या देशातील संविधान किंवा राजकीय प्रणाली यांत मूलतः बदल झाल्यास किंवा तेथे परकीय अंमल प्रस्थापित झाल्यास मूळच्या राष्ट्रगीतांच्या जागी दुसरे राष्ट्रगीत येते. लिथ्युएनिया हा प्रदेश रशियाच्या अंमलाखाली गेल्यानंतर रशियन राष्ट्रगीत हेच लिथ्युएनियाचे राष्ट्रगीत बनले.

देशात स्वयंस्फूर्तपणे देशभक्तिपर गीते लिहिली जात असतात. त्यामागील प्रेरणाही राष्ट्रीय ऐक्याची, अभिमानाची किंवा देशाच्या आशा-आकांक्षांची असते. अशा गीतांपैकी एखादे गीत विशिष्ट परिस्थितीत लोकमानसाचा कबजा घेते व ते लोकमान्यतेच्या काळात राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले जाते. उदा., भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात ‘वंदे मातरम्…’ या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त झाला होता. राजसत्ता असल्यास राष्ट्रगीतातून राजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. ग्रेट ब्रिटनच्या राष्ट्रगीतातून राजाचे हित हे अंतिमतः राष्ट्रहित असल्याने राजा हा त्या राष्ट्राचे प्रतीक बनला. काही वेळा मात्र राष्ट्रगीत हे व्यक्तिगौरवात्मक असते, तेव्हा ते राजाचे स्तुतिगीतच होऊन बसते. उदा., नेपाळचे राष्ट्रगीत.

राष्ट्रगीताच्या गायन-वादनासंबंधी प्रत्येक राष्ट्राचे विशिष्ट नियम, संकेत वा रूढी असतात. त्यांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असा दंडक असतो. शिवाय या संकेतांचा भंग करणे म्हणजे राष्ट्राची अप्रतिष्ठा केली, असे गृहीत धरून हे वर्तन निषेधार्ह समजले जाते.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामकाळात बंकिमचंद्र चतर्जी यांच्या आनंदमठ या बंगाली कादंबरीतील (१८८२) ‘वंदे मातरम्’ या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त झाला. या गीतातील काही भाग देशातील मुसलमानांपैकी काहींना आक्षेपार्ह वाटल्याने त्यासंबंधी वादंग निर्माण झाला. त्यामुळे सुरुवातीची दोन कडवी वगळता उर्वरित गीत म्हणण्यास सार्वजनिक ठिकाणी निर्बंध लादले गेले. १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्यसोहळ्याची सुरुवात ‘वंदे मातरम्…’ या गीताने झाली पण पुढे भारतीय संविधान समितीने रवींद्रनाथ टागोरांच्या ‘जनगण मन…’ या गीताची (पहिले कडवे) राष्ट्रगीत म्हणून निवड केली. कलकत्ता येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय सभेत हे गीत २७ डिसेंबर १९११ रोजी प्रथम गायले गेले होते. मात्र ‘वंदे मातरम्…’ या गीताला (पहिली दोन कडवी) दुय्यम राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त झाला.

भारतीय राष्ट्रगीतांसंबंधीचे नियम पुढीलप्रमाणे : राष्ट्रगीत वादन खालील प्रसंगी करावे : (१) (अ) राष्ट्रीय सलामीच्या वेळी. (आ) स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) व प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी), संचलने चालू असताना किंवा राष्ट्रध्वज वर चढवीत असताना, (इ) राष्ट्रपती उपस्थित असतील त्या सर्व प्रसंगी, (ई) घटक राज्यात राज्यपाल, उपराज्यपाल किंवा मुख्यमंत्री (जम्मू आणि काश्मीर) उपस्थित असतील अशा प्रसंगी, (उ) संचालनाच्या वेळी राष्ट्रध्वज नेताना, (ऊ) लष्करी रेजिमेंटला ध्वजदान करताना, (ए) नौदलामध्ये ध्वज उभारताना. (२) मेसमध्ये भोजनापूर्वी पेय प्राशनाच्या वेळी सदिच्छा व्यक्त करताना (ड्रिंकिंग टोस्ट). (३) शासकीय समारंभाच्या प्रसंगी. (४) अपवादात्मक प्रसंगी पंतप्रधान उपस्थित असताना (सामान्यतः पंतप्रधान असताना राष्ट्रगीत वाजवू नये).

राष्ट्रगीत गायनासंबंधी विशिष्ट नियम असून ज्यावेळी राष्ट्रगीत गायले जाईल, त्यावेळी ते पूर्ण गावे. मंत्री वगैरेंच्या उपस्थितीत एखाद्या समारंभास खास महत्त्व असेल, तर त्या प्रसंगी राष्ट्रगीत मातृभूमीला मानवंदना देण्यासाठी आदरभावपूर्वक व शिष्टाचार पाळून राष्ट्रगीत म्हणण्यात यावे तसेच विद्यालयातून दैनंदिन अभ्यासवर्गांची सुरुवात होण्यापूर्वी सामूहिक रीत्या राष्ट्रगीताचे गायन करावे. राष्ट्रगीताच्या गायन-वादन प्रसंगी सर्व श्रोत्यांनी सावधान स्थितीतच उभे रहावे, असा नियम आहे. मात्र वार्तापट किंवा अनुबोधपटाचा एक भाग म्हणून वाजविण्यात येणाऱ्या राष्ट्रगीताच्या वेळी श्रोत्यांनी सावधान स्थितीत उभे रहाण्याची सक्ती नाही व तशी अपेक्षाही नसते. सामान्यतः राष्ट्रध्वज उभारण्याबाबत जे नियमांचे तारतम्य अंगीकारण्यात येते, तेच राष्ट्रगीताच्या बाबतीत पाळले जावे असा संकेत आहे. त्याचे गायन-वादन शक्य तो अविचाराने कोठेही होऊ नये, ही त्यामागील भूमिका होय.

संदर्भ : Shaw Martin Henry, Coleman and Cartledge, T. M. National Anthems of the World, London, 1969.

ओक, द. ह. कीर्तने, अंजली