इंग्रज-मराठे युद्धे : दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले आसन स्थिर केल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतातही प्रदेश मिळविण्यास सुरुवात केली. इंग्रज व मराठे ह्यांच्यात झालेल्या तीन युद्धानंतर मराठी सत्तेचा शेवट होऊन जवळजवळ संपूर्ण भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला, म्हणूनच भारतीय इतिहासात या युद्धांना महत्त्वाचे स्थान आहे

पहिले युद्ध: (१७७५–१७८२). नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर रघुनाथरावाने पेशवाईचा अधिकार स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याच्याविरुद्ध बारभाई कारस्थान रचून तत्कालीन मुत्सद्यांनी सवाई माधवराव यास पेशवा म्हणून जाहीर केले. साहजिकच पेशवाईविषयी तंटा चालू झाला. पेशवेपद मिळविण्याच्या महत्त्वकांक्षेने रघुनाथराव ऊर्फ राघोबा इंग्रजांस मिळाला व १७७५ मध्ये त्याने इंग्रजांबरोबर सुरत तेथे तह केला. या तहानुसार मुंबईकर इंग्रजांनी रघुनाथरावाला पेशवेपद देण्याची हमी घेतली. त्याबद्दल त्याने इंग्रजांना साष्टी, वसई, भडोच, सुरत असा एकोणीस लाखांचा मुलूख देण्याचे कबूल केले. या तहानुसार रघुनाथरावाचे व इंग्रजांचे सैन्य पुण्यावर चालून गेले. रघुनाथराव पेशव्याबरोबर सुरत येथे इंग्रजांनी केलेला तह कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला मान्य नव्हता, त्याने मुंबईकरांना दोषी ठरवून सदर कारवाईसाठी धाडलेले सैन्य माघारे बोलाविले. थोड्याच दिवसांत कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलने बारभाईंचे पुढारी नाना फडणीस व सखारामबापू यांच्याशी १७७६ मध्ये पुरंदर येथे तह केला. या तहात साष्टी व वसई परत देऊन इंग्रजांनी रघुनाथरावाला मदत करु नये असे ठरले. परंतु मुंबईच्या गव्हर्नरने इंग्लंडमधील कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीच्या जोरावर पुरंदरचा तह अमान्य करुन रघुनाथरावाला आश्रय दिला. यामुळे बारभाईंनाही पुरंदरचा तह पाळता आला नाही. नाना फडणीसाने फ्रेंच अधिकारी सेंट लूबिन याचे साहाय्य घेण्यासाठी फ्रेंचांना पश्चिम किनाऱ्यावर एक बंदर द्यावयाचे कबूल केले. मराठ्यांच्या हालचालींचा संशय येऊन इंग्रजांनी मराठ्यांविरुद्ध युद्ध पुकारले. १७७८ मध्ये रघुनाथरावाला घेऊन कर्नल इगर्टन पुण्यावर चालून आला. मुंबईकरांच्या मदतीसाठी वॉरन हेस्टिंग्जने बंगालमधून सहा पलटणी धाडल्या. कर्नल इगर्टनची प्रकृती बिघडल्यामुळे कर्नल कॉकबर्नकडे १७७९ मध्ये सैन्याचे नेतृत्व आले. या फौजेवर भीमराव पानसे चालून गेला आणि महादजी शिंदे व हरिपंत फडके त्याला सैन्यासह मिळाले. कार्ले येथे झालेल्या चकमकीत सेनापती स्ट्यूअर्ट ठार झाला. मराठ्यांच्या विरोधाला न जुमानता इंग्रजी फौजेने तळेगावपर्यंत येण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांच्या फौजेने वाटेत त्यांना वडगाव येथे वेढले. त्यामुळे १७७९ च्या जानेवारीत इंग्रजांनी वडगाव येथे तह केला. या तहानुसार इंग्रजांनी १७७३ पासून घेतलेला मुलूख त्यांस मराठ्यांना परत द्यावा लागला व रघुनाथरावाला महादजी शिंदे याच्या स्वाधीन करावे लागले. रघुनाथरावाला घेऊन महादजी शिंदे उत्तरेकडे जात असता वाटेत तो निसटला व सुरत येथे तो इंग्रजांना जाऊन मिळाला. याचा फायदा घेऊन हेस्टिंग्जने वडगाव येथे आलेले अपयश भरुन काढण्याचे ठरविले

हेस्टिंग्जने बंगालमधून कर्नल गॉडर्डला सैन्य घेऊन पाठविले. १७८० च्या जानेवारीत फत्तेसिंग गायकवाडाला गॉडर्डने आपल्या बाजूला वळवून घेतले. इंग्रजांनी शिंदे-होळकरांचा पराभव करून अहमदाबाद हस्तगत केले. हे कळताच नाना फडणीसाने हैदर, नागपूरकर भोसले, जंजिरेकर सिद्दी व निजाम यांना आपल्या गटात सामील करुन घेतले. फ्रेंच, पोर्तुगीज व डच यांचेही साहाय्य मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. निजाम व हैदर अली यांनी मद्रासच्या बाजूने चढाई करावी, शिंदे व भोसले यांनी बंगालवर चाल करावी आणि पुणेकरांनी मुंबईकरांचा बंदोबस्त करावा, अशी योजना आखण्यात आली. महादजी माळव्यात लढत होता. गॉडर्डच्या गुजरातमधील मोहिमेविरुद्ध शिंदे-होळकरांनी चांगली कामगिरी बजाविली. दरम्यान मुंबईकडील इंग्रजांच्या फौजेने ठाणे घेऊन पुण्याकडे चाल केली. त्यांना विरोध करण्यासाठी हरिपंत फडके व पटवर्धन पुण्याहून निघाले. तुकोजी होळकर पुणेकरांच्या मदतीस धावून आला. परशुराम भाऊ पटवर्धन, हरिपंत फडके, तुकोजी होळकर यांनी गनिमी काव्याने लढून पुणे ते पनवेल यामधील मुलूख उद्ध्वस्त केला. त्यामुळे इंग्रजांना कुमक मिळेना. या हालचालीत गॉडर्डचा पराभव झाल्याने तो माघारी फिरला

उत्तर हिंदुस्थानात सेनापती पॉपमच्या फौजेने शिंद्यांच्या मुलखात शिरुन ग्वाल्हेर घेतले. माळव्यावर इंग्रजांचा हल्ला होताच महादजीने त्यांना मागे रेटले. सर्व बाजूंनी इंग्रजांवर हल्ला करण्याच्या योजनेत निजाम मात्र स्वस्थ बसला. वॉरन हेस्टिंग्जने फत्तेसिंग भोसल्यास सोळा लाख रुपये देऊन आपल्याकडे वळवून घेतले. यामुळे पूर्वी ठरल्याप्रमाणे फक्त हैदर अली व महादजी यांनी चढाई केली. मद्रासच्या बाजूस हैदरने इंग्रजांचा पराभव केला. महादजीने सीप्री येथे कर्नल मूटचा पराभव केला. शेवटी इंग्रजांनी मराठ्यांशी मिळते घेण्याचे ठरविले. वॉरन हेस्टिंग्जने महादजीमार्फत पुणे दरबाराशी बोलणी सुरू केली. याच सुमारास हैदर मरण पावल्यामुळे नाना फडणीसाने शिंद्यांच्या विचारास संमती दिली. दि. १७ मे १७८२ रोजी इंग्रज-मराठे यांत सालबाईचा तह झाला. त्यातील काही महत्त्वाच्या अटी अशा : (१) साष्टीखेरीज इंग्रजांनी घेतलेला मुलूख मराठ्यांना परत करावा. (२) मराठ्यांनी इंग्रजांखेरीज इतर पाश्चात्त्यांना आश्रय देऊ नये (३) रघुनाथरावाचा पक्ष इंग्रजांनी सोडावा (४) रघुनाथरावाने दरसाल तीन लाखांची नेमणूक घेऊन कोपरगावी स्वस्थ रहावे. (५) शिंद्यांस त्यांच्या मध्यस्थीबद्दल भडोच द्यावे

या युद्धात हिंदुस्थानच्या राजकारणाचे केंद्र पुण्याहून उत्तरेकडे स्थिर झाले. तह करण्यात महादजीला यश मिळाले. महादजीशी वैर करुन चालणार नाही, हे इंग्रजांनी हेरले. पुण्यात नाना व उत्तरेत महादजी असेपर्यंत त्यांच्या कारभारात ढवळाढवळ करू नये, हा धडा इंग्रजांनी घेतला. नानाने आपल्या मुत्सद्देगिरीने व महादजीने आपल्या शौर्याने मराठी राज्य सांभाळले. इंग्रजांविरुद्ध नानाने निजाम, हैदर, सिद्दी, भोसले यांजबरोबर केलेला संघ त्याच्या मुत्सद्दीपणाचे द्योतक ठरते. मराठ्यांची शक्ती पानिपताच्या पराभवानंतरही कमी झाली नव्हती, हे या नऊ वर्षांच्या लढाईत इंग्रजांना कळून चुकले

दुसरे युद्ध : (१८०२–१८०५). सालबाईच्या तहानंतर काही वर्षे मराठे व इंग्रज यांच्यात सख्य होते. १७९५ मध्ये सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नानाने सवाई माधवरावाच्या पत्नीला दत्तक घ्यावयास लावून त्याच्या नावाने गादी चालवावी अशी योजना केली. दुसऱ्या बाजीरावाने पेशवेपद मिळविण्यासाठी दौलतराव शिंद्याचे साहाय्य घेतले. पेशवेपदासाठी दुसरा बाजीराव व अमृतराव यांच्यात संघर्ष होऊन पुण्यात लुटालूट, मारामाऱ्या सुरू झाल्या. १८०० मध्ये नाना फडणीस मरण पावल्यावर इंग्रजांना मराठी राज्यात ढवळाढवळ करण्यास चांगली संधी मिळाली. बाजीरावाने गादीवर येताच रघुनाथरावाच्या पक्षाविरुद्ध असणाऱ्या रास्ते, होळकर इ. सरदारांचा सूड उगविण्यास सुरुवात केली. त्यातूनच शिंदे व होळकर यांच्यात वितुष्ट आले. यशवंतराव होळकर फौजेसह दक्षिणेत येत आहे. हे ऐकून बाजीराव घाबरला व वसई येथे इंग्रजांच्या आश्रयाला गेला. तेथे त्याने १८०२ मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला, हाच वसईचा तह. या तहानुसार बाजीरावाने इंग्रजांस तैनाती फौजेच्या खर्चाबद्दल काही मुलूख दिला व सेनापती आर्थर वेलस्लीने बाजीरावाची पुण्यास पेशवेपदावर स्थापना केली. मराठ्यांच्या राजकारणांत इंग्रजांचा शिरकाव झाल्यामुळे शिंदे, भोसले, होळकर यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्याचे ठरविले. शिंदे व भोसले यांचे सु. एक लाख सैन्य मोगलाईच्या सरहद्दीवर एकत्र झाले. इंग्रजांनी सर्व प्रांतांतून ५०,००० फौज गोळा केली. त्यांनी चारी बाजूंनी मराठ्यांविरुद्ध मोहीम सुरू केली. जनरल वेलस्लीने अहमदनगरचा किल्ला जिंकला. नंतर तो उत्तरेकडे वळला. उभय सैन्यांची असई येथे गाठ पडली. ⇨ असईच्या लढाईत शिंद्यांचा पराभव झाला. वेलस्लीने बऱ्हाणपूर, असिरगढ ही ठाणी घेतली. त्यानंतर आडळगाव येथे भोसल्यांचा पराभव करुन वेलस्लीने गाविलगडचा किल्ला हस्तगत केला. उत्तरेत सेनापती लेकने शिंद्यांच्या मुलखावर स्वारी करुन अलीगढ, आग्रा, दिल्ली ही शहरे काबीज केली. शिंद्यांच्या दुसऱ्या फौजेचाही लासवारी येथे पराभव होऊन चंबळ नदीच्या उत्तरेचा मुलूख इंग्रजांच्या ताब्यात गेला. भोसल्यांनी कटक प्रांत इंग्रजांस दिला. भोसल्यांनी देवगाव आणि शिंद्यांनी अंजनगाव-सुर्जी येथे इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला. शिंदे व भोसले इंग्रजांविरुद्ध लढत असता होळकर तटस्थ राहिले, तथापि लवकरच त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. १८०४ मध्ये वेलस्लीने होळकरांशी युद्ध सुरू केले. या युद्धात प्रथम यशवंतराव होळकराने इंग्रजांस जेरीस आणले. १८०४ च्या एप्रिलमध्ये होळकरांच्या पाठलागावर गेलेल्या मॉन्सनला पराभूत होऊन पीछेहाट सहन करावी लागली. होळकरांनी गनिमी काव्याने लढून इंग्रजी फौजेची युद्धात भयंकर लूटमार केली. परंतु शेवटी दीग येथे होळकरांचा पराभव झाला. होळकरांना भरतपूरच्या रणजितसिंग राजाने मदत केली म्हणून इंग्रजांनी भरतपूरला वेढा घातला. भरतपूरवर केलेल्या चार हल्ल्यांतही इंग्रजांना यश येऊ शकले नाही. शेवटी भरतपूरच्या राजाने इंग्रजांशी तह केला व होळकरांची मैत्री सोडली. टिपूबरोबर झालेले युद्ध, शिंदे व भोसले ह्यांच्याबरोबरचे युद्ध व होळकरांशी चालू असलेले युद्ध यांत इंग्रजांना बेसुमार खर्च आला. युद्धाच्या धामधुमीमुळे प्रदेश उद्ध्वस्त होऊन ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावरही त्याचा परिणाम झाला. मॉन्सनच्या पराभवामुळे ब्रिटिश फौजेची नाचक्की होऊन इंग्लंडमधून गव्हर्नर जनरलला युद्ध थांबवून खर्च कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वेलस्लीनंतर आलेल्या कॉर्नवॉलिस व बार्लो यांनी भारतात येताच युद्धखर्च कमी करण्याचे प्रयत्न करण्यास सुरुवात केली. २४ डिसेंबर १८०५ मध्ये इंग्रज व होळकर यांचा राजपूरघाट येथे तह झाला. तापी व चंबळ या नद्यांच्या प्रदेशांतील शिंदे व होळकर यांच्या हक्कांच्या बाबतीत ढवळाढवळ न करण्याचे धोरण इंग्रजांनी ठरविले

तिसरे युद्ध : (१८१७–१८१८). आपापसातील युद्धांमुळे मराठ्यांना इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची कुवत राहिली नव्हती. मराठी राज्यात सर्वत्र गोंधळ व अव्यवस्था निर्माण झाली होती. याचा फायदा घेऊन इंग्रजांनी पुन्हा चढाईचे धोरण अंगीकारले. वसईच्या तहानंतर आपण इंग्रजांच्या कह्यात गेलो, याचे बाजीरावास वैषम्य वाटू लागले. त्रिंबकजी डेंगळ्यासारखी माणसे त्याने हाताशी धरली. वसईच्या तहानुसार १८११ पासून एल्फिन्स्टन पुण्यास रेसिडेंट म्हणून राहत होता. बाजीराव व गायकवाड यांच्यातील देण्याघेण्याच्या हिशेबासाठी गंगाधरशास्त्री पटवर्धन हा इंग्रजांच्या हमीने पुण्यास आला होता. बाजीरावाबरोबर पटवर्धन पंढरपुरास गेला असता त्याचा खून झाला. वहीमावरून एल्फिन्स्टनने त्रिंबकजीस अटक केली. पण तो तुरूंगातून निसटून बाजीरावास मिळाला. वरकरणी इंग्रजांबरोबर तह करावा व गुप्तपणे आतून फौज जमवावी या विचाराने बाजीरावाने १८१७ मध्ये इंग्रजांबरोबर नवा तह केला. या तहाने बाजीरावाचे हातपाय अधिकच बांधले गेले, तथापि त्याने युद्धाची तयारी चालू ठेवली. बाजीराव इंग्रजांशी युद्ध करण्याचा प्रयत्न करीत होताच. त्याने इंग्रजांना पेंढाऱ्यांविरूद्धच्या मोहिमेत साहाय्य केले नाही, या सबबीवर इंग्रजांनी त्याच्याविरूद्ध युद्ध सुरू केले. बाजीरावाने बापू गोखले याच्या नेतृत्वाखाली सैन्य उभारले. खडकी येथे पहिली लढाई झाली. तीत एल्फिन्स्टन व स्मिथ यांनी मराठ्यांचा पराभव केला. त्यानंतर कोरेगाव, अष्टी येथे लढाया झाल्या. अष्टीच्या लढाईत बापू गोखले धारातीर्थी पडला. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी पुण्याच्या शनिवारवाड्यावर इंग्रजांचे निशाण लागले आणि मराठेशाहीची इतिश्री झाल्याचे जाहीर झाले. इंग्रजांशी युद्ध करताना आपले सर्व सरदार मृत्यु पावले, बंधू अमृतराव व छत्रपती इंग्रजांना मिळाले हे पाहून बाजीरावला इंग्रजांशी समेट करण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही, असेही बऱ्याच मराठी कागदपत्रांवरून दिसते. 

बाजीरावाशी युद्ध सुरू असताना हेस्टिंग्जने सातारच्या छत्रपती प्रतापसिंहाशी कारस्थान चालू केले होते. बाजीरावाचा पराभव होणार असे दिसताच प्रतापसिंह इंग्रजांस मिळाला. त्याच्याकडे इंग्रजांचा मांडलिक म्हणून सातारचे राज्य ठेवण्यात आले. उत्तरेत १८११ मध्ये यशवंतराव होळकर मरण पावला. त्यानंतर त्याची बायको तुळसाबाई ही संस्थानचा कारभार पाहत असे. बाजीरावाचा पाठलाग करीत इंग्रजांचे सैन्य उत्तरेकडे गेले होते. बाजीरावाच्या साहाय्यासाठी तुळसाबाईने सैन्य धाडले. परंतु तिच्या राज्यातील गोंधळामुळे तिच्याच सैनिकांनी तिला ठार मारले. इंग्रजांनी महिदपूरच्या लढाईत होळकरांचा पराभव केला. त्यानंतर दुसरा मल्हारराव होळकर याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला. १८१६ मध्ये रघुजी भोसले वारल्यावर त्याचा मुलगा परसोजी गादीवर आला. तो मेल्यावर त्याचा चुलत भाऊ आप्पासाहेब याने वारसाहक्कासाठी इंग्रजांशी तह केला. १८१८ मध्ये इंग्रजांनी त्यास नामधारी राजा केले. 

चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर इंग्रजांनी हिंदुस्थानातील मराठ्यांची प्रबळ सत्ता नामशेष केली.  १८१५ मध्ये पेशव्यांच्या राज्याचे एकूण उत्पन्न ९७ लक्ष होते, त्यांतील २३ लाखांचा मुलूख सातारच्या छत्रपतींकडे होता. बाजीरावाला आठ लाखांची नेमणूक दिल्यानंतर इंग्रजांना बाकी उत्पन्नाचा प्रदेश मिळाला. अनेक वर्षे शत्रुत्व करणारी एक सत्ता नामशेष केल्यानंतर इंग्रजांना इतर ठिकाणी राज्यविस्तार करण्यास सोपे गेले. मिरजेचे पटवर्धन, भोरचे पंतसचिव, औंधचे पंतप्रतिनिधी, फलटणचे निंबाळकर, जतचे पवार व अक्कलकोटचे भोसले हे सातारच्या छत्रपतींच्या सत्तेखाली ती गादी खालसा होईपर्यंत राहिले. 

थोरल्या माधवरावांच्या अखेरीपर्यंत मध्यवर्ती मराठी सत्ता बळकट होती. त्याच्या मृत्यूनंतर ती कमकुवत होत गेली. जोपर्यंत स्वत: पेशवे हे सेनापती होते व कर्तृत्ववान होते, तोपर्यंत मराठ्यांची सत्ता एकसंध व प्रबळ होती, पण राजकारणाची सूत्रे नाना फडणवीसाच्या हाती व लष्कराची सूत्रे अनेक मराठा सरदारांकडे गेल्यानंतर मध्यवर्ती सत्ता कमकुवत होऊ लागली. छत्रपतींची सत्ता प्रथम पेशव्यांकडे आली व नंतर हळूहळू सरंजामी सरदारांत विभागली गेली. स्वतंत्र सुभ्याच्या सत्तेसाठी सरदारांत भांडणे सुरू झाली. या भांडणांत वेळोवेळी सरदारांनी इंग्रजांचे साहाय्य घेतले. त्यामुळे इंग्रजांना संधी मिळाली. मराठ्यांमधील राजनीतिज्ञान, शिस्त, राष्ट्राभिमान, प्रगत युद्धशास्त्र व युद्धसामग्री इ. गोष्टींचा प्राय: अभाव त्यांच्या पराभवाला मुख्यत: कारणीभूत झाला. 

पहा : मराठा अंमल 

संदर्भ : 1. Sen, S. N. Anglo-Maratha Relations, Calcutta, 1961. 

            2. Thompson, Edward Garrett, G. T. Rise and Fulfillment of British Rule in India, Allahabad, 1958.  

            ३. केळकर, न. चिं. मराठे व इंग्रज, पुणे, १९६८.

गोखले, कमल