वृत्तपत्रविद्या : (जर्नॅलिझम, स्टडी ऑफ). वृत्त किंवा वार्ता हा वृत्तपत्राचा केंद्रबिंदू असल्याने वार्तेचे स्वरुप, मूल्ये, संकलन, लेखन, संपादन, विश्लेषण, टिकाटिप्पणी या विषयांचा वृत्तपत्रविद्येत प्रामुख्याने समावेश होतो. म्हणूनच केसरीचे संपादक थोर साहित्यिक न. चिं. केळकर (१८७२-१९४७) त्याला ‘संपादकीय शिक्षण’ असे म्हणत. याशिवाय वृत्तपत्राशी संबंधित असलेले इतर विषय म्हणजे मुद्रण, वृत्तपत्राचे तत्त्वज्ञान, वृत्तपत्रविषयक कायदे, ताज्या घडामोडी, जाहिरात, जनसंपर्क, तसेच नभोवाणी, दूरचित्रवाणी, चित्रपट इ. जनसंज्ञापन-माध्यमे यांचाही वृत्तपत्रविद्येत समावेश करण्यात येतो. मात्र एक किंवा दोन वर्षांच्या मर्यादित कालावधीत या सर्व विषयांचे सखोल ज्ञान देता येणे अशक्य असल्याने वृत्तपत्रविद्येच्या अभ्यासक्रमात तांत्रिक कौशल्ये व तत्वज्ञान यांना प्राधान्य देऊन इतर विषयांची साधारणपणे तोंडओळख करुन दिली जाते. वृत्तपत्रविद्येला एक शैक्षणिक विषय म्हणून म्हणून मान्यता मिळाली आहे.

जागतिक आढावा :(१) भारत : वृत्तपत्रविद्येचे प्रशिक्षण देण्याचे सुरुवातीचे प्रयत्न पुणे व चेन्नई येथे झाले. १९२१ साली असहकारितेच्या चळवळीत उडी घेऊन शाळा-महाविद्यालयांतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र धंद्याचे शिक्षण देण्याकरिता केसरी-मराठा संस्थेने पुणे येथील गायकवाड वाड्यात संपादकीय शिक्षणाचा एक वर्ग काढून खर्च करुन एक वर्ष चालविला. या वर्गातून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे वर्तमानपत्राचा धंदा केला व हैदराबाद, सोलापूर, जळगाव, सातारा वगैरे ठिकाणी त्यांनी वर्तमानपत्रे चालविली, असे न. चिं. केळकरांनी वृत्तपत्रमीमांसा (१९६५ – पृ. १३४) या पुस्तकात म्हटले आहे. चेन्नईतील अड्यारच्या राष्ट्रीय विद्यापीठातील इंग्लिश विभागामध्ये डॉ. ॲनी बेझंट यांनी वृत्तपत्रविद्येचे प्रशिक्षण देण्यास १९२०-२१ मध्ये सुरुवात केली. हा उपक्रम सु, पाच वर्षे चालला. वृत्तपत्रातील कार्यानुभव हा या अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग होता आणि त्यातून सु. २५ विद्यार्थी प्रशिक्षत झाले, अशी माहिती या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेले एक विद्यार्थी व साध्वीचे संपादक अगाराम रंगय्या यांनी आपल्याला दिली अशे नोंद प्रा. नाडिग कृष्णमूर्ती यांनी केली आहे (इंडियन जर्नॅलिझम, १९६६). विद्यापीठ पातळीवर वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा पहिला मान अलिगढ मुस्लिम विद्यापीठाकडे जातो. १९३८ मध्ये सुरु झालेला हा अभ्यासक्रम शिकविणारे प्राध्यापक रहमली अल् हाशमी यांचे वरिष्ठांशी मतभेद झाल्यामुळे तो १९४० मध्ये बंद झाला.

भारतात वृत्तपत्रविद्येचा खरा पाया घातला प्रा. पृथ्वीपालसिंग यांनी. लाहोर (सध्या पाकिस्तानात) येथील ⇨पंजाब विद्यापीठात  त्यांनी १९४१ मध्ये वृत्तपत्रविद्येचा सायंकालीन अंशवेळ पदविका अभ्यासक्रम सुरु केला. त्यांनी स्वतः ‘लंडन पॉलिटेक्निक’ मधून पदविका आणि मिसूरी विद्यापीठातून ‘मास्टर’ ही पदवी मिळवली होती. त्यामुळे भारतातील वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणापुढे अगदी प्रारंभापासून त्या दोन भिन्न प्रणालींचे आदर्श होते. त्यापैंकी ब्रिटिश प्रणाली फक्त पत्रकारितेच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणारी, प्रात्यक्षिक कार्यानुभवावर भर देणारी आणि मनुष्यबळ व निधी यांच्या मर्यादित गुंतवणूकीवर आधारलेली होती. त्यामुळे व सर्व ब्रिटिश गोष्टींना आदर्श मानण्याच्या तत्कालीन प्रवृत्तीमुळे भारतीय विद्यापीठांनी प्रारंभीच्या दोन-तीन दशकांत ब्रिटिश प्रणालीचे अनुकरण केले. १९७० नंतर अमेरिकी  धर्तीवर दोन वर्षांचे ‘मास्टर’ पदवीचे विद्याकेंद्री (अकॅडेमिक) अभ्यासक्रम भारतीय विद्यापीठांत सुरु झाले.

पंजाब विद्यापीठाचे तात्पुरते कार्यालय १९४७ च्या फाळणीनंतर प्रथम सिमला व नंतर सोलोन येथे होते. १९५७ मध्ये ते चंडिगढ येथे स्थलांतरित झाले व सर्व अध्यापनविभाग तेथे नेण्यात आले. आता वृत्तपत्रविद्येच्या पदविका अभ्यासक्रमाचे रुपांतर दोन वर्षांच्या ‘मास्टर’ या पदवी अभ्यासक्रमात झाले आहे. मद्रास विद्यापीठाने १९४७ मध्ये अर्थशास्त्र विभागांतर्गत वृत्तपत्रविद्येचा पदविका अभ्यासक्रम सुरु केला. १९७५ मध्ये त्याच्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन होऊन तेथे दोन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरु झाला. १९७९ मध्ये त्याची जागा दोन वर्षांच्या एम्. ए. (संज्ञापन) या अभ्यासक्रमाने घेतली. नागपूरच्या हिस्लॉप ख्रिश्चन (सध्याचे विदर्भ महाविद्यालय) महाविद्यालयाने १९५२ मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेल्यांसाठी पदविका अभ्यासक्रम सुरु केला. १९६४ मध्ये त्या अभ्यासक्रमाचे रुपांतर ‘बॅचलर’ पदवी अभ्यासक्रमात झाले. पण शिक्षकांच्या अभावी हा अभ्यासक्रम १९६६ मध्ये बंद पडला. नागपूर विद्यापीठाने १९६९ मध्ये त्याचे पुनरुज्जीवन केले. कलकत्ता विद्यापीठानेही १९५० मध्ये सुरु केलेल्या दोन वर्षांच्या अंशकालीन अभ्यासक्रमाचे १९७१ मध्ये ‘मास्टर’ पदवी अभ्यासक्रमात रुपांतर केले. म्हैसूरच्या महाराजा महाविद्यालयाने बी. ए. च्या अभ्यासक्रमात वृत्तपत्रविद्येचा ऐच्छिक विषय म्हणून समावेश केला. १९५९ मध्ये बी. ए. च्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात वृत्तपत्रविद्या हा मुख्य विषय म्हणून मान्य करण्यात आला. म्हैसूर विद्यापीठाने वृत्तपत्रविद्येचा स्वतंत्र विभाग १९६९ मध्ये सुरु केला. तेथे तेव्हापासून दोन वर्षांचा ‘मास्टर’ पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. आता बंगलोर विद्यापीठाने व अन्य काही विद्यापीठांनीही बॅचलरच्या पदवी अभ्यासक्रमात पत्रकारिता व जनसंज्ञापन या विषयांचा समावेश केला आहे. भारतात सु. साठ विद्यापीठांमध्ये वृत्तपत्रविद्येचे शिक्षण दिले जाते.

पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाची स्थापना १९६४ मध्ये झाली. प्रारंभी दोन वर्षांचा अंशकालीन पदविका अभ्यासक्रम, १९६८ पासून एक वर्षाचा पूर्ण वेळ पदविका अभ्यासक्रम, १९७४ पासून एक वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आणि १९९३ पासून एक वर्षाचा ‘मास्टर’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम अशी प्रगती होत होत आता तेथे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि मास्टर या पदवीचा एक वर्षाचा अभ्यासक्रम असे तीन अभ्यासक्रम चालविले जातात. यांशिवाय पुणे विद्यापीठात १९९० नंतरच्या दशकात संज्ञापनविद्या हा वेगळा विभाग सुरु झाला. तेथेही दोन वर्षांचा संज्ञापनविद्येतील ‘मास्टर’ या पदवीचा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. वृत्तपत्रविद्येमध्ये पुणे विद्यापीठाने आतापर्यंत तीन पीएच्. डी. पदव्याही प्रदान केल्या आहेत.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ येथे वृत्तपत्रविद्येचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ यांच्या क्षेत्रांतील काही महाविद्यालयांमध्ये वृत्तपत्रविद्येचे अभ्यासक्रम चालविले जातात. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठामध्ये वृत्तपत्रविद्येचे अल्पकालीन व अंशकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात.

भारत सरकारने १९६५ मध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’ ची स्थापना केली. तेथे केंद्राच्या व राज्यांच्या कक्षेतील अधिकाऱ्यांना वृत्तपत्रविद्या व जनसंपर्क यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते. शिवाय त्या संस्थेमध्ये वृत्तपत्रविद्येचा एक वर्षाचा पदव्युत्तर-पदविका अभ्यासक्रम, आकाशवाणी व दूरचित्रवाणी-पत्रकरिता, वृत्तसंस्था-पत्रकारिता आणि जाहिरात असे प्रत्येक एक वर्षाचे चार पदविका अभ्यासक्रम इंग्लिश व हिंदी या माध्यमांतून चालविले जातात. त्यांपैकी वृत्तपत्रविद्येच्या व वृत्तसंस्था-पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांत आशिया व आफ्रिका खंडातील विकसनशील राष्ट्रांच्या उमेदवारांसाठी ५०% जागा राखीव ठेवलेल्या असतात. अध्यापकवर्ग, इमारत, यंत्रसामग्री आणि निधी या दृष्टींनी भारतातील ही एक समृद्ध संस्था आहे. आता तिची  धेनकानाल (ओरिसा) व कोट्टयम् (केरळ) अशी दोन प्रादेशिक केंद्रे सुरु झाली असून, मध्य प्रदेशातील झाबुआ येथे आणि नागालँडमध्ये दिमापूर येथे केंद्रे सुरु करण्याची संस्थेची योजना आहे. पुणे येथील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ या संस्थेमध्ये दूरचित्रवाणी पत्रकारितेचे सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाते.

वृत्तपत्रविद्येसाठी मध्य प्रदेश शासनाने भोपाळ येथे ‘माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विश्वविद्यालय’ स्थापन केले (१९९१).

भारतात अनेक खाजगी संस्थांमध्येही वृत्तपत्रविद्येचे शिक्षण दिले जाते. त्यांमध्ये भारतीय विद्याभवनाची सु. २० केंद्रे, ‘सेंट झेव्हियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन’ (मुंबई), ‘मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड ॲडव्हरटायझिंग’ (अहमदाबाद), ‘एशियन कॉलेज ऑफ जर्नॅलिझम’ (बंगलोर), ‘मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन’ (मणिपाल) आणि ‘सिंबॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन’ (पुणे) यांचा उल्लेख करावा लागेल. यांशिवाय मुंबईतील किसनदास चेलाराम महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय, सोफिया महाविद्यालय यांसारखी खाजगी महाविद्यालये वृत्तपत्रविद्येचे अंशकालीन अभ्यासक्रम चालवितात. केरळ, म्हैसूर व जयपूर या विद्यापीठांतर्फे टपालाद्वारेही वृत्तपत्रविद्येचे शिक्षण दिले जाते.

वृत्तपत्रविद्येच्या प्रमाणभूत अभ्यासक्रमांत पुढील विषयांचा अंतर्भाव असतो : (१) वृत्तसंकलन, वृत्तलेखन, वृत्तसंपादन. (२) संपादकीय लेखन, वृत्तपत्रे व नियतकालिके यांचे संपादन, पानांची रचना (३) छायाचित्र-पत्रकारिता. (४) वृत्तपत्रांचे तत्वज्ञान. (५) वृत्तपत्रविषयक कायदे, भारतीय राज्यघटना. (६) भारतातील वृत्तपत्रांचा (=पत्रकारितेचा) इतिहास, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास. (७) चालू घडामोडी-आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक. (८) संज्ञापनाचे सिद्धांत, आंतरव्यक्ती संज्ञापन, जनसंज्ञापन. (९) भारतातील नभोवाणी व दूरचित्रवाणी यांचा विकास. (१०) नभोवाणी/दूरचित्रवाणीसाठी पत्रकारिता. (११) भाषालेखन कौशल्ये. (१२) संशोधनपद्धती. (१३)प्रादेशिक भाषेतील पत्रकारिता, प्रदेशाचा इतिहास.

(2)अमेरिका : वॉशिंग्टन विद्यापीठाने १८६९ मध्ये पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याला फक्त जोसेफ पुलिट्झर (न्यूयॉर्क वर्ल्ड) आणि व्हाइट लॉ रीड (‘ट्रिब्यून’) या दोनच संपादकांचा पाठिंबा होता. मिसूरी विद्यापीठाने १८७८ मध्ये पत्रकारितेचा ‘इतिहास-साधने’ याचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला. तेथेच १९०८ मध्ये पत्रकारितेचे पहिले स्वतंत्र ‘स्कूल’ सुरु झाले. जोसेफ पुलिट्झरने दिलेल्या देणगीमुळे कोलंबिया विद्यापीठाने (न्यूयॉर्क) पत्रकारितेची कौशल्ये व कार्यानुभव देणारे ‘स्कूल’ १९१२ मध्ये सुरु केले. पत्रकारितेच्या विभागांची अमेरिकी विद्यापीठातील संख्या ४ (१९१०) वरुन ८४ (१९१७), ४५५ (१९३४) व ६०० (१९८७) अशी वेगाने वाढत गेली. अमेरिकेतील पत्रकारितेच्या शिक्षणाचे प्रमाणीकरण करण्यात ‘अमेरिकेन असोसिएशन ऑफ टीचर्स ऑफ जर्नॅलिझम’ (१९१२), ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ स्कूल्स अँड डिपार्टमेंट्स ऑफ जर्नॅलिझम’ (१९१७), ‘अमेरिकन काउन्सिल फॉर एज्युकेशन इन जर्नॅलिझम’ (१९३९) आणि ‘अमेरिकन सोसायटी ऑफ जर्नॅलिझम अँड स्कूल जर्नॅलिझम’ (१९४४) इ. संस्थांनी आणि वृत्तपत्रादी माध्यमांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे. शासकीय मदतीवर चालणारी विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे यांच्याबरोबरच ‘गनेट सेंटर’ (न्यूयॉर्क) यांसारख्या खाजगी संस्था संशोधन, चर्चासत्रे, अभ्यासक्रमांचे आणि अध्यापनपद्धतींचे आधुनिकीकरण, ग्रंथनिर्मिती अशा विविध मार्गांनी पत्रकारितेच्या शिक्षणाचा कस वाढविण्यास साहाय्य करतात. पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी (उच्च माध्यमिक शिक्षणानंतर) चार वर्षे असतो. त्याला एक वर्षाच्या अभ्यासक्रमाची जोड देऊन पदव्युत्तर पदवी घेता येते. एकूण अभ्यासक्रमाच्या २५% भाग प्रात्यक्षिके, कार्यानुभव, पत्रकारितेची तत्वे, इतिहास आणि संज्ञापनाचे सिद्धांत यांचा असतो. बाकी ७५% अभ्यासक्रमात भाषा, मानव्यविद्या व विज्ञाने यांनी व्यापलेला असतो.


() कॅनडा : मार्शल मक्लूअन या इंग्लिशच्या प्राध्यापकाने माध्यमविषयक आपले क्रांतिकारक व द्रष्टे विचार टोराँटो विद्यापीठातील व्याख्यानात मांडले, त्यामुळे आता तेथे ‘मक्लूअन सेंटर फॉर कल्चर अँड टेक्नॉलॉजी’ची स्थापना करण्यात आली आहे. १९८० पर्यंत वृत्तपत्रविद्येचे शिक्षण देणाऱ्या कॅनडातील संस्थांची संख्या ७० (३० विद्यापीठे व ४० महाविद्यालये) झाली होती.

() इंग्लंड : लॉर्ड नॉर्थक्लिफ आणि इतर वृत्तपत्र-मालकांच्या आश्रयाने ‘लंडन स्कूल ऑफ जर्नॅलिझम’ ची स्थापना १९१९ मध्ये झाली. लंडन विद्यापीठाने १९१९ ते १९३९, अशी सु. २० वर्षे वृत्तपत्रविद्येचा पदविका अभ्यासक्रम चालविला होता. वृत्तपत्रांचे मालक, संपादक व पत्रकार यांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन १९५२ मध्ये ‘नॅशनल काउन्सिल फॉर द ट्रेनिंग ऑफ जर्नॅलिझम’ (एनसीटीजे) या संस्थेची स्थापना केली. इच्छुक उमेदवारांसाठी ‘एनसीटीजे’ ने (१) थेट प्रवेश व (२) प्रवेशपूर्व उमेदवारी अशा दोन पद्धती ठरविल्या आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये उमेदवार संपादकांकडे थेट अर्ज करुन वृत्तपत्रांत दाखल होतात. तेथे सहा महिने काम केल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना दोन-अडीच किंवा तीन वर्षांसाठी ‘शिकाऊ उमेदवार’ हा दर्जा दिला जातो. या काळात पदवीधर उमेदवार दहा आठवड्यांचा, तर पदवीधर नसलेले उमेदवार आठ आठवड्यांचा एक अभ्यासक्रम पूर्ण करतात. दुसऱ्या पद्धतीतील उमेदवार प्रारंभीच्या सहा महिन्यांच्या सेवेनंतर एखाद्या महाविद्यालयात एक वर्ष पूर्णवेळ शिक्षण घेतात आणि त्यानंतर वृत्तपत्रातील प्रशिक्षण पूर्ण करतात. त्यानंतर त्यांना वृत्तपत्रांत तीन महिन्यांसाठी परिवीक्षा कालावर काम करावे लागते. परिवीक्षा कालावधीनंतर सव्वादोन वर्षे किंवा अधिक काळासाठी त्यांना शिकाऊ उमेदवार हा दर्जा मिळतो. ‘शिकाऊ उमेदवारां’च्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी ‘एनसीटीजे’ ने काही (सु. सात) महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. तेथे इंग्रजी  भाषा, स्थानिक व राष्ट्रीय प्रशासन, वृत्तपत्रविषयक कायदे, लघुलेखन व टंकलेखन आणि वृत्तपत्रांची विविध अंगे ह्यांचे शिक्षण दिले जाते. शिकाऊ उमेदवारांच्या परिक्षेत, बातमीसाठी घ्यावयाची मुलाखत, प्रसिद्धीपत्रकावरुन सु. ३०० शब्दांची बातमी लिहिणे, लघुलेखन (मिनिटाला १०० शब्द), टंकलेखन, भाषणाच्या नोंदींच्या साहाय्याने ४०० ते ५०० शब्दांची बातमी लिहिणे इत्यादींचा समावेश असतो. ‘एनसीटीजे’ ने पदव्युत्तर एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कार्डिफच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’ ला व लंडनच्या ‘सिटी युनिव्हर्सिटी’ ला मान्यता दिली आहे. राजकारण, अर्थकारण, संपादकीय लेखन इ. विशेष क्षेत्रांसाठी वृत्तपत्रे योग्य उमेदवारांची थेट भरतीही करतात. पण सर्वसाधारणपणे राष्ट्रीय वृत्तपत्रे प्रादेशिक वृत्तपत्रांतील पत्रकारांनाच आपल्या सेवेत घेतात.

() जर्मनी  व फ्रान्स : पत्रकारितेच्या इतिहासासंबंधीची व्याख्याने जर्मनीतील विद्यापीठांमध्ये १६७२ मध्ये आयोजित केली जात. परंतु वृत्तपत्रविद्येच्या औपचारिक आणि सातत्यपूर्ण शिक्षणाचा प्रारंभ मात्र जर्मनीमध्ये पहिल्या महायुद्धाच्या सुमारास झाला. पत्रकारितेच्या कौशल्यांचे शिक्षण देणे हे आपल्या कक्षेत येत नाही, असे जर्मन विद्यापीठांचे मत होते, त्यामुळे इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, कायदा या विषयांवर जर्मन विद्यापीठातील पत्रकारिता विभाग भर देत. दुसऱ्या महायुद्धानंतर जनमत व प्रचार यांना महत्त्व देण्यात येऊ लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बंद पडलेल्या वृत्तपत्रविद्या प्रबोधिनीचे पुनरुज्जीवन फ्रान्सने ‘फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ द प्रेस’ या नावाने १९५१ मध्ये केले. १९५७ मध्ये ती संस्था सॉरबाँ विद्यापीठाला जोडण्यात आली आणि पदवी व पदविका देण्याचा अधिकार तिला १९६६ मध्ये मिळाला. १९७० च्या दशकापर्यंत यूरोपमधील प्रत्येक देशात वृत्तपत्रविद्येचे सिद्धांत व कौशल्ये अशा दोन्ही प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्याच्या सोयी निर्माण झाल्या होत्या.

() रशिया : ऑक्टोबर क्रांतीनंतर (१९१७) लगेचच मॉस्को येथे ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ जर्नॅलिझम’ ची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर विद्यापीठीय केंद्रांनी तिची जागा घेतली. त्यातील पहिले केंद्र लेनिनग्राड विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात १९४६ मध्ये सुरु झाले. मॉस्को विद्यापीठातील केंद्र भाषाविज्ञान विभागात होते. रशियात वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाच्या तीन पद्धती आढळतात : (१) पाच वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम, (२) सहा वर्षांचा सायंकालीन अभ्यासक्रम, (३) टपालद्वारे शिक्षण. वृत्तपत्रे, नियतकालिके व वृत्तसंस्था यांमधील पत्रकारिता, ग्रंथप्रकाशन आणि नभोवाणी-दूरचित्रवाणी यांमधील पत्रकारिता यांतील एखाद्या विषयाचा विद्यापीठीय केंद्रात विशेष अभ्यास करता येतो. याशिवाय रशियन पत्रकारितेचा इतिहास, जनसंज्ञापनमाध्यमांचे समाजशास्त्र, रशियन भाषा व वाङ्‌मयीन समीक्षा या विषयांचा व दहा आठवड्यांच्या कार्यानुभवाचा वृत्तपत्रविद्येच्या अभ्यासक्रमांत समावेश असतो.

(७) आशिया खंड : वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापनविद्या यांचे औपचारिक शिक्षण देणाऱ्या आशिया खंडातील संस्थांची संख्या १९३० च्या दशकात वीसपेक्षा कमी होती. १९७५ मध्ये ती संख्या २१० पर्यंत गेली. त्यांपैकी जवळजवळ निम्म्या संस्था अमेरिकी प्रणाली वापरतात. टोकिओच्या सोफाया विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभाग १९३२ मध्ये सुरु झाला. तेथील अभ्यासक्रम चार वर्षांचा असून त्यात पत्रकारितेच्या कौशल्यांवर भर दिला जातो. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात संशोधनावर भर असतो. मानिला (थायलंड) च्या ‘फारईस्टर्न’ ने १९३४ मध्ये आणि चीनमधील चेंगची विद्यापीठाने १९३५ मध्ये वृत्तपत्रविद्येचे अभ्यासक्रम सुरु केले. त्यानंतर इंडोनिशिया, कोरिया, सिंगापूर इ. देशात वृत्तपत्रविद्येचे अभ्यासक्रम सुरु झाले.

इंग्लंडच्या टॉमसन फौंडेशनने व आफ्रिका खंडातील वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणात मोलाची कामगिरी बजावली आहे. भारतातील ‘प्रेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’, चीनची ‘झिनुआ’ ही वृत्तसंस्था, सिंगापूरमधील ‘ॲमिक’ (एशियन मास कम्युनिकेशन अँड रिसर्च सेंटर) इ. संस्थांच्या सहकार्याने टॉमसन फौंडेशन इंग्लंडमध्ये आणि त्या त्या देशांत अल्पमुदतीचे सेवांतर्गत अभ्यासवर्ग चालविते. जर्मनीची ‘फ्रीड्रिख एबर्ट फौंडेशन’ ही भारत, सिंगापूर येथील संस्थांच्या सहकार्याने संशोधन, चर्चासत्रे इ. कार्यक्रम राबविते.

(८) आफ्रिका खंड : संपूर्ण आफ्रिका खंडात स्वतंत्र देशांची संख्या १९५० मध्ये चार होती, ती १९७० मध्ये ३६ पर्यंत पोहोचली. नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी वृत्तपत्रविद्या वा जनसंज्ञापन-माध्यमांचे शिक्षण देणारी केंद्रे वेगाने सुरु केली. यांपैकी अनेक देशांत स्वतःच्या वृत्तसंस्थाही नव्हत्या त्यामुळे पुस्तके, स्टुडिओ, साधने, अनुभवी शिक्षक यांचीही उणीव होती.

कैरोच्या अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम १९३७ मध्ये सुरु झाला. इस्राइलमध्ये जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठामध्ये संज्ञापन वृत्तपत्रविद्येसाठी स्वतंत्र संस्था सुरु करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतील पॉचफ्स्ट्रूम विद्यापीठामध्ये माध्यम-व्यावसायिकांसाठीचा अभ्यासक्रम १९६० मध्ये सुरु झाला. उत्तर आफ्रिकेतील वृत्तपत्रविद्येची पहिली संस्था १९६४ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर अल्जीरिया, लिबिया, सीरिया इ. देशांमध्ये वृत्तपत्रविद्येशी संबंधित असलेले अभ्यासक्रम व संस्था स्थापन झाल्या.

आफ्रिकेच्या वासाहतिक इतिहासामुळे तेथे स्थानिक व प्रादेशिक भाषांपेक्षा इंग्रजी व फ्रेंच या भाषांचे राज्यकारभार, माध्यमे व शिक्षण या क्षेत्रांत वर्चस्व आहे. त्यामुळे वृत्तपत्रविद्येच्या संस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पुस्तकांपैकी ६०% पुस्तके अमेरिकेतील व २०% पुस्तके इंग्लंडमधील आहेत, असे युनेस्कोने १९८७ मध्ये केलेल्या एका पाहणीत आढळले. काही ठिकाणी पुस्तकाची एकच प्रत, तीही शिक्षकाकडे, होती आणि विद्यार्थ्यांना त्याच्या छायाप्रती वापराव्या लागत.

(९) लॅटिन अमेरिका: तथाकथित ‘तिसऱ्या’ जगातील इतर देशांच्या तुलनेने दक्षिण व मध्य अमेरिकेतील देश पुष्कळच आधी स्वतंत्र झाले. शिवाय भौगोलिक व सांस्कृतिक सान्निध्यातील त्यांच्यापुढे उत्तर अमेरिकेतील शिक्षणाचा आदर्श होता. त्यामुळे वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाच्या बाबतीत आशिया व आफ्रिकेतील देशांपेक्षा लॅटिन अमेरिकेतील देशांनी आघाडी घेतली. ब्राझील व अर्जेंटिनामध्ये वृत्तपत्रविद्येचे शिक्षण देणाऱ्या संस्था १९३० च्या दशकातच स्थापन झाल्या. त्यानंतरच्या दशकात एक्वादोर, मेक्सिको, पेरु आणि व्हेनेझुएला या देशांत अशा संस्था सुरु झाल्या. १९७० मध्ये या संस्थांची संख्या ८१ पर्यंत पोहोचली होती. मात्र यातील बहुतेक सर्व संस्थांना निधीचा व पात्र शिक्षकांचा तुटवडा जाणवतो. साधनेही तुटपुंजी व प्राथमिक स्वरुपाची आढळतात. बहुसंख्य अभ्यासक्रम अल्प मुदतीचे असल्यामुळे शिक्षणाचा दर्जा समाधानकारक नसतो. या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून ब्राझीलने १९६९ मध्ये पत्रकारांना मात्यताप्राप्त संस्थेची पदवी मिळविणे बंधनकारक ठरविले. १९८० नंतरच्या दशकातील नव्या जागतिक माहिती व संज्ञापन-व्यवस्थेविषयीच्या आवेशपूर्ण चर्चेमुळे युनेस्कोने ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडिज् इन जरनॅलिझम इन लॅटिन अमेरिका’ (सीआय्इएसपीएएल्) या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. शेतीविषयक संघटनांच्या मुळेही वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाला खूप साहाय्य झाले. शेतीतील आधुनिकतेचे तंत्र व संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांचा उपयोग अधिकाधिक प्रभावी पद्धतीने कसा करता येईल याचे संशोधन त्या संघटना करत असतात. वृत्तपत्रविद्येच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी लॅटिन अमेरिकेतील प्रमुख वृत्तपत्रे साहाय्य करतात.

                    संदर्भ : 1. Astbury, A. K. Freelance Journalism, London, 1963.

            2. Careers Institute, Journalism as a Career, New Delhi, 1951.

            3. Dodge, John, Ed. The Practice of Journalism, London, 1963.

            4. Sengupta, B. Journalism as a Career, Culcutta, 1955.

            5. Williams, Francis, Journalism as a Career, London, 1962.

            ६. अकलूजकर, प्रसन्नकुमार, वृत्तपत्रविद्या, पुणे, २०००.

            ७. केळकर, न. चिं. संपा. केळकर, का.न. वृत्तपत्रमीमांसा, पुणे, १९६५. 

                         परांजपे, प्र. ना.