रहीम : (१५५६−१६२६). मध्ययुगीन मुसलमान हिंदी कवी. जन्म लाहोर येथे. मूळचे नाव अब्दुर्रहीम खाँ ‘खानखाना’. काव्यात ‘रहिमन’ असेही त्याचे नाव आढळते. अकबराचे पालक बहिरामखान हे त्याचे वडील होत. रहीम पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा खून झाला. तेव्हापासून अकबराच्या देखरेखीखाली त्याचे पालनपोषण व शिक्षण झाले. त्याच्या कार्याने संतुष्ट होऊन अकबराने त्याला १५७२ मध्ये जहागीर व १५७६ मध्ये गुजरातची सुभेदारी दिली. गुजरात मधील बंडाळी त्याने १५८३ मध्ये मोडून काढली. १६२३ मध्ये जहांगीरविरुद्ध गादी मिळविण्यासाठी शाहजहान उभा राहिला, तेव्हा त्याने शाहजहानची बाजू घेतली आणि म्हणून त्याला दिलेला ‘खानखाना’ हा किताब काढून घेण्यात आला होता पण त्याने क्षमा मागताच जहांगीराने तो त्याला परत दिला. अरबी, फार्सी, तुर्की, संस्कृत, हिंदी, अवधी, ब्रज इ. भाषांवर त्याचे प्रभुत्व होते. १५८४ मध्ये ‘खानखाना’, १५८९ मध्ये ‘मीर’ व ‘वकील’ हे किताब त्याला देण्यात आले. वैयक्तिक जीवनात मात्र त्याच्या वाट्याला दुःखच अधिक आले. त्याच्या बालपणीच वडील, बेचाळीसाव्या वर्षी पत्नी, पुढे तीन मुलगे व आश्रयदाता अकबर यांच्या मृत्यूंचे आघात त्याच्यावर झाले. तो मोठा उदार व दानशूर होता. उत्तरकाळात कौटुंबिक आपत्ती व वाईट दिवस आले, तेव्हा स्वतःच्या गरिबीपेक्षा आपण याचकांना काही देऊ शकत नाही, याचेच त्याला अधिक दुःख होत असे.
रहीमचा दोहावली हा सु. तीनशे दोह्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे. त्याने ‘सतसई’ लिहिल्याचे सांगण्यात येते पण दोह्यांखेरीज वेगळा ‘सतसई’ ग्रंथ अजूनपर्यंत तरी उपलब्ध झाला नाही. नगरशोभा ह्या त्याच्या रचनेच्या १४२ दोह्यांत निरनिराळ्या जातींच्या स्त्रियांचे शृंगारिक वर्णन आहे. बरवै नायिकाभेद या त्याच्या काव्यात अवधी भाषेत विविध नायिकांची वर्णने व उदाहरणे आली आहेत. मदनाष्टक या काव्यात खडी बोली व संस्कृत अशा मिश्रित भाषेत मालिनी वृत्तात राधा-कृष्णांच्या रासलीलेचे वर्णन आले आहे. याशिवाय बरंबै नावाची १०१ बरवै छंद असलेली त्याची आणखी एक स्वतंत्र रचना उपलब्ध झाली आहे. तसेच त्याचे ६ शृंगारिक सोरठेही उपलब्ध झाले आहे. त्याचे शृंगार सोरठ व रासपंचाध्यायी हे ग्रंथ मात्र उपलब्ध नाहीत. खेट कौतुकजातकम् हा संस्कृत फार्सीमिश्रित हिंदी भाषेत रचलेला त्याचा ज्योतिषविषयावरील ग्रंथ होय. रामायण, महाभारत, पुराणे इत्यादींचा त्याचा सखोल अभ्यास होता. त्याने काही भक्तिपर स्फुट श्लोकरचना संस्कृतमध्येही केली असून ती ‘रहीम काव्य’ वा ‘संस्कृत काव्य’ नावाने प्रसिद्ध आहे. काही श्लोकांत संस्कृत सोबतच हिंदीचाही वापर आढळतो. बाबराने लिहिलेल्या आत्मचरित्राचा रहीमने वाकेआत बाबरी हा तुर्कीवरून फार्सीत अनुवादही केला होता. त्याचा एक फार्सी ‘दीवान’ (काव्यसंग्रह) उपलब्ध आहे. भारतीय संस्कृतीच्या अंतरंगात इतक्या खोलपर्यंत शिरणारा व त्या संस्कृतीशी एकरूप झालेला अन्य मुसलमान कवी सापडणे कठीण आहे. दोहवलीत मुख्यत्वेकरून नीती व भक्तीसंबंधीचे विचार व्यक्त झाले आहेत. शार्दूलविक्रिडित, मालिनी, शिखरिणी, वरवै, दोहा, सोरठ, कवित्त, सवैया वगैरे संस्कृत प्राकृत वृत्तांचा त्याने वापर केला आहे. त्याचे नीतिपर दोहे हिंदीभाषी प्रदेशात खूपच लोकप्रिय आहेत. यात त्याच्या जीवनातील अनुभवांची−विशेषतः कटू अनुभवांची−छाया दिसून येते.
मतिराम व बिहारी यांच्यावर रहीमच्या शृंगारिक वाणीचा प्रभाव पडलेला आहे. व्यास, वृंद व रसनिधी या कवींवर त्याच्या नीतिपर दोह्यांचा प्रभाव पडलेला आहे. तुलसीदासांच्या बरवै रामायणावर त्याच्या बरवै नायिकाभेद या काव्याचा परिणाम झालेला आहे.
रहीमच्या रचनांचे संपादन करून त्या अनेकांनी प्रकाशित केल्या आहेत. त्यांतील १९२८ मध्ये मायाशंकर याज्ञिक यांनी रहीम रत्नावली नावाने व ब्रजरत्नदास यांनी १९४८ मध्ये रहिमनविलास नावाने संपादित केलेली प्रकाशने प्रमाणभूत मानली जातात.
संदर्भ : १. अग्रवाल, सरयूप्रसाद, अकबरी दरबारके हिंदी कवि, लखनौ, १९५०.
२. ब्रजरत्नदास, रहिमनविलास, काशी, १९४८.
३. राष्ट्रभाषा प्रचार समिती, रहीम के दोहे, वर्धा, १९५९.
दुबे, चंदूलाल द्रविड, व्यं. वि.