राजेंद्र : सागरी व्यापाराला आवश्यक असे नाविक प्रशिक्षण देणारे भारतातील जहाज. हे जहाज मुंबई येथे आहे. भारतात १९२७ ते १९७२ या काळात ⇨डफरिन नावाचे प्रशिक्षण जहाज वापरात होते. डफरिनची कार्यक्षमता संपल्याने १६ एप्रिल १९७२ पासून ‘राजेंद्र’ हे जहाज प्रशिक्षणासाठी वापरण्यात येत आहे.

व्यापारी जहाजावर खलाशी व अधिकारी असे दोन वर्ग असतात. अधिकारीवर्गांत अभियांत्रिकी आणि कार्यकारी अधिकारी असे दोन प्रकार असतात. १०+२ हा शिक्षणक्रम उत्तीर्ण झालेल्या १७ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या प्रवेश परीक्षेला बसता येते. त्यातून व्यापारी नौकानयन हा विषय घेतलेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राजेंद्र जहाजावर प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळतो. यांवरील शिक्षणक्रम ४ वर्षांचा असतो. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना पदविका देण्यात येते. पदविकाधारक विद्यार्थी सामान्यपणे व्यक्तिशः एखाद्या व्यापारी नौकेवर काम मिळवितो. असा सागरी पर्यटनाचा अनुभव घेतल्यानंतर त्याला खाजगी संस्थांमध्ये पुढील प्रशिक्षण घेता येते.

अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांकरिता कलकत्ता येथे सागरी अभियांत्रिकेवरील पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रथमोपचार, रेडिओ, रडारयंत्रणा इत्यादींचे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतात.

पित्रे, का. ग.