राजेशाही : (मॉनर्की.) राजाचे राज्य म्हणजे राजेशाही. एकाच व्यक्तीच्या ठिकाणी सत्ता ज्या राज्यात कायम असते. ते राज्य म्हणजे राजेशाही होय. सेनेचा मुख्य सेनापती, न्यायाचा निर्णय करणारा अंतिम अधिकारी, ज्याच्या आज्ञा अनुल्लंघनीय असतात असा व जन्मभर सार्वभौम सत्ता वापरणारा माणूस, हा राजा होय किंवा स्त्री असेल, तर राणी होय. अशा राजाची अथवा राणीची सत्ता म्हणजे राजेशाही होय.

जगातील राज्यांचा आजपर्यंत जो इतिहास उपलब्ध आहे, त्यात राजे व राण्या तीन प्रकारे सार्वभौम सत्ताधारी बनलेल्या दिसतात: एक प्रकार म्हणजे देशाची जनता अथवा निवडक, विशिष्ट जन अथवा वरिष्ठ सरदार यांनी निवडलेला राजा बनतो. त्याएवजी दुसरा प्रकार म्हणजे एखादा शूर सेनापती देश काबीज करतो आणि सार्वभौम सत्ता बळकावतो त्याला जनतेचा मूक किंवा उघड पाठिंबा मिळतो. तिसरा प्रकार म्हणजे वंशपरंपरागत, जनसंमत पद्धतीने राजाचा औरस पुत्र किंवा पुत्री अथवा दत्तकपुत्र राजाच्या गादीचा युवराज बनतो आणि राजाच्या देहान्तानंतर अथवा स्वेच्छेने राजा निवृत्त झाल्यानंतर पुत्राला वा पुत्रीला राजपदाची प्राप्ती होते. चंद्रगुप्त मौर्य (इ. स. पू. ?–इ. स. पू. ३००) हा आपल्या शौर्याने राजपदावर आला. त्याच्यानंतर जे मौर्य राजे झाले, ते अनुवंशिक पद्धतीने झाले. मोगल सम्राट बाबर (१४ फेब्रुवारी १४८२–२६ डिंसेबंर १५३०) व मराठी सत्तेचे संस्थापक शिवाजी महाराज (१९ फेब्रुवारी १६३०–३ एप्रिल १९६०) हे स्वतःच्या आक्रमक सामर्थ्याने राजपदावर आले आणि त्यांनी आपल्याला रज्याभिषेक करवून घेतला. नंतरचे मोगल बादशाह आणि छ. संभाजी, छ. शाहू इ. राजपूत्र या नात्याने आनुवंशिक पद्धताने राजपदावर आले. चंद्रगुप्त मौर्य किंवा शिवाजी महाराज हे स्वपराक्रमाने जरी राजपदावर असले असले, तरी त्यांना जनसंमतीचा लाभ झालाच होता. पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट हा निवडून सम्राटपदावर आला. प्राचीन यूरोपातील बहुतेक राजेशाह्या या बऱ्याच प्रमाणात निवडणुकीने निर्माण झाल्या. ख्रिश्‍चन धर्माच्या स्थापनेनंतर राजवंशातील युवराजाला मुख्य ख्रिश्‍चन धर्मपीठाचा म्हणजे पवित्र धार्मिक सत्तेचा पाठिंबा अनेक शतके आवश्यक ठरला. यूरोपात मध्ययुगात राजा हा देवाच्या दिव्य शक्तीने समर्थ बनलेला असतो, अशी समजूत होती. राजाला देवाची शक्ती प्राप्त झालेली असते, अशी श्रध्दा जनांमध्ये मुरली होती. त्यामुळे राजा अपराध करत नसतो, हे तत्त्व वा हा सिध्दान्त सार्वत्रिक रीतीने स्वीकारला गेला.

राजेशाहीची दोन स्वरूपे प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये प्रचलित होती. एक म्हणजे राजाला राजवंशात जन्मल्यामुळे सत्ता प्राप्त होऊन सेनेचे आधिपत्यही मिळत असे. दुसरे स्वरूप म्हणजे राजाला सम्राटपदाबरोबरच दिव्य शक्तींचा लाभ होतो असे मानले जात होते. ग्रीक सम्राट अलेक्झांडर (? ऑक्टोबर ३५६– १३ जून ३२३ इ. स. पू.) याने मोठे साम्राज्य निर्माण केले. त्याचबरोबर त्याने ग्रीकांचा बुद्धिप्रामाण्यवाद आणि लोकशाही यांना रजा दिली.

राजा हा सर्व प्रजेचे रक्षण करणारा आणि कायद्याने राज्य करणारा, कायद्यापुढे सर्वांना मानणारा असेल, तरच तो खरा राजा होय, असे मानले जाते. दुर्बलांचे सबळांपासून रक्षण करणे, हे राजाचे पहिले कर्तव्य होय. तो निःपक्षपाती असावा लागतो. त्याच्या मध्ये आपपरभाव असता कामा नये. राजा म्हणजे सर्व सत्तेचे अधिष्ठान असल्यामुळे ती सत्ता कायद्याने म्हणजे नियमाने न वापरता निरपराध्यांना शासन न करणे आणि अपराध्यांना क्षमा न करणे हे न्याय्य होय. अशा जाणिवेने बिनचूक रीतीने जो राज्य करतो, तोच खरा राजा होय. आपणास पाहिजे असलेल्या वस्तू, द्रव्य, व्यक्ती, आपला हक्क नसताना सत्तेच्या बळावर जो हिसकतो, तो अन्यायी राजा होय, तो खरा नव्हे. लोकांवर आपला कोश भरण्याकरिता जो लोकांना असह्य असे भारी कर लादतो आणि गरज पडल्यास लोकांना आणि धनिकांना लुबाडतो, तो अयोग्य राजा होय. कायद्याचे व न्यायाचे राज्य हे सर्व प्रकारच्या राजकीय पद्धतीचे मुख्य लक्षण होय. सर्व प्रकारच्या राजकीय सत्तांमध्ये हे लक्षण असले, तरच समाज नीट राहू शकतो.

अठराव्या शतकापर्यंत यूरोपमध्ये सर्वाधिकार असलेल्या राजांची सत्ता चालू असलेली दिसते. फीड्रिख द ग्रेट (हा जर्मन सम्राट) आणि कॅथरिन द ग्रेट (ही रशियन राणी) हे दोघे उदारमताचे हुकूमशहा होते, असे मानले जाते. १७८९ मध्ये झालेल्या फ्रेंच क्रांतीनंतर राजांच्या दडपशाही प्रवृत्तीवर मर्यादा पडू लागल्या. पहिल्या महायुद्धानंतर रशिया, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी यांच्या राजेशाह्यांचा नाश झाला. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर यूरोपच्या बाहेरील अनेक राजेशाह्या समाप्त झाल्या. जपानच्या बादशाहीला लोकशाहीचे बंधन निर्माण झाले. लोकशाहीच्या बंधनात नामधारी राजेशाह्या आजही यूरोपात चालू आहेत. ब्रिटन, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, बेल्जियम आणि नेदर्लड्स येथे संविधानानुसारी राजेशाही आहे. ब्रिटनमध्ये जो आकृतिबंध राजकीय सत्तेला आहे, तोच यूरोपातील अन्य टिकलेल्या राजेशाह्यांना जवळजवळ लागू आहे. लोकसभा किंवा संसद कायदे करणारी संस्था असून मंत्रिमंडळ त्या संसदेला जबाबदार असते. राजा हा प्रमुख म्हणून केवळ आदरासच पात्र ठरतो.

संदर्भ: 1. Altekar, A. S. State and Government in Ancient India, Banaras, 1955.

2. Inlow, E.B. Shahanshah, Delhi, 1979.

3. Montgomery-Massingberd, Hugh, The Monarchy, London, १९७९.

४. Seymour, William, Sovereign Legacy, New York, 198०.

5. Sidney, A. Discourses Concerning Government, New York, 1979.

जोशी, लक्ष्मणशास्त्री