रझाक, अब्द-अल्‌ : (६ नोव्हेंबर १४१३ – ? ऑगस्ट १४८२). समरकंदमधील मध्ययुगीन फार्सी इतिहासकार. त्याचे पूर्ण नाव कमालुद्दीन अब्द्-अल्‌ रझाक. रझाक समरकंदी या नावाने तो परिचित होता. त्याचा जन्म हेरात (समरकंद-रशिया) येथे मुस्लिम धर्मोपदेशकाच्या कुटुंबात झाला. त्याचे वडील जलालुद्दीन इशाक हे सुलतान शाहारूखाच्या दरबारात काझी व इमाम होते. त्याने मुस्लिम परंपरेनुसार धार्मिक शिक्षण घेतले. वडिलांसोबत तो दरबारात जात असे. त्याला राजाकडून इदूजाझ (खास परवानगी) मिळाली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर (१४३७) तो थोरल्या भावाबरोबर दरबारात जाई. तेथे त्याने अझुद्दीन याह्याच्या ग्रंथावर एक चिकित्सक टीका अरबीत लिहिली आणि ती शाहरूखला अर्पण केली. तेव्हा सुलतानाने त्याची दरबारात नेमणूक केली. दोन वर्षांनंतर बादशाहाने त्याची हिंदुस्थानातील विजयानगरच्या साम्राज्यात राजदूत म्हणून नियुक्ती केली. रझाकने १३ जानेवारी १४४२ रोजी आपल्या प्रवासास सुरुवात करून तो कालिकत, मंगलोर, बेलूर अशा मार्गे हंपी येथे पोहोचला. तो सु. सात महिने हंपीला राहिला. या प्रवासातील अनुभव त्याने पुढे मत्‌ल-उस-सादैन या ग्रंथात लिहून ठेवले असून त्यात त्याने दक्षिण हिंदुस्थानातील शिल्प व वास्तुकलेविषयी प्रशंसोद्‌गार काढले आहेत तसेच कालिकतच्या सामुरींचे राज्य आणि विजयानगरचे साम्राज्य यांविषयी त्यात साक्षेपी माहिती मिळते.

तो जेव्हा हंपीला पोहोचला (एप्रिल १४४३) तेव्हा दुसरा देवराय (कार. १४१९-४४) विजयानगरच्या गादीवर होता. तेथील वास्तव्यात त्याने राजाशी स्नेहसंबंध दृढ केले. विजयानगरमधील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीचे त्याने अवलोकन केले. त्याच्या मते विजयानगर हे त्यावेळी एक अत्यंत समृद्ध व प्रबळ साम्राज्य होते. विजयानगरच्या बाजारात पाचू, मोती, हिरे यांच्या राशी असत आणि अनेक परकीय व्यापारी खरेदी-विक्रीसाठी जमत. खुद्द राजाचे सिंहासन रत्नजडित सुवर्णाचे होते. दसरा हा प्रमुख सण मोठ्या उत्साहाने राजा व त्याची प्रजा साजरा करी. राजाचा जनानखाना मोठा असून देवरायाला नृत्याचा शौक होता.

समरकंदला परतल्यानंतर त्याला राजदूत म्हणून इराणमधील गिलानला पाठविण्यात आले (१४४६). याशिवाय त्याची नंतर ईजिप्तलाही नियुक्ती झाली होती.परंतु शाहरुखच्या आकस्मिक निधनामुळे ती रद्द झाली. मीर्झा अब्द अल्-लतिफ, मीर्झा अब्द अल्लाह आणि मीर्झा अबुल कासिम बाबुर या शाहरूखच्या वारसांच्या कारकीर्दीत त्याने सद्र, नायब, खाश्श वगैरे उच्च पदांवर काम केले. सुलतान-अबू सय्यद (जानेवारी १४६३-८२) याने त्याची शेख (राज्यपाल) म्हणून नेमणूक केली. या पदावर तो अखेरपर्यंत होता. मत्‌ल-उस-सादैन या ग्रंथात (पूर्ण नाव मत्‌ल्ल-उस-सादैन मज्मा-उल्‌-बहरैन) त्याने सुलतान अबू सय्यिद बहादूरखानपासून मीर्झा सुलतान अबू सय्यिद गुर्रगानच्या खुनापर्यंतच्या तत्कालीन घटनांचा (१३१७-१४७१) सुसंगत इतिहास निवेदन केला आहे. त्याने सुरुवातीच्या कालखंडासाठी हाफिझ-इ-आबरूच्या झुबलत अल्‌ वारीख या ग्रंथाचा उपयोग केला आहे. यांशिवाय विविध देशांतील प्रवास आणि तेथील राजकीय परिस्थिती यांचाही परामर्श त्याने घेतला आहे. अधूनमधून त्याने आपण केलेल्या कविता अंतर्भूत केल्या आहेत. मध्ययुगीन इतिहासाचा एकविश्वसनीय साधनग्रंथ म्हणून त्याच्या ग्रंथाचे महत्त्व आहे.

संदर्भ: 1. Elliot, H. M. Dowson, John, Ed. The History of India, Vol. IV, Calcutta. 1958.

2. Kejariwal, O. P. Ed. Akashvani October 16-31, 1984 New Delhi.

चौधरी, जयश्री