रॅपिड सिटी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील साउथ डकोटा राज्यातील पेनिंग्टन परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ४६,४९२ (१९८०). हे रॅपिड क्रीक नदीच्या काठावर आणि ब्लॅक हिल्स या पर्वतसमूहाच्या पूर्व कडेवर सस. पासून ९७८ मी. उंचीवर वसले आहे. रॅपिड क्रीक नदीच्या नावावरूनच शहराला सांप्रतचे नाव मिळाले आहे. ब्लॅक हिल्समध्ये लागलेल्या सोन्याच्या खाणींच्या शोधामुळे तिकडे सोन्यासाठी माणसांचा ओघ सुरू झाला परिणामी रॅपिड सिटीची स्थापना करण्यात आली (१८७६). १८८२ मध्ये त्याला शहराचा दर्जा प्राप्त झाला. सांप्रत शहराला पर्यटन, उद्योग व व्यापार दृष्टींनी महत्त्व प्राप्त झालेले आहे. जवळपासच्या प्रदेशात सापडणारे सोने, चांदी, फेल्स्पार, जिप्सम, अभ्रक, युरेनियम इ. खनिज उत्पादनांवर तसेच परिसरात चालणारे पशुपालन, लाकूडतोड व शेती यांवर आधारित अनेक उद्योगधंदे येथे स्थापन झाले आहेत. सिमेंट, बांधकामाचे साहित्य, फिरती घरे, इलेक्ट्रॉनिकी साहित्य, मृत्पात्री, पीठ, दुग्धोत्पादने, मांसप्रक्रिया, जडजवाहीर हे येथील प्रमुख उद्योग आहेत. साउथ डकोटा खाणकाम आणि तंत्रविद्या संस्था (१८८५), राष्ट्रीय व्यवसाय महाविद्यालय (१९४०) या येथील महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था होत. यांशिवाय शहरात जीवाश्म व विविध खनिजे यांचा उत्कृष्ट साठा असलेले भूविज्ञानविषयक, सू इंडियनांची कला व हस्तोद्योगनिदर्शक, तसेच वाहतूकविषयक व इतिहासविषयक संग्रहालये आहेत. एल्सवर्थ वायुसेना तळ, मौंट रशमोर राष्ट्रीय स्मारक, क्रेझी हॉर्स मौंटन, कस्टर स्टेट पार्क, रॉकरव्हील गोल्ड टाउन, विंडकेव्ह नॅशनल पार्क, बॅडलँड्स नॅशनल मॉन्युमेंट इ. शहरांच्या साधारण जवळपासच्या प्रेक्षणीय स्थळांचे प्रवेशद्वार म्हणूनही रॅपिड सिटीला मोठे महत्त्व आले आहे. शहरापासून सु. ४० किमी. वरील मौंट रशमोर राष्ट्रीय स्मारकामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन, टॉमस जेफर्सन, अब्राहम लिंकन व थीओडोर रूझवेल्ट या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी ग्रँनाइटी खडकांतील भव्य मस्तकशिल्पे (प्रत्येकी १८ मी. उंचीची) प्रवाशांचे मोठेच आकर्षण ठरली आहेत. जून १९७२ मध्ये ब्लॅक हिल्स भागात झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे तसेच तीमुळे फुटलेल्या दोन मातीच्या धरणांमुळे रॅपिड क्रीक नदीला प्रचंड पूर आला. परिणामतः शहरातील २३५ लोक प्राणास मुकले आणि सु. १२ कोटी डॉलर किंमतीची वित्तहानी झाली.
चौधरी, वसंत