रॅटल साप : अमेरिकेत आढळणारा हा एक विषारी सरंध्र मंडली सर्प आहे. याच्या सिस्ट्रुरस आणि क्रोटॅलस अशा दोन प्रजाती आहेत. पहिलीत चार आणि दुसरीत बावीस जाती आहेत. या सगळ्या सापांच्या शेपटीच्या टोकावर आवाज करणारा एक शृंगी अवयव−रॅटल नेहमी असतो. चवताळल्यावर हा आपले शेपूट वेगाने हलवितो आणि रॅटलच्या योगाने एक विशिष्ट प्रकारचा, जोराने फुरकारल्यासारखा आवाज उत्पन्न होतो. एंजिनातून वाफ सोडताना जसा आवाज होतो तसा हा आवाज असतो. मोठ्या सापाचा आवाज ३०−३५मी. अंतरापर्यंत ऐकू जातो.

पूर्वी अमेरिकेत सगळीकडे रॅटल साप आढळत असत पण हल्ली पुष्कळ राज्यांतून ते नामशेष झाले आहेत. रॅटल साप रखरखीत किंवा अर्धवट रूक्ष प्रदेशात राहतो खडकाळ आणि झुडपे असणारा प्रदेश त्याला जास्त मानवतो. काही जाती दलदलीत किंवा दमट जंगलात राहतात काही सखल प्रदेशात तर काही पर्वतात सु. ४,५७२ मी. उंचीवर देखील राहतात. काही जातींचे रॅटल साप (उदा., क्रोटॅलस विलार्डाय) ६० सेंमी. पेक्षा जास्त लांब नसतात पण कित्येकांची (उदा., क्रो. ॲट्रॉक्स) लांबी २१३ सेंमी.पेक्षाही जास्त असते. बहुतेक जातींत नर मादीपेक्षा मोठा असतो.

हा साप सामान्यतः दिवसा बाहेर हिंडतो पण उन्हाळ्यात भक्ष्य मिळविण्याकरिता हा रात्री बाहेर पडतो. उंदीर, घुशी, खारी, ससे, सरडे व कधीकधी बेडूक हे यांचे खाद्य होय.

उन्हाळ्यात एखाद्या सुरक्षित जागी ते ग्रीष्मसुप्ती घेत (काही प्राण्यांना उन्हाळ्यात येणाऱ्या अर्धवट किंवा पूर्ण गुंगीच्या अवस्थेत) पडतात आणि हिवाळ्यात जमिनीतील बिळात ते शीतसुप्ती घेतात (काही प्राणी हिवाळ्यात अर्धवट अथवा पूर्ण गुंगीच्या अवस्थेत जातात). रॅटल सापाची मादी अंडी घालीत नाही ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात तिला २−३० पिल्ले होतात. लहान जातींच्या माद्यांना थोडी पिल्ले होतात. जन्मल्याबरोबर पिल्ले स्वतंत्रपणे राहू लागतात.

शेपटीवरील रॅटलमध्ये वाळलेल्या शृंगी त्वचेचे बनलेले २−१५ अंडाकार पोकळ खंड ओळीने एसून ते एक दुसऱ्यात सैलपणे बसविलेले असतात. हे खंड कात टाकण्याच्या वेळी दर वर्षी एक याप्रमाणे शेपटीच्या टोकावर तयार होतात. सगळ्यात जुना खंड रॅटलच्या टोकावर आणि अगदी नवा त्याच्या बुडाशी असतो. टोकावरचे खंड तुटून किंवा झिजून नाहीसे होतात. शेपटीचे कंपन वेगाने सुरू झाले म्हणजे या खंडांची दर सेकंदाला ४५−६० कंपने होऊन विशिष्ट आवाज निघतो. शत्रूला घाबरविण्याकरिता हे साप हा आवाज काढतात असे काहींचे म्हणणे आहे इतर कित्येकांच्या मताने विणीच्या हंगामात नराला किंवा मादीला बोलावण्याकरिता या आवाजाचा उपयोग होतो.

नाक व डोळा यांच्या मध्ये असणाऱ्या खळग्याचे कार्य इतर सरंध्र मंडली सापांच्या खळग्याच्या कार्याप्रमाणेच असते त्याने तापमानातील बदल कळतात आणि भक्ष्याचा (सस्तन प्राण्यांचा) माग काढता येतो.

विषाचे उपकरण इतर विषारी सापांप्रमाणेच असते. टोकावर छिद्र असलेले दोन मोठे पोकळ विषदंत असतात. विषग्रंथीतील विष एका वाहिनीमधून विषदंताच्या पोकळीत जाऊन टोकावरील छिद्रामधून दंशाच्या वेळी प्राण्याच्या अंगांत शिरते. विषदंत ठराविक काळाने पडून त्यांच्या जागी नवे उगवतात. याच्या विषापासून अँटिव्हेनिन (प्रति-प्रसर्पविष) तयार करतात.

पहा : घोणस बांबू साप

कर्वे, ज. नी.