राव, चलपति : (? १९०९ –२५ मार्च १९८३). भारतातील एक थोर पत्रकार. १९३४ मध्ये मद्रास विद्यापीठातून एम्. ए., बी. एल्. झाल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली. तथापि १९३६ साली त्यांनी वृत्तपत्रव्यवसायात पदार्पण केले. १९३८ पर्यंत स्वराज्य, न्यूज इ. वृत्तपत्रांत उपसंपादक म्हणून काम. त्यानंतर लखनौला नॅशनल हेरॉल्ड या पं. नेहरूंच्या वृत्तपत्रात वरिष्ठ सहायक संपादक म्हणून रुजू (१९३८ते१९४२). त्यानंतर दिल्लीच्या हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्रात स्तंभलेखक म्हणून काम (१९४३ – ४५), १९४६ रोजी पुन्हा नॅशनल हेरॉल्डमध्ये संयुक्त संपादक म्हणून व पुढे १९४६ मध्ये संपादक म्हणून नियुक्ती. या काळात पं. जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांचा घनिष्ठ संबंध आला. पं. नेहरूंशी असणाऱ्या घनिष्ठ संबंधामुळेच त्यांना वृत्तपत्रव्यवसायाच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी घडवून आणता आल्या. वृत्तपत्र आयोगाची स्थापना (१९५२) आणि श्रमिक पत्रकारांसाठी कायदा (१९५५) या त्यांपैकी दोन महत्त्वाच्या गोष्टी. लोकशाही व समाजवाद यांवर त्यांचा दृढ विश्वास होता. वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ते खंदे पुरस्कर्ते होते. नॅशनल हेरॉल्ड मधील त्यांचे अग्रलेख भारदस्त असत. त्यांतून ते एखाद्या प्रश्नाचा वा विषयाचा परामर्श घेत. देशात आणि परदेशातही त्यांच्या लेखनाचा आधार घेऊन ते उद्धृत केले जात. भारतासारख्या विकसनशील देशांत लोकांना नेतृत्व देण्यासाठी अग्रलेख आवश्यक आहेत, असे ते म्हणत. १९६३ मध्ये त्यांनी आपल्या सतरा वर्षांच्या संपादकीय कारकीर्दीचा आढावा घेणारा लेख लिहिला. त्यात भारतीय पत्रकारितेचे मार्मिक विश्लेषण त्यांनी केले. पत्रकार म्हणजे जबाबदार सार्वजनिक व्यक्ती होय. नुसते तंत्र किंवा सजावट व मांडणी जाणणारा उपसंपादक नव्हे, तर त्यात सामाजिक उद्धाराची आच व ऐतिहासिक घटनांची जाण असल्याशिवाय तो आपले कर्तव्य नीट बजावू शकणार नाही, असे त्यांनी यात म्हटले आहे.
युनेस्कोच्या वृत्तपत्र तज्ञ आयोगाचे १९५२ – ५४ या काळात ते सदस्य होते. भारतीय वृत्तपत्र आयोगाचे ते सदस्य होते तसेच भारतीय प्रसारण व माहिती समितीचे ते सदस्य होते (१९६४). न्यूयॉर्कच्या ‘इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट’चे ते सहसंस्थापक आणि अखिल भारतीय श्रमिक पत्रकार संघाचेही ते एक संस्थापक-अध्यक्ष होते (१९५०). युनेस्कोच्या सर्वसाधारण बैठकीत दोनदा भारताचे प्रतिनिधित्व (१९५६, नवी दिल्ली आणि १९६०, पॅरिस) तसेच संयुक्त राष्ट्रांच्या (यूनो) सर्वसाधारण बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते (१९५८). चीनला गेलेल्या भारतीय सदिच्छा शिष्टमंडळाचे सदस्य (१९५२) आणि रशिया, पोलंड व युगोस्लाव्हियाला गेलेल्या भारतीय पत्रकारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले (१९५५).
राव यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आग्रा व मद्रास विद्यापीठांतर्फे सन्माननीय डी.लिट्. व श्री वेंकटेश्वर विद्यापीठातर्फे सन्माननीय एल्एल्. डी. या पदव्या बहाल करण्यात आल्या. पत्रकारांवर दडपणे येण्याचे प्रकार वाढल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्या निषेधार्थ १९६९ मध्ये केंद्र सरकारने दिलेला पद्मभूषण किताब परत केला होता. ही त्यांची वृत्ती अखेरपर्यंत कायम होती. बिहार प्रेस विधेयकाच्या विरोधातही ते अग्रभागी होते (१९८२). विकसनशील देशांतील वार्ताविनिमयात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने अलिप्त देशांची नवी माध्यम व्यवस्था निर्माण करण्यात त्यांचा पुढाकार होता. जून १९७६ मध्ये राव यांच्या संपादकीय कारकीर्दीला ३० वर्षे पूर्ण झाली, म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधींच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आणीबाणीत सरकारने वृत्तपत्रांवर लादलेल्या निर्बधांची या सत्काराला पार्श्वभूमी होती. त्यांनी या समारंभानंतर अल्पकाळात जिवाभावाने जोपासलेल्या नॅशनल हेरॉल्डमधून निवृत्ती स्वीकारली. मृत्युपूर्वी थोडे दिवस आधी त्यांनी मॉरिडियन इंटरनॅशनल या मासिकाचे संपादकत्व स्वीकारले होते. दिल्ली येथे त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : फ्रॅगमेन्ट्स ऑफ ए रेव्होल्यूशन (१९६५), इंदिरा प्रियदर्शिनी (१९६६), गांधी अँड नेहरू (१९६७), द प्रेस इन इंडिया (१९६८), ऑल इन ऑल, इंदिरा गांधी प्राइममिनिस्टर ऑफ इंडिया (१९७०), जवाहरलाल नेहरू (१९७३), द प्रेस (१९७४), इंडिया : पोर्ट्रेट ऑफ अ पीपल (१९७४), गोविंद वल्लभ पंत (१९८१),द रोमान्स ऑफ न्यूजपेपर (१९८२) व एशियन ड्रामा (१९८२).
पवार, सुधाकर