रक्तरोहिडा : ही संज्ञा तीन भिन्न वनस्पतींच्या संबंधात उपयोगात असून त्यांची वर्णने पुढे दिली आहेत.
(१) रक्तरोहिडा : [हिं. रगतरोडा गु. रगतरोहिडो सं. रोही, रोहितक, कूटशाल्मली इं. वेव्ही-लीव्ह्ड टेकोमेला (बिग्नोनिया) लॅ. टेकोमा अंड्युलॅटा, टेकोमेला अंड्युलॅटा कुल-बिग्नोनिएसी]. फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा लहान सदापर्णी, ९ –१२ मी. उंच व १·५—२·४ मी. घेराचा वृक्ष बलुचिस्तान, अरबस्तान, पाकिस्तान (सिंध) व भारत (पश्चिम व उत्तर) येथे जंगली अवस्थेत व उद्यानांतून आणि रस्त्यांच्या दुतर्फा शोभेकरिता लावलेला आढळतो. फांद्या केसाळ व लोंबत्या असून खोडावरची साल मऊ, लालसर तपकिरी व ⇨त्वक्षायुक्त असते. पाने साधी, मध्यम आकाराची, समोरासमोर किंवा काहीशी एकाआड एक, लांबट व तरंगित किनारीची असतात. या वृक्षाला फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये ५–१० पिवळट-नारिंगी, मोठी, घंटाकृती फुले गुलुच्छ-मंजरी प्रकारच्या फुलोऱ्यावर [⟶ पुष्पबंध] येतात. पुष्पमुकुट व त्याखालचा संवर्त घंटेसारखा असतो. पाकळ्या पाच, केसरदले चार (त्यांपैकी दोन अधिक लांब) व बाहेर डोकावणारी असतात. बिंब वलयाकृती व त्यावर किंजपुट असतो [⟶ फूल]. फळे (बोंडे) मोठी, सपाट, काहीशी वाकडी, लांबट (२० x ०·९ सेंमी.) फुटीर व अनेकबीजी असून बिया अनेक व पंखयुक्त असतात. इतर शारीरिक लक्षणे ⇨बिग्नोनिएसी अथवा टेटू कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
याचे लाकूड कठीण, बळकट, टिकाऊ, करडे किंवा पिवळट तपकिरी असून त्यावर फिकट रेषा असतात. सजावटी सामान, कोरीव काम, शेतकीची अवजारे, बांधकाम, गाड्या, तेलघाणे इत्यादींस ते फार चांगले असते. गुरे पाला खातात. जून साल कातडी कमावण्यास वापरतात. कोवळ्या फांद्यांची साल उपदंशावर देतात. हा वृक्ष रुक्षता व आग सहन करू शकतो व तो वनरोपणास उपयुक्त आहे. बिया किंवा छाट कलमे लावून अभिवृद्धी (लागवड) करतात.
देशपांडे, सुधाकर
(२) रक्तरोहिडा : (रगतरोडा, कारी क. मुळ्ळ मुत्तलगिड, हौळकुंचा लॅ. मॅबा नायग्रेसेंस कुल-एबेनेसी). सुमारे ४·५—१०·५ मी. उंच वाढणारी ही वनस्पती सखल प्रदेशात मोठ्या झुडपाएवढी आणि सावलीत लहान वृक्षाएवढी असून तिचा प्रसार भारतात कोकण, उत्तर कारवार ते म्हैसूरपर्यंत आहे. अंबोली येथील दाट जंगलात आणि समुद्रसपाटीपासून १,८०० मी. उंचीपर्यंत तो आढळतो. कोवळ्या भागांवर लालसर लव असते खोडावरची साल करडी, खरबरीत असून तिच्या ढलप्या पडून गेल्यावर आतला भाग काळा दिसतो. पाने साधी, एकाआड एक, विविध स्वरूपांची (३–७·५ x १·३–२·५ सेंमी.), चिवट किंवा पातळ, गुळगुळीत, वरच्या बाजूस चकचकीत किंवा कधीकधी लालसर लवदार असून वाळल्यावर काळी होतात. फुले एकलिंगी, पण भिन्न झाडांवर, लहान, पिवळी, आखूड देठाची आणि त्रिभागी असतात. पुं-पुष्पे स्त्री-पुष्पांपेक्षा लहान व तीन स्त्री-पुष्पे एकाकी व बिनदेठाची आणि पानांच्या बगलेत येतात. फुले नोव्हेंबर-फेब्रुवारीत येतात. इतर सामान्य लक्षणे ⇨एबेनेसी अथवा टेंबुर्णी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. मृदू फळे गोल (६·५–१२·५ सेंमी.), गुळगुळीत व पिकल्यावर पिवळी होतात बी १—३. याचे लाकूड करडे-तपकिरी, सुबक, कठीण व टिकाऊ असते.
जमदाडे, ज. वि.
(३) रक्तरोहिडा : (रगतरोडा लॅ. ऱ्हॅम्नस वाईटाय कुल – ऱ्हॅम्नेसी). सह्याद्री घाट व निलगिरी आणि तेथून खाली दक्षिणेकडे श्रीलंकेपर्यंत हे मोठे पानझडी झुडूप सु. २,००० मी. उंचीपर्यंत आढळते. याला साधी, एकाआड एक, ६·२–१० x २·२–४·६ सेंमी., आयत-अंडाकृती, लांबट टोकाची व किनारीवर सूक्ष्म दाते असलेली पाने असतात. पानांच्या बगलेत लहान फुले येतात संदले व प्रदले ४-५ व सुटी केसरदले पाच किंजपुटात ३-४ कप्पे, किंजले ३-४ व तळाशी जुळलेली असतात [⟶ फूल]. मृदुफळे ०·५ सेंमी. व्यासाची, गोलसर, गुळगुळीत व लालसर जांभळी असतात. इतर शारीरिक लक्षणे ⇨ऱ्हॅम्नेसीत अथवा बदरी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. याची साल (रक्तरोहिडा) जाड, कठीण व लालसर असते. ती कडू असून तिच्यात पौष्टीक व रेचक गुण असतात तिच्यात रेझीन व टॅनीन असते. रक्तयुक्त आमांशात जून सालीचे सरबत देतात. सूज, रक्त साकळणे व मूळव्याध यांवर ताजी साल पाण्यात उगाळून लेप करतात. ⇨रोहितकाची व ⇨हळदूचीही साल रक्तरोहिडा नावाचेच विकली जाते. (चित्रपत्र ५८).
परांडेकर, शं. आ.
संदर्भ : 1. Cooke, T. Flora of the Presidency of Bombay, Vol. I, Calcutta, 1958.
2. C. S. I. R., The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.
3. Randhawa, M. S. Flowering Trees, New Delhi, 1965.
“