रानडुक्कर : हा प्राणी समखुरीय गणातल्या सूइडी कुलातील सुस प्रजातीचा आहे. याचे शास्त्रीय नाव सुस स्क्रोफा आहे. हा यूरोप, उत्तर आफ्रिका, आशिया, जपान, मलाया द्वीपकल्प तसेच अमेरिकेतही आढळतो. भारतात हा जवळजवळ सगळीकडे आढळतो. गवताळ किंवा विरळ झुडपे असणाऱ्या जंगलात आणि क्वचित अरण्यात तो राहतो. पावसाळ्यानतंर पुष्कळदा यांचे कळप उभ्या पिकात शिरतात.

डोक्यासकट शरीराची लांबी दीड ते दोन मीटरपर्यंत आणि खांद्यापाशी उंची सु. एक मीटरपर्यंत असते. रंग काळा, तपकिरी किंवा काळसर करडा असतो. पिल्ले बदामी रंगाची असून त्यांच्या अंगावर फिक्कट अथवा काळसर पट्टे असतात. याच्या अंगावरचे राठ केस विरळ असतात आणि आयाळ काळ्या राठ केसांची असून ती डोक्याच्या मागच्या भागापासून निघून पाठीवर गेलेली असते. मुस्कटाचे टोक चापट, मांसल तबकडीसारखे असून त्यावर नाकपुड्या असतात. वरचे आणि खालचे सुळे लांब व वाकडे होऊन तोंडाच्या बाहेर आलेले असतात. हा चपळ असून वेगाने धावू शकतो त्याचप्रमाणे तो उत्तम पोहोणाराही आहे. यांचे लहान कळप असतात.

रानडुक्कर मुख्यतः शाकाहारी आहे. वनस्पतींची कोवळी खोडे, मुळे, कंद, धान्य, भुईमुगाच्या शेंगा इ. पदार्थ तो खातो पण यांशिवाय किडे, सडलेले मांस व इतर घाणेरडे पदार्थ तो खात असल्यामुळे त्याला सर्वभक्षी म्हणणे योग्य होईल. पहाट आणि संध्याकाळ या यांच्या भक्ष्य मिळविण्याच्या वेळा होत पण पुष्कळदा ते रात्रीही बाहेर पडतात. हे पिकांची बरीच नासधूस करतात.

रानडुकराचे घ्राणेंद्रिय अतिशय तीक्ष्ण असते. हा साहसी आणि बुद्धिमान प्राणी आहे. रानडुक्कर बहुप्रसव आहे. प्रजोत्पादनाचा ठराविक काळ नाही. सुमारे चार महिन्यांच्या गर्भावधीनंतर मादीला दर खेपेस ४–६ पिल्ले होतात.

नेपाळ, भूतान, आसाम आणि सिक्किममध्ये हिमालयाच्या पायथ्याच्या अरण्यात एक खुजा डुक्कर आढळतो. याचे शास्त्रीय नाव सुस साल्व्हॅनियस आहे. याची उंची २५ सेंमी, पेक्षा जास्त नसते. हे रात्रिंचर असून यांचे लहान कळप असतात.

भट, नलिनी