राव, मधुसूदन : (२९ जानेवारी १८५३ –? १९१२). आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक. ⇨फकीरमोहन सेनापति (१८४३ –१९१८), ⇨राधानाथ राय (१८४८–१९०८) आणि मधुसूदन राव ह्या थोर त्रयीने आधुनिक ओडिया साहित्याचा भक्कम पाया घातला. ओरिसावर मराठ्यांचे राज्य असताना महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली, त्यांपैकी एका कुटुंबात पुरी येथे मधुसूदनांचा जन्म झाला. मधुसूदनांचे वडील भगीरथी हे पोलीस खात्यात दरोगा होते. मधुसूदन लहान असतानाच त्यांची आई वारली. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांचे प्रारंभीचे शिक्षण गोप ह्या गावी व नंतरचे पुरी व कटक येथे झाले. कटक येथील रॅव्हनशा महाविद्यालयातून ते बी. ए. च्या पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाले (१८७१). पुरी येथे शिकत असतानाच मधुसूदनांना राधानाथ राय गुरू म्हणून लाभले. ओडिया काव्यात ह्या गुरुशिष्य जोडीने नव्या युगाचे प्रवर्तन केले. राधानाथांप्रमाणेच मधुसूदन हे शिक्षणतज्ञ होते. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. त्यांना बंगाली, हिंदी, संस्कृत, इंग्रजी इ. भाषा चांगल्या अवगत होत्या आणि ओडिया भाषासाहित्याचा तर त्यांचा सखोल व्यासंग होता. महाविद्यालयात शिकत असतानाच मधुसूदनांनी ब्राह्मो समाजाची दीक्षाही घेतली व प्रदीर्घकाल ओरिसात ब्राह्मो समाजाचे नेतृत्व केले. सरकारी शिक्षण खात्यात शिक्षक म्हणून ते रुजू झाले आणि विभागीय शाळा-निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. ‘ उत्कल साहित्य समाजा’ची त्यांनी कटक येथे स्थापना (१९०४) केली. ही संस्था आजही कार्यरत आहे. कटक व भुवनेश्वर येथील दोन उच्च माध्यमिक विद्यालयांना मधुसूदनांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. १९०७ मध्ये त्यांना ‘रावबहादूर’ हा किताब प्राप्त झाला.

मधुसूदनांची वृत्ती मुळातच धार्मिक-आध्यात्मिक होती. ब्राह्मो समाजाचे विचार, त्यांचे सदाचारसंपन्न जीवन आणि त्यांची साहित्य निर्मिती यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुंदर मिलाफ झालेला दिसतो. जातीयता, अस्पृश्यता यांना त्यांनी कडवा विरोध केला. विधवा विवाहाचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. रामायण, महाभारत, भगवद्‌गीता तसेच अभिजात संस्कृत साहित्य, टागोर व इतर बंगाली कवी, इंग्रजीतील शेक्सपिअरपासून ते शेली, कीट्‌सपर्यंतचे कवी इत्यादींच्या वाचनाने त्यांची दृष्टी विशाल बनली होती.

पाश्चात्त्य शिक्षणाचे ते पुरस्कर्ते होते. ह्या शिक्षणामुळे पारंपरिक भारतीय समाजात नवा, आधुनिक दृष्टिकोन येईल, अशी त्यांची धारणा होती. त्यांना शिक्षणाचा केवळ उच्च दर्जाच अभिप्रेत नव्हता, तर विद्यार्थ्यांचे चारित्र्यसंवर्धनही अभिप्रेत होते. सदाचाराचे ते कडवे पुरस्कर्ते होते. शिक्षणाने विद्यार्थ्यांचे आचरण उच्च नैतिक पातळीवर नेले जावे म्हणून ते सदैव दक्ष असत.

मधुसूदनांच्या काव्यात (राधानाथांप्रमाणेच) देशभक्ती आणि राष्ट्रवादावर आधारलेल्या मानवतावादाचा हिरिरीने पुरस्कार केलेला आढळतो. राष्ट्रवादाच्या व्यापक दृष्टीतून भारताच्या सर्वच प्रदेशांचा व लोकांचा विकास झाला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले त्यासाठी लोकशाही शासनव्यवस्था येथे यावी असे ते म्हणत. ते उत्तम वक्तेही होते. मुंबई, मद्रास, कलकत्ता, अलाहाबाद, पाटणा इ. ठिकाणी त्यांनी धर्मावर दिलेल्या व्याख्यानांची त्यावेळी सर्वत्र वाखाणणी झाली.

त्यांनी इंग्रजीतील व संस्कृतमधील साहित्याची ओडियात अनेक भाषांतरे केली. ही भाषांतरेही त्यांच्या प्रतिभास्पर्शाने मौलिक साहित्यनिर्मितीइतकीच सरस उतरली आहेत. चांगल्या शालेय पुस्तकांची ओडियातील उणीव लक्षात घेऊन त्यांनी मुलांसाठी उत्कृष्ट पाठ्यपुस्तके व बालवाङ्मय तयार केले. त्यांच्या उत्कलगाथामधील काव्यपंक्ती, वक्ते व समीक्षक आजही उद्धृत करतात.

कुसुमांजलिमध्ये त्यांची उत्कृष्ट व उत्कट भावकविता संगृहीत आहे. त्यांची विद्वत्ता, दार्शनिक दृष्टिकोन, प्रगाढ भक्तिभावना, उच्च नैतिक आदर्श इ. विशेष त्यांच्या सर्वच साहित्यात प्रत्ययास येतात.

ओडियातील आधुनिक भावगीतांचे मधुसूदन जनक मानले जातात. इंग्रजीतील सुनीत, उद्देशिका (ओड), विलापिका इ. काव्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे ओडियात आणले. ब्राह्मो समाजासाठी त्यांनी भक्तिरसाने ओथंबलेली प्रार्थनागीतेही रचली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी व सार्वजनिक प्रसंगी म्हणण्यासाठी देशभक्तिपर उत्कृष्ट गीतरचनाही केली. ओरिसाच्या कोनाकोपऱ्यातील शाळांतून तसेच सार्वजनिक ठिकाणी आजही ही त्यांची गीते मोठ्या आवडीने म्हटली गायिली जातात.

जगन्नाथदास [⟶ जगन्नाथदास-१], आरक्षितदास व भीम भोई या प्राचीन संतकविपरंपरेतीलच मधुसूदन हे आधुनिक ओरिसाचे एक श्रेष्ठ आध्यात्मिक कवी होत. त्यांच्या काव्याने व गद्याने ओरिसातील शाळकरी मुलांच्या मनावर गेली सु. ७५ वर्षे सुसंस्काराचे कायम ठसे कोरले आहेत. ओरिसातील सर्वसामान्य माणसाच्या सांस्कृतिक जडणघडणीत त्यांच्या साहित्याचा मोठा वाटा आहे. त्यांचे वर्णबोध हे प्राथमिक अक्षरओळख करून देणारे पाठ्यपुस्तक ओरिसात अभिजात पाठ्यपुस्तक म्हणून आजही गणले जाते.

कवितावली (१८७३) मध्ये राधानाथ व मधुसूदनांच्या कविता संगृहीत आहेत. मधुसूदनांच्या कविता त्यात संख्येने अधिक आहेत. ह्या आरंभीच्या कवितांतूनही त्यांच्या दिव्य, आध्यात्मिक आणि भक्तिभावनेने ओथंबलेले रचनेचा प्रत्यय येतो. त्यांची काव्यरचना प्रासंगिक, लहान लहान कवितांच्या रूपात आहे. त्यांचा पिंड मूलतः शिक्षकाचा, उपदेशकाचा आहे. त्यांनी काव्यमाध्यमाचा वापर आपल्या कल्पना, विचार व संदर्शने (व्हिजन्स) प्रसारित करण्यासाठी केला. आकाश, पृथ्वी, ध्वनी, नदी इत्यादींवर त्यांनी उत्कृष्ट उद्देशिका लिहिल्या. त्यांतून शब्दकळेची व आध्यात्मिकतेची उत्तुंगता प्रत्ययास येते. ऋग्वेदातील ऋचांचा प्रत्यय ह्या उद्देशिका आपणास देतात. ह्या भक्तकवीने धर्मग्रंथांच्या भाषेत आपली गीते गायली. सुनीतरचना करणारे त्यावेळचे ते एकमेव कवी होते. बसंतगाथामध्ये त्यांची सुनीते संगृहीत आहेत. त्यांचे गद्यलेखन त्यांच्या निबंधांतून आढळते. हे निबंध ओरिसाच्या शालेय वाचनमालांतही घेतलेले आहेत. अभिजात वाङ्मयीन गद्यशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ह्या निबंधांची गणना होते. ओडियातील प्रबंध (निबंध) साहित्याचे ते आद्य प्रवर्तक मानले जातात. संस्कृतमधील उत्तररामचरित आणि बालरामायणाचा त्यांनी ओडियात सुंदर अनुवाद केला आहे.

त्यांच्या महत्त्वाच्या साहित्यकृती पुढीलप्रमाणे : निबंध प्रबंधमाला (१८८८) शिक्षणविषयक –निम्न शिक्षक सुहृद (१९१०), उच्च शिक्षक सुहृद (१९१२) शब्दकोश –सुखबोध (१९१२) काव्य – कर्णबध (दुसरी आवृ. १९०१), बसंतगाथा (१९०३), कुसुमांजलि (१९०३), नलचरित (१९३०), उत्कलगाथा (चौथी आवृ. १९४८) इत्यादी.

मधुसूदन ग्रंथावलि (१९१५, दुसरी आवृ. १९४९) मध्ये त्यांच्या सर्व काव्यरचना, निवडक गद्य तसेच उत्तररामचरितचा त्यांनी केलेला ओडिया अनुवाद अंतर्भूत आहे. प्रास्ताविकात मधुसूदनांचे संक्षिप्त चरित्र असून त्यांच्या सर्व रचनांची कालक्रमवार यादीही दिली आहे.

मधुसूदनांवर कालिंदीचरण पाणिग्राही यांनी भक्तकवि मधुसूदन (१९२८) हा दर्जेदार चरित्रग्रंथ लिहिला आहे.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)