रस : (इंटरेस्ट). मानसशास्त्रव शिक्षणाशास्त्र यांतील एक संज्ञा. ‘इंटरेस्ट’ वा रस ही संज्ञ विविधार्थांनी उपयोजिली जाते आणि म्हणूनच ती काटेकोर नसून संदिग्ध आहे. सर्वसाधारणपणे रस म्हणजे आवडीनिवडी, रुची या अभिरुची. आपला कल कशाकडे आहे आणि आपली प्रगती कोणत्या क्षेत्रात होईल हे समजणे सोपे नाही. या विषयाचे शास्त्रीय विवेचन मानसिक कसोट्यांप्रमाणेच अत्यंत उपयोगी होईल, हे लक्षात घेऊन १९१९ साली कार्नेगी तंत्रविद्या संस्थेने हे संशोधन हाती घेतले. यशस्वी स्त्री-पुरुषांच्या रसविषयांचे एकूण सांघातिक स्वरूप कसे असते ते निश्चित करण्याकरिता कार्नेगी संस्थेतील एडवर्ड के. स्ट्राँग व तर शास्त्रज्ञांनी विभिन्न व्यवसायातील यशस्वी व्यक्तींच्या आवडीनिवडींचा मागोवा घेऊन एक रसविषयक जंत्री सिद्ध करून ती १९२७ मध्ये प्रसिद्धही केली.

विभिन्न व्यवसाय, करमणूकप्रकार, शालेय विषय, व्यक्तिप्रकार इ. ४०० हून अधिक विषयांचा ह्या जंत्रीत समावेश आहे. या जंत्रीतील प्रत्येक विषयापुढे ‘आवडतो’, ‘विशेष आस्था नाही’ वा ‘अप्रिय’ यांतील इष्ट तो शब्द लिहावयाचा असतो. या उत्तरांवरून व्यक्तींचे रसविषय निश्चित करता येतात. वयोवर्ष २० नंतर साधारणतः रसविषय स्थिर होतात, म्हणून या जंत्रीचा उपयोग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि व्यवसाय शोधणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्याकरिता केला जातो.

बालकांच्या रसविषयाचेही संशोधन करण्यात आज मानसशास्त्रज्ञ गुंतले आहेत. एडवर्ड थॉर्नडिक म्हणतो, की बालपणापासून तो प्रौढ विद्यार्थिदशेपर्यंत रसविषय सामान्यतः स्थिरच असतात तथापि रॉबर्ट हॉपॉकच्या मते १/३ हून अधिक व्यवसायी व्यक्तींना आपल्या कामात रस नसतो. एडवर्ड स्प्रॅन्गरच्या मते तत्त्वचिंतक, व्यवहारी, कलाप्रेमी, समाजप्रेमी, राजकारणी आणि धार्मिक असे मनुष्याचे रसवृत्त्यनुसार सहा आदर्श प्रकार असतात आणि प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व हे ह्या प्रकारांच्या कमीअधिक प्रमाणातील मिश्रण असते. पुढील संशोधनानुसार असे दिसून येते, की स्प्रॅन्गरप्रणीत रसविषयी संघातात परिस्थित्यनुसार परिवर्तन होत असते. व्यक्तिमत्त्व आणि रसविषय यांच्यातील संबंधाबाबत विविध प्रकारे संशोधन सुरू आहे.

पहा : वृत्ति व्यक्तिमत्त्व सर्जनशीलता.

संदर्भ : 1. Campbell, D. P. Manual for the Strong-Campbell Interest Inventory, Stanford, Calif, 1974.

2. Thorndike, R. L. Hagen, E. Measurement and Evaluation in Psychology and Education, New York, 1969.

कुलकर्णी, वा. मा.