राणा धुंडाई : उत्तर बलुचिस्तानातील झाब नदीच्या खोऱ्यातील प्रख्यात पुरातत्त्वीय स्थल. ब्रिगेडियर रॉस यांनी येथे केलेल्या संशोधनात आणि उत्खननात ताम्रपाषाणयुगीन वस्तीचा पुरावा उपलब्ध झाला. ही वस्ती प्रामुख्याने पाच कालखंडांत व अनेक उपकालखंडांत उत्क्रांत झाल्याचे दिसून आले. यांतील पहिली वस्ती भटके जीवन जगणाऱ्या लोकांनी केली असावी, असे दिसते कारण या कालातील घरबांधणीचा पुरावा उपलब्ध झाला नाही. साधी, रंगकाम नसलेली मडकी, फ्लिंट दगडाच्या पात्यांचा हत्यारासारखा वापर आणि बैल, घोडा, मेंढ्या व गाढवे ही जनावरे पाळणे ही यांची वैशिष्ट्ये. यानंतरच्या म्हणजे दुसऱ्या कालखंडातील वस्ती दगडगोट्यांचे पाये असलेल्या घरांच्या रूपाने दिसून येते. या लोकांचे जीवन या आधीच्या लोकांच्या जीवनापेक्षा जास्त सरस होते. हे चाकावर घडविलेली आणि गुलाबी/विटकरी पृष्ठभागावर काळ्या रंगात बैल, बकरी यांचे चित्रण केलेली मडकी दर्शवितात. तिवईयुक्त चषक अत्यंत कलात्मक आहेत. तिसऱ्या कालखंडातील वस्त्यांचे अनेक उपकाल पाडता येतात. मडक्यावरील चित्रण आणि त्यांचे आकार यानुसार हे विभाग केलेले आहेत. रंगकामात बहुधा कुंचल्याचा वापर, लाल रंगात चित्रकाम आणि उंच, काचेच्या बाटलीच्या आकारासारखी मडकी या कालात प्रचलित झाली. या तिसऱ्या कालखंडात राणा धुंडाईच्या लोकांचा बलुचिस्तानातील मुघल धुंडाई, सुरजंधाल येथील वस्त्यांशी संपर्क आला असावा मात्र दुसऱ्या कालखंडातील सांस्कृतिक अवशेष इराणशी संपर्क दाखवितात. राणा धुंडाई येथील चौथी आणि पाचवी वस्ती पहिल्या वस्त्यांपेक्षा मडक्यांच्या बाबतीत अगदी वेगळी वाटते.
संदर्भ : 1. Ross, E. J. Journal of Near Eastern Studies, Vol. 5, 1946.
2. Piggott, Stuart, Prehistoric India, London, 1950.
देव, शां. भा.