राघवांक : (उपलब्ध काळ सु. १२२५). प्राचीन वीरशैव कन्नड कवी. तो प्रख्यात कवी ⇨हरिहर (सु. ११६५) याचा भाचा व पट्टशिष्य होता. इंपी या जन्मगावीच त्याचे बहुतांश वास्तव्य होते. पुढे तो दोरासमुद्र (सध्याचे बेलूर) व बरंगळ येथील राजांच्या दरबारात गेला व तेथे आपल्या कवित्वशक्तिमुळे त्याने विविध मानसन्मान मिळवले. आयुष्याच्या अखेरीची काही वर्षे त्याने बेलूर (जि. हसन) येथे व्यतित केली.

षट्पदी छंदात सर्वप्रथम कन्नड काव्यरचना करून अशा रचनेचा परमोत्कर्ष साधण्याचे श्रेय राघवांकाकडेच जाते. राघवांकाने प्रवर्तित केलेल्या षट्पदीत रचना करणाऱ्या नंतरच्या कवीपरंपरेत भीमकवी, ⇨कुमारव्यास, ⇨मरस, ⇨कुमारवाल्मिकी, ⇨विरुपाक्ष पंडित, ⇨लक्ष्मीश, ⇨मुद्दण इ. प्रख्यात कवींचा समावेश होतो. ‘पंपापतीला (शिवाला) वाखाणणाऱ्या जिभेने अन्य दैवते किंवा भवींची (वीरशैवेतरांची) कीर्तना केली, तर मी शिवभक्तच नव्हे’, असे राघवांकाने म्हटले होते आणि ते त्याचा गुरु हरिहर याच्या काव्यप्रेरणेशी सुसंगतच होते.

राघवांकाच्या नावावर सोमनाथ चरित, वीरेशचरित, सिद्धराम पुराण, हरिश्चंद्र-काव्य, शरभ चरित आणि हरिहरमहत्त्व ह्या सहा रचना मोडतात तथापि यांतील शेवटच्या दोन आजतरी उपलब्ध नाहीत. राघवांकाच्या सर्वच रचना षट्पदी छंदात आहेत. उपलब्ध चार कृतींचा रचनाक्रमही वर नामनिर्देश केलंल्या क्रमानुसारच असावा, असे मानले जाते.

सोमनाथचरितमध्ये सौराष्ट्राचा शिवभक्त कवी आदय्य याने सौराष्ट्रातील सोमनाथाची मूर्ती कर्नाटकात पुलिगेरे येथे आणून तिची प्रतिष्ठापणा केली आणि तेथील जैन धर्मीयांना अनेक चमत्कार दाखवून शिवभक्तीची दिक्षा दिल्याची कथा आहे. आदय्याची व्यक्तिरेखा उदात्त व सुंदर असून त्यातील नाट्यात्मकता विशेष लक्षणीय आहे. वीरेशचरित हे काव्य आकाराने लहान, पण गुणाने श्रेष्ठ आहे. शिवकोपातून जन्मलेल्या वीरभद्राची व दक्षयज्ञविध्वंसाची कथा त्यात आली आहे. ह्या दोन्ही काव्यांवर हरिहराच्या ‘रगळें’ चा प्रभाव जाणवत असला, तरी अनुकरण मात्र नाही. या दुसऱ्या काव्यात रौद्ररसाचा परिणामकारक आविष्कार आढळतो.

सिद्धराम पुराण हे ९ सर्गाच महाकाव्य असून त्यात सोन्नलिगे (सोलापूर) येथील प्रख्यात वचनकारकवी सिद्धराम याचे जीवनचरित्र वर्णिले आहे. राघवांकाच्या प्रतिभेचा अधिक परिपक्व व उन्नत आविष्कार यात दिसून येतो.

हरिश्चंद्र-काव्य हे राघवांकाचे सर्वोत्कृष्ट काव्य असून त्यात त्याच्या प्रतिभेचा व काव्यगुणांचा परमोत्कर्ष दिसून येतो. सत्यवचनी राजा हरिश्चंद्राची कथा-मूळ कथानकात आवश्यकतेनुसार बदल करून-त्यात वर्णिली आहे. राघवांकाच्या नाट्यमय काव्यप्रतिभेचा त्यात उत्कृष्ट आविष्कार असल्याने त्यास उच्च कलात्मक पातळी लाभली आहे. कथानक, व्यक्तिरेखा, रसपरिपोष, संवाद, कल्पनाविलास, नाट्यपूर्णता यांसारख्या सर्वच बाबतींत कवीच्या श्रेष्ठतेची साक्ष त्यातून पटते. सांप्रदायिकतेच्या मर्यादा उल्लंघून निखळ कलात्मक आनंद देणारी श्रेष्ठ साहित्यकृती म्हणून कन्नड काव्यात त्याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. ‘हर (ईश्वर) हाच सत्य व सत्य हेच हर आहे’ हा त्यातील सूचित संदेश होय.

सतराव्या शतकातील सिद्धनंजेश ह्या कवीने राघवांकाच्या जीवनावर राघवांकाचरित्रे हे काव्य लिहिले आहे. राघवांकावर आर्. सी. हिरेमठ यांनी महाकवि राघवांक (१९२२) हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. राघवांकाच्या कृतीही साक्षेपाने संपादन व त्यांना चिकित्सक प्रस्तावना लिहून प्रसिद्ध झाल्या आहेत.

मळगी, से. रा. (क.) कायकिणी, गौरीश (म.)