राइल, सर मार्टिन : (२७ सप्टेंबर १९१२—१४ ऑक्टोबर १९८४). ब्रिटिश रेडिओ ज्योतिषशास्त्रज्ञ. ⇨रेडिओ ज्योतिषशास्त्रातील पायाभूत महत्त्वाच्या कार्याबद्दल त्यांना ⇨अँटनी ह्यूडश यांच्याबरोबर १९७४ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. ज्योतिषशास्त्रातील संशोधनाकरिता देण्यात आलेले हे पहिलेच नोबेल पारितोषिक होते.

राइल यांचा जन्म ससेक्समधील ब्राइटन येथे झाला. १९३९ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकीची पदवी मिळविल्यानंतर दुसऱ्या महायुद्धात त्यांनी टेलिकम्युनिकेशन्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंटमध्ये रडारविषयक संशोधन केले. त्यानंतर इंपीरियल केमिकल इंडस्ट्रीजची शिष्यवृत्ती मिळवून १९४५ मध्ये ते केंब्रिज येथील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत जे. ए. रॅटक्लिफ यांच्या मार्गदर्शनाखाली ⇨आयनांबरासंबंधी चाललेल्या संशोधनात सहभागी झाले. १९४८—५९ मध्ये ते केंब्रिज विद्यापीठात भौतिकीचे अधिव्याख्याते व पुढे १९५९—८२ मध्ये प्राध्यापक होते. याचबरोबर त्यांनी मुलार्ड रेडिओ अँस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरीचे संचालक (१९५७—८२) म्हणूनही काम केले. १९७२—८२ या काळात ते ऑस्ट्रॉनॉमर रॉयल (राज ज्योतिर्विद) होते.

राइल यांचे प्रारंभीचे कार्य सूर्य, सौर डाग व जवळपासचे काही तारे यांपासून येणाऱ्या रेडिओ तरंगांच्या अभ्यासाविषयी होते. केंब्रिज येथील रेडिओ ज्योतिषशास्त्रीय संशोधकांच्या गटाला रेडिओ उद्गमांची सूची करण्यासाठी त्यांनी १९५० पासून मार्गदर्शन केले. याकरिता करण्यात आलेल्या तिसऱ्या सर्वेक्षणात ५०० उद्गमांकरिता संकलित केलेल्या थर्ड केंब्रिज कॅटलॉग (१९५९) या सूचीमुळे पुढे पहिल्या ⇨क्वासारचा शोध लावण्यास मदत झाली. या सर्वेक्षणाचा रेडिओ ज्योतिषशास्त्राच्या विकासावर फार मोठा परिणाम झाला. या सर्वेक्षणातील निरनिराळ्या तीव्रतेच्या उद्‌गमांच्या संख्या गणनेवरून ⇨विश्वस्थितीशास्त्रातील महास्फोट सिद्धांताला पहिला निरीक्षणजन्य पुरावा मिळाला.

क्वासारसारख्या अतिदूर अंतरावरील रेडिओ उद्गमांचे निरीक्षण करण्यासाठी राइल यांनी ‘द्वारक संश्लेषण’ या नावाने ओळखण्यात येणारे तंत्र विकसित केले. यात दोन ⇨ रेडिओ दूरदर्शक वापरून व त्यांमधील अंतर बदलून त्यांनी मिळविलेल्या माहितीचे संगणकाच्या साहाय्याने विश्लेषण केले आणि त्यामुळे दूरदर्शकाची विभेदनक्षमता (दोन वस्तू अलग असल्याचे ओळखण्याची क्षमता) प्रचंड प्रमाणात वाढली. १९६३ च्या सुमारास राइल यांनी उभारलेल्या अशा प्रकारच्या दूरदर्शकात १८ मी. व्यासाचे तीन परावर्तक होते. त्यांपैकी दोन परावर्तक पूर्व–पश्चिम रेषेत परस्परांपासून ०·८ किमी. अंतरावर बसविलेले होते व तिसरा ०·८ किमी. लांबीच्या रूळमार्गावर बसविलेला होता. रूळमार्गावरील परावर्तक व एक स्थिर परावर्तक यांच्या जोडीचा व्यतिकरणमापक [⟶ रेडिओ दूरदर्शक] म्हणून उपयोग करण्यात आला. रूळमार्गावरील परावर्तक निरनिराळ्या स्थानी ठेवून व पृथ्वीच्या अक्षीय भ्रमणाचा उपयोग करून निरीक्षणे घेतल्यानंतर या दूरदर्शकापासून मिळणारे वेध हे परिणामी १·६ किमी. व्यास असलेल्या एकाच परावर्तकाशी तुलनीय असल्याचे दिसून आले. या दूरदर्शकाच्या साहाय्याने ५,००० उद्गमांची सूची तयार करण्यात आली व पहिल्या⇨पल्सारचे स्थान निश्चित करण्यात आले. अशाच प्रकारच्या ८ परावर्तकांचा व ५ किमी. व्यासाच्या दूरदर्शकाचा आराखडा राइल यांनी तयार केला आणि १९७१ मध्ये त्याची उभारणी पूर्ण झाली. या दूरदर्शकाच्या साहाय्याने रेडिओ दीर्घिकांच्या (तारामंडळाच्या) व क्वासारांच्या घेतलेल्या वेधांमुळे त्यांच्या संरचनेसंबंधी महत्त्वाची माहिती उपलब्ध झालेली आहे. वरील दोन अतिशय संवेदनाक्षम दूरदर्शकांच्या मदतीने आकाशाच्या महत्त्वाच्या भागांचे सखोल सर्वेक्षण करण्यात येत आहे.

रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९५२ मध्ये राइल यांची निवड झाली आणि सोसायटीच्या ह्यूज (१९५४) व रॉयल (१९७३) या पदकांचा सन्मान त्यांना मिळाला. यांखेरीज त्यांना ‘नाइट’ हा किताब (१९६६), रॉयल अँस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक (१९६४) तसेच अमेरिका, रशिया, फ्रान्स इ. देशांतील विविध संस्थांचे सन्मान मिळाले. ते अमेरिकेच्या ॲकॅडेमी ऑफ आर्टस अँड सायन्सेसचे व रशियाच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्य होते. ते आणवीय निःशस्त्रीकरणाचे पुरस्कर्ते असून या संदर्भातील टोअर्डस न्यूक्लिअर होलकॉस्ट (१९८१) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पारंपारिक व अणुकेंद्रीय या दोन्ही इंधनांऐवजी अन्य ऊर्जा उद्‌गम वापरावेत, या आपल्या मताचा त्यांनी प्रचार केला. ते केंब्रिज येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.