मेहेर, गंगाधर: (१८६२–१९२४). प्रख्यात ओडिया कवी. संबळपूर जिल्ह्यातील बरपल्ली या गावी एका कोष्टी कुटुंबात जन्म. गावातील शाळेत काही काळ प्राथमिक शिक्षण घेतल्यावर ते आपला वाडवडिलार्जित विणकामाचा धंदा करू लागले. नंतर स्थानिक जमीनदाराच्या न्यायालयात अर्जनवीस म्हणून दस्तऐवज लिहिण्याचे काम ते करू लागले. पुढे सरकारी न्यायालयातही त्यांनी हेच काम केले. स्वतःच्या प्रयत्नाने व कर्तृत्वाने ते जीवनात यशस्वी व प्रख्यात झाले. आपल्या बुद्धीचा ज्ञान मिळविण्यासाठी त्यांनी योग्य उपयोग करून घेतला. जुने व नवे ओडिया काव्य त्यांनी वाचून चिकित्सकपणे अभ्यासिले. संस्कृत, हिंदी, बंगाली व इंग्रजी ह्या भाषाही त्यांनी स्वप्रयत्नाने चांगल्या अवगत करून घेतल्या. या भाषांतील दर्जेदार ग्रंथ त्यांनी मुळातून वा भाषांतरित स्वरूपातून चिकित्सकपणे वाचले.

रामायण महाभारतातील विषयांवर त्यांनी महाकाव्यसदृश अशी काही दीर्घ व स्वतंत्र कथाकाव्ये रचली. कीचकवध हे त्यातील पहिले काव्य ते प्रसिद्ध होताच त्यांचा ओरिसात सर्वत्र कवी म्हणून लौकिक झाला. बोरसांबर येथील देशभक्त जमीनदाराचा त्यामुळे त्यांना शेवटपर्यंत आश्रय लाभून त्यांच्या हलाखीच्या जीवनास काहीसे स्थैर्यही आले. सीतेच्या जीवनावरीलत्यांचे दुसरे नितान्त सुंदर दीर्घकाव्य तपस्विनी होय. कालिदासाच्या शाकुंतलाचे प्रणय-ल्लरी हे अत्यंत सरस असे ओडिया रूपांतर होय. इंदुमती, उत्कल-लक्ष्मी, अयोध्या-दृश्य, कविता-कल्लोल, अर्घ्य थाली, अहल्यास्तव, महिमा, पद्‌मिनी , भारती-भवन, कृषक-संगीत ही इतर काव्ये वा काव्यसंग्रह होत. त्यांच्या गद्यग्रंथांत त्यांचे अपूर्ण राहिलेले आत्मचरित्र तसेच नृपराजसिंह, फकीर मोहन व काशिनाथ पंडा यांच्यावरील काही निबंध यांचा समावेश होता. त्यांनी अभिजात शैलीत दीर्घ कथाकाव्येच रचली नाहीत, तर आधुनिक प्रकारची उद्देशिका (ओड), सुनीते, भावगीते. देशभक्तिपर गीते इ. प्रकारांतील रचनाही केली असून त्यात त्यांची मौलिकता, सर्वस्पर्शी व्यापक जीवनदृष्टी, कल्पकता, अभिव्यक्तिकौशल्य इत्यादींचा प्रत्यय येतो. त्यांच्या काही कवितांतील प्रखर देशभक्तिपर भावनेमुळे ओरिसात ते राष्ट्रीय वृत्तीचे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. जुन्या व नव्या काव्यप्रकारांचे अत्यंत मनोरम रीतीने संश्लेषण करणारे कवी म्हणून ओडियात ते सर्वत्र ओळखले जातात. ओडिया कवी ⇨ राधानाथ राय यांनी गंगाधर मेहेर यांच्या काव्यप्रतिभेचा खूपच गौरव केला आहे.

एक महान राष्ट्रकवी म्हणून त्यांचा आदराने सर्वत्र उल्लेख केला जातो. संबळपूर येथील शासकीय महाविद्यालयाला गंगाधरमेहेर यांचे नाव देण्यात आले आहे. संबळपूर येथे ‘गंगाधर साहित्य परिषद’ या नावाची साहित्यसंस्थाही स्थापण्यात आली आहे. १९६२ मध्ये त्यांची जन्मशताब्दी ओरिसात मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली गेली.

दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) शिरोडकर, द. स. (म.)