रसस्राव : (ब्लीडिंग). काही उच्च दर्जाच्या वनस्पतींना हजा वा जखम झाल्यास त्यांच्यातून पाण्यासारखा द्रव वाहतो, त्याला रसस्राव म्हणतात. इजा न होता थेंबांच्या रूपात होणाऱ्या पाण्यासारख्या द्रवाच्या स्त्रावाला ⇨निस्यंदन म्हणतात. रसस्राव व निस्यंदन यांच्यात निकटचा संबंध आहे, असे काहींचे मत आहे. या दोन्ही प्रक्रियांचा समावेश ‘निर्यास’ या एकाच प्रक्रियेत केला जातो. ⇨मॅपल, बर्च [⟶ भूर्ज] व काही वेलींची टोके पाने येण्यापूर्वी तोडून टाकल्यास किंवा कुंडीत लावलेल्या वनस्पती पूर्णपणे छाटल्यास उरलेल्या भागातून काही वेळ हा स्राव होतो, कारण मुळांतील दाबाने वाहिन्यांत खेचले गेलेले पाणी बाहेर येते. या दावाचे अस्तित्व (व मापन) योग्य प्रयोग व साधने यांनी सिद्ध करता येते. तो दाब सामान्यपणे एका वातावरणापेक्षा आधिक नसतो परंतु बर्च वृक्षामध्ये दोनपेक्षा जास्त व टोमॅटोत सहा वातावरणांइतका दाब असतो. तसेच या रसस्रावामुळे २४ तासांत बाहेर पडणारे पाणी वेलीतून १ लिटरपर्यंत, बर्चातून ५ लिटरपर्यंत व तालासारख्या (उदा., शिंदी, ताड, माड इ.) वृक्षांतून १०−१५ लिटरपर्यंत असते. हे प्रमाण दिनमान, ऋतुमान, वनस्पतीची विकासावस्था इत्यादींवर अवलंबून असते. वसंत ऋतूतील रसस्रावात अनेक प्रथिने, कार्बनी पदार्थ, एंझाइमे (जीवरासायनिक प्रक्रियांना मदत करणारी प्रथिने) इ. पदार्थ असतात याचा संबंध संचित पदार्थांना गती देणे व उमलणाऱ्या कळ्यांना वाहिन्यांतून अन्नपुरवठा करणे यांच्याशी असतो. अशा रसस्रावाचा मनुष्याने मोठ्या प्रमाणावर व्यावहारिक उपयोग करून घेतला आहे. उदा., मॅपलच्या रसापासून साखर, शिंदी वृक्षांपासून नीरा, शिंदी व गूळ इ. आणि ताड, माड इ. वृक्षांपासून ताडी, माडी इ. मद्यप्रकार बनविले जातात.
पहा : निस्यंदन वनस्पति व पाणी.
परांडेकर, शं. आ.