राय, राजकिशोर : (२३ नोव्हेंबर १९१४– ). आधुनिक ओडियातील एक श्रेष्ठ लघुकथाकार. जन्म पुरी जिल्ह्यातील मेंढसाल ह्या खेड्यात. शिक्षण पाटणा व कलकत्ता विद्यापीठांत. पाटणा विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्य घेऊन एम्.ए. तसेच अध्यापनशास्त्रातील पदविका घेतली आणि कलकत्ता विद्यापीठातून ओडिया साहित्य घेऊन ते एम्.ए. झाले. नंतर त्यांनी ओरिसा शासनाच्या शिक्षणखात्यात शाळा-निरीक्षक, ओडियाचे अधिव्याख्याता, कटक येथील रॅव्हनशा महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राचार्य इ, पदांवर काम केले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ रिलिजस अँड कल्चरल स्टडीज’ ह्या संस्थेचे अध्यक्ष ओरिसा साहित्य अकादेमीचे तसेच ओरिसा संगीत-नाटक अकादेमीचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले. ओरिसात कथेसाठी असलेला ‘विषुव मीलन’ हा बहुमानाचा पुरस्कारही त्यांना लाभला.
आजवर त्यांच्या वीसपेक्षा अधिक साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. यांतील काव्य (दीपाली –१९३६, शोषित काव्य –१९५४) नाटक (पंच पल्लव) निबंध (श्रीसाहित्य –१९५०, श्रीमा श्री अरविंद आधारित चेतनावली) समीक्षा (साहित्य ओ साहित्यतत्त्व – १९४८) या प्रकारांतील लेखन वगळता बाकी सर्व कथासंग्रह आहेत. त्यांच्या महत्त्वाच्या कथासंग्रहांची नावे अशी : नील लहरी (१९४४), जयश्री (१९४६), बिकच शतदळ (१९४७), बन ज्योस्त्ना (१९४८), जयशंख (१९५०), मनर मृणाल (१९५२), पंक चंदन, जीवन संगीत (१९६५) इत्यादी. राय रचनावली ह्या शीर्षकाने त्यांच्या कथांचे संकलनही प्रसिद्ध झाले आहे. राजकिशोर राय यांनी आपल्या पारंपरिक वास्तववादाची चाकोरी सोडून केलेल्या स्वच्छंदतावादी दर्जेदार कथालेखनाने ओडिया कथेस नवे वळण प्राप्त करून दिले, विशेषतः स्वतंत्र्योत्तर कालखंडातील त्यांचे कथालेखन नव्या वळणाचे असून ओडियात आदर्श समजले जाते.
दास, कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)