राबी, इझिडॉर इझाक : (२९ जुलै १८९८ – ११ जानेवारी १९८८). अमेरिकन भौतिकीविज्ञ. अणुकेंद्रांच्या चुंबकीय गुणधर्मांची नोंद करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या अनुस्पंदन पद्धतीच्या [⟶ अणुकेंद्रीय व आणवीय परिबले] शोधाकरिता त्यांना १९४४ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला.

राबी यांचा जन्म ऑस्ट्रियातील (आता रशियातील) रेमॅनॉव्ह येथे झाला. १८९९ मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबियांबरोबर अमेरिकेस प्रयाण केले. त्यांनी कॉर्नेल विद्यापीठाची रसायनशास्त्राची पदवी मिळविली (१९१९) आणि नंतर स्फटिकांच्या चुंबकीय गुणधर्मांवर संशोधन करून कोलंबिया विद्यापीठाची पीएच्.डी संपादन केली (१९२७). शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांना यूरोपात आर्नोल्ट झोमरफेल्ड, नील्स बोर, व्होल्फगांग पाउली, ओटो स्टर्न व व्हेर्नर हायझेनबेर्क या नामवंत शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. १९२९ मध्ये ते कोलंबिया विद्यापीठीत सैद्धांतिक भौतिकीचे अधिव्याख्याते व पुढे १९३७ मध्ये प्राध्यापक झाले. दुसऱ्या महायुद्धात ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रेडिएशन लॅबोरेटरीचे सहयोगी संचालक होते आणि त्यांनी सूक्ष्मतरंग रडार व अणुबाँब यांच्या विकासात सहकार्य केले. महायुद्ध संपल्यावर १९४५ मध्ये ते कोलंबिया विद्यापीठात भौतिकी विभागाचे कार्यकारी अधिकारी झाले. उच्च ऊर्जा भौतिकी आणि सूक्ष्मतरंगांचे वैज्ञानिक व व्यावहारिक उपयोग या नवीन क्षेत्रांत या विभागाला त्यांनी अग्रस्थान प्राप्त करून दिले. त्याच विद्यापीठात पुढे ते १९५१ – ६४ मध्ये भौतिकीचे हिगिन्स प्राध्यापक, १९६४ –६७ मध्ये पहिले विद्यापीठीय प्राध्यापक व १९६७ पासून गुणश्री प्राध्यापक झाले.

अणुकेंद्रांच्या चुंबकीय गुणधर्मांचा अभ्यास करण्यास १९३० मध्ये त्यांनी सुरूवात केली आणि हे गुणधर्म मोजण्याचे एक काटेकोर साधन म्हणून त्यांनी स्टर्न यांच्या रेणवीय शलाका पद्धतीचा विकास केला [⟶ रेणवीय शलाका]. १९३७ मध्ये त्यांनी आणवीय वर्णपटांचे निरीक्षण करण्यासाठी रेणवीय व आणवीय शलाकांच्या चुंबकीय अनुस्पंदनाच्या पद्धतीचा शोध लावला. या पद्धतीचा उपयोग करून अणू व रेणू यांच्या परिभ्रमणाच्या एकेका अवस्थांचे अभिज्ञान करण्यात व त्या मोजण्यात आणि त्यावरून अणुकेंद्रांची यांत्रिक व चुंबकीय परिबले काढण्यात त्यांनी यश मिळविले [⟶ अणुकेंद्रीय आणि आणवीय परिबले]. त्यांच्या या पद्धतीमुळे अणू व रेणू यांच्या संरचनेसंबंधी अधिक विस्तृत माहिती उपलब्ध झाली. पुढे शोधण्यात आलेल्या आणवीय कालमापक, ⇨मेसर व ⇨लेसर यांसारख्या प्रयुक्ती राबी यांच्या या मूलभूत कार्यावर मोठ्या प्रमाणावर आधारलेल्या आहेत.

युद्धोत्तर काळात ते अमेरिकेच्या अणुऊर्जा मंडळाच्या सर्वसाधारण सल्लागार समितीचे सदस्य (१९४६ – ५६) व चार वर्षे अध्यक्ष होते. जिनीव्हा येथे १९५५, १९५८ व १९६४ या वर्षी अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगांसाठी आंतरराष्ट्रीय परिषदा भरविण्यात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. युनेस्कोतील अमेरिकेचे प्रतिनिधी या नात्याने त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जिनीव्हा येथे उच्च ऊर्जा भौतिकीच्या अभ्यासाकरिता एक आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा (CERN) उभारली जाण्यास मोठी मदत झाली. ब्रुकहॅवन नॅशनल लॅबोरेटरी स्थापन करण्यातही त्यांचा सहभाग होता. अमेरिकेच्या शस्त्रास्त्र नियंत्रण व निःशस्त्रीकरण विभागाच्या सल्लागार समितीचे, तसेच इतर अनेक सरकारी व आंतरराष्ट्रीय समित्यांचे ते सदस्य होते.

राबी यांचे महत्त्वाचे संशोधन निबंध फिजिकल रिव्ह्यू या नियतकालिकात प्रसिद्ध झाले व त्याचे काही काळ ते सहयोगी संपादकही होते. माय लाइफ अँड टाइम्स ॲज अ फिजिसिस्ट (१९६०), मॅन अँड सायन्स (१९६८) व सायन्स द सेंटर ऑफ कल्चर (१९७०) हे ग्रंथ त्यांनी लिहिले. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सेसचे पारितोषिक (१९३९), फ्रँकलिन इन्स्टिट्यूटचे एलिअट क्रिसन पदक (१९४२), मेरिट पदक (१९४८), किंग्ज पदक (१९४८), ॲटम्‍स फॉर पीस पुरस्कार (१९६७) इ. पारितोषिके तसेच प्रिन्स्टन, हार्व्हर्ड, बर्मिंगहॅम वगैरे विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या हे बहुमान मिळाले. अमेरिकन फिजिकल सोसायटी, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी वगैरे अनेक संस्थांचे ते सदस्य होते. ते न्यूयॉर्क येते मृत्यु पावले.

भदे, व. ग.