रामदास कंचेर्ल गोपन्ना : (१६२० –८७). मध्ययुगीन तेलुगु कवी. गोवळकोंडा येथील शेवटचा राजा अतुल हसन तानाशाह (तानीशाह) याच्या काळात तो सरकारी अधिकारी होता. आक्कण्णा व मादण्णा या दोन मंत्र्यांचा तो भाचा होता. त्याची भद्राचलम् येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली होती. सरकारी कामकाजानंतर उरलेला सर्व वेळ तो रामाची भक्ती, भजन, कीर्तन इ. कामांत घालवीत असे. एके वर्षी त्याने वसुलाच्या रूपाने जमा झालेल्या रकमेतून भद्राचलम् येथे एक रामाचे मंदिर बांधले. तानाशाहला जेव्हा हे समजले, तेव्हा त्याने गोपन्नाला अटक केली व गोवळकोंड्याच्या किल्ल्यातील तुरुंगात ठेवले. १० वर्षे (१६६५ –७५) तुरुंगात असताना तो अखंडपणे रामाचे भजन करीत असे. तुरुंगात उत्स्फूर्त रीतीने स्फुरलेली भजने म्हणजे त्याच्या संवेदनशील मनाचे हृदयविदारक उद्‌गारच होत. रामाजवळ त्याने कधी करुणा भाकली आहे, कधी रक्षणाकरिता आर्त वाणीने विनवणी केली आहे, तर कधी सौम्य शब्दात रामाची कानउघाडणीही केली आहे. त्याच्या ह्या निवडक पद्यांचा संग्रह दाशरथिशतकमु या ग्रंथात केला गेला आहे. प्रत्येक पद्याच्या शेवटी ‘दाशरथि करुणापयोनिधि’ अशी पदसंहती आली आहे. दाशरथिशतकमुतील पद्ये अत्यंत ओजस्वी, शैलीबद्ध आणि भावपूर्ण आहेत. ती पद्ये शब्दालंकारपूर्णही असून वाचकांचे मन एकदम आकर्षित करून घेतात. संपूर्ण आंध्र प्रदेशातील जनतेच्या जिभेवर म्हणूनच ती अनेक वर्षे घोळत आहेत. त्याच्या प्रगाढ रामभक्तीमुळे त्याचे मूळ ‘गोपन्ना’ हे नाव मागे पडून ‘रामदास’ हे उपनामच फार प्रसिद्ध झाले आहे. रामदासाला भद्राचलमची जाहागीर तानीशाह बादशहाने दिली होती. ‘भद्राचलम् रामदास’ या नावानेही तो ओळखला जात असे. प्रख्यात रामभक्त गायक त्यागराज (१७६७ – १८४७) याने भद्रचलम्‍ला भेट दिली होती व रामदासाच्या दाशरथिशतकमुमधील भक्तिपूर्ण पद्यांचाही परिचय करून घेतला होता, असे एका परंपरेनुसार सांगितले जाते.

लाळे, प्र. ग.