रघुनाथराव पेशवे : (१ ऑगस्ट १७३४-११ डिसेंबर १७८३). उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर (१७७३) असलेला एक पेशवा. पहिला बाजीराव व काशीबाई यांचा हा दुसरा मुलगा असून तो राघो भरारी, राघोबा, दादासाहेब इ. नावांनीही ओळखला जातो. त्याचा जन्म माहुली (सातारा) येथे झाला. बालपण छ. शाहूंजवळ गेले. लहानपणी हा उनाड होता. १७५३ पासून तो स्वतंत्रतेने स्वाऱ्या काढू लागला. त्याची पहिली स्वारी १७५३ ते १७५५ पर्यंत चालली. तीत तो दिल्लीस गेला होता. या स्वारीत राजस्थानातून त्याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्याची दुसरी स्वारीही दिल्लीवरतीच झाली पण १७५७ मध्ये अब्दाली दिल्लीहून अफगाणिस्तानात परत गेल्यावर मग हा दिल्लीस पोहोचला. तेथून तो दिल्लीच्या उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेत घेत अटकपर्यंत पोहोचला व काही मराठे घोडदळाच्या तुकड्या तर पेशावरला जाऊन राहिल्या होत्या पण हा काही कारण नसता १७५८ मध्ये पुण्यास परत आला. १७६० मध्ये भाऊसाहेब पानिपतमध्ये अडकले असता त्यांना साह्य करण्यासाठी बाळाजी बाजीराव राघोबास घेऊन उत्तरेत जात होता तेव्हा राघोबास निजामाला मदतीस आणण्यासाठी दक्षिणेत पाठविले पण निजामाचे मन वळविण्याचा कोणताच प्रयत्न न करता हा दक्षिणेत स्वस्थ बसून राहिला. थोरला माधवराव गादीवर आल्यावर (१७६१) राघोबाने पेशवेपद बळकाविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश आले नाही पण थोरल्या माधवरावाला हयातभर याने त्रास दिला. परिणामतः त्याने राघोबाला नजरकैदेत ठेवले. नारायणरावाच्या कारकीर्दीत त्याच्या पेशवेपद मिळविण्याच्या आकांक्षेने मोठीच उचल खाल्ली. नारायणरावाचा खून होण्यात त्याचे अंग होतेच. शेवटी त्यास काही महिने पेशवेपद मिळाले (१७७३). त्यात स्वार्थी हेतूने इंग्रजांनी त्यास मदत केली तथापि बारभाईच्या कारस्थानामुळे त्याचे काहीएक न चालून शेवटी त्यास बारभाईस शरण यावे लागले. पुरंदरच्या तहानंतर (१७७६) उर्वरित जीवन त्याला कोपरगाव, आनंदवल्ली वगैरे ठिकाणी आणि इंग्रजांच्या आश्रयाखाली सुरत, मुंबई, भावनगर इ. ठिकाणी व्यतीत करावे लागले. कचेश्वर (कोपरगावजवळ) येथे किरकोळ आजाराने तो मरण पावला.
रघुनाथरावाने एकूण तीन लग्ने केली. जानकीबाई (१७४२), आनंदीबाई (१७५५) आणि मथुराबाई (१७७९). या तिघींपैकी आनंदीबाई देखणी व महत्त्वाकांक्षी होती. जानकीबाई १७५५ मध्ये मरण पावली. आनंदीबाई १७९४ मध्ये मरण पावली. आनंदीबाईपासून दोन मुली व भास्कर, बाजीराव आणि चिमणाजी असे तीन मुलगे झाले. पण पहिला भास्कर हा लहानपणीच मरण पावल्याने त्याने अमृतराव नावाच्या एका मुलास दत्तक घेतले होते. बाजीराव व चिमणाजी हे त्यास नंतर झालेले मुलगे. त्याच्या बऱ्याच नाटकशाळा होत्या. रघुनाथरावाच्या ठिकाणी खास कर्तबगारी नव्हती पण जबरदस्त महत्त्वाकांक्षा असल्यामुळे त्याचे पेशवाईत कोणाशीच पटले नाही. महत्त्वाकांक्षेच्या पायी त्याने इंग्रजांचीसुद्धा मदत घेतली, पण त्याच्या नाकर्तेपणामुळे त्याचा कोठेच जम बसला नाही. मराठी इतिहासात त्याला ‘कलिपुरुष’ हे नाव त्याच्या वादग्रस्त व्यक्तिमत्त्वामुळे प्राप्त झाले.
संदर्भ : 1. Mujumdar, R. C. Ed. The Marathas Supremacy, Bombay, 1977.
२. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, मध्य विभाग-१-४, पुणे, १९२५.
३. ओक, प्र. ग. संपा. पेशवे घराण्याचा इतिहास, पुणे, १९८५.
खरे, ग. ह.
“