राइशस्टाइन, टाडेयस : (२० जुलै १८९७ – ). स्विस रसायनशास्त्रज्ञ.⇨अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकातील (बाहेरील कवचासारख्या भागातील) हॉर्मोनांचा (रक्तात सरळ मिसळणाऱ्या उत्तेजक स्त्रावांचा) शोध, त्यांची रासायनिक संरचना (रेणूतील अणूंची रचना) व जैव परिणाम यांसंबंधीच्या संशोधनाबद्दल राइशस्टाइन यांना ⇨एडवर्ड कॅल्व्हिन केंड्ल व ⇨फिलिप शोवॉल्टर हेंच यांच्या समवेत १९५० चे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले.

राइशस्टाइन यांचा जन्म पोलंडमधील व्हॉट्स्वाव्हेक येथे झाला. १९१४ मध्ये ते स्विस नागरिक झाले. झुरिक येथील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत शिक्षण घेऊन त्यांनी १९२० मध्ये रासायनिक अभियांत्रिकीची पदविका व हेर्मान स्टाउडिंगर यांच्या मार्गदर्शनाखाली १९२२ मध्ये कार्बनी रसायनशास्त्रातील पीएच.डी. पदवी मिळविली. काही काळ औद्योगिक क्षेत्रात कॉफी व चिकोरी यांच्यातील स्वादकारक पदार्थांसंबंधी संशोधन केल्यावर १९२९ मध्ये त्यास संस्थेत ते कार्बनी व शरीरक्रियावैज्ञानिक रसायनशास्त्राचे अधिव्याख्याते व नंतर प्राध्यापक झाले. १९३८ मध्ये ते बाझेल विद्यापीठात फार्मास्युटिकल इन्स्टिट्यूटचे संचालक व औषधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. १९४६–५० या काळात या पदांखेरीज त्यांनी कार्बनी रसायनशास्त्राच्या अध्यासनावर काम केले. त्यानंतर त्याच विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्‌गॅनिक केमिस्ट्री या संस्थेत ते प्राध्यापक व १९६० पासून संचालक होते. १९६७ मध्ये सेवानिवृत्त झाल्या व त्यांनी गुणश्री प्राध्यापक म्हणून तेथेच आपले काम चालू ठेवले.

अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकातील हॉर्मोनांसंबंधीचे आपले कार्य राइशस्टाइन यांनी १९३४ मध्ये सुरू केले. १९४६ पावेतो त्यांनी निरनिराळी २९ स्टेरॉइडे अलग करण्यात यश मिळविले. ज्याची अधिवृक्क ग्रंथी काढून टाकलेली आहे अशा प्राण्याचे आयुष्य यांपैकी सहा स्टेरॉइडे पुरविल्यास वाढू शकते, असे त्यांना आढळून आले. यांपैकी ॲल्डोस्टेरोन, कॉर्टिकोस्टेरोन व हायड्रोकॉर्टिकोस्टेरोन ही सर्वांत क्रियाशील आहेत, असे नंतर सिद्ध झाले. राइशस्टाइन यांनी डेसॉक्सिकॉर्टिकोस्टेरोनाचे अंशतः संश्लेषण (मूळ घटकांपासून कृत्रिम रीतीने बनविण्याची क्रिया) साध्य केले. फक्त हेच कॉर्टिकॉइड पुढे अनेक वर्षे मोठ्या प्रमाणावर तयार करणे शक्य झाले. त्या काळी ⇨ॲडिसन रोगावर डेसॉविसकॉर्टिकोस्टेरोन सर्वांत गुणकारी ठरले होते. अशाच स्वरूपाचे कार्य अमेरिकेत केंड्ल हे करीत होते. राइशस्टाइन यांनी १९३६ मध्ये वर्णन केलेला व ‘सबस्टन्स एफ’ हे नाव दिलेला पदार्थ आणि केंड्ल यांनी ‘कंपाउंड- ई’ हे नाव दिलेला पदार्थ एकच आहेत असे दिसून आले. पुढे त्याला ‘कॉर्टिसोन’ हे नाव देण्यात आले [⟶ कॉर्टिसोन].

संधिवाताभ संधिशोधात [⟶ संधिशोध] परिणामकारी ठरलेल्या या महत्त्वाच्या संयुगाचे राइशस्टाइन यांच्या कार्यामुळे अमेरिकेत एल्. एच्. सारेट यांना अंशतः संश्लेषण करणे शक्य झाले. कॉर्टिसोनाचे अलगीकरण व त्याच्या चिकित्सात्मक मूल्याचा शोध यांसंबंधी केलेल्या सहकार्याबद्दल प्रामुख्याने राइशस्टाइन, केंडूल व हेंच यांना नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. हॉर्मोनांवरील संशोधनाखेरीज १९३३ मध्ये राइशस्टाइन यांनी ॲस्कॉर्बिक अम्लाचे (क जीवनसत्त्वाचे) संश्लेषण करण्यात यश मिळविले. त्याच सुमारास इंग्लंडमध्ये सर डब्ल्यू. एन्. हार्थ व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे संश्लेषण केले होते. त्याच वर्षी नंतर राइशस्टाइन यांनी हे जीवनसत्त्व तयार करण्याचे अधिक चांगले तंत्र शोधून काढले व त्याचा अद्यापही व्यापारी उत्पादनासाठी उपयोग करण्यात येत आहे.

लंडनच्या रॉयल सोसायटीचे व अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमीचे परदेशी सदस्य म्हणून १९५२ मध्ये त्यांची निवड झाली. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना रॉयल सोसायटीचे कॉप्ली पदक (१९६८) तसेच लंडन, सॉरबॉन, झुरिक इ. विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या हे बहुमान मिळाले.

भालेराव, य. त्र्यं.