रॅली : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील नॉर्थ कॅरोलायना राज्याची राजधानी व वेक परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,४८,२९९ (१९८०). अटलांटिक महासागर किनाऱ्यापासून पश्चिमेस १९३ किमी. आत सस. पासून ११० मी. उंचीवर वसलेले रॅली हे प्रमुख राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक व व्यापारी केंद्र आहे. रॅलीमधील रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या ओक वृक्षांमुळे शहराला ‘ओक वृक्षनगरी’ असे संबोधले जाते. या जागेची शहरासाठी १७८८ मध्येच निवड करण्यात आली होती. त्यानंतर १७९२ मध्ये जोएल लेन यांच्याकडून ४०५ हे. जमीन खरेदी करून तेथे या शहराची स्थापना करण्यात आली. नॉर्थ कॅरोलायनाच्या किनाऱ्यावर इंग्रजांची पहिली वसाहत स्थापन करणाऱ्या सर वॉल्टर रॅली याच्या नावावरून शहराला हे नाव देण्यात आले. येथे पहिले विधानभवन १७९४ मध्ये बांधण्यात आले,ते १८३१ मध्ये जळाले. त्यानंतर १८४० मध्ये पूर्ण करण्यात आलेली १.६ हे क्षेत्रातील विधानभवनाची वास्तू म्हणजे अभिजात ग्रीक वास्तुशैलीच्या पुनरुज्जीवनाचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. ही वास्तू अपुरी पडू लागल्याने १९६२ मध्ये एक नवे भव्य विधानभवन उभारण्यात आले. यादवी युद्धकाळात (१२ एप्रिल १८६१–२६ मे १८६५) जनरल विल्यम शेर्मनने आपल्या सैन्यासह या शहरात विनाप्रतिकार प्रवेश केला (१४ एप्रिल १८६५) युद्धसमाप्तीनंतर ते आपल्या ताब्यातच ठेवले. शहरात अनेक जुन्या पण सुंदर वास्तू असून राज्यशासनाने त्यांत शासकीय कार्यालये ठेवून त्या इमारतींची जपणूक केलेली आहे. रॅली येथेच जन्मलेले (१८०८) अमेरिकेचे सतरावे राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॉन्सन यांचे घर ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करण्यात आले आहे. जोएल लेन यांचे घरही येथे आहे.

रॅली हे शैक्षणिक केंद्र असून येथेच नॉर्थ कॅरोलायना राज्य विद्यापीठ (१८८७), शॉ विद्यापीठ (बॅप्टिस्ट, १८६५) ही विद्यापीठे व सेंट मेरीज (१८४२), पीस (१८५७), सेंट ऑगस्टीन (१८६७) आणि मेरेडिथ (१८९१) ही महाविद्यालये आहेत. सांस्कृतिक, शास्त्रीय व शैक्षणिक घडामोडींचे संशोधनकेंद्र (रिसर्च ट्रँगल) हे नॉर्थ कॅरोलायना राज्य विद्यापीठाचाच एक भाग आहे. रॅलीजवळच १,६१८ हे. क्षेत्रात पसरलेल्या ‘रिसर्च ट्रँगल पार्क’ (१९६०) या विभागात विविध संशोधन प्रयोगशाळांचे जाळेच निर्माण झाले असून त्यामुळेच शहराच्या औद्योगिक विकासास मोठी चालना मिळाली. इलेक्ट्रॉनिकी साहित्य, संगणक, वस्त्रोद्योग, दळणवळण व बांधकामाचे साहित्य, तंबाखू व वनोत्पादन प्रक्रिया, रसायने, औषधे, सौंदर्यप्रसाधने, अन्नप्रक्रिया, कृषी अवजारे, कागद, काचसामान हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. रसायन व वस्त्रोद्योग विकास आणि संशोधन केंद्र शहरात आहे. नॉर्थ कॅरोलायनाच्या पूर्व भागातील हे ठोक व किरकोळ व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्ग यांनी रॅली महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडलेले आहे. शहरात अनेक विमा कंपन्यांची मूळ कार्यालये आढळतात.

नॉर्थ कॅरोलायना कला, इतिहास व प्रकृतिविज्ञान संग्रहालय, नॉर्थ कॅरोलायना सिंफनी वाद्यवृंद, रॅली लिटल थिएटर, पुलेन व चेव्हिस उद्याने ही शहरातील प्रमुख आकर्षणे होत. रॅली नागरी केंद्र (१९७७) हे दुतर्फा शोभिवंत वृक्ष असलेल्या प्रमुख मार्गाने विधानभवनाशी जोडलेले आहे.

चौधरी, वसंत