राजखोवा, बेणुधर : (११ डिसेंबर १८७२–? १९५५). आधुनिक असमिया नाटककार. कवी व कोशकार. पूर्व आसाममधील लखिमपूर जिल्ह्या तील दिब्रुगड उपविभागात असलेल्या खोवांग ह्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. १८९६ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून पदवी घेऊन ते उपजिल्हाधिकारी म्हणून सरकारी नोकरीत शिरले आणि १९३१ मध्ये सिबसागर जिल्ह्याचे उपायुक्त ह्या पदावरून निवृत्त झाले.

विद्यार्थिदशेतच त्यांच्या साहित्यिक जीवनाची सुरूवात झाली. नीतिपाठ (१८८९), साहित्यप्रषेश व पंचकविता (१८९५) हे त्यांचे ग्रंथ विद्यार्थिदशेतच त्यांनी लिहिले. १८९०–९४ ह्या कालावधीत ते बिजुलि ह्या असमिया साहित्यास वाहिलेल्या मासिकाचे संपादकही होते आणि ह्या काळात त्यांचे एकमेव गंभीर नाटक सेउती किरण (१८९४) प्रसिद्ध झाले तथापि रंगमंचावर ते यशस्वी ठरले नाही. या नाटकावर शेक्सपिअरचा प्रभाव दिसून येतो. यांनतर मात्र त्यांनी लिहिलेली सर्व नाटके हलक्या फुलक्या सुखात्मिकांच्या किंवा प्रहसनां च्या स्वरूपाची आहेत. तत्कालीन समाजाच्या अवनतीचे व विसंगतीचे चित्रण त्यांनी त्यात केले आहे. त्यांनी काही पौराणिक नाटकेही लिहिली. त्यांची उल्लेखनीय नाटके आणि प्रहसने अशी : दर्योधनर उरूमंग (१९०१), दरबार (१९०२), दक्षयज्ञ (१९०८), कुरि शतिकार सभ्यता (१९०८), तिनी घडणी (म.शी.‘तीन गृहिणी’-१९२८), अशिक्षित घडणी, यमपुरी (१९३१), तोपनिर परिणाम (म.शी.‘झोपेचे परिणाम’–१९३२), चोरर सृष्टि (१९३१) इत्यादी.

बेणुधर हे आरंभीच्या काळातील गीतकार कवी म्हणूनही ओळखले जातात. चंद्रसंभव काव्य हे त्यांचे प्रदीर्घ काव्य होय. १९२०–३० च्या दरम्यान त्यांनी विपुल गीतरचना केली. त्यां चे उल्लेखनीय संग्रह असे : दशगीत (१८९९), असमिया भाई (१९०१), बाँ हि (म.शी.‘ बासरी–१९०६), देहार प्रलय (१९२९), जीवन संधिया (?), सिपुरीर बातरि (म.शी.‘पलीकडच्या जगाचा संदेश’–१९२३), पुनरूत्थान (१९३१) इत्यादी. त्यांची कविता पुढील स्वच्छदतावादी असमिया कवितेचा उषःकाल म्हणून महत्वाची मानली जाते.

महासति जयमति (१९४७) हे त्यांनी लिहिलेले राजा गदाधर सिंग यांची पत्नी जयमती कुबाँरीचे चरित्र होय. लखीमी तिरोता (म. शी. ‘शुभलक्षणी गृहिणी’) ही त्यांची संवादरूपाने गद्यात लिहिलेली कांदबरीसदृश साहित्यकृती असून आदर्श आसामी गृहिणीचे चित्रण त्यात आले आहे. बिट्टू हा आसामच्या प्रख्यात उत्सवावरील चिकित्सक ग्रंथ आजही महत्वाचा मानला जातो.

बेणुधरां नी नाटक, प्रहसन, काव्य इ. प्रकारांत विपुल रचना केली असली, तरी त्यांचे असमियात महत्त्वपूर्ण स्थान आहे ते त्यांनी रचलेल्या असमिया खंड वाक्य कोश (म.शीत्र ‘असमिया वाक्प्रचार व म्हणी यांचा कोश’ −१९१७) ह्या कोशामुळेच. असमिया–इंग्रजी असा हा कोश असून तो मौलिक स्वरूपाचा आहे. या प्रकारचा दुसरा कोश असमियात नाही. याशिवाय त्यांनी इंग्रजीत केलेली ग्रंथरचनाही विशेष महत्त्वपूर्ण आहे. त्यांतील उल्लेखनीय ग्रंथ असे : ब्राशॅर ऑन द आसामीज लँग्वेज (१८५८), आसामीज डीमनॉलॉजी (१९०५), नोट्स ऑन द सिल्हेटी डायलेक्ट (सिल्हेट भागातील बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास–१९१३), शॉर्ट अकाउंट्स ऑफ आसाम (१९१५), हिन्टॉरिकल स्केचेस ऑफ आसाम (१९१७), विप्र दामोदर (शंकरदेवांच्या कृतीचा इंग्रजी अनुवाद–१९१८), होलि नामघोषा (माधवदेवांच्या नामवोपेचा अनुवाद–१९१९), सम पॉप्युलर सुपरस्टिशन्स ऑफ आसाम (१९२०), कणखोवा (वैष्णव कवी श्रीधर कंदलीच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद–१९२०), गुणमाला (शंकरदेवांच्या प्रख्यात ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद) इत्यादी.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)