रणगाडा :आधुनिक काळातील एक अस्त्रक्षेपक लढाऊ वाहन. तोफ आणि स्वयंचलित मशीनगन यांनी सुसज्ज असलेला चिलखती रणगाडा, खाचखळग्यांच्या प्रदेशातूनही आपल्या लंबगोलाकार पोलादी पट्ट्यांवर निर्वेधपणे वाटचाल करू शकतो. रचनेच्या दृष्टीने त्याचे तीन भाग पाडतात : संधारण (सस्पेन्शन), काया (हल) व घुमट (टरेट).रणगाड्याचे सस्पेन्शन हे बोगीव्हील्स, रोलर्स, स्प्रिंग ट्रॅक्स, स्प्रॉकेट व आयड्लर व्हील यांवर आधारित असते. रणगाड्याच्या कायाच्या पुढच्या बाजूवर जास्त जाडीचा, तर इतर बाजूंवर कमी जाडीचे पोलादी कवच असते. त्यांवर रायफल, मशीनगन इत्यादींच्या माऱ्याचा काहीही परिणाम होऊ शकत नाही. फक्त चिलखतभेदी मोठ्या गोळ्याच हे चिलखती कवच फोडू शकतात. रणगाड्यावरील तोफेचा वा ⇨मशीनगनचा मारा करण्याचे कार्य घुमट हे करते. ३६०°परिघात कोणत्याही दिशेला व इष्ट त्या कोनाने ते फिरवता येते. उंचसखल जमिनीवरून जात असताना तोफेचा नेम लक्ष्यावर स्थिर राखण्याची यंत्रणाही असते. पेट्रोल, डीझेल किंवा इतर इंधनांवर रणगाड्याचे एंजिन चालते.
रणगाड्यावरील स्वयंचलित मशीनगन वेगवेगळ्या क्षमतेच्या असू शकतात. त्यात विमानविरोधी मशीनगनचाही समावेश होतो. धुराच्या नळकांड्या वा इतर क्षेपणास्त्रे सोडण्याची व्यवस्थाही रणगाड्यात असते. चालक, गनर व कमांडर अशा कमीत कमी तीन व्यक्त्ती या लढाऊ वाहनावर असतात. त्यांच्या कार्याला अनुसरून रणगाड्याचे तीन विभाग पडतात : चालक जेथे बसून रणगाडा चालवतो तो चालक विभाग (ड्रायव्हिंग कंपार्टमेंट), रणगाडा पूर्णपणे बंद ठेवून उपरिदर्शक (एपिस्कोप) वा परिदर्शक (पेरिस्कोप) यांचा उपयोग करून चालक तो चालवितो. लढाऊ विभाग (साइटिंग कंपार्टमेंट) यात गनर असतो. अलीकडे स्वयंचलित पद्धतीने त्यात गोळे चढविले जातात. या विभागात बराचसा दारूगोळाही ठेवलेला असतो. कमांडरने दिलेले हुकूम अंमलात आणणे, हे गनरचे काम असते. या विभागातच बिनतारी संदेशयंत्रणा, रेडिओ इ. संपर्कसाधने असतात. तिसऱ्या विभागात एंजिन व त्याच्याशी निगडित अशी इतर यांत्रिक सामग्री असते.
रणगाडे सामान्यपणे दोन प्रकारचे असतात : मुख्य लढाऊ रणगाडा (मेन बॅटल टँक) व हलका रणगाडा (लाइट टँक). रणगाडा विरुद्ध रणगाडा अशा लढाईत, तसेच पायदळाला मदत म्हणून व पराभूत शत्रूचा पाठलाग करण्यासाठी लढाऊ रणगाडे वापरतात. आपल्या फौजांच्या बगलांचे रक्षण करण्यासाठी व शत्रूच्या आघाडीची माहिती काढण्यासाठी हलक्या रणगाड्यांचा वापर केला जातो. हवानळांचा (स्नॉर्केल) उपयोग करून उथळ प्रवाहातून किंवा नदीपात्रातून रणगाडे वाटचाल करू शकतात. पहिल्या महायुद्धकाळात फ्रान्समध्ये फ्लँडर्सच्या लढाईत जर्मन सैन्याने खंदक व काटेरी तारा यांचा उपयोग करून दोस्त राष्ट्रांच्या सैन्याची आगेकूच रोखली. त्यावर मात करण्यासाठी इंग्लंडने १९१६ मध्ये प्रथम रणगाड्याचा वापर केला. सॉम व कँब्रे येथील लढायांत (२० नोव्हेंबर १९१७) रणगाड्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला. जर्मनांची हिंडेनबर्ग लाइन ही फळी फोडण्यात ब्रिटिश जनरल एलिसने यश मिळविले.
प्राचीन काळी युद्धात रथांचा उपयोग करण्यात येई. पुढे रथांसाठी लाकडी फळ्यांचे चिलखती कवच तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. १९०१ मध्ये फ्रेंच सैन्याने साध्या मोटारगाडीवर कवचधारी टीप (टब) व मशीनगन ठेवून त्याचा रणगाड्यासारखा वापर केला व १९११ साली ट्रॅकवर चालणारे रणगाडे प्रथम बनले.
पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांदरम्यानच्या काळात रणगाड्यांच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आले. दूर पल्ल्याच्या तोफा बसविल्याने रणगाड्यांचे वजन वाढते व वजन वाढल्याने त्यांची गती कमी होते, तेव्हा वजन व गती यात समतोल राखण्याच्या दृष्टीने रणगाड्याच्या दारूगोळ्यात व स्फोटक द्रव्यांमध्ये बदल करण्यात आले. शत्रूच्या रणगाडाविरोधी तोफांच्या माऱ्याला निष्प्रभ करण्याच्या दृष्टीने रणगाड्यावरचे पोलादी आवरण तिरके बसविण्यात आले.
पहिल्या महायुद्धात रणगाड्यांचा उपयोग प्रामुख्याने पायदळाच्या मदतीसाठी करण्यात आला व त्यामुळे रणगाड्यांच्या तुकड्या पायदळांच्या तुकड्याजवळ ठेवण्यात आल्या. पण त्यामुळे रणगाड्यांचा उपयोग एकत्रितपणे केला जात नसे व त्यांचा पराभव करणे सोपे जाई. दुसऱ्या महायुद्धात पहिल्यांदाच रणगाड्यांचा एकत्रितपणे उपयोग करण्यात आला व त्यासाठी स्वतंत्र रणगाडा विभाग (डिव्हिजन) निर्माण करण्यात आला. तसेच पायदळ विभागाकडे रणगाड्यांच्या तुकड्या स्वतंत्रपणे सोपविण्यात आल्या.
प्रख्यात जर्मन सेनानी फील्ड मार्शल ⇨रोमेलयाने रणगाड्यांचा एकत्रित उपयोग मोठ्या प्रमाणावर करून दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा उत्तर आफ्रिकेत धुव्वा उडविला आणि त्यांना कैरो शहरापर्यंत मागे हटविले. त्यानंतर मात्र जनरल (नंतर फील्ड मार्शल) ⇨ मंगमरीच्या सैन्याने त्याच तंत्राचा उपयोग करून, जर्मन सैन्याचा फडशा पाडला व त्यांना आफ्रिकेतून हाकलून लावले.⇨एल्.ॲलामेनचीलढाई या दृष्टीने प्रसिद्ध आहे.
जगातील सर्वांत मोठी रणगाड्यांची लढाई १९४३ साली रशियात कूर्स्क या ठिकाणी झाली. त्या लढाईत जवळजवळ ३,००० रणगाड्यांचा उपयोग करण्यात आला व त्यानंतर १९४४ मध्ये अमेरिकेच्या जनरल ⇨जॉर्जपॅटनच्या तिसऱ्या सैन्याने १६ रणगाडा विभाग (डिव्हिजन) वापरून जर्मन सैन्याचा यूरोपमध्ये पराभव केला. दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाच्या लढाईत (१९५०–५३) कोरियन सैन्याने रशियन रणगाड्यांचा व अमेरिकेने स्वतःच्या रणगाड्यांचा उपयोग केला परंतु त्या देशातील डोंगराळ भागामुळे, रस्त्यांच्या अभावामुळे व बचावाची फळी अत्याधुनिक साधनांनी भक्कम केली असल्याने त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही परंतु रणगाड्यांचा उपयोग एकत्रितपणे केला पाहिजे, एवढे मात्र या लढाईत सिद्ध झाले. याच तंत्राचा उपयोग करून इझ्राएली फौजांनी (१९५६-५७) मध्ये अरब फौजांचा पराभव केला.
इ. स. १९१७ सालच्या फ्रान्समधील कँब्रे येथील लढाईत रणगाड्यांचा प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला. त्या लढाईत हिंदुस्थानातील घोडदळाचाही यशस्वी रीतीने उपयोग करण्यात आला होता. दुसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसू लागताच हिंदी घोडदळातील काही तुकड्यांना चिलखती रणवाहनांचे शिक्षण देण्यात आले. त्यात चिलखती गाड्या, चिलखती टेहळणी वाहने यांचा समावेश होता. त्यानंतर ब्रिटिश व अमेरिकन हलक्या रणगाड्यांचा उपयोग भारतीय लष्करात करण्यात आला. त्यांत व्हॅलेंटाइन व स्ट्युअर्ट रणगाड्यांचा समावेश होता. रणगाड्यांतील यांत्रिक व तांत्रिक सुधारणानंतर मध्यम प्रतीचे अमेरिकन शर्मन रणगाडे व पायदळाच्या मदतीसाठी खास वापरण्यात येणारे ब्रिटिश चर्चिल रणगाडे वापरण्यात आले.
ब्रिटिशकालीन हिंदुस्थानातील वायव्य सरहद्दीवरील लढायांमध्ये चिलखती गाड्यांचा उपयोग होऊ शकला. दुसऱ्या महायुद्धामध्ये तिसावी इंडियन आर्मर्ड डिव्हिजन व अन्य रणगाड्यांच्या रेजिमेंटनी आफ्रिकेच्या व यूरोपच्या भूमीवरील लढायांत भाग घेतला. १९६५ साली पाकिस्तानबरोबर झालेल्या लढाईत भारतीय फौजांनी स्ट्युअर्ट रणगाडे ५,००० मी. उंचीवरील झोजी या ठिकाणी नेऊन यशस्वी रीतीने त्यांचा उपयोग केला. त्या वेळी हिंदी फौजांच्या रणगाड्यांनी सियालकोट प्रदेशात फार मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांचा धुव्वा उडविला. [⇨भारत-पाकिस्तान संघर्ष].
हिंदी फौजांमध्ये मेन बॅटल टँक (एम्.बी.टी.) म्हणून वैजयंता रणगाड्यांचा उपयोग केला जात आहे. हा रणगाडा भारतातच तयार होतो व त्याशिवाय फ्रेंच (ए.एम्.एक्स.) व रशियन रणगाडेही भारतीय लष्करात आहेत.
जमिनीवरील लढाईत रणगाड्यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे व संभाव्य अण्वस्त्रांच्या युद्धांमध्येदेखील रणगाडे व अन्य चिलखती वाहनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जाऊ शकेल.
लढाऊ चिलखती वाहनांचे अन्य प्रकार आढळतात : (१) चिलखती गाड्या (आर्मर्ड कार्स व्हिल्ड) : यांचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असे. (२) चिलखती टेहळणी वाहने (आर्मर्ड रिकनायझन्स व्हेइकल्स) : खास टेहळणीसाठी असलेले हे लहान वाहन टेहाळणीदलाचे कमांडर वापरतात. (3) चिलखती कर्मचारी वाहन (आर्मर्ड पर्सोनल कॅरिअर ए.पी.सी.) : रणगाड्यांच्या विभागाबरोबर पायदळ सैन्याला नेण्यासाठी या वाहनांचा उपयोग केला जातो. आधुनिक फौजांमध्ये पायदळाच्या बऱ्याचशा पलटणीत हा विभाग असतो. (४) चिलखती वाहनदुरुस्ती गाड्या (आर्मर्ड रिकव्हरी व्हेइकल) : रणगाड्यांचे युद्ध फार विस्तीर्ण प्रमाणावर व प्रदेशावर खेळले जाते. त्यात नादुरुस्त झालेल्या रणगाड्यांना लवकरात लवकर दुरुस्त करून परत लढाईला सिद्ध करून देण्यासाठी या वाहनांचा उपयोग होतो. (५) पूल तयार करणार रणगाडा : रस्त्यामध्ये लहान मोठे ओढे तसेच नदीप्रवाह पार करणे सर्व रणगाड्यांना नेहमीच शक्य नसते. अशा ठिकाणी त्या त्या अडथळ्यांवर तात्पुरता पूल बनविण्यासाठी चिलखती गाड्यांवर तयार पूल करून त्याचा उपयोग केला जातो. तो यंत्राच्या साहाय्याने उचलून दुसरीकडे नेता येतो. (६) सुरुंगविरोधी रणगाडे : शत्रूची आगेकूच थांबविण्यासाठी सुरुंगाचा वापर करण्यात येतो. अशा वेळी सुरुंग क्षेत्रातून रस्ता काढण्यासाठी या प्रकारच्या रणगाड्यांचा उपयोग केला जातो. या रणगाड्याला पुढच्या बाजूला एक मोठा फिरता सिलिंडर असतो व त्याच्यावर लांबलांब लोखंडी साखळ्या बसविलेल्या असतात. या साखळ्या जमिनीवर आपटल्या जातात व त्याने सुरुंग उडविला जातो. या रणगाड्यात तोफ व इतर आयुधे असल्याने ते लढूही शकतात. (७) जलस्थलगामी रणगाडे : नदी अथवा पाण्याचा अन्य अडथळा पार करणे, हे रणगाड्यांना एक मोठे आव्हान ठरते. त्या दृष्टीने हवानळांचाच उपयोग करून नदीच्या उथळ पात्रातून रणगाडा जाऊ शकतो. खोल पाण्यातून रणगाड्यांना पार करण्यासाठी तरंगत्या साधनांचा उपयोग करून तो अडथळा दूर केला जातो.
विमानातूननेलेजाणारेरणगाडे :विमानातून रणक्षेत्रावर रणगाडे उतरविणे आता शक्य झाले आहे. या अति हलक्या रणगाड्यांमध्ये ब्रिटिश स्कॉर्पियन हा पहिलाच ऍल्युमिनियमचा रणगाडा होय. त्याचे (वजन ८·७) टन आहे. त्याखेरीज फ्रान्सचा ए. एम्. एक्स –१३ (१४·६ टन), रशियाचा पी.पी.–७६ (१५·४ टन) आणि अमेरिकेचा शेरिडन एम् – ५५१ (१६·८ टन) हे रणगाडेही विमानांतून रणक्षेत्रावर उतरविता येतात.
पहा : भूसेना.
संदर्भ : 1. Hogg, Ian V. Modern Military Techaniques Tanks, London, 1984.
2. Mellenthin, F. W. Panzer Battles, Norman, Okla, 1956.
3. Ogorkiewicz, R. M. The Design and Development of Fighting Vehicles, New York, 1968. काथवटे, मा. श्री.
“