रत्ने : सामान्यपणे आकर्षक रंगरूपाच्या टिकाऊ आणि दुर्मिळ असल्यामुळे मौल्यवान असणाऱ्या अशा प्रकारच्या खनिजांना रत्न असे म्हटले जाते. बहुसंख्य रत्ने ही खनिजांचे प्रकार असले तरी मोती, प्रवाळ (पोवळे), अंबर अशा काही खनिजेतर, प्राणिजन्य अथवा वनस्पतिज पदार्थांचाही समावेश त्यांच्या आकर्षक रंगरूपामुळे रत्नांमध्ये केला जातो. रत्नांचे महारत्ने व उपरत्ने असे दोन भाग केले जातात. प्राचीन ग्रंथांत ‘हिरा, मोती, प्रवाळ, गोमेद, इंद्रनील (नीळ), वैदूर्य, पुष्कराज, पाचू आणि माणिक’ ही नऊ महारत्ने व वैक्रांत (तोरमल्ली), सूर्यकांत (फेल्सपार), चंद्रकांत (फेल्सपार), राजावर्त (लॅपिस लॅझुली), पिरोजा, अकीक (ॲगेट) इ. उपरत्ने गणिली आहेत.
इतिहास : भारतीय आर्यांना फार प्राचीन काळापासून रत्नांसंबंधी माहिती होती. वैदिक व इतर प्राचीन संस्कृत वाङ्मयात ठिकठिकाणी रत्नांचे उल्लेख आले आहेत. महाभारतात वर्णन केलेला स्यमंतक मणी विष्णूच्या छातीवर रुळणारा कौस्तुभमणी, मनातील इच्छा पुरवणारा चिंतामणी, नागाच्या डोक्यावर आढळणारा नागमणी हे सारे मणी रत्नेच होती. ऋग्वेदात तीन ठिकाणी सप्तरत्नांचा उल्लेख असून एके जागी एकवीस रत्नांचा उल्लेख आला आहे. पुराणात रत्ने, रत्नखचित हार, मेखला, किरीट, कुंडले यांचे अनेक उल्लेख आढळतात. वैदिक काळापासून आजतागायत रत्न ही वैभवनिदर्शक वस्तू मानली जात आहे. नकली व हिणकस रत्ने ओळखण्यासाठी रत्नपारखी हा खास वर्ग त्या काळापासून चालत आला आहे. रत्नपरीक्षेचे एक स्वतंत्र शास्त्र निर्माण झालेले होते आणि त्यासंबंधीचे अनेक ग्रंथ, उदा., कौटिल्याचे अर्थशास्त्र, बुद्धभट्टाचा रत्नपरीक्षा हा ग्रंथ, अगस्तीमत, नवरत्नपरीक्षा, मानसोल्लासरत्नसंग्रह, रत्नसमुच्चय, लघुरत्नपरीक्षा, मणिमाहात्म्य इ. ग्रंथ लिहिले गेले होते. या ग्रंथांत रत्नांची नावे, रत्नपरीक्षेचे ठोकताळे, रत्नांचे गुणधर्म, कृत्रिम व नकली रत्ने ओळखण्याच्या पद्धती, रत्नांच्या व्यापारात रत्नांची वजने, मापे घेण्याच्या पद्धती इ. माहिती सविस्तर दिलेली आढळते. अल्लाउद्दीन खिलजींच्या पदरी खजिना व टाकसाळ विभागाचे अधिकारी असलेल्या ठक्कर फेरू यांनी प्राकृत भाषेत रत्नपरीक्षा हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी रत्नपरीक्षेची प्राचीन परंपरा देऊन त्यांच्या काळी प्रचलित असलेल्या पुढील नवरत्नांची यादी दिली आहे : पद्मराग (माणिक), मुक्त्ता (मोती), विद्रुम (पोवळे), मरकत (पाचू), पुखराज, हिरा, इंद्रनील, गोमेद आणि वैदूर्य.
अठराव्या शतकापर्यंत भारत हा जागतिक ख्यातीच्या रत्नांची मोठी बाजारपेठ होती. इसवी सनाच्या आरंभापासून यूरोपीय देश व भारत यांच्यात चालत असलेल्या व्यापारात भारतीय रत्नांना मोठे स्थान होते. भारतीय जवाहिरे रत्नपरीक्षेत निष्णात असत. इंग्लंड, यूरोप, रशिया इ. ठिकाणच्या राजघराण्यांतील बहुतेक सर्व ऐतिहासिक ख्यातीचे हिरे, माणके, पाचू इ. रत्ने भारतातूनच पुरविण्यात आली होती.
पाश्चिमात्य देशांतही रत्नांचा वापर फार प्राचीन काळापासून होत असल्याचे दिसते. ईजिप्तमध्ये तीन हजार वर्षांपूर्वीच्या, रासायनिक प्रक्रिया करून जतन केलेल्या प्रेतासमवेत (ममी) इतर वस्तूंबरोबरच रत्नेही ठेवलेली आढळली. ख्रिस्तपूर्व चारशे वर्षे या काळात ग्रीसमधील इतिहासकार थीओफ्रॅस्टस (इ. स. पू. सु. ३७२–२८७) यांनी रत्नांचे व त्यांच्यावर केलेल्या कोरीवकामाचे वर्णन केले आहे. रोमन इतिहासकार थोरले प्लिनी (इ. स. २३ ते ७९) यांनीही अनेक रत्नांचे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे. सतराव्या शतकात फ्रान्समधील रत्नांचे अभ्यासक झां बातीस्त ताव्हेर्न्ये यांनी १६६१–६८ या काळात भारतभर प्रवास केला. त्यांनी भारतातील हिरे व इतर रत्नांच्या खाणींचे प्रदेश आणि बाजारपेठा यांना भेटी दिल्या त्यांचे बारकाईने निरीक्षण करून त्यांनी या खाणींचे, तसेच अनेक महत्त्वाच्या रत्नांचे व हिऱ्यांचे रंगरूप, आकार, मूल्य आणि इतिहास इत्यादींचे सविस्तर वर्णन रोजनिशीत लिहून ठेवले. त्यामुळे अनेक भारतीय रत्नांचा इतिहास समजण्यास मदत झाली आहे. ताव्हेर्न्ये अत्यंत प्रामाणिक व नेकीचे असल्यामुळे त्यांनी भारतातील मोगल बादशाह आणि इतर राजेरजवाडे, तसेच रत्नांचे व्यापारी यांचा विश्वास संपादन केला होता. त्यांनी दिल्लीला बादशाह औरंगजेबाचीही भेट घेऊन त्यांच्या खजिन्यातील अनेक मौल्यवान रत्ने, राजमुकुट इ. जडजवाहिर पाहिले होते व त्यांचा इतिहास समजून घेतला होता. ताव्हेर्न्ये यांनी भारतातून अनेक हिरे व इतर रत्ने खरेदी करून ती फ्रान्सचे राजे चौदावे लूई यांना पुरवली. ‘होप’ हा जगप्रसिद्ध निळ्या रंगाचा हिरा मुळात ज्या हिऱ्याचा भाग होता तो ताव्हेर्न्ये ब्ल्यू नावाचा निळ्या रंगाचा हिरा त्यांनीच भारतात खरेदी केला होता.
पारंपरिकसमजुती : बॅबिलोनियन संस्कृतीच्या काळापासून ते अठराव्या शतकापर्यंत रत्नांच्या अंगी विशेष औषधी गुण व इतर अद्भुत गूढ शक्त्ती आहेत, अशी लोकांची दृढ श्रद्धा होती. जन्मदिवसानुसार प्रत्येक महिन्याचे विशिष्ट रत्न, तसेच जन्मराशीनुसार प्रत्येक राशीचे विशिष्ट रत्न, तसेच सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ इ. नवग्रहांतील प्रत्येक ग्रहाचे विशिष्ट रत्न अशी रत्नांची वाटणी करण्यात येऊन तशा पद्धतीने अंगावर रत्ने धारण करणाऱ्यांस ती रत्ने विशेष लाभदायक ठरतात, अशी समजूत होती. कोणत्या बोटातील अंगठीत कोणता खडा वापरल्यास शकुनी किंवा अपशकुनी ठरतो याविषयी पारंपारिक समजुती रूढ होत्या. यांतील कित्येक समजुती अजूनही प्रचलित आहेत.
हिऱ्यामुळे शत्रूंशी लढण्यासाठी शौर्य व धैर्य मिळते, भुतेखेते व चेटूक यांपासून संरक्षण होते नील या रत्नामुळे लोकांचा विश्वास संपादन होतो, दारिद्र्यनाश होतो, डोळ्यांच्या आजारापासून रक्षण होते. सर्पविषावर उतारा मिळतो. माणिक रत्नामुळे मनःशांती, प्रेम व समाधान मिळते. अशुभ स्वप्ने पडत नाहीत. पाचूमुळे संसारसुख, धन व यशप्राप्ती होते. जमुनियामुळे मद्य चढत नाही, अंगी शहाणपण येते, पिरोजामुळे घोड्यावरून पडण्यापासून बचाव होतो, अशा प्रकारच्या प्रत्येक रत्नासंबंधीच्या समजुती प्रचारात होत्या. रत्नांच्या या अद्भुत शक्त्तीचा तसेच त्यांच्या औषधी गुणांचा फायदा मिळविण्यासाठी अशा रत्नांचे चूर्ण व भस्म करून ते पोटात घेण्याचीही पद्धत अठराव्या शतकापर्यंत प्रचलित होती. अठराव्या शतकापासून रत्नांभोवतीचे हे गूढतेचे वलय कमी होऊ लागून रत्ने हा खनिजांचा एक प्रकार या दृष्टीने त्यांच्या प्रणमनांक (प्रकाशाचा दिलेल्या माध्यमातील वेग व त्याचा मुक्त्त अवकाशातील वेग यांचे गुणोत्तर), स्फटिकरचना, रासायनिक संघटन इ. गुणधर्मांचा अभ्यास होऊ लागला आणि आता ‘रत्नविद्या’ ही रत्नांच्या पद्धतशीर अभ्यासाची एक स्वतंत्र शास्त्रशाखा झाली आहे.
गुणधर्म : सृष्टीत सु. २,५०० हून अधिक प्रकारची नैसर्गिक खनिजे आढळतात परंतु त्यांतील काही अगदी थोड्या खनिज प्रकारांचीच गणना रत्न म्हणून होते. रत्न या संज्ञेस पात्र होण्यासाठी खनिजांच्या अंगी प्रामुख्याने सौंदर्य, टिकाऊपणा व दुर्मिळता हे गुण असावे लागतात. रत्नांचे सौंदर्य, आकर्षक रंग, स्वच्छ पारदर्शकता, चमक, तेजस्विता, झळाळी यांवर अवलंबून असते आणि हे गुण त्या रत्न-खनिजाच्या प्रकाशीय गुणधर्मावर म्हणजे त्यातून होणारे प्रकाशाचे प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरताना दिशेत होणारा बदल), अपस्करण (आत शिरणाऱ्या पांढऱ्या प्रकाश किरणांचे बाहेर पडताना अनेक रंगी किरणांत पसरणे), प्रकाशाचे कमीजास्त शोषण, द्विवर्णिकता [⟶ प्रकाशकी], तारादर्शकता (रत्नांत ताऱ्याच्या आकाराची प्रकाशित आकृती दिसणे) इत्यादींवर अवलंबून असतात. रत्नांचे प्रणमनांक किमान १·४५ (ओपल) पासून तो कमाल २·६ ते २·९ (संश्लिष्ट-कृत्रिम-रूटाइल) पर्यंत असू शकतात. प्रणमनांक जितका जास्त तेवढी त्या रत्नाची तेजस्विता आणि चमक अधिक असते. मात्र त्यासाठी ते रत्न स्वच्छ पारदर्शक हवे, त्याला योग्य प्रकारे पैलू पाडलेले हवेत आणि उत्तम चमकदार पॉलिश येण्यासाठी ते पुरेसे कठीणही हवे. प्रणमनांकाप्रमाणेच रत्न-खनिजाच्या अंगी अपस्करणाचा गुण असेल, तर त्या रत्नाला विशेष झळाळी दिसते. सर्वसामान्य प्रचलित रत्नांमध्ये हिऱ्याचा प्रणमनांक सर्वांत जास्त (२·४२) असून त्याची कठिनताही (१०) सर्वांत जास्त आहे. त्याचप्रमाणे त्याचे अपस्करणही बरेच जास्त (०·०४४) असल्यामुळे उत्तम पैलूदार हिरा विलक्षण तेजस्वी व झळाळीयुक्त्त दिसतो.
पिरोजा, मॅलॅकाइट यांसारखी काही अगदी थोडी रत्ने वगळता बाकीची सर्व रत्ने अत्यंत शुद्ध रूपात बिनरंगी असतात. त्या रत्नांचे आकर्षक रंग त्यांच्यात अत्यल्प प्रमाणात मिसळलेल्या इतर रंगदायी द्रव्यांच्या योगे आलेले असतात. ही रंगदायी द्रव्ये विविध धातूंची ऑक्साइडे असतात. उदा., क्रोमियम ऑक्साइडामुळे माणकाला लाल रंग आणि पाचूला तसेच डेमंटॉइड गार्नेटाला हिरवा रंग प्राप्त होतो. नील रत्नांचा निळा रंग लोह ऑक्साइड व टिटॅनियम ऑक्साइड यांमुळे आलेला असतो. रत्न-खनिजात इतर पदार्थांचे सूक्ष्म कण अंतर्विष्ट झाल्यामुळे अथवा त्यांच्यात अतिसूक्ष्म भेगा व बुडबुडे काही विशिष्ट रचनेने असल्यामुळेही त्यांना आकर्षक प्रकाशीय गुणधर्म प्राप्त होतात. उदा., माणिक व नील यांच्या षट्कोणी स्फटिकरचनेत सूच्याकार (सुईच्या आकाराची) खनिजे अंतर्विष्ट झाल्यामुळे अशी रत्ने त्यांच्या स्फटिकाच्या उभ्या अक्षाच्या दिशेने पाहिल्यास त्यांच्यात सहा अऱ्यांची चमकदार तारकाकृती दिसते. चंद्रकांतमणी या फेल्सपार जातीच्या रत्नात ऑर्थोक्लेज आणि अल्बाइट या दोन खनिजांची अत्यंत पातळ पटले एकाआड एक पद्धतीने स्फटिकित झालेली असतात, त्यांच्यामुळे प्रकाशाचे परावर्तन व व्यतिकरण [⟶ प्रकाशकी] होऊन आतून सौम्य निळसर प्रकाश पाझरत बाहेर येत आहे, असा भास होतो.
काही खनिजांमध्ये त्यांच्या स्फटिकरचनेत एखाद्या विशिष्ट दिशेने चपट्या पोकळ्या अथवा भेगा असतात किंवा तंतुमय खनिजांची अंतर्विष्टे एकमेकांना समांतर रचलेली असतात. अशा खनिजांचे मदारघाटी (बहिर्गोलाकार) आकाराचे आणि पृष्ठभागी उत्तम झिलई असणारे खडे वरून पाहिल्यास त्यांच्यात मांजराच्या डोळ्यातील उभ्या बाहुलीसारखी प्रकाशाची चमक दिसते. खडा फिरवावा तशी ही चमकही फिरते. ही चमक खनिजाच्या आतून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनामुळे निर्माण होते. अशी फिरती प्रकाशाची चमक दाखवण्याच्या गुणधर्माला मार्जारनेत्रत्व म्हणतात. वैदूर्य ऊर्फ लसण्या (क्रिसोबेरील) हे रत्न मार्जारनेत्री असते.
ओपल खनिजाच्या काही प्रकारांत आतून लाल-पिवळा-निळा-हिरवा असे अनेक रंगांच्या प्रकाशाचे पुंजके असल्यासारखे दिसतात. ओपलच्या पांढरट दुधी अथवा काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर हे रंगीबेरंगी पुंजके फारच आकर्षक दिसतात. या प्रकाराला वर्णविलास असे नाव आहे. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने ओपलच्या अंतरंगाचे परीक्षण केल्यावर ओपलच्या अंतर्रचनेत अस्फटिकी सिलिकेचे अतिसूक्ष्म काही मायक्रॉन व्यासाचे गोलक व त्यांच्यामधील पोकळ जागा यांच्या विशिष्ट रचनेमुळे विविध रंग दिसतात, असे आढळले आहे.
रत्नांचा टिकाऊपणा हा प्रामुख्याने त्यांच्या कठिनतेवर अवलंबून असतो. खनिजांची परस्पर सापेक्ष कठिनता ठरवण्यासाठी फ्रीड्रिख मोस या शास्त्रज्ञाने १ ते १० अशा वाढत्या कठिनतेच्या क्रमाने दहा प्रातिनिधिक खनिजे निवडून त्यांची कठिनता श्रेणी तयार केली. या श्रेणीत १ क्रमांकाचे संगजिरे हे सर्वांत मऊ खनिज आणि १० क्रमांकाचा हिरा हा सर्व नैसर्गिक पदार्थांत सर्वांत कठीण खनिज आहे. क्वॉर्ट्झाची कठिनता ७ आहे आणि हवेत सर्वत्र असणाऱ्या धूलिकणांत क्वार्ट्झाचे सूक्ष्मकण सर्वांत अधिक प्रमाणात असल्यामुळे क्वार्ट्झापेक्षा अधिक कठीण असणाऱ्या खनिजांवर रोजच्या वापरात धुळीमुळे चरे पडत नाहीत. त्यामुळे सामान्यतः ७ पेक्षा अधिक कठिनता असणारी खनिजे रत्ने म्हणून वापरात आलेली दिसतात. याला अपवाद म्हणजे ओपल (५ ते ६·५), चंद्रकांतमणी (६), पोवळे (३·५ ते ४), मोती (२·५ ते ४), पिरोजा (५·६) ही रत्ने ७ पेक्षा कमी कठिनतेची असूनही केवळ त्यांच्या आकर्षक रंगरूपामुळे रत्नांत गणली जातात. [⟶ कठिनता].
टिकाऊपणासाठी रत्न-खनिज केवळ कठीण असून भागत नाही. ते भंगुर म्हणजे आघाताने सहज फुटणारेही असू नये. कठीणपणा व चिवटपणा (म्हणजे सहज न फुटणे) हे अगदी भिन्न गुण आहेत. खनिजांच्या अंगी विशिष्ट दिशेने चांगले पाटन (त्या दिशेने सहज विभागले जाण्याचा गुण) असेल, तर ते खनिज कठीण असूनही सहज दुभंगते. क्वॉर्ट्झ, माणिक, नील इ. रत्नांच्या अंगी पाटनाचा अभाव असतो. पाचूच्या अंगी दुर्बल पाटन असते. हिरा सर्व खनिजांत कठीण असला, तरी त्याच्या अंगी अष्टफलकाच्या पातळीत उत्तम पाटन असते आणि त्या दिशेने हिऱ्यावर आघात केल्यास तो अगदी सहजपणे दुभंगतो. जेड हे रत्न-खनिज सर्व खनिजांत अत्यंत चिवट, सहज न दुभंगणारे आहे. ओपल हे सिलिकेचे अस्फटिकी खनिज, त्याच्यात पाटन नसूनही बरेच ठिसूळ असते.
कोणतेही खनिज रत्न या संज्ञेला पात्र होण्यासाठी त्याच्या अंगी असाव्या लागणाऱ्या सौंदर्य व टिकाऊपणा या गुणांइतकाच आवश्यक गुण दुर्मिळता हा आहे. एखादे खनिज सहज सर्वत्र आढळणारे असले, तरी त्या खनिजाचे रत्नप्रतीचे गुण असणारे नमुने इतके दुर्मिळ असू शकतात की, त्यामुळे अशा नमुन्यांना फार मोठे मूल्य प्राप्त होते. उदा., वैदूर्य (बेरील) हे खनिज निसर्गात अनेक ठिकाणी मुबलक प्रमाणात, मोठ्या स्फटिकांच्या आकारांत सापडते पण त्याच्या पाचू या रत्न प्रकाराचे स्वच्छ पारदर्शक हिरव्या रंगाचे दोषरहित नमुने अत्यंत दुर्मिळ असतात. त्यामुळे अशा पाचूच्या नमुन्यांना त्याच आकाराच्या आणि वजनाच्या हिऱ्यापेक्षाही अधिक मूल्य येऊ शकते.
सर्वसामान्य व्यवहारात प्रचलित असणाऱ्या रत्नांचे व उपरत्नांचे काही महत्त्वाचे भौतिक गुणधर्म व रासायनिक संघटन वेगळ्या कोष्टकात दिले आहेत. हे गुणधर्म, विशेषतः रत्नांचा प्रणमनांक व विशिष्ट गुरुत्व, रत्ने ओळखण्यासाठी उपयोगी ठरतात.
काही सर्वसामान्य प्रचलित रत्ने आणि त्यांचे ठळक गुणधर्म
रत्नाचे नाव व
खनिज प्रकार १ |
रासायनिक संघटन
२ |
स्फ़टिक प्रणाली
३ |
प्रणमनांक
४ |
कठिनता
५ |
विशिष्ट गुरुत्व
६ |
रंग, पारदर्शकता
७ |
विशेष गुणधर्म
८ |
अकीक*
(ॲगेट) |
सिलिकॉन डाय-
ऑक्साइड, SiO2 |
अर्धस्फटिकी | १·५३०
ते १·५३९ |
७ | २·६ | अर्धपारभासी ते अपारदर्शक, दुधी, पिवळसर, तांबूस, काळसर. | एकाआड एक विविध रंगी समांतर पट्टे, समकेंद्री पट्ट्यांची रचना. |
ॲक्वामरीन
(बेरील) |
बेरिलियम ॲल्यु-मिनियम सिलिकेट,
Be3Al2(SiO3)6 |
षट्कोणीय | १·५८०
ते १·५८६ |
७·५ | २·६९ | पारदर्शक, फिकट, आकाशी निळा ते हिरवट निळा. | काही प्रकारांत द्विवर्णिकता दिसते. |
अंबर*
(वनस्पतिज) |
कार्बनी संयुग,
C10H16O + H2S |
अस्फटिकी | १·५४ | २·५
ते ३·० |
१·०४
ते १·१० |
पारदरर्शक ते अर्धपारभासी, पिवळ-सर लाल ते
लालसर तपकिरी. |
जीवाश्म राळ, प्राचीन मृत कीटकांची शरीरे अंतर्विष्ट झालेली दिसतात. |
ॲमेझॉन स्टोन*
(मायक्रोक्लीन फेल्स्पार) |
पोटॅशियम ॲल्यु-मिनियम सिलिकेट,
KAlSi3O8 |
त्रिनताक्ष | १·५२२
ते १·५३० |
६·०
ते ६·५ |
२·५६
ते २·५८ |
पारदरर्शक, पारभासी, निळसर हिरवा. | _ |
जमुनिया*
(क्वॉर्ट्झ) |
सिलिकॉन डाय-ऑक्साइड, SiO2 | त्रिकोणीय
समलंब फलकीय |
१·५४४
ते १·५५३ |
७ | २·६५ | पारदरर्शक, जांभळट लालसर. | _ |
ॲलेक्झांड्राइट
(क्रिसोबेरील) |
बेरिलियम ॲल्यु-मिनियम ऑक्सा-इड, BeAl2O4 | समचतुर्भुजी | १·७५
ते १·७६ |
८·५ | ३·७०
ते ३·७२ |
पारदरर्शक, हिरवट, पिवळसर, लालसर. | दिवसाच्या प्रकाशात हिरवा पण कृत्रिम प्रकाशात काळसर लाल रंग. |
ओपल* | सजल सिलिकॉन
डाय-ऑक्साइड, SiO2 .nH2O |
अस्फटिकी | १·४४०
ते १·४६० |
५·५
ते ६·५ |
१·९८
ते २·२० |
अर्धपारभासी, दुधट पांढरा, क्वचित काळा. | आतून लाल, निळा, हिरवा, जांभळा, पिवळा असे विविध रंगांचे ठिपके चमकताना दिसतात. |
कार्नेलियन*
(कॅल्सेडोनी) |
सिलिकॉन डाय-
ऑक्साइड, SiO2 |
अर्धस्फटिकी | १·५३०
ते १·५३९ |
७ | २·६ | अर्धपारभासी, गुलाबी लाल ते
गर्द लाल |
_ |
काही सर्वसामान्य प्रचलित रत्ने आणि त्यांचे ठळक गुणधर्म – (पुढे चालू)
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
कुन्साइट
(स्पॉड्युमीन) |
लिथियम ॲल्युमिनियम सिलिकेट,
LiAl(SiO3)2 |
एकनताक्ष | १·६६०
ते १·६७५ |
७ | ३·१७
ते ३·१९ |
पारदर्शक, जांभळट गुलाबी. | _ |
क्वॉर्ट्झ* | सिलिकॉन डाय-ऑक्साइड,
SiO2 |
त्रिकोणीय
समलंब फलकीय |
१·५५४
ते १·५५३ |
७ | २·६५ | पारदर्शक, बिनरंगी (शुभ्र). | _ |
आमंडाइन
(गार्नेट गट*) |
लोह ॲल्युमिनियम सिलिकेट,
Fe3Al2Si3O12 |
घनीय | १·७३
ते १·७६ |
७·२५ | ३·७
ते ३·९ |
पारदर्शक, जांभळट, लाल. | लाल रंग लोहामुळे आलेला. |
डेमंटॉइड
(ॲड्राइट) |
कॅल्शियम लोह सिलिकेट,
Ca3Fe2Si3O12 |
घनीय | १·८९ | ६·५ | ३·८५ | पारदर्शक, पोपटी हिरवा. | प्रकाशाचे मोठ्या प्रमाणावर अपस्करण झाल्याने झळाळतो. |
गोमेद
(हेस्सोनाइट- ग्रॉस्युलर) |
कॅल्शियम ॲल्यु-
मिनियम सिलिकेट, Ca3Al2Si3O12 |
घनीय | १·७४ | ७·२५ | ३·६५ | पारदर्शक, नारिंगी तपकिरी. | हेस्सोनाइटामध्ये अल्प प्रमाणात आमंडाइन मिश्रित असतो. |
पायरोप | मॅग्नेशियम ॲल्यु-
मिनियम सिलिकेट, Mg3Al2Si3O12 |
घनीय | १·७३
ते १·७६ |
७ | ३·७
ते ३·९ |
पारदर्शक, रक्तासारखा गर्द लाल. | लाल रंग क्रोमियमाच्या अंशामुळे आलेला. पायरोपआमंडाइन अशी मिश्र गोमेद मालिका आढळते. |
स्पेसारटाइट | मॅंगॅनीज ॲल्युमिनियम सिलिकेट,
Mn3Al2Si3O12 |
घनीय | १·८० | ७ | ४·१६ | पारदरर्शक, पिवळा, नारिंगी, लाल. | _ |
युव्हॅरोव्हाइट | कॅल्शियम क्रोमियम सिलिकेट,
Ca3Cr2Si3O12 |
घनीय | १·८७ | ७·५ | ३·७७ | पारदर्शक, गर्द
हिरवा. |
हिरवा रंग क्रोमियमामुळे, पैलू पाडण्यायोग्य मोठ्या आकाराचे नमुने अत्यंत दुर्मिळ. |
चंद्रकांतमणी
(ऑर्थोक्लेज फेल्स्पार) |
पोटॅशियम ॲल्युमिनियम सिलिकेट,
KAlSi3O8 |
एकनताक्ष | १·५२०
ते १·५२५ |
६ | २·५६ | अर्धपारभासी, आतून रेश्मासारखी चमक दिसते. | ऑर्थोक्लेज आणि अल्बाइट यांच्या एकाआड एक रचलेल्या अतिसूक्ष्म जाडीच्या थरांमुळे रुपेरी रेशमी चमक येते. |
जेड*(जेडाइट) | सोडियम ॲल्युमिनियम सिलिकेट,
NaAlSi2O6 |
एकनताक्ष | १·६५४
ते १·६६७ |
७ | ३·३३ | पारभासी, पांढरट हिरवा, पांढरा, जांभरट, तपकिरी. | तंतुमय अथवा सूक्ष्म कणीदार रचना कोरीव कामासाठी उपयुक्त. |
काही सर्वसामान्य प्रचलित रत्ने आणि त्यांचे ठळक गुणधर्म—(पुढे चालू)
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
जेड(नेफ्राइट) | कॅल्शियम मॅग्नेशियम लोह सिलिकेट, Ca(MgFe)5-(OH)2(Si4O11)2 | एकनताक्ष | १·६२
ते १·६४ |
६·५ | २·९०
ते ३·२ |
पारभासी, राखी, पांढरट हिरवा ते गर्द हिरवा, तपकिरी. | घट्ट एकत्र विणीच्या तंतुमय रचनेचे कोरीव कामासाठी उपयुक्त. |
झिरकॉन* | झिर्कोनियम सिलिकेट, ZrSiO4 | चतुष्कोणीय | १·९२
ते १·९८ |
७·५ | ४·६७
ते ४·७० |
पारदर्शक, शुभ्र, क्वचित निळसर, नारिंगी लाल, हिरवट, पिवळसर. | उच्च प्रणमनांकामुळे हिऱ्याअएवजी वापर. |
तोरमल्ली*
(टुर्मलीन) |
ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह, क्षार (अल्कली) धातू इत्यादींचे बोरो सिलिकेट | त्रिकोणीय | १·६२
ते १·६४ |
७ | ३·०५ | पारदर्शक, शुभ्र, क्वचित निळसर, नारिंगी लाल, हिरवट, पिवळसर. | तीव्र द्विवर्णिकता, बरेच मोठे द्विप्रणमन. |
नील*
(कोरंडम) |
ॲल्युमिनियम ऑक्साइड, Al2O3 | समांतर षट्फलकीय (त्रिकोणीय) | १·७६०
ते १·७६८ |
९ | ३·९९ | पारदर्शक, निळा. | निळा रंग लोह व टिटॅनियम यांच्या अल्पांशामुळे आलेला काही नमुन्यांत तारकादर्शकत्व गुण असतो. |
पाचु* (बेरील) | बेरिलियम ॲल्युमिनियम सिलिकेट, Be3Al2Si6O18 | षट्कोणीय | १·५८५
ते १·५९३ |
७·५ | २·७१
ते २·७४ |
पारदर्शक, हिरवा. | _ |
पिरोजा* (टरकॉइज) | ॲल्युमिनियम व तांबे यांचे सजल फॉस्फेट,
CuO.3Al2O3. 2P2O5.9H2O |
त्रिनताक्ष | १·६१
ते १·६५ |
६ | २·६
ते २·८ |
पारभासी ते अपारदर्शक,
आकाशी निळा ते हिरवट निळा |
पृष्ठभाग काहीसा मेणकट दिसतो उत्तम पॉलिश करता येते. |
पुष्कराज* (टोपॅझ) | ॲल्युमिनियम फ्ल्युओसिलिकेट,
Al2 (F, OH)2SiO4 |
समचतुर्भुजी | १·६३
ते १·६४ |
८ | ३·५३
ते ३·५६ |
पारदर्शक, पिवळा. | उत्क्रृष्ट आधारतल पाटन दिसते, स्पष्ट बहुवर्णिकता दिसते. |
पुष्कराज (पिवळा सफायर) | ॲल्युमिनियम
ऑक्साइड, Al2O3 |
त्रिकोणीय | १·७६० | ९ | ३·९९ | पारदर्शक | भारतात पुष्कराज म्हणून ओळखला जातो. |
पेरिडोट
(ऑलिव्हीन) |
मॅग्नेशियम-लोह सिलिकेट,
(MgFe)2SiO4 |
समचतुर्भुजी | १·६५४
ते १·६९० |
६·५ | ३·३४ | पारदर्शक, हिरवा, पिवळट हिरवा. | तीव्र द्विप्रणमन |
पोवळे* (प्राणिज) | कॅल्शियम कार्बोनेट अल्पांशाने मॅग्नेशियम कार्बोनेट, CaCO3 +
MgCO3 |
_ | १·४९
ते १·६५ |
३·५ | २·६
ते २·७ |
अपारदर्शक, नारिंगी लाल. | अतिसूक्ष्मस्फटिकी कॅल्साइट आणि मॅग्नेसाइट व जैव कार्बनी पदार्थ यांचे मिश्रण. |
काही सर्वसामान्य प्रचलित रत्ने आणि त्यांचे ठळक गुणधर्म (पुढे चालू)
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
माणिक*
(कोरंडम) |
ॲल्युमिनियम ऑक्साइड, Al2O3 | समांतर षट्फलकीय (त्रिकोणीय) | १·७६०
ते १·७६८ |
९ | ३·९९ | पारदर्शक, गर्द लाल | लाल रंग क्रोमियमाच्या अंशामुळे आलेला काही नमुन्यांत तारकादर्शकत्व गुण असतो. |
मार्जारनेत्री* (क्रिसोबेरील) | बेरिलियम ॲल्युमिनियम ऑक्साइड, BeAl2O4 किंवा BeO.Al2O3 | समचतुर्भुजी | १·७५
ते १·७६ |
८·५ | ३·७०
ते ३·७२ |
पारदर्शक ते अर्धपारभासी, गर्द पिवळसर तपकिरी, फिकट पिवळा. | स्फटिकाच्या उभ्या अक्षाला समांतर असलेल्या सूक्ष्म नलिका अथवा सुचींच्या अंतर्विष्ट रचनेमुळे मदारघाटी नमुन्यात प्रकाशाची फिरती चमक दिसते. |
मॉर्डेनाइट (बेरील) | बेरिलियम ॲल्युमिनियम सिलिकेट, Be3Al2Si6O18 | षट्कोणीय | १·५८०
ते १·५९० |
७·५ | २·८० | पारदर्शक, गुलाबी | स्पष्ट द्विवर्णिकता दिसते, सीझियम व रुबिडियम यांच्या अल्पांशामुळे गुलाबी रंग आलेला असतो. |
मोती* (प्राणिज) | कॅल्शियम कार्बोनेट व कॉकिओलिन, CaCO3 + C32H48N2O11 | _ | _ | ३·५ | २·६५
ते २·७१ |
पारभासी, रेशमी चमकदार शुभ्र, पिवळसर गुलाबी छटा. | मोत्यांमध्ये ९०% कॅल्शियम कार्बोनेट ॲरॅगोनाइटाच्या स्वरुपात असते. |
लॅपिस लॅझुली | सोडियम ॲल्युमिनियमचे गंधक व क्लोरीनयुक्त जटिल सिलिकेट | घनीय | १·५० | ५·५ | २·७
ते २·९ |
अपारदर्शक, फिकट ते गर्द निळा. | लॅपिस लॅझुली हे एक खनिज नसून लॅझुराइट, हॉयेन, सोडालाइट या खनिजांचे मिश्रण असलेला खडकाचा प्रकार आहे. |
वैदूर्य* (क्रिसोबेरील) | बेरिलियम ॲल्युमिनियम ऑक्साइड, BeAl2O4 किंवा BeO.Al2O3 | समचतुर्भुजी | १·७५
ते १·७६ |
८·५ | ३·७०
ते ३·७२ |
अर्धपारभासी, हिरवा, हिरवट पांढरा, पिवळा, करडा, उदी. | यालाच लसण्या असे नाव असून त्यात मांजराच्या डोळ्याप्रमाणे फिरती चमक दिसते. |
स्पिनेल* | मॅग्नेशियम ॲल्युमिनेट, MgO.Al2O3 | घनीय | १·७१
ते १·७५ |
८ | ३·६०
ते ४·०६ |
पारदर्शक, लाल, हिरवा, निळा, काळा. | _ |
सिंहलाइट | मॅग्नेशियम ॲल्युमिनियम लोह बोरेट, Mg(AlFe)BO4 | समचतुर्भुजी | १·६८ | ६·५ | ३·४८ | पारदर्शक उदी रंग. | श्रीलंकेत हा सापडतो म्हणून त्या देशावरून नाव पडले आहे. |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
सीट्रीन (क्वॉर्ट्झ) | सिलिकॉन डाय-ऑक्साइड, SiO2 | त्रिकोणीय समलंबफलकीय | १·५४
ते १·५५ |
७ | २·६५ | पारदर्शक, पिवळा, नारिंगी पिवळा. | पिवळा रंग लोहाच्या अंशामुळे. | |
हिरा* | कार्बन, C | घनीय | २·४१८ | १० | ३·५२ | पारदर्शक, शुभ्र, क्वचित पिवळसर, गुलाबी, निळसर छटा. | सर्व खनिजांत सर्वांत कठीण. |
रासायनिक संघटनाच्या दृष्टीने पाहिल्यास हिरा हे एकाच मूलद्रव्याचे–कार्बनाचे–स्फटिकरूप असलेले एकमेव रत्न आहे. बाकीची सर्व रत्ने आणि उपरत्ने दोन अथवा अधिक मूलद्रव्यांच्या संयुगांची बनलेली आहेत. त्यांतही माणिक व नील हे कुरुविंदाचे प्रकार अकीक, ओपल, कार्नेलियन, जमुनिया इ. क्वॉर्ट्झचे प्रकार आणि स्पिनेल, रूटाइल, ॲलेक्झांड्राइट ही रत्न-खनिजे ॲल्युमिनियम, सिलिकॉन, मॅग्नेशियम बेरिलियम, टिटॅनियम इ. मूलद्रव्यांची ऑक्साइडे आहेत. पिरोजा हे ॲल्युमिनियम व तांबे यांचे मिश्र फॉस्फेट आहे आणि मोती, पोवळे व अंबर ही जैव रत्ने वगळता बाकीची बहुतेक सर्व रत्ने सिलिकेटे आहेत. रत्नपरीक्षेच्या दृष्टीने रासायनिक संघटन महत्त्वाचे नसते कारण कोणत्याही साध्या अविनाशक चाचणीने रासायनिक संघटन निश्चित ठरवता येत नाही.
रत्नांचेनैसर्गिकआढळ : निसर्गात विविध प्रकारच्या भूवैज्ञानिक परिस्थितींत व खडकांच्या प्रकारांत रत्ने आढळतात. कित्येक दुर्मिळ व मौल्यवान रत्ने ही अग्निज खडकांची प्राथमिक घटक खनिजे असतात. या खडकांची झीज व धूप होऊन तयार झालेल्या गाळमातीच्या थरात ही रत्न-खनिजे विखुरलेल्या स्थितीत सापडतात. उदा., हिरे पेरिडोटाइट या अत्यल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अत्यल्प असलेल्या) खडकाच्या किंबर्लाइट या प्रकारच्या अग्निज खडकात एक प्राथमिक घटक खनिज स्वरूपात आढळतात. हा खडक सामान्यतः ज्वालामुखी नळाच्या स्वरूपात आणि क्वचित भित्ती व शिलापट्टाच्या स्वरूपातही आढळतो. हिरे असलेल्या किंबर्लाइटाचे ज्वालामुखी नळ दक्षिण आफ्रिका, टांझानिया, कांगो, सिएरा लिओन, भारत, लेसोथो, रशिया आणि उत्तर अमेरिकेत आर्कॅन्सॉ येथे आहेत. हिरायुक्त्त गाळमातीचे जलोढ थर घाना, अंगोला, गियाना, आयव्हरी कोस्ट, नामिबिया, ब्राझील, व्हेनेझुएला, भारत इ. प्रदेशांत असून त्यांतून प्लेसर पद्धतीच्या खाणकामाने हिरे मिळविले जातात.
हिऱ्यांशिवाय इतर रत्न-खनिजे असणारे प्रमुख प्राथमिक खडक म्हणजे पेग्माइट भित्ती आणि शिलारसाच्या अंतर्वेशनामुळे संस्पर्शी रूपांतरण झालेले खडक. चुनखडकात शिलारसाचे अंतर्वेशन झाल्यामुळे चुनखडकाच्या भरडकणी संगमरवर होतो. या खडकात स्पिनेल, कुरुविंद, गार्नेट, स्कॅपोलाइट, एन्स्टॅटाइट यांसारखी अनेक आकर्षक रंगांची खनिजे तयार होतात. ब्रह्मदेशात मोगॉक येथे आढळणारे माणिक रत्नाचे साठे अशाच प्रकारे तयार झालेले आहेत. या प्रदेशात माणिक, नील आणि विविध रंगांचे सफायर या कुरुविंदाच्या रत्न प्रकारांबरोबरच पेरिडोट, पुष्कराज, क्वार्ट्झ, गार्नेट अशी अनेक प्रकारांची रत्न-खनिजे तयार झाली आहेत.
जगभर बहुतेक सर्व अग्निज व रूपांतरित खडकांच्या प्रदेशांत पेग्मटाइट भित्ती आढळतात पण यांपैकी काही फारच थोड्या पेग्मटाइट भित्तींत रत्नप्रकारची खनिजे सापडतात. पेग्मटाइट खडकात सापडणारी प्रमुख रत्ने म्हणजे पाचू, कुन्साइट (स्पॉड्युमिनाचा प्रकार), पुष्कराज व तोरमल्ली ही असून अशी रत्ने असणाऱ्या पेग्मटाइट भित्ती ब्राझील, मादागास्कर, द. कॅलिफोर्निया, कोलंबिया, भारत व श्रीलंका या प्रदेशांत आहेत. या प्रदेशांत बऱ्याच ठिकाणी अशा पेग्मटाइट भित्तींची धूप होऊन त्यांतून सुटी झालेली रत्न-खनिजे गाळमातीच्या थरात प्लेसर साठ्यांच्या स्वरूपात आढळतात आणि त्यांचे उत्पादन प्रामुख्याने प्लेसर साठ्यातूनच केले जाते.
रत्नांचेभौगोलिकवितरण : रत्न-खनिजांचे वितरण जगभरच्या सर्व प्रदेशांत सारख्या प्रमाणात झालेले नसून काही विशिष्ट प्रदेशांत विशिष्ट रत्नांचे साठे एकवटलेले आढळतात. फार प्राचीन काळापासून भारत, ब्रह्मदेश, थायलंड, व्हिएटनाम आणि इंडोनेशिया तसेच श्रीलंका या देशांची मौल्यवान रत्नांच्या नैसर्गिक साठ्यांविषयी जगभर ख्याती होती. भारत हा देश प्रामुख्याने हिऱ्यांचे उत्पादन करणारा होता. काही मौल्यवान माणके, नील व पाचू ही रत्नेही भारतात सापडली होती. श्रीलंकेत हिरा वगळता बाकीची बहुतेक सर्व मौल्यवान रत्ने व उपरत्ने सापडत होती त्यामुळेच श्रीलंकेला रत्नद्वीप हे नाव मिळाले होते. थायलंड आणि व्हिएटनाम यांची नील रत्नासाठी ख्याती होती. नील रत्नांच्या जागतिक उत्पादनापैकी ५०% उत्पादन या दोन देशांतून होई. थायलंडची स्पिनेलसाठीही ख्याती होती. जेड या रत्नाचा पुरवठा प्रामुख्याने ब्रह्मदेश आणि चीनमधून होई. जपानची संवर्धित (कल्चर्ड) मोत्याविषयी त्याचप्रमाणे पोवळे, जमुनिया व क्वॉर्ट्झासाठी ख्याती होती. माणकासाठी ब्रह्मदेशाची विशेष ख्याती होती.
आता हिऱ्याच्या उत्पादनामध्ये द. आफ्रिकेने इतर सर्व देशांना मागे टाकले आहे. सध्या भारतातील हिऱ्यांचे उत्पादन फारच कमी प्रमाणात होत आहे. हिऱ्याचा अपवाद वगळता इतर रत्नांच्या बाबतीत मात्र बाकीच्या सर्व प्रदेशांची ख्याती अजूनही अबाधित आहे. इतर उपरत्नांच्या बाबतींत ऑस्ट्रेलिया मौल्यवान ओपलसाठी प्रसिद्ध आहे. सायबीरियात उत्कृष्ट रत्न प्रतीच्या पुष्कराजाचे व लॅपिस लॅझुलीचे उत्पादन होते, अफगाणिस्तानात ६,००० वर्षांपूर्वीपासून लॅपिस लॅझुलीच्या खाणी चालत आल्या असून त्यांतून अजूनही उत्पादन होत आहे. इराणची प्राचीन काळापासून पिरोजासाठी ख्याती आहे. अफगाणिस्तानातही पिरोजाचे उत्पादन होते. तांबड्या समुद्रातील सेंट जोन हे बेट उत्कृष्ट रत्न प्रतीचे पेरिडोट मिळण्याचे एकमेव महत्त्वाचे ठिकाण आहे. मादागास्कर बेटातील पेग्मटाइट भित्तीत पाचू, तोरमल्ली, गोमेद, पुष्कराज, स्पिनेल, कुन्साइट, ॲमेझॉन स्टोन व सूर्यकांत (पारदर्शक सोनेरी पिवळ्या रंगाचा फेल्स्पार) ही रत्न-खनिजे सापडतात. कॅलिफोर्नियातील सॅन डिएगोच्या प्रदेशात लिथियमयुक्त खनिजे असलेल्या पेग्मटाइट भित्ती आहेत त्यांच्यात कुन्साइट, गुलाबी रंगाचे वैदूर्य व गुलाबी तोरमल्ली मिळते. ब्राझीलमधील मीनास झिराइस आणि मीनास नोव्हास या क्षेत्रांतील पेग्मटाइटात रत्न-प्रतीचे वैदूर्य आणि तोरमल्ली आढळते. ब्राझीलमध्ये मीनास झिराइस क्षेत्रातील डायमॅन्शिया येथे १७२५ मध्ये प्रथम हिरे आढळले. त्यानंतर माट्टू ग्रॉसू, बाईआ, गोयाझ, ॲमेझोनस, मारन्यआउन पराना व साऊँ पाउलू अशा अनेक क्षेत्रांत हिरे आढळले असून या क्षेत्रांतून हिऱ्यांचे उत्पादन होत आहे. यूरोपात बाल्टिक समुद्राच्या लगतच्या प्रदेशात रत्न-प्रतीचे अंबर सापडते. रशियात ॲलेक्झांड्राइट आणि मार्जारनेत्री हे क्रिसोबेरिलाचे प्रकार, पाचू आणि इतर रंगाचे वैदूर्य तसेच गोमेद ही रत्ने आढळतात. झेकोस्लोव्हाकियात उत्तम रत्न-प्रतीचे गोमेद सापडतात.
भारतातीलरत्नांचेआढळ : फार प्राचीन काळापासून साऱ्या जगभरच्या देशांना हिरे, माणके, पाचू इ. रत्नांचा पुरवठा करणारा देश अशी भारताची ख्याती होती. यूरोप–आशियातील राजघराण्यांत गाजलेले बहुतेक सर्व ऐतिहासिक महत्त्वाचे हिरे व कित्येक माणके यांचे मूलस्थान भारत होता. १७२० मधील ब्राझीलमधील हिऱ्याच्या क्षेत्राचा व त्यानंतर १८६० मध्ये दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत समृद्ध अशा हिऱ्याच्या क्षेत्रांचा शोध लागल्यानंतर हे चित्र पालटले.
भूवैज्ञानिक दृष्ट्या भारतातील हिरे अत्यल्पसिकत पेरिडोटाइट खडकाच्या ज्वालामुखी नळांत आणि त्यांच्या अपक्षरणाने झालेल्या हिरायुक्त गाळमातीच्या जलोढ थरात विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. हिऱ्याव्यतिरिक्त्त इतर रत्न-खनिजे मात्र प्रामुख्याने प्राचीन अग्निज व गाळाच्या खडकांचे उच्च तापमान व दाबाच्या स्थितीत रूपांतरण होऊन तयार झालेल्या ग्रॅन्युलाइट खडकात, त्यात घुसलेल्या पेग्मटाइट व क्वॉर्ट्झ शिरांत बेरील, पुष्कराज, धुरकट क्वॉर्ट्झ, माणिक, गोमेद इ. रत्न-प्रकारची खनिजे आहेत.
भारतातील हिरे सापडण्याची प्रमुख क्षेत्रे म्हणजे दक्षिणेत कृष्णा व गोदावरी या नद्यांच्या दरम्यानचा वज्रकरूर, कडाप्पा, बल्लारी, कर्नुल, कोलूर इ. गावे असलेला प्रदेश आणि मध्य प्रदेशातील पन्ना हे क्षेत्र ही आहेत. यांशिवाय अल्प प्रमाणात ओरिसातील महानदीच्या खोऱ्यात, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आणि बिहारमधील छोटा नागपूर प्रदेशात तुरळक प्रमाणात हिरे सापडतात [⟶ हिरा].
भारतातील इतर रत्नांचे आढळ खालीलप्रमाणे आहेत.
माणिक :कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या प्रदेशांत तुरळक प्रमाणावर उत्पादन होते. पैलू पाडता येण्याजोगी मौल्यवान, दोषरहित माणके तामिळनाडूतील कंगायम येथे मिळतात. कर्नाटकातील चन्नपट्टण येथे मिळणारी माणके पैलू पाडण्यासाठी उपयुक्त्त नाही. त्यांना मदारघाटी किंवा मण्यांच्या आकारात पॉलिश करतात. कंगायम व म्हैसूर येथे तारक माणके तुरळक प्रमाणात मिळतात. काश्मीरमध्येही काही अपक्षरित पेग्मटाइट भित्तींत तुरळक माणके सापडतात.
नील : जगात गाजलेली काही उत्कृष्ट नील रत्ने काश्मीर प्रदेशातील किश्तवार जिल्ह्यातील पद्दार क्षेत्रात सापडली आहेत मात्र या खाणी अत्यंत दुर्गम जागी असून त्या चोहोबाजूंनी बर्फाच्छादित डोंगर रांगांनी वेढलेल्या आहेत.
पाचू : पाचू, तसेच फिकट निळ्या रंगाच्या ॲक्वामरीन रत्नाविषयी राजस्थान विशेष प्रसिद्ध आहे. राजस्थानातील पाचू असणाऱ्या पेग्मटाइट भित्ती सु. १०० किमी.पेक्षा जास्त लांबीच्या पट्ट्यात आढळतात. या पट्ट्यातील बुबानी, कालीगुमान व राजगढ येथे उच्च प्रतीचे पाचू मिळतात. १९७८ मध्ये ओरिसातील बोलांगीर जिल्ह्यात बीरमहाराजपूर या गावाजवळ पाचूचे नवे क्षेत्र सापडले आहे. या भागात पाचूबरोबरच ॲक्वामरीन, पुष्कराज, गोमेद आणि पिवळे व नारिंगी रंगांचे सफायर ही रत्नेही सापडतात. गुजरातेत पंचमहाल जिल्ह्यातील सेहरा तालुक्यातही नव्याने पाचू व ॲक्वामरीनचे क्षेत्र आढळले आहे. दक्षिण भारतात कोईमतूर जिल्ह्यातील तिरुपूरपासून तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील करूरपर्यंतच्या पट्ट्यात उत्कृष्ट प्रतीचे ॲक्वामरीन तुरळक प्रमाणात सापडतात.
गोमेद : भारतात जेथेजेथे प्राचीन काळचे अग्निज व रूपांतरित आर्कीयन खडक आहेत त्यांच्यात अनेक जागी मोठ्या आकारमानाचे गोमेद स्फटिक आढळतात. मात्र रत्न-प्रतीचे गोमेद प्रामुख्याने राजस्थान, आंध्र प्रदेश, बिहार व ओरिसा या राज्यांत दिसून येतात. तुरळक प्रमाणात कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतही रत्न-प्रतीचे गोमेद मिळतात.
वैदूर्य : राजस्थान व तामिळनाडू या राज्यांत तुरळक प्रमाणात वैदूर्य मिळते. केरळ राज्यात त्रिवेंद्रम जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतीचे म्हणजे ब्राझील व श्रीलंका येथील रत्न-प्रतीच्या वैदूर्याच्या तोडीचे वैदूर्य मिळते.
चंद्रकांतमणी : हे फेल्स्पाराचा उपरत्नाचा प्रकार तामिळनाडू व कर्नाटक या राज्यांत तुरळक आढळतो.
क्वॉर्ट्झ : गुलाबी क्वॉर्ट्झाचे उपरत्न म्हणून वापरता येण्याजोगे स्फटिक कर्नाटक, बिहार व राजस्थान या राज्यांत सापडतात.
जमुनिया : हा क्वॉर्ट्झचा जांभळट रंगाचा उपरत्नाचा प्रकार महाराष्ट्रातील बेसाल्ट खडकातील पोकळ्यांत असणाऱ्या स्फटग्रंथीमध्ये (साधारणपणे गोलाभ व पोकळ असलेल्या आणि आतील बाजूस लहानलहान स्फटिकांचे अस्तर असलेल्या पिंडामध्ये) तुरळक प्रमाणावर आढळतो.
अकीक : हा क्वॉर्ट्झाचा अर्धस्फटिकी पट्टेदार उपरत्नांचा प्रकार बेसाल्टाच्या पोकळ्यांतील स्फटग्रंथीत आढळतो. महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश येथील बेसाल्टात असे अकीक सापडतात.
मोती : प्राचीन काळी तामिळनाडूतील मानारचे आखात व गुजरातेतील कच्छचे आखात या भागांतील समुद्रातून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक मोत्यांचे उत्पादन होत असे. ते अलीकडे घटले आहे. आता त्रिवेंद्रम व कच्छ येथे नव्याने संवर्धित मोत्यांचे उत्पादन सुरू झाले आहे.
रत्नांनाआकारदेणेवपैलूपाडणे : नैसर्गिक अवस्थेत ज्या आकारात व स्थितीत रत्ने सापडतात ती जशीच्या तशी व्यवहारात वापरण्यासाठी योग्य व आकर्षक नसतात. त्यांचे मूळचे स्वाभाविक आकार बरेचदा अनियमित असून त्यांच्या कडा वेड्यावाकड्या असतात आणि पृष्ठभागही मळकट असू शकतो. अशी रत्ने योग्य त्या आकारात कापून त्यांना अनेक पृष्ठांचे नियमित आकारांचे पैलू पाडणे आणि पृष्ठांना सफाईदार पॉलिश करणे आवश्यक ठरते. पैलू पाडणे व पॉलिश करणे यांमुळे प्रकाशाचे प्रणमन व अपस्करण होऊन रत्नांचे रंग, तेज व झळाळी विशेष खुलून दिसते. रत्ने कापून त्यांना पैलू पाडणे व पॉलिश करणे ही कामे करणाऱ्या कारागिरांना मणिकार (लॅपिडेरी) अशी संज्ञा असून देशोदेशी फार प्राचीन काळापासून हा व्यवसाय चालत आला आहे.
सुरुवातीच्या काळात खाणीतून निघालेली रत्ने केवळ साफसूफ करून त्यांचे अनियमित कोनेकोपरे कापून त्यांना नीटनेटका आकार देणे आणि स्वभावतःच असलेली त्यांची पृष्ठे घासून उजळ करणे एवढेच काम होत असे. भारतात रत्नांना सुयोग्य आकार देण्याच्या बाबतीत फारशी प्रगती झाली नाही. यूरोपमध्ये मात्र जरूर तर रत्नांचे आकारमान कमी करून त्यातील दोष काढून टाकणे आणि त्यांचे सौंदर्य व तेज पूर्णत्वाने खुलेल अशा प्रकारचे योग्य ते पैलूदार आकार देण्याची पद्धत रूढ झाली. यूरोपातील अँटवर्प, ॲम्स्टरडॅम व इदार ओबेरस्टाईन ही शहरे मणिकारांच्या व्यवसायासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.
हिऱ्याखेरीज इतर रत्ने कापणे व घासणे यांसाठी कार्बोरंडम (सिलिकॉन कार्बाइड) या अपघर्षकाची (खरवडून व घासून पृष्ठ गुळगुळीत करणाऱ्या पदार्थाची) पूड वापरतात परंतु हिरे कापून त्यांना आकार देणे आणि पृष्ठांना पॉलिश करणे यांसाठी मात्र हिऱ्याचीच पूड वापरावी लागते.
यूरोपात रत्ने कापून त्यांना पैलू पाडण्याच्या कलेची सुरुवात व विकास पंधराव्या शतकात झाला. १५६२ मध्ये यूरोपात हिऱ्यासाठी पॉईंट व टेबल असे दोन आकार प्रचलित होते. यांपैकी पॉईंट हा हिऱ्याची नैसर्गिक अष्टफलकीय पृष्ठे नीटनेटकी करून बांधेसूद केलेला व पॉलिश केलेला आकार होता आणि टेबल म्हणजे याच अष्टफलकीय आकाराच्या वरच्या अर्धभागातील माथ्याचा भाग आडवा कापून वरचे पृष्ठ टेबलासारखे सपाट केलेला आकार होता. या आकारावरूनच पुढे सतराव्या शतकाच्या अखेरीस व्हेनिसच्या व्हिन्सेंत्सो पेरुत्त्सी नावाच्या मणिकारांनी ब्रिलियंट हा हिऱ्यांसाठी अत्यंत योग्य आणि लोकप्रिय आकार शोधून काढला.
रत्नांना देण्यात येणारे आकार अनेक प्रकारचे असले, तरी त्यांचे दोन प्रमुख वर्ग आहेत : (१) गोलाकार पृष्ठेआ. २. ब्रिलियंटघाटीची उदाहरणे : (अ) एका बाजूस टोक असलेले लंबवर्तुळ ( फेअर घाटी) (आ) दोन्ही बाजूंस टोक असलेले लंबवर्तुळ ( मार्क्विस अथवा नॅव्हेटघाटी ) (इ) वर्तुळाकार (ई) बदामघाटी.
असलेले आकार, यांना मदारघाटी किंवा कॅबोशाँ म्हणतात. (२) सपाट पृष्ठांचे पैलू असणारे आकार. सपाट पृष्ठांच्या पैलूदार आकारातही ब्रिलियंटघाटी व पायरीदारघाटी असे दोन उपप्रकार आहेत. या दोन्हीही उपप्रकारांत सर्वांत वरच्या बाजूला आडवे सपाट पृष्ठ असते. त्याला टेबल म्हणतात. या पृष्ठापासून उतरते पैलू असणारा माथ्याचा भाग, त्याच्या खाली असणारा पैलूदार तलभाग आणि हे दोन्ही भाग जोडणारा कटिभागाचा कंगोरा असे प्रमुख भाग असतात. या आकारात जसे वरच्या बाजूला टेबल असते, तसेच सर्वांत खालच्या टोकाशी एक अत्यंत छोटे सपाट पृष्ठ असते, त्याला क्यूलेट हे नाव आहे.
सध्या रत्नांना देण्यात येणारे प्रमुख आकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) ब्रिलियंटघाटी, (२) टेबलघाटी, (३) पायऱ्याचे टेबलघाटी, (४) गुलाबघाटी अथवा कमलघाटी, (५) मदारघाटी.
ब्रिलियंटघाटी :ब्रिलियंट या आकारात माथा व खालचा पेंदी असे दोन भाग असतात. हे दोन्ही भाग मध्याशी एकत्र येतात त्याला कटिभागाचा कंगोरा म्हणतात. माथ्याच्या सर्वांत वरच्या आडव्या सपाट पृष्ठाला टेबल म्हणतात. टेबलाची बाह्यकडा अष्टकोनी असते. अगदी तळाशी असलेले क्यूलेट हे पृष्ठही अष्टकोनी असते. पूर्ण ब्रिलियंट आकारात एकूण ५८ पैलू असतात. त्यांपैकी माथ्याच्या भागात टेबल धरून ३३ आणि पेंदीच्या भागात क्यूलेट धरून २५ पैलू असतात. हिऱ्याचे तेज व झळाळी पूर्णपणे खुलण्यासाठी ब्रिलियंट हा आकार सर्वोत्कृष्ट असल्याचे आढळले आहे. मात्र यासाठी टेबल ते कंगोरा आणि कंगोरा ते क्यूलेट हे कोन काटेकोरपणे विशिष्ट मर्यादेत असावे लागतात. [àहिरा]. ब्रिलियंटघाटीत सर्वसामान्य कंगोऱ्याचा आकार वर्तुळाकार असतो परंतु क्वचित हा आकार एका बाजूस टोक असणारे लंबवर्तुळ (पेअरघाटी), दोन्ही बाजूंना टोके असणारे लंबवर्तुळ (मार्क्विस अथवा नॅव्हेटघाटी) आणि बदामाच्या आकारात (बदामघाटी) असेही असतात.
पायरीदारघाटी :यामध्ये सर्वांत वरचे सपाट टेबल व कटिभागाचा कंगोरा यांच्या कडांना समांतर असणारे समलंब चौकोनी आकाराचे, क्रमाक्रमाने अधिक उतरती पृष्ठे असणारे पैलू असतात. पायरीदारघाटीतही माथा व तलभाग अथवा पेंदी असे दोन मुख्य भाग असतात. मात्र या दोन्ही भागांतील सर्व पैलू समलंब चौकोनी आकाराचे असतात. याउलट ब्रिलियंटघाटीत टेबल व क्यूलेट हे दोन पैलू सोडल्यास बाकीचे सर्व पैलू त्रिकोणी अथवा पतंगाकृती चौकोनी आकाराचे असतात.
पायरीदारघाटीचे टेबलपृष्ठ तसेच कंगोरा लांबट चौकोनी आकाराचे असल्यास त्याला पाचूघाटी असेही नाव देतात. अशी रत्ने क्वचित चौरस आकाराच्या टेबलपृष्ठाची असल्यास त्यांना चौरस पाचूघाटी म्हणतात.
गुलाबघाटीअथवाकमलघाटी : ब्रिलियंटघाटीचा शोध लागण्यापूर्वी हिऱ्यांसाठी गुलाबघाटी हा आकार प्रचलित होता. भारतातील ग्रेट मोगल हा हिरा व्हेनिसच्या हार्तेन्सिओ बोर्गिस या मणिकाराने कापून त्यास गुलाबघाटी आकार दिला होता. या आकारात माथ्याचा भाग अर्धगोलाकृती करून त्या भागात चोवीस त्रिकोणाकृती पैलू पाडतात. याचा तलभाग सपाट असतो.
मदारघाटी :रत्नांना देण्यात येणारा हा सर्वांत साधा आकार आहे. साधा मदारघाटी, दुहेरी मदारघाटी आणि पोकळ मदारघाटी असे याचे तीन प्रकार आहेत. साध्या मदारघाटीत तलपृष्ठ सपाट असून वरचा भाग फुगीर बाकदार असतो. दुहेरी मदारघटीत वरचा आणि खालचा असे दोन्ही भाग बहिर्वक्र असतात. पोकट मदारघाटीत वक्रभागाच्या पोटातील भाग खरडून काढून तो पोकळ पातळ करण्यात येतो. त्यामुळे तलभाग सपाट न राहता वरच्या बाकदार पृष्ठाला समांतर असतो. मदारघाटीला पैलू नसतात. ओपल, चंद्रकांतमणी, तारकांकित माणिक, मार्जारनेत्री, वैदूर्य यांसारख्या रत्नांना मदारघाटी आकार योग्य असतो. पिरोजाचा आकारही मदारघाटी असतो. रत्नाचा रंग फार गर्द असल्यास पोकळ मदारघाटी आकार केल्याने रंग अधिक खुलतो.
कोंदण : दागिन्यात, विशिषतः अंगठीत, पैलूदार रत्नाचा खडा सहजपणे निसटून पडणार नाही अशा प्रकारे बसवण्याच्या प्रकाराला कोंदण म्हणतात. कोंदणासाठी प्रामुख्याने १४ अथवा १८ कॅरटचे सोने, प्लॅटिनम, पॅलॅडियम, चांदी इ. मौल्यवान धातू वापरतात. कोंदणाचे अनेक प्रकार आहेत. एका प्रकारात रत्नाच्या चोहोबाजूंनी खालून वर आलेल्या चिमट्यांच्या टोकदार काट्यांच्या टोकाशी छोटे भरीव गोळे असतात. त्यांच्या आधाराने रत्न कोंदणात पक्के बसते. दुसऱ्या प्रकारात रत्नाच्या कंगोऱ्याला सर्व बाजूंनी वेटाळणारे कडे असून या कड्याची वरची बाजू रत्नाच्या कंगोऱ्यावरून आतल्या दिशेने वळवलेली असते. अनेकदा कड्याची ही बाजू शिंपल्याच्या काठासारखी कंगोरेदार असते, तर कधी ती माशांच्या शेपटीच्या आकाराची असते.
रत्नांवरीलकोरीवकाम:रत्नांवरील कोरीवकामाची सुरुवात इ. स. पू. ४००० वर्षे या काळात दक्षिण मेसोपोटेमिया प्रदेशात झाल्याचे दिसते. तेव्हापासून ते इ. स. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याचा ऱ्हास होईपर्यंतच्या काळात आशिया मायनर व भूमध्य समुद्राच्या पूर्वेचा प्रदेश या भागातील प्रत्येक संस्कृतीत एक महत्त्वाचा कलाप्रकार म्हणून रत्नावरील कोरीवकाम प्रचलित होते. सुमेर किंवा दक्षिण बॅबिलोनिया (सध्याचा इराक) या प्रदेशातील उत्खननात सर्वांत प्राचीन काळच्या कोरीव रत्नांचे सापडलेले नमुने अत्यंत कलापूर्ण व कुशल कारागिरीचे आहेत. येथून ही कला नाईल नदीच्या खोऱ्यात व भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील प्रदेशात पसरली. रत्नाच्या खोदकामाचे अगदी सुरुवातीचे प्रकार लांबट नळकांड्याच्या आकाराचे व पृष्ठभागापासून आत कोरलेल्या चित्राकृतीचे असत. हे नळकांडे चिखलाच्या किंवा मऊ मेणाच्या पृष्ठावर दाबून फिरवले म्हणजे त्या पृष्ठावर उठावदार चित्राकृती उमटत. सुरुवातीचे चित्रविषय हे धार्मिक चिन्हे, देवता, जंगली प्राण्यांशी लढत करणारे शूर वीर, तसेच इतर शोभेच्या नक्षीदार आकृती असे असत. या चित्रविषयांचा प्रत्येकाची वैयक्त्तिक ओळख चिन्हे (मुद्रा) म्हणून वापर होत असे.
नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेशात नळकांड्याच्या जागी सूर्याचे प्रतीक मानल्या गेलेल्या व त्या काळी पवित्र मानल्या जाणाऱ्या स्कॅरॅब या कीटकाची आकृती रत्नांच्या कोरीवकामात विशेष प्रचारात आली. ग्रीक काळात रत्नांच्या कोरीवकामात खूपच सफाई आणि परिपूर्णता आली. रोमन साम्राज्याच्या अस्तापर्यंत ही कला प्रचलित होती पण पुढे मध्ययुगीन काळात या कलेचा लोप झाला. प्रबोधन काळानंतर या कलेला उजळा मिळून महत्त्व येऊ लागले होते परंतु अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणिसाव्या शतकात ही कला पुन्हा मागे पडली.
कोरीवकामाचेतंत्र : रत्नावरील कोरीवकामाचे दोन प्रमुख प्रकार आहेत : (१) इंटॅग्लिओ : यात रत्नाच्या पृष्ठभागापासून आत इष्ट चित्राकृती खोदलेली असते म्हणजे पुतळ्याच्या साच्यासारखे या कोरीवकामाचे स्वरूप असते. मऊ ओली माती या कोरीवकामावर दाबली असता उठावाचे चित्र मिळते. (२) कॅमिओ : यात चित्राकृतीचा पार्श्वभाग खोदून काढल्यामुळे चित्राकृती रत्नाच्या पृष्ठापासून उठावाने वर आलेली दिसते. अगदी सुरुवातीचे कोरीवकाम शंख-शिंपले, संगजिरे यांसारख्या कमी कठिनतेच्या पृष्ठावर केल्याचे आढळते. या कामासाठी क्वॉर्ट्झाचे धारदार टोक असलेली हत्यारे वापरीत असावेत. इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून मात्र खुद्द क्वॉर्ट्झ व कॅल्सेडोनीच्या पृष्ठावर कोरीवकाम करण्यास सुरुवात झाल्याचे दिसते. या कामासाठी बहुधा एमरी या नैसर्गिक घर्षकाची पूड टोकाशी लावलेली हत्यारे वापरली असावीत. याच काळात क्वॉर्ट्झ व कॅल्सेडोनी यांच्या बरोबरच ॲमेझोनाइट, लॅपिस लॅझुली, हेमॅटाइट, पेरिडोट, गोमेद, पाचू, पुष्कराज इ. रत्न-खनिजांवरही कोरीवकाम केल्याचे आढळते. यातील कित्येक कोरीवकामांसाठी गिरमिटाचा वापर केल्याचेही दिसून आले आहे.
आधुनिक काळात कोरीवकामासाठी अनेक प्रकारची यांत्रिक गिरमिटे व इतर हत्यारे वापरतात. ही हत्यारे पोलादाची असून त्यांच्या टोकाशी हिऱ्याची पूड लावलेली असते. मात्र सध्याच्या काळात एकूण कोरीवकामाचे प्रमाण फारच कमी झालेले असून त्यात पूर्वीसारखी कलाकुसर दिसून येत नाही. सध्या सर्व भर रत्ने विविध आकारांत कापून, पैलू पाडून त्यांना झळाळी आणणे यांवरच आहे.
मानवनिर्मितरत्ने : मौल्यवान रत्नांच्याऐवजी हुबेहूब रत्नासारखी दिसणारी कृत्रिम नकली रत्ने तयार करण्याची पद्धत ईजिप्शियन काळापासून प्रचलित आहे. यूरोपात खऱ्या रत्नांसारखी दिसणारी काचेची नकली रत्ने ‘पेस्ट’ या नावाने प्रचारात होती. विसाव्या शतकात नैसर्गिक रत्नांचे सर्व गुणधर्म असणारी संश्लेषित (कृत्रिम) रत्ने तयार करण्यात यश आले असून बहुतेक सर्व रत्ने संश्लेषित पद्धतीने मोठ्या प्रमाणावर तयार केली जात आहेत.
मानवनिर्मित रत्नांचे चार प्रकार होतात : (१) संस्कारित रत्ने (२) पुनर्घटित म्हणजे खऱ्या रत्नाचे छोटे तुकडे एकत्र करून तयार केलेली मोठ्या आकाराची मौल्यवान रत्नासारखी दिसणारी रत्ने (३) नैसर्गिक क्रियेचे अनुकरण करून तयार केलेली संश्लेषित रत्ने आणि (४) केवळ वरवर खऱ्या रत्नांसारखी दिसणारी नकली रत्ने.
यांशिवाय खऱ्या मौल्यवान रत्नासारखे भासणारे इतर नैसर्गिक खनिज-प्रकारही त्या रत्नांच्याऐवजी वापरले जातात.
संस्कारितरत्ने : संस्कारित रत्न प्रकारात नैसर्गिक मोत्यांऐवजी कालवांच्या शिंपल्यात कण घुसवून त्या कालवांच्याकरवी तयार होणारे संवर्धित मोती मिळवण्याचे तंत्र आता चांगले विकसित झाले आहे. त्यांना लावणीची मोत्ये असेही नाव आहे. [à मोती]. संस्कारित रत्न-खनिजांमध्ये काही सहज सर्वत्र मिळणाऱ्या अल्पमोली अशा खनिजांवर उष्णता, रासायनिक प्रक्रिया व किरणोत्सर्ग (काही विशिष्ट मूलद्रव्यांनी बाहेर टाकलेले भेदक कण वा किरण) यांचे संस्कार करून त्यांचे रंगरूप मौल्यवान रत्नांसारखे करतात. उदा., ब्राझीलमध्ये क्वॉर्ट्झाचे स्वच्छ पारदर्शक बिनरंगाचे स्फटिक तापवून त्यांना पिवळट नारिंगी रंग आणतात. क्वॉर्ट्झाच्या या प्रकाराला ‘सीट्रीन’ हे नाव आहे. या स्फटिकांची पुष्कराज म्हणून विक्री केली जाते. थायलंडमध्ये मळकट तपकिरी रंगाचे झिर्कॉन मोठ्या प्रमाणावर सापडतात. हे रंगीत झिर्कॉन तापवून त्याच्यापासून हिऱ्यासारखे दिसणारे रंगहीन स्वच्छ झिर्कॉन तयार करतात तसेच आकर्षक निळ्या अथवा सोनेरी पिवळ्या रंगाचे झिर्कॉनही तयार करतात.
पुष्कराजावर गॅमा किरणांचा (उच्च ऊर्जायुक्त्त भेदक किरणांचा) मारा करून नंतर ते नमुने तापवल्यास त्यांना गडद निळा रंग प्राप्त होतो. प्रथम गॅमा किरणांमुळे पुष्कराजाचा रंग हिरवट तपकिरी होतो पण तापवल्यावर हा रंग बदलून गडद निळा होतो. काही सोनेरी पिवळ्या रंगांचे पुष्कराज केवळ तापवल्याने गुलाबी किंवा गडद लाल रंगांचे होतात.
तोरमल्ली तापवल्यास त्याचा मूळचा रंग फिका होतो. पण याचा फायदा घेऊन अतिशय गडद हिरव्या रंगाचे तोरमल्लीचे नमुने तापवून त्यांचा रंग पाचूच्या रंगासारखा आकर्षक हिरवा करतात. गॅमा किरणांनी तोरमल्लीचे मूळचे रंग पालटतात. अशा किरणांनी मुळात रंगहीन असणारे किंवा फिकट गुलाबी रंगाचे तोरमल्लीचे नमुने गडद लाल रंगांचे बनवतात.
निसर्गतः आढळणाऱ्या ॲक्वामरिनाचा रंग फिकट आकाशी निळा असतो. गडद निळ्या रंगाचे ॲक्वामरीन निसर्गात फारच क्वचित सापडते परंतु हिरवट किंवा तपकिरी रंगाचे वैदूर्यांचे नमुने ४००० ते ४५०० से.पर्यंत तापवल्यास त्यांना आकर्षक गडद निळा रंग येतो. काही वैदूर्यांच्या नमुन्यांवर गॅमा किरणांचा मारा केल्याने त्यांचा रंग निळीसारखा गर्द जांभळट निळा होतो. धुरकट तपकिरी रंगाच्या क्वॉर्ट्झावर गॅमा किरणांचा मारा करून त्याचे रूपांतर आकर्षक जांभळ्या रंगाच्या जमुनियामध्ये करता येते. ब्राझीलमध्ये सापडणाऱ्या काही क्वॉर्ट्झाच्या नमुन्यांवर गॅमा किरणांचा मारा करून नंतर ते तापवल्यास अशा नमुन्यांना गडद हिरवट पिवळा रंग येतो. या रंगाचे क्वॉर्ट्झ खनिज निसर्गात स्वाभाविक रीत्या आढळत नाही मात्र हा रंग सूर्यप्रकाशामुळे फिका पडत जातो.
पुनर्घटितरत्ने : रत्नांचे लहान लहान तुकडे एकत्र जोडून किंवा रत्ने व अल्पमोली खनिजे, तसेच काच यांचे तुकडे बेमालुम एकत्र चिकटवून मोठ्या आकारमानाच्या मौल्यवान रत्नांसारखी दिसतील अशी रत्ने तयार करण्याचे काम गेल्या कित्येक शतकांपासून प्रचलित आहे. उदा., स्वच्छ, पारदर्शक क्वॉर्ट्झाच्या दोन कपच्यांमध्ये हिरव्या काचेचा तुकडा चिकटवून अशा तीन तुकड्यांचे बनवलेले रत्न पाचू म्हणून विकले जाते. या बनावट पाचूच्या वरच्या, तसेच खालच्या पृष्ठावर असणाऱ्या क्वॉर्ट्झाची कठिनता ७ असल्याने अशा रत्नांची पृष्ठाची चमक व झिलई रोजच्या वापरानेही फारशी कमी होत नाही. आकर्षक रंगाच्या, शोभिवंत परंतु कमी कठिनतेच्या अशा खनिजावर क्वॉर्ट्झ अथवा गार्नेटाची पातळ कपची चिकटवून वरच्या पृष्ठाची कठिनता ७ ते ८ पर्यंत करतात व या खड्यांची मौल्यवान रत्ने म्हणून विक्री होते मात्र अशी पुनर्घटित रत्ने उकळते पाणी, क्लोरोफॉर्म अथवा अल्कोहॉल अशा द्रवात टाकल्यास त्यांच्यातील लुकण विरघळून तुकडे सहज सुटे होतात. ही रत्ने बाजूने पाहिली, तरी त्यांचे वेगवेगळे तुकडे स्पष्ट दिसतात. विशेषतः एखाद्या द्रवात बुडवून हे खडे पाहिले म्हणजे वेगवेगळे तुकडे व त्यांच्या परस्परांशी चिकटवलेल्या पृष्ठभागाच्या कडा सहज ओळखू येतात.
पुनर्घटित रत्नांचा आणखी एक प्रकार १८८२ मध्ये जिनीव्हा येथे तयार करण्यात आला. या प्रकारात नैसर्गिक माणकांचे लहान तुकडे एकत्र ठेवून ते ऑक्सिॲसिटिलिनाच्या प्रखर ज्योतीने वितळवून एकजीव केले जात. या प्रकाराची पुनर्घटित माणके इंग्लंडमध्ये व यूरोपातील इतर देशांतही तयार होऊ लागली. त्यांना ‘रीको (रिकन्स्ट्रक्टेड) माणिक’ असे म्हणत. नंतरच्या काळात ‘व्हेर्न्य’ पद्धतीने संश्लेषित माणके मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागल्यावर रीको माणके मागे पडली.
संश्लेषितरत्ने : इतर खनिजांच्या मानाने रत्नांना फार मोठी किंमत येत असल्यामुळे आणि निसर्गात रत्ने दुर्मिळ असल्यामुळे ती प्रयोगशाळेत संश्लेषण पद्धतीने तयार करण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयोग गेली दोन-तीन शतके चालू होते परंतु हुबेहूब नैसर्गिक रत्नांचे गुणधर्म असणारी संश्लेषित रत्ने तयार करण्यात ऑग्यूस्तव्हेर्न्यया फ्रेंच रसायनशास्त्रज्ञांना १९०२ साली प्रथम यश मिळाले. त्यांनी स्वतः शोधून काढलेल्या एका खास भट्टीत प्रथम संश्लेषित माणके तयार करण्यात आली. या भट्टीत वरच्या बाजूने खाली उलट जाणारी ऑक्सिजन हायड्रोजन वायूची प्रखर ज्योत वापरली होती. ही ‘व्हेर्न्य पद्धत’ थोड्याफार फरकाने आजतागायत चालू असून या पद्धतीने सध्या दरवर्षी रत्न-प्रकारांसाठी, तसेच मनगटी घड्याळे व इतर मापके यांच्यातील धारव्यांसाठी (फिरत्या दंडांना त्यांची गती स्थिर रहाण्यासाठी देण्यात येणाऱ्या आधारांसाठी बेअरिंगांसाठी) लागणारी लक्षावधी कॅरट वजनाची माणिक, नील तसेच स्पिनेल ही रत्न-खनिजे तयार केली जात आहेत.
व्हेर्न्य पद्धतीने माणिक अथवा नील तयार करण्यासाठी प्रमुख कच्चा माल ॲल्युमिना (ॲल्युमिनियम ऑक्साइड) असतो. ही ॲल्युमिना अत्यंत शुद्ध स्वरूपात मिळावी म्हणून अमोनियम तुरटीचे (ॲलमचे) पुनर्स्फटिकीकरणाने तयार केलेले शुद्ध स्फटिक घेतात आणि ते भट्टीत १,१००० से. तापमानाला तापवतात. उष्णतेने तुरटीचे अपघटन होऊन (रेणूचे तुकडे झाल्याने घटक अलग होऊन) अमोनिया, सल्फर डाय-ऑक्साइड व स्फटिक जल उडून जाते व खाली शुद्ध ॲल्युमिनेचे अतिसूक्ष्मकणी चूर्ण उरते. माणकाला लाल रंग यावा यासाठी तुरटी भट्टीत भाजतानाच तीत ८% प्रमाणात क्रोमिक ऑक्साइड मिसळतात. याचप्रमाणे नील रत्नाच्या निळ्या रंगासाठी तुरटी, लोह व टिटॅनियम यांची ऑक्साइडे, तसेच पिवळ्या रंगाच्या सफायरसाठी निकेल ऑक्साइड मिसळतात.
जो रत्न-प्रकार हवा असेल त्यानुसार इष्ट ते रंगद्रव्य मिसळलेली ॲल्युमिनेचे चूर्ण भट्टीत उलट्या ज्योतीच्या वरच्या बाजूस असलेल्या एका जाळीवर ठेवतात. या जाळीला ठराविक कालाने छोट्या हातोड्याने ठोके दिले जातात, त्यामुळे ठराविक प्रमाणात थोड्या थोड्या वेळाने चूर्ण ज्योतीत पडत राहते. ज्योतीच्या प्रखर उष्णतेने चूर्णाचा तात्काळ रस होऊन त्या रसाचे थेंब ज्योतीच्या खाली उभ्या केलेल्या पोर्सलिनाच्या दांड्याच्या माथ्याशी असलेल्या सु. २·५ सेंमी. व्यासाच्या मंचावर पडत राहतात. तेथे हे थेंब थिजून त्या जागी उभट, लांबट सोंगटीच्या आकाराचा स्फटिक घनरूपात तयार होऊ लागतो. या सोंगटीला बूल असे म्हणतात.
माणिक, नील या कुरुविंद जातीच्या खनिजांप्रमाणेच स्पिनेल जातीची रत्नेही संश्लेषित पद्धतीने व्हेर्न्य भट्टीत तयार केली जातात. यासाठी कच्चा माल म्हणून ॲल्युमिना व मॅग्नेशिया (मॅग्नेशियम ऑक्साइड) यांचा वापर करतात. रत्नांना इष्ट तो रंग येण्यासाठी या मिश्रणात निळ्या रंगासाठी कोबाल्ट ऑक्साइड, फिकट हिरव्या रंगासाठी मँगॅनीज ऑक्साइड व गुलाबी रंगासाठी लोह ऑक्साइड मिसळतात. नैसर्गिक स्पिनेलाच्या स्फटिकात ॲल्युमिना व मॅग्नेशिया यांचे प्रमाण १:१ असते परंतु हे प्रमाण वापरून संश्लेषित पद्धतीत स्पिनेलाचे चांगले स्फटिक मिळत नाहीत. यासाठी ३·५ भाग ॲल्युमिना व १ भाग मॅग्नेशिया या प्रमाणातील मिश्रण वापरल्यास स्पिनेल स्फटिकाची चांगली सोंगटी तयार होते, असे आढळले आहे. हे संश्लेषित स्पिनेल प्रत्यक्षात स्पिनेल व गॅमा ॲल्युमिना यांचे संमिश्र घनीय स्फटिक असतात. बाह्यतः हे नैसर्गिक स्पिनेलासारखेच दिसतात परंतु त्यांचा प्रणमनांक आणि वि. गु. नैसर्गिक स्पिनेलापेक्षा थोडेसे भिन्न असते.
इ. स. १९४७ मध्ये प्रथमच व्हेर्न्य पद्धतीने तारादर्शक नील व माणिक ही रत्नेही तयार करण्यात यश आले. तारादर्शक रत्ने करण्यासाठी ज्योतीमध्ये टाकावयाच्या चूर्णात रंगद्रव्याबरोबरच थोड्या प्रमाणात टिटॅनियम ऑक्साइडाची पूडही मिसळतात आणि चूर्ण वितळून तयार होणारी घनस्फटिकाची सोंगटी ७२ तासांपर्यंत १,५००० ते १,१००० से. तापमानात सावकाशीने निवत ठेवतात. यामुळे टिटॅनियम ऑक्साइडापासून रूटाइलाचे सूक्ष्म सूईच्या आकाराचे लांबट स्फटिक तयार होतात व हे स्फटिक कुरुविंदाच्या स्फटिक जालकाला अनुसरून कुरुविंदाच्या उभ्या अक्षाला लंब व एकमेकांशी १२०० कोनात रचले जातात. अशा माणिक अथवा नील रत्नांच्या सोंगट्यांपासून त्यांचा उभा अक्ष मदारघाटी आकाराच्या उभ्या अक्षाला समांतर येईल अशा प्रकारे खडे कापून त्यांना आकार देतात. या मदारघाटी रत्नांमध्ये नैसर्गिक तारादर्शक रत्नांसारखीच सहा आऱ्यांची तारकाकृती दिसते.
संश्लेषितरूटाइल : निसर्गात रत्न म्हणून वापरता येईल अशा स्वच्छ व पारदर्शक प्रकारचे रूटाइलाचे स्फटिक सहसा आढळत नाहीत. त्यामुळे रूटाइलाचा अंतर्भाव रत्न-खनिजात केला जात नाही परंतु १९४९ मध्ये प्रथमच संश्लेषित पद्धतीने अत्यंत स्वच्छ, पारदर्शक व आकर्षक रंगाचे रूटाइल व्हेर्न्य भट्टीत ऑक्सि-ॲसिटिलिनाची ज्योत वापरून तयार करण्यात आले. हे स्फटिक भट्टीत तयार होताना अत्यंत गर्द रंगाचे जवळजवळ काळे व अपारदर्शक असतात परंतु ऑक्सिजनाच्या वातावरणात हे स्फटिक १,०००० से.पर्यंत तापवल्यानंतर स्वच्छ पारदर्शक होतात आणि त्यांना अनेक आकर्षक रंग प्राप्त होतात. या संश्लेषित रूटाइलांचे प्रणमनांक २·६० व २·९० असे असून त्यांचे अपस्करणही हिऱ्याच्या अपस्करणाच्या सातपट जास्त (०·२८०) आहे, त्यामुळे पैलू पाडल्यावर त्यांची चमक व झळाळी डोळे दिपवणारी असते. त्याचे वि. गु. ४·२५ असून कठिनता मात्र फक्त्त ६ आहे. त्यामुळे बाह्यतः अत्यंत तेजस्वी दिसले, तरी रोजच्या वापराला ते फारसे टिकाऊ नाहीत.
संश्लेषितस्ट्राँशियमटिटॅनेट : व्हेर्न्य पद्धतीने तयार होणारे हे रत्न-खनिज पूर्णपणे मानवनिर्मित असून या प्रकारचे खनिज निसर्गात सापडत नाही. निसर्गात या खनिजवर्गातले पेरोव्हस्काइट हे कॅल्शियम टिटॅनेट आहे पण त्याचा वापर रत्न म्हणून होत नाही. स्ट्राँशियम टिटॅनेटाचे हिऱ्याच्या गुणधर्माशी फार साधर्म्य असल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे. स्ट्राँशियम टिटॅनेटाचा प्रणमनांक २·४१ म्हणजे जवळजवळ हिऱ्याइतकाच असून ते घनीय स्फटिक रचनेचे आहे. त्याचे अपस्करणही हिऱ्याच्या चौपट (०·१९०) आहे. त्यामुळे त्याची झळाळी हिऱ्यापेक्षाही जास्त दिसते. त्याचे वि. गु. ५·१३ असून कठिनता मात्र फक्त्त ५·५ इतकीच आहे.
चोक्राल्स्कीपद्धत : वितळलेल्या रसाचे घनीभवन करून संश्लेषित रत्न खनिज तयार करण्याच्या पद्धतीचा एक सुधारित प्रकार ‘चोक्राल्स्की पद्धत’ या नावाने ओळखला जातो. जे. चोक्राल्स्की यांनी १९१८ मध्ये ही पद्धत शोधून काढली. या पद्धतीत इरिडियमाच्या मुशीत इष्ट त्या पदार्थाची, उदा., ॲल्युमिनाची, पूड घालून मुशीला प्रखर उष्णता देतात व पदार्थ वितळवून रस करतात. या रसाचे तापमान स्फटिकीभवनाच्या तापमानाइतके ठेवून एका उभ्या दांड्याच्या तळाशी बसवलेला माणकाचा छोटा बीज स्फटिक रसात बुडवतात. हा दांडा स्वतःच्या अक्षाभोवती सावकाशीने गोल फिरवीत हळूहळू वर ओढला जातो. त्यामुळे बीज स्फटिकाला चिकटून वर येणाऱ्या रसाच्या भागाचे स्फटिकाभोवती घनीभवन होते. अशा प्रकारे बीज स्फटिकाला लागून माणकाची सलग लांब कांडी तयार होते.
याच पद्धतीचा आणखी एक प्रकार म्हणजे बीज स्फटिक रसाबाहेर न ओढता तो रसात पृष्ठभागाखाली बुडालेला राहू देतात. रसाचे तापमान स्फटिकीभवनाच्या तापमानाएवढेच असल्यामुळे बीज स्फटिकाभोवती रसाचे स्फटिकीभवन होऊ लागते आणि शेवटी मुशीच्या आकाराचा एक मोठा सलग घन स्फटिक तयार होतो. या प्रकाराला कायरोपौलस तंत्र असे नाव आहे. या पद्धतीत माणकाप्रमाणेच नील, स्पिनेल, रूटाइल इ. रत्नेही संश्लेषित करता येतात.
संश्लेषितपाचू : आतापर्यंत पाहिलेली सर्व संश्लेषित रत्ने उदा., माणिक, नील, स्पिनेल, रूटाइल इ. ही ऑक्साइडे होती. त्यामुळे व्हेर्न्य भट्टीत अथवा अन्य पद्धतीने वितळवून पुन्हा घन करण्याच्या क्रियेने ती तयार करणे शक्य होते पण जी रत्न-खनिजे सिलिकेटे आहेत, त्यांचा भट्टीत रस करून त्यांपासून संश्लेषित रत्ने करता येत नाहीत कारण सिलिकेटांचा रस वेगाने थंड झाल्यास त्याचे स्फटिकीभवन न होता काचमय पदार्थ तयार होतो त्यामुळे अशा म्हणजे सिलिकेट असणाऱ्या रत्नांच्या संश्लेषणासाठी वेगळी पद्धत वापरावी लागते. पाचू म्हणजे बेरील हे बेरिलियम ॲल्युमिनियम सिलिकेट असल्यामुळे व्हेर्न्य अथवा अन्य भट्टीत त्याचे संश्लेषण करणे शक्य नव्हते. १९३० च्या सुमारास जर्मनीतील आय्. जी. फार्बेन इंडस्ट्री या रंगद्रव्याच्या कारखान्याच्या प्रयोगशाळेत एच्. एसपिग व त्यांचे सहकारी यांनी प्रथम संश्लेषित पाचू तयार करण्यात यश मिळवले. या पद्धतीत त्यांनी लिथियम मॉलिब्डेट वितळवून त्या रसात बेरिलियम आणि ॲल्युमिनियम यांच्या ऑक्साइडांची पूड विरघळविली. हा रस प्लॅटिनमाच्या मोठ्या मुशीत ठेवून वितळलेल्या रसाच्या मिश्रणावर काचमय सिलिकेच्या (सिलिकेचा रस वेगाने थंड करून तयार झालेल्या काचेच्या) वड्या तरंगत ठेवल्या. या वड्या रसाच्या पृष्ठभागी तरंगत राहण्यासाठी त्यांच्या खाली प्लॅटिनमाची जाळी ठेवली होती. या जाळीवरच पाचूचे अगदी छोटे बीज स्फटिक ठेवले होते. बीज स्फटिकांभोवती बेरिलियम, ॲल्युमिनियम व सिलिका यांची परस्पर विक्रिया होऊन पाचूचे स्फटिक वाढू लागले. पाचूला हिरवा रंग येण्यासाठी मिश्रणात आवश्यकतेप्रमाणे क्रोमियम ऑक्साइड मिसळले होते. वितळलेले मिश्रण ८००० से. तापमानात कित्येक महिने ठेवल्यानंतर पुरेशा मोठ्या आकारमानाचे पाचूचे स्फटिक तयार झाले. या पाचूंना नैसर्गिक एमराल्डाऐवजी संश्लेषित पद्धतीने बनवलेले म्हणून इगेमराल्ड असे नाव देण्यात आले होते. पुढे दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे हे काम बंद पडले.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत सॅनफ्रॅन्सिस्को येथील एक रसायनशास्त्रज्ञ कॅरल एफ्. चॅटम यांनी याच तत्त्वावर आधारित असलेल्या पद्धतीने व्यापारी प्रमाणावर संश्लेषित पाचू तयार करण्यात यश मिळविले. या पद्धतीने चॅटम यांनी तयार केलेला १,२७५ कॅरट (२२५ ग्रॅम) वजनाचा पाचूचा स्फटिक हार्व्हर्ड संग्रहालयात ठेवलेला आहे, मात्र हा स्फटिक रत्न-प्रतीचा नाही. उत्तम रत्न-प्रतीचे संश्लेषित पाचू क्वचितच ६ कॅरटपेक्षा मोठे तयार करता येतात पण १ ते ३ कॅरट वजनाचे उत्तम संश्लेषित पाचू मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत.
जलतापीय पद्धत : पाचू, तसेच क्वॉर्ट्झ ही खनिजे संश्लेषित रीतीने तयार करण्यासाठी जलतापीय पद्धतीचाही चांगला उपयोग होतो. इटलीतील जी. स्पेझिया यांनी १८९८ ते १९०८ या काळात प्रथम जलतापीय पद्धतीने संश्लेषित क्कॉर्ट्झ हे खनिज तयार केले आणि १९६० मध्ये या पद्धतीने संश्लेषित पाचू तयार करण्यात जे. लेखलाइटनर यांना प्रथम यश मिळाले.
जलतापीय पद्धतीत उच्च तापमान आणि दाब असलेल्या पाण्यात इष्ट त्या रत्न-खनिजाचे रासायनिक संघटन असलेल्या मिश्रणाची पूड विरघळू देतात. यासाठी सर्व बाजूंनी बंद करता येईल असे जाड, भक्कम, पोलादी पात्र वापरतात. या पात्रात रत्न-खनिजाचे छोटे बीज स्फटिक ठेवून त्यांच्याभोवती विद्रावाचे सावकाशीने स्फटिकीभवन होऊ देतात. स्फटिकीभवनाचे कार्य अत्यंत सावकाश होते. उदा., क्वॉर्ट्झाचे पुरेसे मोठे स्फटिक तयार होण्यासाठी किमान ५० ते ७० दिवस लागतात. पाचूचे स्फटिक तयार होण्यासाठी याहूनही दीर्घकाळ लागतो. या सर्व काळपर्यंत दाब आणि तापमान पुरेसे उच्च राखावे लागते. यामुळे ही पद्धत सावकाशीची व खर्चिक आहे. या पद्धतीने क्वॉर्ट्झाचे ४५ सेंमी. लांबीचे व १५ सेंमी. रुंदीचे स्फटिक, तसेच पाचूचे २५ ते ४० सेंमी. लांबीचे व ५ सेंमी. रुंदीचे स्फटिक मिळू शकतात.
संश्लेषितहिरा : हिरा व ग्रॅफाइट ही दोन्ही कार्बनाची स्फटिकरूपे असूनही कठिनता व प्रकाशीय गुणधर्म या बाबतींत त्यांच्यात अतिशय मोठा फरक आहे. याचे कारण दोहोंच्या स्फटिकांतील आंतरिक अणूंची मांडणी भिन्न आहे. हिऱ्याच्या स्फटिकात कार्बनाचे अणू अत्यंत घट्ट घनीय रचनेच्या बंधात एकत्र आलेले असतात. याचा अर्थ निसर्गात हिऱ्याचे स्फटिकीभवन अत्यंत उच्च दाब आणि उष्णतेच्या परिस्थितीत झाले असले पाहिजे. ही गोष्ट ध्यानात आल्यावर अनेक शास्त्रज्ञांनी अशी उष्णता व दाब परिस्थिती निर्माण करून संश्लेषित हिरे तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले. १८७८ मध्ये ग्लासगो येथील जेम्स बी. हॅने आणि १८९६ मध्ये पॅरिस येथील आंरी म्वासां यांनी अशा पद्धतीने सूक्ष्म हिरे तयार केल्याचा दावा केला पण त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचा निर्विवाद पुरावा मिळाला नाही. पुढे अनेकांच्या अयशस्वी प्रयत्नानंतर शेवटी फेब्रुवारी १९५५ मध्ये अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या स्कनेक्टिडी (न्यूयॉर्क राज्य) येथील प्रयोगशाळेत प्रथमच सूक्ष्म आकारमानाचे संश्लेषित हिरे करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. यासाठी एका पोलादी पात्रात ग्रॅफाइटयुक्त्त कार्बनी द्रव्य २,७६०० से. इतक्या तापमानाच्या व सामान्य वातावरणाच्या एक लक्षपटींनी असलेल्या दाबाच्या परिस्थितीत ठेवले. या अत्यंत उच्च दाब-तापमानाच्या स्थितीत ग्रॅफाइटाचे रूपांतर सूक्ष्म आकारमानाच्या हिऱ्यांच्या स्फटिकात होण्यासाठी निकेल धातूची उत्प्रेरक (विक्रियेचा वेग बदलणारा पदार्थ) म्हणून मदत झाली.
अमेरिकेच्या पाठोपाठ द. आफ्रिका (जोहान्सबर्ग), जपान, रशिया, इंग्लंड इ. देशांतही संशोधन शाळांमध्ये संश्लेषित हिरे तयार करण्यात यश आले. भारतामध्ये दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीतही प्रायोगिक स्वरूपात संश्लेषित हिरे तयार केले गेले आहेत. आता औद्योगिक कामासाठी लागणाऱ्या हिऱ्याच्या गुणधर्माचे हिरे संश्लेषण पद्धतीने मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत परंतु रत्न-प्रतीचे स्वच्छ, दोषरहित असे संश्लेषित हिरे मात्र पुरेशा मोठ्या आकारमानाचे म्हणजे १ कॅरटपेक्षा अधिक वजनाचे तयार करणे सहजी शक्य झालेले नाही. त्यांच्या निर्मितीचा खर्चही प्रचंड असल्यामुळे रत्न-प्रकार म्हणून अजून तरी खऱ्या हिऱ्याशी संश्लेषित हिरे स्पर्धा करू शकत नाहीत. काही नव्या तंत्रांचा विकास होऊन संश्लेषित हिरे तयार करण्याचा खर्च कमी झाल्यासच त्यांचा रत्न म्हणून वापर होऊ शकेल. [⟶हिरा].
नकलीरत्ने : काचेचा शोध लागून काचेत योग्य ती धातुलवणे मिसळल्याने हव्या त्या रंगाची काच तयार करणे शक्य झाले, तेव्हापासून खऱ्या रत्नांसारखी दिसतील अशी काचेची नकली रत्ने तयार करणे सुरू झाले आणि आता जरी संश्लेषित माणिक, नील, पाचू इ. रत्ने मोठ्या प्रमाणावर मिळू लागली असली, तरीही वरवर नुसते पाहून ओळखता येणार नाहीत अशा काचेच्या रत्नांना अजूनही मागणी आहे. अर्थात एकेरी प्रणमन, कमी प्रणमनांक, विशिष्ट गुरुत्व, कमी कठिनता इ. भौतिक गुणधर्मांच्या चाचण्यांवरून काचेची नकली रत्ने सहज ओळखता येतात. रत्न-खनिजांच्या तुलनेने काचेची कठिनता खूपच कमी (५ ते ५·५) असल्याने रोजच्या वापरात त्यांचे पॉलिश व चमक टिकत नाही.
काचेची रत्ने करण्यासाठी प्रामुख्याने बोरोसिलिकेटाची कॅल्शियमयुक्त्त क्राऊन काच व शिसेयुक्त्त फ्लिंट काच [àकाच] यांचा वापर करतात. बोरोसिलिकेट क्राऊन काचेचा प्रणमनांक १·४७ ते १·५१ पर्यंत आणि वि. गु. २·३० ते २·३७ पर्यंत असते. कॅल्शियमयुक्त्त क्राऊन काचेचा प्रणमनांक १·५० ते १·५१ आणि वि. गु. २·४३ ते २·४६ असते आणि शिसेयुक्त्त फ्लिंट काचेचा प्रणमनांक १·५४ ते १·७७ आणि वि. गु. २·८७ ते ४·९८ पर्यंत असू शकते. काचेत शिशाचे प्रमाण जसजसे वाढत जाते तसा काचेचा प्रणमनांक आणि वि. गु. वाढत असल्याने अशी नकली रत्ने खऱ्या रत्नासारखी झळाळतात पण शिशाच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच त्या काचेची कठिनता कमी होत असल्यामुळे रोजच्या वापरासाठी ती रत्ने निरुपयोगी ठरतात
वेगवेगळ्या रत्न-प्रकारांसाठी काचेत इष्ट ती धातवीय लवणे मिसळून काचेला लाल, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा इ. मोहक रंग देता येतात. अशा नकली रत्नांना खऱ्या रत्नांसारखे योग्य त्या आकारात पैलू पाडले म्हणजे वरवर पहाणाऱ्याला ती खऱ्या रत्नासारखीच भासतात.
रत्न-अभिज्ञान : (रत्नांची पारख). अनेक जातींच्या रत्नांचे रंग सारखे असू शकतात, तसेच कित्येक रत्ने पांढरी (बिनरंगी) पारदर्शक असतात. अशा रत्नांची नेमकी जात नुसत्या डोळ्यांनी पाहून ओळखणे सामान्य माणसाला शक्य नसते. रत्नांची निश्चित जात (खनिज-प्रकार) ठरवण्यासाठी त्यांच्या विविध गुणधर्मांची तपासणी करावी लागते. अशी तपासणी करून रत्ननिश्चिती करण्याचे ‘रत्नविद्या’ या नावाचे एक स्वतंत्र शास्त्रच बनलेले असून रत्नांची पारख करणाऱ्या तज्ञांचा वेगळा वर्ग निर्माण झाला आहे.
मोती, पोवळे, अंबर यांसारखे रत्न-प्रकार वगळता इतर बहुतेक सर्व रत्ने ही खनिजांचे स्फटिकी, अर्धस्फटिकी किंवा अस्फटिकी प्रकार असल्यामुळे त्यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म ठरलेले अथवा फार थोड्या मर्यादेत कमीजास्त बदल होणारे असतात. त्यामुळे रत्ने ओळखण्यासाठी या गुणधर्मांची तपासणी व मापन करून काम होते. एकूण खनिजवर्गांपैकी फारच थोड्या खनिजांचे प्रकार रत्ने म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या खनिजांचे वि. गु. आणि प्रकाशीय गुणधर्म (विशेषतः त्यांचा प्रणमनांक) हे समदिक् (सर्व दिशांना सारखे गुणधर्म असणारे) आहेत की विषमदिक् आहेत आणि त्यांची स्फटिक प्रणाली अशा अगदी थोड्या निवडक मापनांनी रत्न-प्रकार निश्चित करता येतो. अलीकडे संश्लेषित रत्ने तयार होऊ लागल्यानंतर मात्र विशिष्ट रत्न हे नैसर्गिक आहे की संश्लेषित आहे हे ठरवणे अत्यंत अवघड झाले आहे. संश्लेषित रत्नांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म नैसर्गिक रत्न-खनिजांशी अगदी मिळतेजुळते असल्यामुळे विशिष्ट रत्न संश्लेषित आहे की नाही हे ठरविण्यासाठी सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने त्याच्या स्फटिकाची वाढ कसकशी होत गेली आहे, हे तपासणे आवश्यक ठरते. उदा., नैसर्गिक माणिक आणि नील रत्नांमध्ये रंगाचे पट्टे षट्कोनी आकृतीला समांतर असतात, तर संश्लेषित माणिक व नील रत्नांत काहीसे वक्र असतात. नैसर्गिक रत्नांत वायूचे बुडबुडे कमी प्रमाणात असतात आणि असल्यास ते कोनीय असतात, तर संश्लेषित रत्नांमध्ये ते गोलाभ असतात ही तपासणी करण्यासाठी काळा अंधारी पार्श्वभाग असणारा ‘जेमोलाइट’ नावाचा द्विनेत्री सूक्ष्मदर्शक उपयुक्त्त असतो.
रत्ननिश्चिती करण्याच्या कामी रत्नांच्या कठिनतेची तपासणी सहसा केली जात नाही, कारण या तपासणीत रत्नांना इजा होण्याची शक्यता असते. रत्नांचे विशिष्ट गुरुत्व व त्यांचे प्रणमनांक हे दोन गुणधर्म रत्ने ओळखण्यासाठी विशेष सुलभ आणि म्हणून उपयुक्त्त ठरतात. रत्नांचे विशिष्ट गुरुत्व काढण्यासाठी हव्या त्या विशिष्ट गुरुत्वाची द्रव मिश्रणे वापरतात. [àखनिजविज्ञान].
रत्न-खनिजांचा प्रणमनांक मोजण्याआधी ते खनिज एक-प्रणमनी आहे की द्वि-प्रणमनी आहे हे ध्रुवणदर्शक (पोलॅरीस्कोप) नावाच्या उपकरणाने तपासणी करून ठरवतात. ध्रुवणदर्शकामध्ये प्रकाशकिरणांचे एकाच पातळीत ध्रुवण करतील असे पोलरॉइडाचे [àप्रकाशकी] दोन तक्त्ते त्यांच्या ध्रुवणपातळ्या एकमेकींशी काटकोनात करून बसवलेले असतात. या दोन पोलरॉइडांमध्ये रत्नाचा नमुना ठेवून तपासतात. रत्न-खनिज समदिक् आणि एक-प्रणमनी असल्यास त्यातून प्रकाशकिरण नेत्रिकेपर्यंत न येता वाटेत अडवले जाऊन खनिज अंधारी दिसते परंतु ते असमदिक् व द्वि-प्रणमनी असल्यास प्रकाशित दिसते.
रत्न-खनिजांचा प्रणमनांक खनिजनिश्चितीसाठी महत्त्वाचा ठरणारा गुणधर्म असून तो मोजण्यासाठी खास प्रकारचे प्रणमनांकमापक असतात [àप्रणमनांकमापन]. यासाठी पूर्वी हर्बर्ट स्मिथ यांचा व अलीकडे त्याच तत्त्वावर आधारलेला, सुधारित असा रायनर यांचा प्रणमनांकमापक वापरतात. या प्रणमनांकमापकात रत्न-खनिजांपेक्षा जास्त प्रणमनांक असलेल्या काचेचा एक गोलार्ध त्याची सपाट गुळगुळीत बाजू वर आडवी येईल अशा रीतीने बसवलेला असतो. ज्या रत्न-खनिजाचा प्रणमनांक काढावयाचा त्याचे घासून सपाट गुळगुळीत केलेले पृष्ठ (पैलू) गोलार्धाच्या सपाट पृष्ठावर ठेवतात. रत्न-खनिजाचे पृष्ठ व काचेचे पृष्ठ यांच्यात हवेचा किंचितही थर राहू नये म्हणून रत्नापेक्षा जास्त प्रणमनांक असलेल्या तेलाचा एक थेंब काचेवर टाकून त्यावर रत्न-खनिजाचे पृष्ठ दाबून बसवतात. काच गोलार्धाच्या एका बाजूला खालच्या दिशेने प्रकाशकिरण आत येण्यासाठी एक खिडकी असते. गोलार्धाच्या दुसऱ्या बाजूला खालच्या दिशेने गोलार्धाभोवती फिरु शकेल असा छोटा दूरदर्शक (दुर्बिण) बसवलेला असतो. आ. ८ मध्ये डाव्या बाजूने आत येणाऱ्या प्रकाशकिरणांपैकी मअया भागातून काचेत शिरणाऱ्या किरणांचा काचेच्या सपाट पृष्ठाशी होणारा आपात कोन खनिज व काच या माध्यमांच्या संदर्भातील सीमांत कोनापेक्षा मोठा असल्याने त्यांचे संपूर्ण अंतर्गत परावर्तन होऊन ते किरण दुसऱ्या बाजूने म’बाजूने म’आ या भागातून बाहेर पडतात [⟶प्रकाशकी] पण अइ या भागातून आत येणारे किरण मात्र प्रणमनानेकाचेबाहेर खनिजात जाऊन बाहेर पडतात. त्यामुळे दूरदर्शक ईआ रेषेत आणल्यास इईआ हे क्षेत्र अंधारी आणि आईम‘ हे क्षेत्र प्रकाशमान दिसते. इईया रेषेपासून ईआ रेषेपर्यंत दूरदर्शक आणण्यासाठी किती कोनातून तो फिरवावा लागला हे मापपट्टीवर मोजता येते. हाच सीमांत कोन होय. यावरून काचेवर ठेवलेल्या रत्न-खनिजाचा प्रणमनांक प्र (रत्न) = प्र (काच) .ज्या θ या सूत्राने काढता येतो (येथे प्र = प्रणमनांक आणि θ = सीमांत कोन). सीमांत कोनावरून गणिती सूत्राने प्रणमनांक काढण्याऐवजी स्मिथ, तसेच रायनर प्रणमनांकमापकात या सूत्राचा अवलंब करून सीमांत कोनाचे प्रत्यक्ष प्रणमनांकात अंशन परीक्षण [⟶ अंशन वअंशन परीक्षण] केलेले असते. त्यामुळे दूरदर्शकाच्या दृष्टिक्षेत्रात अंधारी व प्रकाशमान भागांची सीमारेषा मापपट्टीवर कोठे येते हे पाहून प्रत्यक्ष प्रणमनांकाचे वाचन करता येते.
स्मिथ, तसेच रायनर प्रणमनांकमापकाने १·३० ते १·८६ या मर्यादेत प्रणमनांक असणाऱ्या खनिजांचीच तपासणी करता येते. या मर्यादेत हिरा व झिर्कॉन हे दोन रत्न-प्रकार वगळल्यास बाकीच्या माणिक, नील, पुष्कराज, पाचू, गोमेद इ. सर्वसामान्य प्रचलित रत्नांचा समावेश होतो. हिरा व झिर्कॉन तसेच इट्रियम ॲल्युमिनियम गार्नेट यांसारख्या मानवनिर्मित रत्न-प्रकारातील फरक ओळखण्यासाठी २·०५ पर्यंतच्या प्रणमनांकाचे मापन करता येईल असे मापकही केलेले आहेत.
प्रणमनांकमापक आणि ध्रुवण सूक्ष्मदर्शक या दोन साधनांप्रमाणेच वर्णपटदर्शक हे साधन रत्न-खनिजाच्या निश्चितीसाठी अत्यंत उपयुक्त्त ठरते. वर्णपटदर्शकाने पैलुदार, तसेच नैसर्गिक अवस्थेतील व कितीही कमी किंवा उच्च प्रणमनांक असलेली रत्ने यांची तपासणी चांगल्या प्रकारे करता येते. विशिष्ट रत्न हे नैसर्गिक आहे की संश्लेषित आहे याची, तसेच रत्नाचा रंग नैसर्गिक आहे की उष्णता संस्कार अथवा गॅमा किरणोत्सर्ग यासारख्या संस्काराने आलेला आहे याची निश्चिती वर्णपटदर्शकाच्या तपासणीने करता येते. रत्नातून आरपार जाणारा प्रकाश तसेच रत्नपृष्ठावरून परावर्तित होणारा प्रकाश या दोन्हीही प्रकाशाच्या वर्णपटाची तपासणी रत्नाच्या निश्चितीसाठी उपयुक्त्त असते [àवर्णपटविज्ञान]. रत्नांची वर्णपटदृष्ट्या तपासणी करण्यासाठी काचेचा त्रिकोणी लोलक असलेला सुटसुटीत छोट्या आकारमानाचा वर्णपटदर्शक उपलब्ध आहे. प्रखर प्रकाशात वर्णपटदर्शकाच्या खिडकीपुढे रत्नाचा नमुना धरून अथवा सूक्ष्मदर्शकाच्या मंचावर रत्नाचा नमुना ठेवून आणि सूक्ष्मदर्शकाची नेत्रिका काढून येथे वर्णपटदर्शक धरून रत्नाच्या वर्णपटाचा अभ्यास करता येतो. प्रत्येक रत्नाच्या वर्णपटातील शोषण रेषांच्या जागा व संख्या ठरलेल्या असतात. त्यांच्या अभ्यासाने रत्ननिश्चिती करता येते.
वर वर्णन केलेल्या तपासणीशिवाय क्वचित प्रसंगी जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणात होणारे रत्नांचे अनुस्फुरण (उत्तेजित झाल्याने दृश्य प्रकाशाचे उत्सर्जन होणे), क्ष-किरणांचे रत्नातून होणारे विवर्तन (क्ष-किरण विखुरले जाणे), रत्नांची रासायनिक तपासणी, कठिनता इ. अन्य तपासण्याही करून रत्ननिश्चिती करतात.
रत्नविद्या : रत्नांचा अभ्यास करण्याची विज्ञान शाखा. बहुसंख्य रत्ने ही खनिजांचा प्रकार असल्यामुळे विसाव्या शतकापूर्वी रत्नविद्या विज्ञानाचेच एक अंग गणले जात होते परंतु रत्ननिश्चिती करण्यासाठी विज्ञानातील बऱ्याच पद्धती, उदा., रासायनिक विश्लेषण, खनिजांचे सूक्ष्म जाडीचे छेद कापून त्यांचा सूक्ष्मदर्शकाखालील अभ्यास, त्यांची कठिनता तपासणे इ. रत्नांसाठी वापरता येत नाहीत. तसेच रत्नांमध्ये मोती, पोवळे, अंबर इ. खनिजेतर पदार्थांचाही समावेश होतो. रत्नांच्या अभ्यासात केवळ रत्ने ओळखणे एवढाच भाग नसून रत्नांचे रंग, पारदर्शकता, अंतर्विष्टे, भेगा इ. दोषांनुसार रत्नांची प्रतवारी करणे, रत्नांचे मूल्यनिर्धारण, रत्नांना योग्य तो आकार देऊन पैलू पाडणे, रत्नांवर उष्णता, गॅमा किरण इत्यादींचे संस्कार करून त्यांचे रंग बदलणे किंवा अधिक आकर्षक करणे, संश्लेषित रत्ननिर्मिती करणे वगैरे अनेक बाबींचा समावेश होतो. नैसर्गिक रत्ने व संश्लेषित रत्ने यांतील सूक्ष्म फरक ओळखण्यासाठी कित्येक नव्या प्रकारच्या तपासण्या कराव्या लागतात.
रत्नांच्या अभ्यासाचे हे वेगळेपण ओळखून इंग्लंडमधील नॅशनल ॲसोसिएशन ऑफ गोल्डस्मिथ्स या संघटनेने जेमॉलॉजिकल ॲसोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेची स्थापना केली आणि रत्नविद्येचा शिक्षणक्रम सुरू करून या शिक्षणक्रमाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना एफ्. जी. ए. (फेलो ऑफ द जेमॉलॉजिकल ॲसोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटन) ही उपाधी देण्यास सुरुवात केली.
रॉबर्ट एम्. शिप्ली या अमेरिकन गृहस्थांनी इंग्लंडमध्ये हा शिक्षणक्रम पूर्ण करून १९३१ मध्ये अमेरिकेत लॉस अँजेल्स येथे जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका ही संख्या सुरू केली. त्यानंतर कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि यूरोपातील फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, नेदर्लंड्स इ. देशांतही रत्नविद्याविषयक संस्थांची स्थापना झाली.
रत्ने व रत्नविद्या यांविषयीची काही महत्त्वाची नियतकालिके पुढीलप्रमाणे आहेत : जेम्सअँडजेमॉलॉजी(स्थापना १९३४, अमेरिका), जेम्सअँडमिनरल्स(स्थापना १९३७, अमेरिका), जर्नलऑफजेमॉलॉजीअँडप्रोसिडिंगऑफदजेमॉलॉजिकलॲसोसिएशनऑफग्रेटब्रिटन(स्थापना १९४७), जेम्स(स्थापना १९६९, ब्रिटन), जर्नलऑफजेमइंडस्ट्री(स्थापना १९६३, जयपूर).
भारतात प्राचीन काळापासून रत्नविद्या हा खास अभ्यासाचा विषय गणला जात होता आणि रत्नपारखी तसेच मणिकार यांचा वेगळा वर्ग होता. सध्या भारतात कलकत्ता व मुंबई येथे रत्नविद्येचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. त्यांशिवाय रत्नांना आकार देऊन पैलू पाडण्याचे खास प्रशिक्षण देणाऱ्या संस्था जयपूर व सुरत येथे आहेत.
रत्नांचेमूल्यनिर्धारणआणिव्यापार : रत्नांचे मूल्य प्रामुख्याने सौंदर्य, टिकाऊपणा, दुर्मिळता व काही प्रमाणात प्रचलित आवडनिवड (फॅशन) या चार घटकांवर अवलंबून असते. सर्व रत्नांमध्ये हिरा सर्वांत मौल्यवान समजला जातो कारण तो सर्वांत कठीण असून योग्य प्रकारे पैलू पाडले असता विलक्षण तेजाने झळाळणारा असतो. नील व माणिक ही दोन्ही रत्ने कुरुविंद खनिजाचाच प्रकार असली, तरी दुर्मिळतेमुळे माणकांचे मूल्य नीलापेक्षा जास्त असते. नील व माणिक या दोन्ही रत्नांचे मूल्य त्यांच्या रंगाच्या छटेनुसार कमीजास्त होते. पाचूची कठिनता नील व माणिक यांपेक्षा कमी असली, तरी ते अधिक दुर्मिळ असल्यामुळे उत्कृष्ट पाचूचे मूल्य हिऱ्याबरोबरीने येते. पाचूचे मूल्य ही त्याची पारदर्शकता, आंतरिक दोषापासून मुक्त्तता व हिरव्या रंगाचा गर्दपणा यांवर अवलंबून असते. ओपलचे मूल्य त्याचे लहानमोठे आकारमान व त्याच्यात दिसणारी विविध रंगांची चमक यांनुसार कमीजास्त होते. अनेक रंगांची झळाळी दाखवणारे काळ्या रंगाचे ओपल विशेष मौल्यवान समजले जाते.
प्रचलित आवडीनिवडीनुसारही रत्नांचे मूल्य कमीजास्त होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून तारकांकित नील व माणिक रत्नांना विशेष मागणी वाढल्याने त्यांचे मूल्यही वाढले आहे. १९२० च्या सुमारास अंबर रत्नांना बरीच मागणी वाढली होती पण अलीकडच्या काळात ती ओसरली आहे. रत्नांचे जास्त मौलिक व कमी मौलिक असे दोन प्रकार मानतात पण ही विभागणी कृत्रिम आहे. कमी मौलिक प्रकारातील उत्कृष्ट, दोषरहित रत्नाचे मूल्य तेवढ्याच वजनाच्या जास्त मौलिक प्रकारातील पण सदोष असलेल्या रत्नापेक्षा जास्त असू शकते.
भारतातीलरत्न-उद्योगवव्यापार : एकेकाळी भारत साऱ्या जगात रत्नांचे उत्पादन आणि व्यापार या क्षेत्रात अग्रेसर होता. अलीकडच्या काळात भारतातील रत्नांचे उत्पादन खूपच घटले आहे, तरीही रत्ने कापून त्यांना पैलू पाडणे आणि त्यांची निर्यात करणे या क्षेत्रांत भारताने पुन्हा आघाडी मिळवली आहे.
भारतातून परदेशी निर्यात होणाऱ्या रत्नांमध्ये ८०% वाटा पैलू पाडलेल्या हिऱ्यांचा आहे. अर्थात यातील बहुसंख्य हिरे पैलू न पाडलेल्या नैसर्गिक स्थितीत हिऱ्यांचे उत्पादन करणाऱ्या इतर देशांतून आयात केलेले असतात. हिऱ्यांना पैलू पाडण्याचा व्यवसाय प्रामुख्याने महाराष्ट्र (मुंबई), गुजरात (सुरत व अहमदाबाद), राजस्थान (जयपूर) व दिल्ली या प्रदेशांत एकवटला असून रत्नांची निर्यात मुंबई, अहमदाबाद, जयपूर व दिल्ली येथून होते. भारतामधून ५० हून अधिक देशांना रत्ने निर्यात केली जातात त्यांपैकी ९०% हून अधिक निर्यात अमेरिकेची संयुक्त्त संस्थाने, हाँगकाँग, जपान, बेल्जियम, ब्रिटन, नेदर्लंड्स व प. जर्मनी या देशांत होते.
रत्न व्यवसायाचा योग्य प्रकारे विकास करण्यासाठी मुंबईला १९६६ मध्ये रत्ने व दागिने निर्यात उत्तेजन मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळातर्फे जयपूर येथे १९७२ मध्ये अद्ययावत साधनांनी परिपूर्ण अशी रत्न-तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.
भारतात हिऱ्याशिवाय नील, माणिक, पाचू अशा रंगीत रत्नांना पैलू पाडण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा रत्नांना पैलू पाडण्याची व्यवसायाची जयपूर, अजमेर, राजपीपला, हैदराबाद, मद्रास आणि तिरुचिरापल्ली ही प्रमुख केंद्रे आहेत. जयपूर पाचूच्या व्यापाराविषयी विशेष प्रसिद्ध असून जगातील पैलूदार पाचूच्या व्यापारापैकी ८०% व्यापार जयपूरहून होतो. अर्थात ही रंगीत रत्ने नैसर्गिक (पैलू न पाडलेल्या) स्थितीत इतर देशांतून आयात केलेली असतात. खुद्द भारतात उत्पादन होणाऱ्या हिऱ्यांचा व रंगीत रत्नांचा वाटा भारतातून निर्यात होणाऱ्या पैलूदार रत्नांमध्ये फारच अल्प आहे. पैलू पाडण्यासाठी झॅंबिया, कोलंबिया, ब्राझील आणि आग्नेय आफ्रिकी देश येथून पाचूंची आयात करण्यात येते. माणकांची आयात थायलांडमधून आणि नील रत्नांची आयात थायलंड व ऑस्ट्रेलिया येथून केली जाते. हिरे व इतर रत्ने यांना पैलू पाडण्याच्या व्यवसायात भारतातील ५ लक्ष कुशल कामगार गुंतले आहेत.
भारतातून परदेशी होणाऱ्या रत्नांच्या निर्यातीचे रुपयाच्या मूल्यात १९८६-८७ या वर्षाचे आकडे असे आहेत (कंसात १९८५-८६ या वर्षाच्या निर्यातीचे आकडे दिले आहेत).
हिरे १९·६ अब्ज रु. (१३·४४ अब्ज रु.),
इतर रत्ने ६१·०९ कोटी रु. (४५·६५ कोटी रु.),
मोती १०·९५ कोटी रु. (८·४१ कोटी रु.).
संदर्भ :
- Anderson, B. W., Gem Testing, London, 1964.
- Dake, H. C., The Art of Gem Cutting, Mentone, Calif., 1963.
- Hurlbut, C. S. Jr., Switrer, G. S. Gemology, New York, 1979.
- Quick. L.; Lepier, H., Gemcraft : How to cut and polish Gemstones, Philadelphia, 1959.
- Smith, G. H. F., Gemstones, New York, 1958.
- Webster, R. ,Gems : Their Sources, Descriptions and Identification, London, 1975.
- Wilson, M., Gems, London, 1967.
- खांबेटे, म. ल.,रत्नप्रदीप,२खंड, नागपूर, १९३१.
- खांबेटे, म. ल., लघुरत्नपरीक्षा, कोल्हापूर, १९४१.
लेखक : सोवनी, प्र. वि.