रसदयंत्रणा, सैनिकी : सैनिकी हालचाल आणि निर्वाह यांसाठी करण्यात येणारी व्यवस्था. युद्धकालीन व शांतताकालीन त्याचप्रमाणे युद्धक्षेत्रातील व त्या क्षेत्राबाहेरील देशांतर्गत अशी रसदयंत्रणेची व्याप्ती असते. रणनीती, व्यूहतंत्र आणि गुप्तवार्तासंकलन यांबरोबरच रसदयंत्रणा हे युद्धशास्त्राचे एक महत्त्वाचे अंग होय. सैनिकी हालचाल, त्यासाठी सर्व प्रकारच्या साधनसामग्रीचा पुरवठा व आवश्यक सेवांची उपलब्धता हे रसदव्यवस्थेचे मुख्य घटक होत.

सामान्यपणे प्रत्येक युद्धकेंद्रावर लढाईची आखणी करणारा आणि त्याला जोडून रसदयंत्रणा राबविणारा असे दोन विभाग असतात. रसदयंत्रणेची काही तत्त्वे आहेत. उदा., दूरदर्शिपणा, काटकसर, साधनसामग्रीचा सम्यक उपयोग, लवचिकपणा इत्यादी. गरजेपुरताच रसद पुरवठा व्हावा त्याचप्रमाणे शस्तूच्या डावपेचांमुळे युद्धाचा नियोजित येत बदलला, तर रसदयंत्रणेत त्यानुसार बदल करता येईल, एवढा लवचिकपणा रसदव्यवस्थेत असावा लागतो.

रसदयंत्रणा प्रत्यक्षात उभी करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. संभाव्य किंवा अभिप्रेत संघर्षाचा भौगोलिक परिसर, तेथील रस्ते, पूल, वाहतूक सुविधा इत्यादींची परिस्थिती, त्या भागातील हवामानाचे स्वरूप यांसारख्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. सैन्याच्या हालचालींसाठी लागणारी वाहने, वाहतुकीची अन्य साधने, दारूगोळा, शस्त्रास्त्रांची किंवा वाहनांची दुरस्ती, शिपायांचे अन्नधान्य, कपडेलत्ते, तंबू, पिण्याचे पाणी इ. बाबी रसदयंत्रणेच्या नियोजनात मोडतात. जखमी होणाऱ्यात सैन्याचा, युद्धकैद्यांचा अंदाजही घ्यावा लागतो. झटपट रस्ते किंवा पूल तयार करण्याची साधनसामग्री जवळ बाळगावी लागते.

सैनिकी दलातील अनेक विभाग रसदयंत्रणेच्या कामी राबविले जातात. सैनिकी वैद्यकीय विभागापासून सैनिकी टापालव्यवस्थेपर्यंत अनेक विभाग या कामी सहभागी असतात. या विविध प्रकारच्या सेवा क्यू (क्वार्टर मास्टर) सेवा म्हणून संबोधल्या जातात. त्यांपैकी प्रशासन सेवेत सैनिकी कायदेकानू, सैनिकांच्या शौर्याच्या कामगिरीचे तपशील, जखमी व मृत सैनिकांची तपशीलवार आकडेवारी इ. कामे सुपविलेली असतात.

युद्धक्षेत्रातील रसतयंत्रणा व शांततेच्या काळातील रसदयंत्रणा यांमध्ये फरक असतो. युद्धक्षेत्रातील रसदयंत्रणा अधिक तत्पर, वेगवान आणि सुविहित स्वरूपाची असावी लागते. रसदपुरवठ्यात विलंब होणे तेथे घातक ठरते. वायुसेना आणि नौसेना यांना लागणारे अन्नधान्य, इंधन, वैद्यकीय सेवा इ. गोष्टींचा पुरवठा भूसेनेच्या संबंधित विभागातर्फे करण्यात येतो.

सामान्यपणे देशाच्या रसदयंत्रणेची क्षमता ज्या प्रकारची असेल, त्यावर त्या देशाचे सैनिकी व्यूहतंत्र तसेच परराष्ट्रीय धोरण अवलंबून असते. अण्वस्त्रांच्या निर्मितीमुळे विद्यमान काळात रसदयंत्रणेवद्दलचा पारंपरिक दृष्टिकोण आणि व्यवस्था यांत बदल करणे अपरिहार्य ठरले आहे. मुख्यतः साधनसामग्रीचा पुरवठा आणि निर्मिती या दोन्ही प्रकारच्या विभागांचे एकाच ठिकाणी केंद्रीकरण न करता ते मोठ्या परिसरात विखरून ठेवणे आवश्यक ठरले आहे. त्याचप्रमाणे अंदाजाहून अधिक साधनसामग्रीचा पुरवठा करणे व त्या साधनसाग्रीच्या निर्मितीची क्षमता वाढवणे आवश्यक ठरले आहे. पुरवठा आणि निर्मिती यांच्या विकेंद्रीकरणामुळे अर्थातच अधिक खर्च, अधिक विलंबाची शक्यता यांसारख्या परिणामांना तोंड देणे भाग पडते. त्याचप्रमाणे समतोल अशा पर्यायी वाहतूक व्यवस्थेचीही गरज आहे. संभाव्य अण्वस्त्रयुद्धाच्या भीतीपोटी युद्धसाहित्याचे जादा उत्पादनही केले जाते. अण्वस्त्रांचे साठे ज्या भागात असतात, तेथे सुरक्षिततेचेही प्रश्न निर्माण होतात.

भारत सीमेवरील रसदयंत्रणा : भारताच्या उत्तर सीमेवरील प्रदेश डोंगराळ आहे. रस्ते मोजके असतात, त्यांमुळे गाड्यांचे तांडे जमवून जाणेयेणे करावे लागते. भारताच्या नैर्ऋत्य व पूर्व सीमेवर जंगलमय डोंगराळ प्रदेश आहे, तर वायव्य सीमेवर सपाट प्रदेश व थरचे वाळवंट आहे. अति उत्तरेत व पूर्वेंकडे बर्फही पडते. अतिवृष्टीमुळे वाहतुकीत अडथळे तसेच अपघात निर्माण होतात. त्यामुळे ह्या भागात गाड्यांची झीज व मोडतोड मोठ्या प्रमाणात होते. उंच शिखरांवर छातीचे व फुप्फुसाचे विकार तर पूर्वेकडील जंगलांत हिवताप, विषमज्वर, कावीळ, हगवण यांसारखे रोग जडण्याची शक्यता असते. आपत्कालात या प्रदेशात वायुदराची विमाने व हेलिकॉप्टर यांचा उपयोग करावा लागतो. रसद उतरवणे, जखमी व गंभीर परिस्थितीतले रोगी हलवणे, डाक पोहोचविणे इ. कामे विमाने करतात. दळणवळणाच्या अडचणींमुळे उन्हाळ्यातच आवश्यक वस्तूंची बेगमी करून ठेवावी लागते. त्यासाठी अहोरात्र शेकडो गाड्या खालीवर धावत असतात.

लढाईच्या काळात दारूगोळ्याच्या मागणीत वाढ होते. तसेच पूल व रस्ते तयार करण्याची साधनसामग्री, काटेरी तारा, वाळूच्या पिशव्या, सुरुंग इ. संरक्षणसाहित्य पुरवावे लागते. तसेच जखमी सैनिकांना त्वरित रुग्णालयापर्यंत पोहोचवावे लागते. कधी कधी युद्धकैद्यांची समस्याही उभी राहते. लढाईतील मृतांच्या दफनाची व्यवस्था करावी लागते. तसेच नवे व रजेवरून परत आलेले सैनिक प्रवासी छावण्यांतून पुढे धाडणे ही कामे महत्त्वाची असतात. मोडक्या गाड्यांच्या बदल्यात नवीन गाड्या, तोफा, रणगाडे यांची हालचालही करावी लागते. त्याशिवाय निर्वासितांकरता वेगळे रस्ते व तळ बांधावे लागतात व युद्धक्षेत्रातून त्यांना सुरक्षित दूर ठेवावे लागते.

जिंकलेल्या शत्रुप्रदेशावर अंमल प्रस्थापित करणारी वेगळी यंत्रणा असते व मुलकी अधिकारी तेथे आपला जम बसवतात. सैनिकांना पगार देणारी व टपालाची ने-आण करण्याची कार्यालये ठिकठिकाणी असतात. तसेच दैनंदित उपभोगाच्या वस्तू पुरविण्याची व्यवस्थाही केलेली असते. युद्धाच्या आघाडीमागे काही अंतरावर रसदयंत्रणा शांतपणे काम करीत असते.

पहा : युद्ध आणि युद्धप्रक्रिया संरक्षणविद्या.

संदर्भ : 1. Baker, J. R. E. Ed. W. G. Lindsell : Military Organization and Administration, London, 1957.

2. Constantin, James A. Principles of Logistics Management, 1966.

3. Daniel, H. For Want of a Nail : The Influence of Logistics on War. 1948.

4. Eccles, H. E. L. Logistics in the National Defence, Pennsylvnia, 1959.

5. Hanning, H. The Peaceful Uses of Military Forces, New York, 1968.

6. Howard, M. The Central Organisation of Defence, 1970.

7. Huston, James A. The Sinews of War : Army Logistics 1755-1953, 1966.

पित्रे, का. ग.